कृष्णद्वादशी : वासुदेव द्वादशी
एक व्रत. या द्वादशीस उपवास, वासुदेवाची पूजा करतात. या तिथीस 'वासुदेव द्वादशी' असेही नाव आहे.
* गुरुद्वादशी
आश्विन व. द्वादशीस 'गुरुद्वादशी' असे म्हणतात दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही पुण्यतिथी होय.
आश्विन वद्य द्वादशीस । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥
या दिवशी दत्तक्षेत्रामध्ये विशेषत: नरसोबाच्या वाडीस दीपोत्सव, गुरुचरित्राची पारायणे; संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.
* गोवत्स द्वादशी
आश्विन व. द्वादशीला हे व्रत करतात. यासाठी प्रदोषव्यापिनी तिथी मानली जाते. जर दोन्ही दिवस प्रदोषव्यापिनी असेल अगर दोन्ही दिवस नसेल, तर
'वत्सपूजा वटश्चैव कर्तव्ये प्रथमेऽदिने'
यानुसार व्रत पहिल्याच दिवशी करतात. संध्याकाळी गाई चरून आल्यानंतर तुल्य रंगाच्या गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून-
'क्षीरोदार्णवसंभुते सुरासुर नमस्कृते ।
सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ।'
हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि
'सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनी ।'
अशी प्रार्थना करावी. महत्त्वाची एक गोष्ट आहे की, त्या दिवशीच्या जेवणात गाईचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच तेलात तळलेली भजी इ. पदार्थ असू नयेत.
या तिथीला 'वसुबारस' असेही म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गाईची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करता -
'तत: सर्वमये देयि सर्वदेवैरलङ्कृते ।
मतर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ॥'
या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ खात नाहीत. गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. गाईला उडदाचे वदे, भात, गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात या व्रताला 'वछबाँछ' असे म्हणतात.
* नीरांजन द्वादशी
आश्विन व. द्वादशीला प्रात:स्नानादि होताच काशाच्या चकचकीत ताम्हणात गंध, पुष्प, अक्षता, पाण्याने भरलेले भांडे इ. ठेवून मग त्या ताम्हणाने देव, ब्राह्मण, आपल्यापेक्षा वयाने मोठे, आई-वडील, तसेच घोडे इ.ना ओवाळावे. लागोपाठ असे पाच दिवस केल्यास अक्षय फलप्राप्ती होते.