कामधेनुव्रत
व्रतावधी कार्तिक व. एकादशीपासून पाच दिवस. याच्या देवता श्री व विष्णू या आहेत. घर, गोठा, चैत्य, देवालय, रस्त्ता, स्मशानभूमी व तलाव या ठिकाणी दिवे लावणे, रात्री फाशांनी खेळने, एकादशीस उपवास करून विष्णुमूर्तीला गाईच्या दुधाने किंवा तुपाने स्नान घालणे, असा याचा विधी आहे.
फल - सर्व पापांची निष्कृती.
कृष्णैकादशीव्रत - उत्पत्ती एकादशी
कार्तिक व. एकदशीला 'उत्पत्ती एकादशी' असेही म्हणतात. प्रात:स्नानादी नित्य कर्मे झाल्यावर
'ममाखिल पापक्षयपूर्वक श्रीपरमेश्वरप्रीतिकामनया कार्तिक कृष्णैकादशीव्रतं करिष्ये ।'
असा संकल्प करून उपोषण करावे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणेच तिथीचा निर्णय घ्यावा व व्रताचे नियम पाळावे.
श्रीक्षेत्र आळंदी वारी
ही वारी कलियुगातील मोक्षदायी वारी असून कार्तिक व. एकादशीस करतात. आळंदी येथे श्रीज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. त्यामुळे आळंदीस क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुराणान्तरी ह्या क्षेत्राचा शिवपीठ म्हणून महिमा गाजत होता. पूर्वी या क्षेत्रास आनंदविपिन, वारुण, कपिल, अलका व सिद्धक्षेत्र अशी पाच नवे असल्याचा स्कंदपुराणात उल्लेख आहे व संतांच्या अभंगात अलंकापुरी, अलंकापूर, अलंकावती या नावांनी आळंदीचा उल्लेख योतो. पुढे शके ६९० त 'अलंदीय' असा उल्लेख सापडतो. त्यासच पुढे 'आळंदी' हे नाव प्राप्त झाले.
श्रीज्ञानेश्वरांचा जन्म श्रावण व. अष्टमीच्या मध्यरात्री म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी, कृष्णजन्माच्या वेळी झाला म्हणून त्यांना विष्णुचा अवतार मानतात. ज्ञानदेवांनी धर्म, अर्थ, काम व मोक्षाचे हे चार पुरुषार्थ सांगून वारकरी सांप्रदायात भक्ती हे मोक्ष आणि स्वात्मसुखाचे श्रेष्ठ साधन असल्याचे सांगून, प्रसंगी चमत्कार दाखवून ईश्वरभक्ती वाढविली. एवढेच नव्हे तर भगवान विष्णु ज्ञानेश्वरांच्या रूपाने अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले असल्याने त्यांनी
'यारे यारे लहानथोर । याती भलते नारीनर ।'
करावा विचार । न लागे चिंता कोणासी ॥'
असे म्हणून सर्व अधिकारांच्या लोकांना पाचारण केलेले आहे.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ व अभंग इ. ग्रंथ मुमुक्षूंसाठी लिहून ठेवावे. नंतर ज्ञानदेवांना आपले इहलोकीचे कार्य समाप्त झाले, असे वाटले. म्हणुन पांडुरगाजवळ त्यांनी समाधीची अनुज्ञा मागितली. पांडुरंगाकडून वचन मिळाले ते-
कृष्णपक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥५॥
कार्तिक शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी ।
दुसरी कृष्णपक्षी निर्धारेसी । तुज दिधली असे ॥६॥
असे वचन मिळताच ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेण्याचा आपला निर्धार जाहीर केला.