* अनघा व्रत
कार्तिक कृ. अष्टमीला दर्भाचे अनघ व अनघा बनवून शेणाने सारवलेल्या पेढीवर त्यांची स्थापना करावी आणि गंधपुष्पादींनी पूजा करावी. अशा प्रकारे एक वर्षापर्यंत प्रत्येक व. अष्टमीस केले असता, सर्व पापे नाहीशी होतात.
* अहोई आठे
कार्तिक व. अष्टमीला. प्रदेशात हे नाव आहे. हे पुत्रवती स्त्रीचे एक व्रत. त्या दिवशी उपवास करून सायंकाळी भिंतीवर आठ कोठे असलेला एक देवीचा कणा रेखतात. त्याच्याखाली एक माळ व तिचे पिलू काढतात. भिंतीच्या मुळात कलश स्थापन करतात. मग त्या सर्वांची पूजा करून दूध-भाताचा नैवेद्य दाखवितात.
* कालाष्टमी व्रत
एक शैव व्रत. आश्विन व. अष्टमीस हे व्रत विहित आहे. कार्तिक व भाद्रपद व. अष्टमी व या तिथीही या व्रतला उक्त सांगितल्या आहेत. व्रतविधीस दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदय झाल्यावर भिंतीवर शेंदुराने शिव आणि चंद्र काढून त्यांची पूजा करतात. या पूजेत आठ दिवे लावतात. आठ पात्रांत वडे, पुर्या पायस इ. खाद्य वस्तू ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवितात. ही पूजा कालभैरवा (शिवा) ची असते. पूजेचा ध्यानमंत्र -
अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम्।
चंद्रमासहितं शुक्ल मृत्युंजय नमोऽस्तु ते ॥
या दिवशी
'जागरं चोपवासं च कृत्वा कलष्टमीदिने ।
प्रयत: पापनिर्मुक्त: शैवो भवति शोभन: ॥'
या वचनानुसार उपोषण करून रात्री जागर करावा, म्हणजे सर्व पापे नाहीशी होतात आणि व्रत करणारा शैव बनतो.
* दांपत्याष्टमी
या व्रतास कार्तिक व. अष्टमीला प्रारंभ करतात. या व्रतात प्रत्येक महिन्यातील वद्य अष्टमीच्या दिवशी उमा-महेश्वराच्या दर्भाच्या मूर्ती करून त्यांची पूजा करतात. त्यांना प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी निरनिराळी फूले वाहतात. निरनिराळ्या खाद्य पदार्थांचे नैवेद्य दाखवितात. वर्षानंतर व्रताचे उद्यापन करतात. त्यावेळी दांपत्य-भोजन घालतात आणि त्याला तांबड्या रंगाची वस्त्रे व दोन सुवर्णधेनू दक्षिणा म्हणुन देतात.
फल- पुत्र, विद्या व शिवलोक यांची प्राप्ती.
* भैरव जयंती
कार्तिक व. अष्टमीला हे व्रत करावे. प्रत्येक प्रहराला भैरवाची यथाविधी पूजा करावी आणि
'भैरवार्घ्यं गृहाणेश भीमरूपाव्ययानघ ।
गृहाण्यार्घ्यं भैरवेदं सपुष्पं परमेश्वर ॥'
'पुष्पांजलिं गृहाणेश वरदो भव भैरव ।
पुनरर्घ्यं गृहाणेदं सपुष्पं यातनापह ॥'
असे तीन मंत्र म्हणून तीन अर्घ्यं द्यावेत. रात्री जागर करावा आणि शिवकथा श्रवण करावी. सर्व पापांचे क्षालन होते. भैरवाचा जन्म मध्यान्ही झाला होता म्हणून व्रतासाठी मध्यान्हव्यापिनी अष्टमी घ्यावी.