* करक चतुर्थी व्रत
हे एक स्त्रीव्रत आहे. कार्तिक व. चतुर्थीस हे व्रत करतात. गौरी ही या व्रताची प्रधान देवता असून शिव, गणेश व कार्तिकेय या गौण देवता आहेत. हे व्रत सायंकाळी करतात. या व्रताचा विधी-
व्रत-देवतांची चित्रे काढून ती वडाच्या झाडाखाली पूजास्थानी ठेवतात. मग स्नान संकल्प, गणपतिपूजा इ. झाल्यावर गौरीची पूजा करतात. मग पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणा हरिवल्लभे ॥
या व्रतात अन्नधान्य, दीपसहित दहा जलपूर्ण कुंभांचे दान, पोळीचा नैवेद्य, चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्यप्रदान करावयाचे असते.
फल -सौभाग्यप्राप्ती
* दशरथ चतुर्थी
कार्तिक व. चतुर्थीला 'दशरथ चतुर्थी' असे म्हणतात. हे एक व्रत आहे. एका मातीच्या पात्रात दशरथाची आणि दूर्गेची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करतात. हिला करक (करक = करा = मातीचे भांडे ) चतुर्थी असेही म्हणतात.
फल - सर्व प्रकारच्या फलांचा लाभ.
* संकष्टी
या चतुर्थीला 'बहुला चतुर्थी' म्हणतात. ही वक्रतुंडाची तिथी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व दिवस दूध पिऊन व्रत करावे. उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर पुन्हा स्नान करून वक्रतुंडाची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर ब्राह्मणभोजन घालून सुवर्णदक्षिणा द्यावी. मग स्वत: जेवावे. हे व्रत पापविनाशी आहे. यायोगे सर्व दु:खांचे अपहरण होते व सुख मिळते. या व्रताच्या आचरणाने पूर्वीच्या काळी कर्दम नावाचा राजा क्षयरोगमुक्त होऊन अंती देवलोकास गेला. तसेच एक पापकर्मा, अत्याचारी चांडाळ अनायासे घडलेल्या व्रताच्या प्रभावाने देवलोकी गेला.