|
क्रि.वि. पु. पूर्णता ; प्राचुर्य ; उत्कर्ष ; सीमा ; वैपुल्य ; कळस ; पर्व ; ऊत ; लोट ; बहार ; रंग ( धान्य , तारुण्य , आरोग्य , मान , संपत्ति , खेळ , उद्योग यांचा ). सति भर आनंदाला जो देतो तोचि भर विलापाला । - मोसभा ७ . ५५ . गाण्याला आतां भर आला आहे . पक्षी बसल्या जागेवरुन अकस्मात उडण्याच्या , गवत अकस्मात भडकतांना होणार्या आवाजाचें अनुकरण होऊन . एका क्षणांत , झटक्यांत , पळांत . [ ध्व ; भर ] आवड ; कल ; मनोवृत्ति ( उद्देश , इच्छा , प्रवृत्ति , आवड यांचा ). पोरांचा प्रायः खेळाकडे भर असतो . बार ( बंदुकीचा ). माज ; मस्ती ; कामुकावस्था ( पशूंची ). भरतें ; उत्तेजन . आवेश . यमानें त्या भरांत सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला . उत्साह ; डौल . उभे सडे फौजेंत भरानें । - ऐपो २६७ . सपाटा . होतां द्विज भोजन भर दुंदुभिचा पळहि तो न रव राहे । - मोआश्व ५ . १३ . भार ; ओझें . प्रपंच भर घे शिरीं करि कृपा पिता त्यावरी । - केका ९४ . ९ ( दुखण्याचा ) जोर ; आवेगं ( शोकाचा ). ( गो . ) नाद ; फंद . भरीक पडचें . स्त्री. भरती ; भरताड ( गलबताचें , गाडीचें ); बुजलेली स्थिति ; बूज ( तालीची , जाड भिंतीची ); पूरण ; उणीव भरुन काढणें ( संख्येची , परिमाणाची ). आधिक्य . जेवणाच्या पदार्थांत कांहीं भर लागल्यास ते बंदरावर विकत घेत असूं . - पाव्ह ४६ . भरुन काढण्यासाठीं टाकलेली माती , दगड इ० ( झाडाच्या मुळांवर , बांधाच्या , भिंतीच्या मध्यें इ० ). पडवीची जमीन वीतभर खोल आहे , भर घालून ती ओटीच्या जमीनीबरोबर करावी . पूरण ; पुरी करण्यासाठीं मिळविलेली संख्या , परिमाण , तुकडा इ० उदा० रकमेची , कापडाची मापाची भर . - क्रिवि . ( शब्दाच्या पुढें जोडल्यानें ) पर्यंत ; इतकें ; पूर्णपणें . उदा० तोळाभर सोनें ; कोसभर वाट . मणभर - भयभर - प्रीतिभर - आनंदभर इ० साद्यंत , इथून याअर्थी . उदा० तिथून पृथ्वीभर ; गांवभर ; महिनाभर इ० शब्दाच्या मागें जोडल्यास परममर्यादेपर्यंत ; पूर्णतम , उच्चतम स्थितींत , असा अर्थ होतो . उदा० भर - अम्मल - आकार - वैराग्य - हंगाम - पीक - ओझें - कचेरी - अमदानी - दौलत - कोस . मूठभर रुपये दिले = मुठीच्या पूर्णमानाइतके रुपये दिले . आणि भरमूठ रुपये दिले म्हणजे पराकाष्ठा करुन मुठींत जितके राहूं शकतील तितके ( चोंदूनचोंदून भरुन ) रुपये दिले असा अर्थ . [ सं . भृ = भरणें ; पोसणें ; भर ] ०करणें भरणें ; कंठापर्यंत घालणें ; तृप्त करणें ; आपण न भोगतां दुसर्यास देऊन टाकणें . आपण स्वतः खाल्लें नाहीं , दान धर्महि केला नाहीं , शेवटीं चोराची मात्र भर कली ! न्यूनता पुरी करणें . ०घालणें देणें - उठावणी करणें ; उत्तेजन देणें ; चेतवणें . ०घेणें आपणांस पुरेसें घेणें . आपल्या भरानें चालणें , भरानें चालणें क्रि . आपल्या स्वतःच्या ( अविचारी ) मार्गास अनुसरणें ; स्वच्छंद वागणें . भरीं घालणें , देणें प्रवाहांत , मार्गांत टाकणें ; चेतविणें ; नादीं लावणें . तमोगुणें भरी घातलेसे । - तुगा ५३९ . भरीचा वि . पूरक ; भरपाई करणारा ; भरतीचा ; पुरवणीचा . पुरा करण्यास , भरुन काढण्यास पुरेसा असलेला . भरीं पडणें - आंत पडणें ; सहकारी होणें ; भुलून जाणें . भरीस पडणें पहा . भरीं भरणें - अतोनात नादीं लागणें ; पूर्णपणें ग्रासला जाणें ; हांवभरी होणें . बहुमास भरीं भरला प्रियसख सचिवांसि विसरला निपट । - मोवन ४ . ९८ . विनाकारण हट्टास पेटणें . भरीस घालणें - न्यूनता नाहींशी करण्यासाठीं कमी असेल तें घालणें . चढविणें ; उत्तेजन देणें . लोकीं भरीस घातलें । - दा ३ . ५ . १३ . भरीस देणें - तोंडापुढें करणें ; नादीं लावणें . सर्व उदासीनपणें पाहति आम्हांसि देवुनी भरिला । - मोआदि ४ . ८३ . भरीस पडणें - भरतीस पडणें ; ( एखादी गोष्ट , काम , मनुष्य इ० च्या ) कमीपणा , अडचणी भरुन काढण्यासाठीं वेंचलें जाणें ; खर्च होणें ; नष्ट होणें ; गडप , ग्रस्त केलें जाणें . त्याची सर्व संपत्ति रांडांचे भरीस पडली . अभिमानास पेटणें . मी बाळपणापासून संसाराच्या भरीस पडलों . ( सकर्मक ) भरीस घालणें . भरुन येणें - मनांतून जाणें ; विस्मरण पडणें ( शोक इ० ). पूर्ण बरी होणें ( जखम ). सामाशब्द - ०अमदानी स्त्री. पूर्णावस्थेची अमदानी , कारकीर्द . ०अमली वि. पूर्णत्वानें सरकारच्या अमलाखालीं असणारा ( गांव , जिल्हा , तालुका इ० ). ०अम्मल पु. पूर्ण अंमल , सत्ता . ०उभर स्त्री. भरणें , उपसणें ; भरणें व ओतून टाकणें . भरणें आणि रितें करणें उदा० एखादा पदार्थ घेतांना मापणें आणि खात्रीकरितां तो पुनः मापणें . मापाची भरउभर केल्यास मोजलेला दाणा कमीजास्त होतच आहे . ( ल . ) मिळविणें व गमावणें , खर्च करणें . संसाराची भरउभरच आहे . ( वाईट अर्थानें ) उठावणी , मथवणी ; उभारणी ; मन वळविणें ; छाप बसविणें ( मत , उद्देश , विचार यांची ). ( ल . ) एखाद्या गोष्टीविषयीं विचार करणें , बोलणें . [ भरणें + उभरणें ] ०कचेरी स्त्री. मनुष्यांनीं पूर्ण भरलेली कचेरी . ०कवळ्या पु. ( गुर्हाळ ) एक इसम प्रथम चरकांत कांडें लावतो , व त्यांतील रस निघाल्यावर दुसरा इसम तेंच कांडें पुनः लावून उरलेला रस काढून घेतो . यापैकीं पहिला इसम . - कृषि ४७३ . ०कुंब कूम खूम - वि . ( राजा . ) स्थिर , गंभीर , शांत , प्रकृतीचा . पुष्कळ . [ भर + कुंब ] ०कोंडा पु. ( कु . ) तूस ( कणिकेंतील ). ०खुम वि. ( गो . ) भरभक्कम . ०खुमी स्त्री. स्वभावाची स्थिरता ; विचारीपणा , अमत्तता ; गांभीर्य . ०गच्चा वि. भरचक्का व भररट्टा पहा . ०गच्ची वि. सोनेरी , रुपेरी , कलाबतू ज्यांत फार विणली आहे असें ( कापड , अशा कापडाचा केलेला अंगरखा इ० ). ०गच्ची - न . चांगल्या चमचमीत पदार्थांनीं पोट भरणें ; आकंठ भोजन . जेवण - न . चांगल्या चमचमीत पदार्थांनीं पोट भरणें ; आकंठ भोजन . ०गत गीत - स्त्री . भरती , भरताड ( गाडीचें , पोटाचें ). भरुन काढलेली स्थिति ( धक्का , बंधारा , जाड भिंत यांची ). पूरण ; पूर्तता ( संख्या , परिमाण यांची ). - न . बारदान ; भरताड ; ओझें ; आंतील जिन्नस . ( गलबत , गाडी इ० च्या ) ( कों . ) पूर्ण . ०गांव पुन . दाट वस्तीचा गांव ; घरें जवळजवळ असून वस्ती मोठी असलेला भाग . ०गोणी स्त्री. भरलेली , सबंध गोणी , पोतें ; भरजकात बसण्याजोगी गोणी . ०गोळी स्त्री. गोळीचा टप्पा ( लांब पल्ल्याच्या बंदुका , तोफा यांच्या ). - क्रिवि . गोळीच्या अंतरावर , टप्प्यांत . ०घोसानें क्रिवि . प्रतिष्ठा न गमावितां ; ऐटीनें ; धौशा वाजवीत ; चढ्या घोड्यानिशी . भर घोसानें श्रीमंत त्यावर पुण्यास येतां क्षणीं । - ऐपो ३९६ . ०चक्का वि. चांगल्या वस्तूंची चंगळ असणारी ( मेजवानी ); तब्बल ; ओकारी येण्याइतकें ; यथेच्छ ( भोजन ). चिकार ; दाट भरलेला ; गडगच्च ; प्रचुर ; विपुल ( जेवण - अलंकार , वस्त्र , आंबे , लाडू , पीक , पाऊस , हंगाम , पावसाळा , उन्हाळा ). ०चंदी स्त्री. घोड्यास खाण्यास देण्याचें भरपूर धान्य . ( ल . ) भरपूर अन्न . ०चौक स्त्री. घोड्याची भरधांव चाल . ०जमा स्त्री भरजमाबंदी ; सर्व जमाबंदी ( देश , गांव इ० ची - सादिलवार ; बूड इ० च्या वजा वाटीच्या पूर्वीची ). ०जमीन स्त्री. पूर्णधारा असलेली जमीन . ०जरी वि. पुर्णपणें सोन्यारुप्याच्या कलाबतूचा केलेला . ( कपडा , गोंडा , कापड ). ०जवानी जानी ज्वानी - स्त्री . ऐन उमेदीचें वय . तारुण्याचा भर . [ भर + फा . जवानीं ] ०ज्यहा ज्याहा ज्यहा झ्याल - क्रिवि . भरदवड पहा . ०डाव पु. ( गंजिफा व बुद्धिबळ ) पुर्ण स्थितींतील डाव ( भारी पानें खेळण्याच्या , भारीमोहरीं घेण्याच्या पूर्वीचा ). ०तिन्ही - स्त्री . पूर्ण तिन्हिसांजाची वेळ ; ऐन संध्याकाळ ; याच्या उलट . फुटकी तिन्हिसांज सांज - स्त्री . पूर्ण तिन्हिसांजाची वेळ ; ऐन संध्याकाळ ; याच्या उलट . फुटकी तिन्हिसांज ०तीर पु. बाणाच्या फेकीचें अंतर , बाणाचा टप्पा . - क्रिवि . अमुक अंतरावर . ०तोंडली स्त्री. सबंध ; मसाला भरुन केलेली तोंडल्यांची भाजी . ०दंड पु. भूर्दंड ; दुसर्याचा जिन्नस आपल्या हातून हरवला किंवा जामीनकी अंगास आली असतां भरावा लागणारा पैका . ०दवड दौड धांव पल्ला धूम दपट - स्त्री . पु . पूर्णदौड , धांव ( घोड्याची , मनुष्याची ). - क्रिवि . पुर्ण वेगानें ( दवडणें , धांवणें , दपटणें , हांकणें , पिटणें , चालवणें , दामटणें , काढणें , पळणें ). ०दार वि. चांगला भरलेला ; दळदार ; गरभरु ; ठसठसीत . पूर्ण वाढ झालेला ; पिळदार ( माणूस , घोडा , छाती , दंड इ० ). ०दोनप्रहर पु. ऐन दुपार . ०दौलत स्त्री. संपत्ति आणि वैभव यांची भरती , बहार . ०धांव चाल - स्त्री . घोड्याची - जलद चाल ; चौपायीं जलद धांवत जाणें . ०नकशी क्षी - वि . पूर्ण नकशीचा ( कांठ ); असल्या काठांचा ( कपडा ). अतिशय कोरींव काम असलेला ( स्तंभ , छत , चौकट इ० ). ०नवती स्त्री. ऐन तारुण्याचा , हिंमतीचा भर , कळस , बहर . ०पंचविशी स्त्री. मनुष्याची ऐनउमर ; प्रौढदशा ; पुरुषाची उमेदी , वय . ०पायी ई - स्त्री . भरपावती ( येणें असलेल्या रकमेची , सालाची ). भरपावतीची रसीद ; प्रायः भरपाई भरुन पावलों हे शब्द लिहून ) केलेला इकरार . ०पायी , पाई , लिहून देतों - उद्गा . ( कंटाळा , अतितृप्ति दाखविणारे शब्द ) बस , पुरें करा . झाली , पाई , लिहून देतों - उद्गा . ( कंटाळा , अतितृप्ति दाखविणारे शब्द ) बस , पुरें करा . ०पावलीं क्रिवि . भरचालीनें भरगतीनें . ( क्रि० पळणें ; धांवणें ; चालणें ; येणें ; जाणें ). [ भर + पाऊल ] ०पितळ वि. ( कु . ) पितळ , कलाबतू लावून शोभिवंत केलेलें ( पायतन , वहाण ) ०पूड न वाहणार्या फोडावर , उठाणूवर ( हवेंत उघडें पडल्यानें ) येणारी पातळ त्वचा . ( क्रि० धरणें ; फुटणें ; वाहणें ; निचरणें ; गळणें ). अशा रीतीनें बंद झालेलें सपूयक्षत . ०पूर वि. पूर्ण भरलेलें ; भरुन काढलेलें ; चोंदलेलें . प्रचुर ; मुबलक . पूर्ण . गंभीर ; भरघोंस ( आवाज ). [ हिं . ] ०पेट वि. भरपूर . ०पोट क्रिवि . भरलेल्या पोटानें , पोटावर पोटभर ( खाणें , पिणें ). ०पोशाख पु. विशिष्ट दिवशीं किंवा प्रसंगीं घालावयाचा पोशाख ; खास पोशाख . ०बादली वि. पूर्णपणें सोन्याच्या , रुप्याच्या कलाबतूचा केलेला ( गोंडा , कपडा , कापड ). ०बिंदु पु. आकाशांतील क्रांतिवृत्ताचे विषुवापासून अति दूरचे बिंदु . - सूर्य २१ . ०भक्कम वि. प्रचुर ; बहुत ; मुबलक . अतिशय भरलेला , चोंदलेला ; आकंठ भरलेला . ०भार पु. पूर्ण भार , वजन . गुरुचा भरभार साहावया जाण । - एभा १२ . ५५९ . ०मजल स्त्री. पूर्ण मजल ( प्रवासाची ). क्रिवि . भरमजलीनीं ( प्रवास करणें ). [ भर + अर . मनझिल ] ०मजलस मजालस - स्त्री . भरसभा ; भरलेली कचेरी . [ भर + अर . मजलस ] ०मजला पु. मोठा व उंच वरचा मजला ( घराचा ). - वि . मोठा व उंच असा वरचा मजला असलेलें ( घर ). ०माहा क्रिवि सर्व महिना . एक भरमाहा घास दाणीयाचे ऐवजीं ... - वाडबाबा १ . १७६ . ०मूठ स्त्री. पूर्ण भरलेली मूठ ( धान्य इ० कानीं ). ०रट्टा वि. भरचक्का पहा . भर ; मोठा ; भक्कम ; भारी या अर्थींहि योजतात . उदा० भररट्टा मजल - कोस - पक्का . तबल , जबर , जरब शब्द पहा . ०रस्ता पु. हमरस्ता . ०रास स्त्री. शेतांत पिकलेल्या धान्याची एकत्र केलेली रास , ढीग . ( भागीदारांत वांटण्याच्या पुर्वीची ). ( सामा . ) रास , ढीग . ०वयाचा वि. प्रौढ , पोक्त ; भरजवानीचा ; ०वसूल पु. ( देश , गांव , जमीन इ० पासून ) मिळालेला पुर्ण वसूल . ०वसुली वि. ज्याचा भरवसूल ( कांहीं वजावाट न होतां ) मिळाला आहे असा ( गांव , शेत इ० ). ०वांगीं नअव . निरनिराळ्या फोडी न करतां चिरुन , मसाला भरुन केलेली सगळ्या वांग्यांची भाजी . ०वायकी स्त्री. ( व . ) बढाई . ०शाई स्त्री. गंभीर आवाज निघण्याकरितां पखवाजाच्या मध्यभागावर लावलेला शाईचा जाड थर , याच्या उलट पाणशाई . ०सांड वि. भरपूर , रगड . ०सुगी स्त्री. ऐन हंगाम . ०हाक स्त्री. भर आवाजानें मारलेल्या हांकेचें अंतर , टप्पा . क्रिवि . अशा अंतरावर , टप्प्यावर .
|