|
स्त्री. दर पंधरवड्यांतील प्रतिपदेपासून अकरावी तिथि . हिचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत . ज्यावेळीं दोन दिवस एकादशी असते त्यावेळीं पहिली स्मार्त व दुसरी भागवत असें धरितात . दर महिन्यांतील शुक्ल आणि कृष्ण पक्षांतील एकादशींचीं जीं निरनिराळीं नांवें आहेत तीं अनुक्रमें पुढीलप्रमाणें - चैत्र - कामदा , पापमोचनी ; वैशाख - मोहिनी , वरुथिनी ; ज्येष्ठ - निर्जला , अपरा ; आषाढ - शयनी , योगिनी ; श्रावण - पुत्रदा , कामिका ; भाद्रपद - परिवर्तिनी , अजा ; अश्विन - पाशांकुशा , इंदिरा ; कार्तिक - प्रबोधिनी , रमा ; मार्गशीर्ष - मोक्षदा , फलदा ; पौष - प्रजावर्धिनी , सफला ; माघ जयदा , षटतिला ; फाल्गुन - आमलकी , विजया . [ सं . ] म्ह० एकादशीच्या घरीं शिवरात्र - जेव्हां एका संकटामागून दुसरें येतें , किंवा एका कंगालाजवळ दुसरा कंगाल भिक्षा मागतो तेव्हां ही म्हण योजतात . ०वात स्त्री. चार बोटांच्या रुंदीवर २५० फेरे घेऊन ( ५०० सुतांची ) कापसाची एक वात तयार करतात . अशा दोन वाती आषाढी एकादशीपासून एक वर्षभर दर एकादशीस लावतात .
|