|
पु केवळ चक्षुरिंद्रियानां जाणतां येतो असा पदार्थाच्या ठिकाणीं जो पांढरेपणा , तांबडेपणा इ० वर्ण तो ; एखद्या वस्तूवर प्रकाश पडला असतां ती वस्तु ज्या रंगाची असेल त्या रंगाच्या किरणाशिवाय इतर किरण शोषले जाऊन त्या रंगाचे किरणच फक्त बाहेर टाकते . त्यास रंग म्हणतात . - ज्ञाको ( र ) २ . रंगाची पूड ; पदार्थाला तांबडा , काळा इ० कोणताहि वर्ण देण्याचें द्रव्य ; रंगविण्याचें द्रव्य . ( ल . ) तेज ; तेजस्विता , चकाकी ; भपका ; गायन , कीर्तन , तमाशा , भाषण , इ० लोकांचीं अंतःकरणें रमण्याजोगा पडणारा शोभाविशेष ; मजा ; शोभा ; आनंद . आजचे गाण्यास रंग चांगला आला . देखणेपणा ; उत्कृष्टता ; चांगली स्थिति ( मनुष्य , वृक्ष , बाग , शेत , इ० पदार्थांची किंवा संसार , व्यवहार इ० ची ). नुकता संसार रंगास आला तों बायको मेली . देखावा ; आकार ; ढब ; डौल ; घाट ; अंदाज ; चिन्ह ; परिस्थिति ; प्रसंग ; संधी . ( क्रि०दिसणें ). आज गरमी होती तेव्हां पाऊस पडेलसा रंग दिसतो . उन्हाचा - वार्याचा - आभाळाचा - दिवसाचा - काळाचा - धारणेचा - भावाचा - पिकाचा - चाकरीचा - रंग . तूं शालजोडी मागशील तर पहा , मागण्याचा रंग आहे . सोंगट्यांचे चार भिन्न प्रकार ; गंजिफांचे निरनिराळे दहा प्रकार ; पत्त्यांच्या चार बाजू प्रत्येकीं . गंमत ; मजा ; तमाशा ; खेळ . भंगकरी रंग , अफू करी चाळा , तंबाखू बापडा भोळा . रंगण ; क्रीडास्थान ( नाट्य , नृत्य इ० चें ); हौदा ; आखाडा ; रंगभूमी ; सभागृह ; सभामंडप . असें बोलून इकडे तिकडे फिरते आणि रंगांतून पडद्यांत निघून जाते . - कमं . २ ; - मोआदि २६ . २१ . नवरा ; पति ( समासांत स्त्रीच्या नांवापुढें योजतात ). सीतारंग . विचार ; बेत . जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग - दा १८ . २ . १२ . तर्हा ; ढोंग . बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे . - तुगा १३५९ . गाणें , बजावणें , नृत्य इत्यादि करमणुकीचा प्रकार . आजि कुमारिकेच्या महालासी । रंग होतो दिवसनिशीं । - शनि २४६ . थाटमाट . रंग स्वर्गीचा उतरे । - दावि ५०४ . महत्त्व . या कारणें कांहीं रंग । राखोन जावें - दा १७ . ७ . २१ . विवाह , शिमगा इ० प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर केशर इ० चें रंगीत पाणी टाकतात तें किंवा तें टाकण्याचा समारंभ . प्रेक्षकांचा किंवा श्रोत्यांचा समुदाय . चुना ; सफेती ; उजळा . ( क्रि० देणें ). [ सं . रञ्ज - रंग देणें ; फा . रड्ग ; हिं . रंग ] ( वाप्र . ) ०उडणें मूळचा रंग जाणें , फिका होणें ; तेज कमी होणें . ०करणें मजा मारणें ; मौज करणें . ०खेळणें विवाहादि प्रसंगीं एकमेकांच्या अंगावर रंग उडविणें . ०चढणें अंमल , निशा , मद , धुंदी येणें . ०दिसणें एखादी गोष्ट होईलशी वाटणें , आकारास येणें ; संभव असणें . तरी यापुढें जें एकंदर अवस्थांतर होण्याचा रंग दिसत आहे . - नि . ०भरणें भरास येणें ; जोमांत येणें ; मजा येणें . भलत्या प्रसंगीं भलत्या तालाची चीज सुरु केलीत तर रंग भरेल कां ? - नाकु ३ . ४६ रंग आणणें . रंग भरिती अदभूत । - सप्र १० . ८८ . तडजोड करणें . - पया १४० . ०मारणें बाजी मारुन नेणें . रहस्य राखून रंग मारला । - ऐपो २५३ . ०राखणें रंगाची मोट बांधणें - विजयानें , वैभवानें हुरळून न जातां सभ्य आणि सौम्य वर्तन कायम ठेवणें ; आपल्या प्रतिपक्ष्यांवर वादांत किंवा कांहीं कामांत आपण सरशी मिळविली असतां आपण दिलदारीनें त्याच्याशीं वागणें ; त्या सरशीच्या जोरावर त्याच्याशीं कठोरपणा न करणें ; त्याला न हिणविणें ; अधिक पेंचांत ढकलण्याचा प्रयत्न न करणें . त्यानें मी चुकलों असें कबूल केलें तें बस झालें , आतां काय रंगाच्या मोटा बांधावयाच्या आहेत ? ०शिंपणें होळीचे अगर लग्नाचे वेळीं रंगाचें पाणी उडविणें , फेकणें ; रंग खेळणें . रंगाचा भंग करणें आनंदाचा बिरस करणें . रंगांत येणें तल्लीन होणें ; रंगून जाणें . चढणें शोभा प्राप्त होणें ; खुलून दिसणें ; पूर्णतेस येणें ; विकास पावणें ; भरास येणें . रंगास , रंगारुपास आणणें , येणें , चढणें फलद्रूप होणें - करणें ; वैभवशाली , सुखावह , करणें ; आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें , येणें . माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे . तो रंगारुपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल . ( तिरस्कारार्थी ) एखाद्या तर्हेस , आकृतीस , विशिष्ट अवस्थेस पोंचणें , पोचविणें . हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला . सामाशब्द - ०आखाडा पु. कुस्ती खेळण्याची जागा . धनुर्याग आरंभिला । मल्लें रंगआखाडा केला । - कथा ४ . ६ . ३७ . ०काम न. रंग देण्याचें , रंगाचें काम . ( रंगारी धंदा ) धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याची क्रिया ; ( इं . ) डाइंग . ०डाव बाजी - पुस्त्री . गंजिफा , पत्ते खेळण्याचा एक प्रकार . ०डी रंगडी ढंगडी धंगडी - स्त्री . ढंग ; चाळा . फसगंमत ; फसवेगिरी ; खोडी ; लबाडी ; डावपेंच इ० ( अनेक वचनी उपयोग ). [ रंग + ढंग ] ०ढंग न. युक्ति ; कारवाई ; फंद ; चाळा ; लटपट ; कावा . ( क्रि० करणें ; मांडणें ; चालविणें ). रागरंग ; स्वरुप ; एकंदर देखावा . नाचरंग वगैरे ; स्वच्छंदी आचरण . रंगणावळ - स्त्री . रंगविण्याबद्दलची मजुरी ; रंगविण्याचा खर्च . [ रंगणें ] ०दार वि. मनोहर रंग असणारा ( पदार्थ , फूल , वस्त्र इ० ) रंगेल गमत्या ; विनोदी विषयी ; चैनी ; ( माणूस ) रंगीत ; रंगविलेले ; रंगीबेरंगी . ०देवता स्त्री. गाणेंबजावणें , कथा , पुराण , प्रवचन , व्याख्यान इ०कांस जिच्या प्रसादानें रंग येतो , यश मिळतें अशी एक कल्पित देवता ; खेळांत रमणीयता आणणारी देवता . खेळांची अधिष्ठात्री देवता . [ सं . ] ०द्रव्यें नअव . ( रसा . ) जीं द्रव्यें सूर्यकिरणांचा कांहीं विशिष्ट भागच फक्त आरपार जाऊं देतात अथवा परावृत्त करतात व बाकीचा भाग नष्ट करुन टाकतात तीं द्रव्यें . - ज्ञाको ( र ) ३ . रंगविण्याच्या कामीं लागणार्या वस्तू , पदार्थ . ०नाथ पु. कृष्ण ; श्रीकृष्णाची बालमूर्ति . [ सं . ] ०पंचमी स्त्री. फाल्गुन वद्य पंचमी . या दिवशीं एकमेकांवर रंग उडवितात . ०पट पु. रंगण्याची खोली ; पात्र रंगून तयार होण्याकरितां केलेली जागा ; ( इं . ) ड्रेसरुम , ग्रीनरुम . [ सं . ] ०बहार पु. मौज . कमालीचा आनंद ; सुख ; आनंदाची लूट ( क्रि० करणें मांडणें ; होणें ) रंगबहार एकांतीं लुटा । घर सुंदर कर पोपटा । - प्रला १४० . भव्य , आनंददायक दृश्य ; थाटमाट . नानाप्रकारच्या करमणुकी , खेळ , कसरती किंवा त्या जेथें चालतात तें ठिकाण . मुबलकता ; पीक इ०ची आनंदप्रद रेलचेल . पिकांचा - धान्याचा - आंब्यांचा - लाडवांचा - जेवणांचा - रंगबहार . [ रंग + बहार ] ०बाजी स्त्री. पत्त्यांनीं खेळण्याचा एक प्रकार ; पत्त्यांतील एक खेळ ; रंगडाव . ०भंग पु. विरस ; आनंदाचा नाश ; मध्येंच एकदम येऊन खेळ थांबविणें , बंद करणें ; खेळांतील आनंद , गोडी न वाटेल असें करणें . ०भूमि स्त्री. नाटकगृह ; प्रयोग किंवा नाटक करुन दाखविण्याची जागा ; सभागृह ; सभामंडप . मर्दानी खेळांचें मैदान ; रणांगण . [ सं . ] ०मंडप पु. कुस्त्या वगैरे खेळण्यासाठीं घातलेला मांडव . [ सं . ] ०मंडपी स्त्री. खेळाची अथवा करमणुकीची जागा . [ सं . ] ०महाल पु. विलासमंदिर ; दिवानखाना ; आरसे व तजबिरी लावून सुखोपभोग घेण्यासाठीं केलेलें घरांतील दालन ; श्रीमंत लोकांची आरशांनीं , रंगीबेरंगी चित्रांनीं सुशोभित केलेली विलास करण्याची खोली ; ( विशेषतः ) निजण्याची खोली . [ फा . ] ०माळ स्त्री. लग्न वगैरे समारंभाच्या मिरवणुकीपुढची नक्षत्रमाळा ; रंगीबेरंगी कागदांचीं अथवा बेगडांचीं फुलें कातरुन दोर्यांत ओवून काठीला बांधून लग्नकार्यांत धरण्याच्या माळा . [ सं . रंग + माला ] ०माळा स्त्री. रांगोळीचीं चित्रें ; रांगोळी . प्रवर्तोनि गृहकामीं रंगमाळा घालुं पाहती । - भूपाळी घनश्यमाची २० . सिंहासन अथवा मूर्तींचें देवालय याचे भोंवतीं तिन्ही बाजूंनीं बसविलेल्या लाकडी अगर धातूच्या सोंगट्या अथवा निरनिराळ्या आकृतीचीं चिन्हें . नक्षत्रपुंज ; तारे . नक्षत्रमाळा ; ( सामा . ) रंगमाळ ०मूर्ति स्त्री. ज्याच्यामुळें समारंभास विशेष शोभा येते असा मनुष्य अथवा मूर्ति ; कृष्णाचें बालस्वरुपी लांकडी अथवा धातूचें छायाचित्र ; श्रीकृष्णाची मूर्ति . [ सं . ] ०मोड स्त्री. रंगभंग ; ऐन भरांत खेळ आला असतां विरस होणें ; हिरमोड ; उत्साहभंग ; आनंदाचा नाश ; खेळाचा चुथडा . ०रस पु. आनंद ; हर्ष . हस्ती सेवकांसुद्धां सकळही लाल रंगरसी । - हो २०३ . ०राग पु. रागरंग पहा . ०रुप न. आकार , रंग , वर्ण , चर्या , देखावा इ० ( फळ , व्यापार , व्यक्ति , इ० चा ); बाह्यस्वरुप . [ सं . ] ०रुपास - चांगल्या स्थितीस आणणें ; निरोगी करणें ; ऊर्जित दशेस आणणें . आणणें - चांगल्या स्थितीस आणणें ; निरोगी करणें ; ऊर्जित दशेस आणणें . ०रुपास , चढणें - चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें , पोहोचणें . येणे , चढणें - चांगल्या स्थितीस किंवा पूर्णतेस येणें , पोहोचणें . ०रेज पु. रंगारी . [ फा . रंगरेझ ] ०रेजी स्त्री. रंग देणें ; रंगविणें ; सफेती . [ फा . ] ०रोगण न. तेलिया रंग . सामान्यतः रंग देणें ; साफसूफ करणें वगैरे क्रिया . [ रंग - इ - रौघन ] ०लाल वि. चैनी ( मनुष्य ). [ रंग ] ०लूट स्त्री. गंजिफांचे खेळांतील एक शब्द ; गंजीफांचे डावांत सर्वांचीं पानें एक रंगाचीच पडलीं असतां तो हुकूम फुकट जातो आणि पानें सर्वांनीं लुटून घ्यावीं असा एक प्रकार आहे ती . ०लेला - पु . गाभ्यांत लाल पडलेला ऊंस . ऊंस - पु . गाभ्यांत लाल पडलेला ऊंस . ०वट स्त्री. खेळण्याची जागा ; क्रीडांगण ; रंगण . द्राखे घोंस लांबटी । रंगवटामाजी मिरवती । - ख्रिपु १ . ८ . २३ . ०वणी न. रंगाचें पाणी . [ रंग + पाणी ] ०वल्ली स्त्री. रांगोळीचें चित्र ; रांगोळी पहा . [ सं . ] ०शाला रंगांगण - स्त्रीन . नाटकगृह ; खेळाचें मैदान ; तालीम ; नर्तनशाला ; जेथें नाटकांतील पात्रें रंगवितात ती जागा . [ सं . ] ०शिला रंगशिळ - स्त्री . दगडी पाटा . देवाच्या मूर्तीपुढील मोठी शिळा ; पंढरपूरच्या विठोबाच्या पुढील मोठी शिळा ( यावर भक्त नाचतात ). नाचा रंगशिळेवरी । भेट देईगा मुरारी । रामचंद्राहो । - भज ८२ . [ सं . ] ०सभा स्त्री. खेळ अथवा करमणूक यासाठीं असलेली जागा . खेळाडू अगर विनोदी मंडळी . ( क्रि० जमणें ; भरणें ; मांडणें ; चालणें ; उठण ; मोडणें ). ०सही स्त्री. तिफांशी खेळांत पक्क्या रंगाच्या चारी सोंगट्या पटाच्या चारी बाजू हिंडून आपल्या पटाच्या डाव्या बाजूकडील घरांच्या ओळींत येऊन बसणें . ०स्थल न. रंगण ; रंगभूमि पहा . विचक्षणा पडद्यांतून रंगस्थलांत येते . - कमं २ . रंगाई स्त्री . ( हिं . ) रंगणावळ ; रंग देण्याची मजूरी , किंमत . रंगार्याला कपडे रंगविण्याबद्दल रंगाई द्यावी लागते . - विक्षिप्त १ . १२ . [ फा . रंगाई ] रंगांगण न . कुस्त्या , खेळ इ० करुन दाखविण्यास योग्य स्थळ ; रंगशाला पहा . रंगाचळ न . ( महानु . ) रंगाचा भर ; आनंद ; उत्साह ; भर . निरुपनांचा रंगाचळी । त्यागाचें आढाळ चाळी । - भाए २३७ . [ रंग + अचल ] रंगाची तालीम , रंगीत तालीम स्त्री . रंगभूमीवर नाटक होण्यापूर्वीं खाजगी रीतीनें सालंकृत प्रयोग करुन पाहणें . [ इं . ] रंगाथिणें क्रि . रंगविणें ; रंगविशिष्ट करणें . यया भूतांचेनि संगें । जीवें घेतलीं अनेक सोंगें । विपरीत वासना संगे । रंगाथिला । - सिसं ३५ . २२२ . रंगामेज पु . चितारी . ढोंगी ; दांभिक इसम . [ फा . रंगामेझ ] रंगामेजी - स्त्री . आरसे , चित्रें ; इ० नीं सुशोभित करणें ; दिवाणखाना इ० स्थलास नानाप्रकारचे रंगांनीं , चित्रें , वेलबुट्टी काढून शोभेसाठीं चितारण्याचा केलेला संस्कार . भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजींचें । - प्रला ७८ . ( ल . ) दांभिकता ; कृत्रिमता ; कुटिलता . रंगारी - पु . कपडे रंगविणारा ; वस्त्रें रंगवून उपजीविका करणार्यांची एक जात . [ सं . रंज ; फा . ] रंगारीहिरडा - पु . एक प्रकारचें हिरड्याचें झाड व त्याचें फळ ( पिवळसर रंगाचें ). यालाच जंगली किंवा चांभारी हिरडा म्हणतात . सुरवारी हिरडा हा दुसर्या जातीचा आहे . रंगालय - न . नाट्यशाला . [ सं . ] रंगालां - न . ( राजा . ) चामडें ताणून घोटण्याचें साधन ( हें सुताराच्या पटाशीसारखें पण बोथट धारेचें असतें ). [ रंगाळें ] रंगिन - न . चांदीवर सोन्याचा पत्रा चढवून तयार केलेलं जरतार . रंगिला - वि . रंगेल ; ख्यालीखुशालीचा ; चैनी ; विषयी ; खेळाडू . [ हिं . ] रंगी - स्त्री . ( बे . ) जुगार ; जुवा ; पत्त्यांतील खेळाचा एक प्रकार . रंगी , रंगीन , रंगील - वि . रंगीत ; रंगविलेलें . तुम्ही रंगीन फेटा पाठविला तो पावला . - रा ३२ . ८९ . रंगेल पहा . [ रंग ; महानु ] रंगीढंगी - वि . रंगेल ; चंगीभंगी ; व्यसनी . मुलगा रंगीढंगी असूनही केवळ पैसा पाहून पांचहजार हुंड्यासह त्याच्या ताब्यांत देऊन टाकली . - हाकांध १८२ . रंगीत - वि . रंगी ; रंगविलेलें ; रंग असलेलें ; रंग लाविलेला ; कुसुंबा , हिंगूळ इ० रंगानीं रंगविलेला ( पदार्थ , वस्त्र , काष्ठ इ० ). रंगीबेरंगी - वि . अनेक रंगाचा . रंगीला - वि . रंगीन ; रंगेल ; गुलहौशी . रंगेरी - स्त्री . ( गंजीफाचा खेळ ) अखेरीस म्हणजे सर्व खेळाच्या शेवटीं खेळणाराची अखेरी दोघानीहि मारली , तिघांचेंहि पान एकाच रंगाचें निघालें तर त्यास रंगेरी म्हणतात . रंगेल , ला , ली - वि . आनंदी ; विनोदि ; खेळाडू ; खेळकर ; चैनी ; विषयी ; विलासी ; ललितकलाप्रिय ; गाणें , तमाशा , इ० विषयांचा उपभोग , मस्करी , या विषयावर ज्याची अधिक रुचि असा आनंदी ; रसिक ; इष्कबाज . रंगविणें - क्रि . रंग लावणें , देणें ; रंगानें वस्त्रादिक विशिष्ट करणें ; शोभिवंत करणें . ( ल . ) तोंडांत देणें ; भडकाविणें ; मारणें . त्याचें तोंडांत दोन रंगविल्या म्हणजे कबूल होईल . तोंड रंगविणें , रंगविणें - विडा खाणें . ( ल . ) थोबाडांत मारणें . [ रंग ; रंज = रंग देणें ]
|