मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
पुरुषाची छाती

माधव जूलियन - पुरुषाची छाती

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति माधवकरणी]

विनायकाची रसरसलेली कोठे प्रतिभा ती
गावया पुरुषाची छाती ? ध्रु०

प्रतिष्ठाच जी धर्माची ही स्त्री हिचियासाठी
स्फुरावी पुरुषाची छाती:
धन रक्षाया, धन वेचाया प्रिय तत्त्वासाठी
धजावी पुरुषाची छाती;
त्यास सिंहबळ येऊ घेऊ जो शिर तळहातीं,
दे पुढे पुरुषाची छाती !

रौरवीं पचत दैन्याच्या
जगतीं तें जीवन खोटें !
वाटून लाज जगण्याची
मरुनीच काज हो मोठें !
तत्त्वास्तव येणें कामीं
हौतात्म्य दिव्य तें कोठे !

मात करिल बन्दुकीवरीही वेताची काठी,
पाहिजे पुरुषाची छाती ! १

राजपथावर औजळे बिजली, सामसूम सारी,
क्वचित त्या पळती मोटारी,
दूर चाळ वाडींत झोपली, डुलक्या घे माड;
भोवती अन्धकार गाढ.
तों आले चालून दाण्डगे रात्रिञ्चर गुण्ड
मवाली धुन्द रक्ततुण्ड.

दरवडा घरीं धनिकाच्या
घातला दुष्ट पुण्डांनी -
बान्धिली मोट शेटाची,
किति मऊ स्थूल तो प्राणी !
हतबुद्ध ऊभी, उडवेना,
कोपर्‍यामधे शेटाणी -

जिकडे साहस तिकडे श्रीयश हीं होऊनि जाती,
पाहिजे पुरुषाची छाती ! २

शेजारी जागले परन्तू भयग्रस्त चित्तीं,
काळजें जणु हरणांचीं तीं !
विश्वासुनि दुसर्‍यावर अपुलें रक्षण टाकून
पहुडती तोण्डें झाकून -
दागदागिने रोकड सगळी हो ऊकडे गोळा,
जाय मग अबलेवर डोळा.

धमकीची सुटता आज्ञा
थरथरा कापते बाला;
लगबगा बघे काढाया
पायिंचा निघेना वाळा
तों एक अधीर पुढे हो
तो पायच तोडायाला -

बाडीबाहिर मौजबघ्यांची जमे हळू दाटी -
पाहिजे पुरुषाची छाती ! ३

तों धावें. ये तरुण मराठी अबलांचा बाली,
सतीला पाठीशी घाली.
पट्टा कुठला ? वेत भिणभिणूं वेगाने लागे,
द्चकले खल सरले मागे,
दूर दिसे तों ऊजेड, गड्बड ये काही कानीं
ठेपली आणि आणिबाणी.

कडकडाडली तों गोळी,
तो वीर तळीं कोसळला;
बोचकें उचलुनी पुण्ड
ऊकेक तमीं  मावळला.
वाचली मराठी कीर्ती,
वाचली सङकटीं अबला !
रक्तपात का अरुणोदय तो ? मृति न, चेतना ती !
धन्य ती पुरुषाची छाती !

ता. २३ मार्च १९२९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP