माधव जूलियन - माझें माहेर - सासर

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


माझें माहेर - सासर
[अभङग]

कन्या सासर्‍यास जाऐ
मागे परतून पाही
डोळे वळोत बापुडे
पाय जातातच पुढे
आसवांच्या भिङगांतून
पुढे रम्य ध्येयखूण
सय मागील ती गोड
गोड पुढीलाची ओढ
पोटीं नवलाऐ, आस
आणि भाबडा विश्वास
दिला करून नवरा
जाय हौसेने त्या घरा
पाणी उल्लङघी शेवटीं -
आऐबापें  ऐल तटीं ! १

कां न होऐ ऐसें मला ?
कां न ओढिशी प्रेमला ?
सङकटींच सय व्हावी
- कां न गूढ हौस ठावी ?
लागून तो गोड छन्द
व्हावा मङगल आनन्द
शिर तुझ्या वक्षावरी
हेलकावे ते संसारीं
व्हावी मायेसवें गोड
तुझ्या सान्निध्याची जोड
अङगीं नाही आता त्राण
सोसायला ओढाताण
कां न होशी विश्वम्भर,
तूच माहेर - सासर ? २

ता. १५ जून १९२५

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:28.9370000