ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग १
वामन.पंडित,vaman.pandit,ब्रम्हस्तुति,brahmastuti
श्रीविष्णु - भक्ति करितां अगुणात्म - सिद्धी
कोण्ही न मानिति असें जन ते कुबुद्धी
आत्मैक्यमात्र कळतां चिदचिद्विवेकीम
हे टाकिली सगुण - भक्ति जगीं अनेकीं ॥१॥
आम्हींच विष्णु तरि कां सगुणा भजावें
आत्मत्व निर्गुण तयासि सदा पहावें
धंदा वृथा श्रवण - कीर्तनरुप आतां
येणें रिती वदति शाब्दिक बोध होतो ॥२॥
जैसी तयांस उपजे सगुणीं उपेक्षा
ऐक्यें तसाचि विधि ही सरसीरुहाक्षा
मानूनि एकपण वत्सप वत्स नेतां
मी हा समान असिहे घडली अहंता ॥३॥
मी एक सृष्टि करणार तसाच हाही
विष्णु - स्थितीस करणार विशेष नाहीं
वत्सें मुलें हरुनि नेइन मी स्वभावें
दावील काय मग वैभव तें पहावें ॥४॥
याचा उपाधि सकळांहुनि थोर जैसा
सर्वात्मतें करुनि बिंब अनंत तैसा
दोहीं कडूनि हरि थोर असें स्मरेना
ब्रम्ह स्वगर्व त्दृदयांतील आवरेना ॥५॥
वत्सें मुलें विधि हरुनि समस्त गेला
वर्षाभरां उपरि मागुति तेथ आला
तों आपणें सकळ वत्सप वत्स नेले
तैसेचि आणिकहि येउनि देखियेले ॥६॥
देखोनि मोह पडला कमळासनाला
ते कोण हे कवण हें नकळे तयाला
म्या वत्स वत्सप हरुनि समस्त नेले
ते तों तसेच दिसती अवघे निजेले ॥७॥
केले नवेच असतील तरीं कळेना
ते कोण हे कवण हें मनिं आकळेना
ते आणिले करुनि नूतन नीजवीले
कीं हे नवे मनिं म्हणे हरिनेंच केले ॥८॥
ऐसें खरें नकळतां त्दृदयांत कष्टी
होऊनि पाहत असे अति - सूक्ष्म - दृष्टी
तो वत्स वत्सप समस्तहि विष्णुरुपीं
देखे सरोज - भव केवळ चित्स्वरुपीं ॥९॥
ब्रम्हांड एक चतुरातन एक - एक
मूर्ती पुढें अजित मूर्ति अशा अनेक
देखोनि मूर्छिन पडोनि उठोनि पाहे
तों गोपरुप हरि एकचि तेथ आहे ॥१०॥
तेव्हां अतर्क्य महिमा कळला हरीचा
कीं हा अनंत गुण आणि अनंत साचा
आत्मैक्यते करुनि भिन्न नसे तथापी
ब्रम्ह स्वयें हरिच मी प्रतिबिंबरुपी ॥११॥
श्लोकाष्टकें करुनि या करितांचि आधीं
टाकूनियां सगुण - भक्ति निजात्म - बोधीं
जे गुंतले श्रमचि त्यांसि म्हणोनि बोले
आत्मज्ञ भक्तचि म्हणे कृतकृत्य झाले ॥१२॥
जे ऐक्य मानुनि तुझी करिती उपेक्षा
तैसेंचि आजि घडलें मज अंबुजाक्षा
ऐक्यें करुनि सलगी करितां मुकुंदा
अन्याय थोर घडला मज बुद्धिमंदा ॥१३॥
भावें अशा नवम पद्य तयांत धाता
अंगी करुनि अपराध वदे अनंता
कीं थोर तूं हरि उपाधि करुनि जैसा
सर्वात्मते करुनिही वहु थोर तैसा ॥१४॥
एकत्व मानुनि समानपणें करुनी
म्यां वत्स वत्सप समस्त तुझे हरुनीं
नेले तयावरि तुझा महिमा पहातां
मी सापराध हरि हा अनुताप आतां ॥१५॥
माये करुनि बहु थोर तुझीच माया
तत्वें करुनि तरि बिंबचि देवराया
जो तूं असा तव महत्त्व पहावयाला
मी कोण येरिति चतुर्मुख बोलियेला ॥१६॥
अंगी करुनि अपराध असा विधाता
आतां क्षमा करिं म्हणोनि म्हणे अनंता
वाणी पती परम भक्तिरसें स्ववाणी
श्लोकत्रयें वदतसे अति दीन वाणी ॥१७॥
करिं अतः पर हें मजला क्षमा विधि असें विनवी पुरुषोत्तम
स्व - अधमत्व निवेदुनि त्यावरी भगवदुत्तमता वदतो खरी ॥१८॥
हरि तुवां पद हें मज दीधलें विभव हें तुजवीण नसाधलें
इतुकिया वरिही तुजवांचुनी मजहि ईश्वरता गमली मनीं ॥१९॥
असें मानणें याच अन्याय - कोटी
नसे मीपणा एवढी गोष्टि खोटी
तथापि क्षमा माधवा तूज मोटी
कृपा सागरा हें धरावें न पोटीं ॥२०॥
रजोगुणें संभव या शरीरा रजोगुणाचाच ननांतथारा
सर्वेश जो तूं विसरोनि त्याला मी ईश ऐसा मज गर्व झाला ॥२१॥
जो अंध त्याचें पद लागतांही विवेकिया क्रोधचि येत नाहीं
रजोगुणें अंध तयासि देवा क्षमा दुरन्यानहि हा करावा ॥२२॥
तथापि ऐश्वर्य तुझें हराया समर्थ होतों जरि देवराया
क्षमा न तेव्हां करितासि देवा अन्याय हा तूं मज वासुदेवा ॥२३॥
च्युति नव्हे विभवासि तुझ्या कधीं
म्हणति अच्युत याकरितां सुची
सहज अच्युत तूं पुरुषोत्तमा
म्हणुनि हा अपराध करीं क्षमा ॥२४॥
विभव नित्य अनंत तुझें हरी
न हरंवी तिळ मात्रहि तें जरी
तरि तुझा अपराध कसा घडे
मन अहंकृतिनेंच तमीं बुडे ॥२५॥
हरुनि नेइन वत्स - परिग्रहा
करिल काय तयावरि कृष्ण हा
म्हणुनियां म्हणतों निज - मीपणें
बुडतसे स्व - उपाधि - रजोगुणें ॥२६॥
अविद्या - आंधारें करुनि नयनीं लेप चढला
जसा तूं तैसा मी म्हणुनि हरि हा मोह पडला
मुलें वत्सें नेलीं बहुत मज अन्याय घडला
क्षमा लक्ष्मीकांता करि मद मनांतील झडला ॥२७॥
सनाथ ब्रम्हा हा मज करुनि याला मजविणें
नसे स्वामी कोण्हीं म्हणसि तरि हें सार्थक जिणें
कृपा - पीयूषाचें कमलभव हा पात्र म्हणुनी
क्षमा लक्ष्मीनाथा धरिं मज अनाथावरि मनी ॥२८॥
कमलजापतिची कमलासनें
परम - उत्तमता चहुं आनतें
कथियली परि वैभव आपुलें
त्दृदयिं आठवितां मन शंकलें ॥२९॥
ब्रम्हांड सावरण सर्व शरीर माझें
होतें असें चहुं शिरांवरि गर्व - ओझें
ब्रम्हांड आणी चतुरानन कोटि कोटी
दावोनी बुद्धि हरिली हरितेंचि खोटी ॥३०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP