कार्तिक माहात्म्य - अध्याय २३

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

धर्मदत्त विचारतोः-- जय आणि विजय या नांवाचे दोघे विष्णूचे द्वारपाळ आहेत असे मीं ऐकिलें तर त्यांना विष्णुसारुप्य मिळण्याला त्यांनीं कोणतें पुण्य केलें होतें ॥१॥
गण म्हणतातः-- तृणबिंदूची कन्या देवहूती तिला कर्दम ऋषीच्या कृपेनें जय थोरला व विजय धाकटा असे दोन मुलगे झाले ॥२॥
देवहूतीचे ठिकाणीं मागाहून योग व धर्म जाणणारा असा कपिल झाला ॥३॥
जय व विजय विष्णुभक्तीमध्यें अगदीं निमग्न होते. ते इंद्रियांचीं कर्मे भगवंताकडे लावून धर्मानें वागणारे असे होते ॥४॥
नित्य अष्टाक्षरी नारायण मंत्राचा जप करुन विष्णूचीं व्रतें करीत होते, म्हणून त्यांना विष्णु पूजासमयीं साक्षात् दर्शन देत असत ॥५॥
ते यज्ञकर्मांत कुशल म्हणून मरुतराजानें त्यांना यज्ञाकरितां बोलाविलें. देव ऋषिगणांनीं पूजित असे ते जय विजय मरुताकडे गेले ॥६॥
तेथें जय ब्रह्मा झाला व विजय याजक झाला. नंतर त्यांनीं संपूर्ण यज्ञविधि परिपूर्ण केला ॥७॥
मरुत राजानें अवभृतस्नान करुन त्यांना पुष्कळ द्रव्य दिलें, तें द्रव्य घेऊन ते आपल्या आश्रमाला आले ॥८॥
विष्णूची पूजा व यज्ञ वगैरे करण्याकरितां ते द्रव्याचा विभाग करुं लागले. विभाग करितांना दोघांत स्पर्धा उत्पन्न झाली ॥९॥
जय म्हणाला दोन भाग बरोबर करावे. विजय म्हणाला - तसें नाहीं. ज्याला जेवढें मिळालें, तेवढें त्यानें घ्यावें ॥१०॥
तेव्हां जयानें संतापून लोभी विजयाला शाप दिला कीं, तूं घेऊन देत नाहींस म्हणून ग्राह म्हणजे नक्र हो ॥११॥
विजयानें त्याचा तो शाप ऐकून जयाला शाप दिला कीं, मदानें भ्रांत होऊन मला शाप दिलास, तर तूं मातंग म्हणजे हत्ती हो ॥१२॥
नंतर रोजच्याप्रमाणें ते विष्णूची पूजा करीत असतां त्यांनीं ती शापाची हकीकत प्रगट झालेल्या देवाला सांगितली व शापापासून मुक्तता व्हावी म्हणून रमापति भगवंताची प्रार्थना करुं लागले ॥१३॥
जय विजय म्हणतातः-- देवा ! आम्ही तुझ्या भक्तांनीं नक्र व हत्ती यांच्या जन्माला कसें जावें ? याकरितां दयासागरा, देवा ! आमचा शाप नाहींसा करा ॥१४॥
भगवान् म्हणालेः-- माझ्या भक्तांचे वचन कधींही खोटें होणार नाहीं तें भक्तवचन मला कधीं विरुद्ध करितां येत नाहीं ॥१५॥
मागें मी प्रह्लादाच्या वचनाकरितां खांबांत प्रगट झालों. अंबरीषाच्या वचनाकरितां गर्भवास सोसले ॥१६॥
म्हणून तुम्हींच परस्पर दिलेले शाप भोगून नंतर माझे अक्षयस्थानाला प्राप्त व्हा. असें म्हणून हरि अंतर्धान पावले ॥१७॥
गण म्हणतातः-- नंतर ते गंडकीनदीच्या तीरीं नक्र व हत्ती झाले. पूर्वपुण्यानें त्यांना पूर्वीच्या जन्माचें स्मरण राहून ते विष्णूची व्रतें व भक्ती करीत होते ॥१८॥
एकदां तो हत्ती कार्तिकमासीं गंडकींत स्नानाला गेला असतां, नक्राला शापाची आठवण होऊन त्यानें त्या हत्तीला धरिलें ॥१९॥
नक्रानें धरिलें तेव्हां त्या हत्तीनें विष्णूचें स्मरण केलें; तेव्हां शंख चक्र गदा धारण केलेले असे विष्णु तेथें प्रगट झाले ॥२०॥
त्यांनीं चक्र मारुन नक्र व हत्ती यांना बाहेर काढिलेंख व त्यांना भगवंतांनीं आपले रुप देऊन वैकुंठास नेलें ॥२१॥
तेव्हांपासून तें स्थान हरिक्षेत्र या नांवानें प्रसिद्ध झालें. चक्राच्या आघातामुळें तेथील धोंडे देखील चक्रचिह्नांकित झाले आहेत ॥२२॥
ते हे तूं विचारलेले प्रसिद्ध जय विजय नेहमीं विष्णूला प्रिय असणारे, देवाच्या द्वारांत आहेत ॥२३॥
याकरितां तूंही धर्म जाणून निरंतर विष्णुव्रत करुन मत्सर व गर्व सोडून सर्वांवर समदृष्टि ठेवणारा असा हो ॥२४॥
तूळ, मकर, मेष या संक्रांतीचे कार्तिक, माघ व वैशाख या महिन्यांत नेहमीं प्रातः स्नान कर एकादशीव्रत करुन तुलसीचें रक्षण कर ॥२५॥
ब्राह्मण, गाई व वैष्णव यांची सेवा कर. मसुरा, कांजी व वांगीं खाऊं नको. ॥२६॥
म्हणजे आमच्याप्रमाणेंच धर्मदत्ता ! तूं त्या विष्णूच्या भक्तीनें देह सोडल्यावर उत्तम जें विष्णूचें स्थान वैकुंठ, ते पावशील ॥२७॥
विष्णूला संतुष्ट करणारें हें व्रत, तूं जन्मापासून केलेंस त्यापेक्षा यज्ञ, दान, तप, तीर्थे हीं अधिक नाहींत ॥२८॥
हे ब्राह्मणश्रेष्ठा ! तूं धन्य आहेस; कारण तूं विष्णूला प्रिय असें कार्तिकव्रत केलेंस व त्याचें अर्धे पुण्य कलहेला मिळाल्यामुळें आम्ही विष्णूच्या वैकुंठलोकीं इला नेतों ॥२९॥
नारद म्हणतात - राजा ! याप्रमाणें धर्मदत्ताला उपदेश करुन, ते गण त्या कलहेसह विमानांत बसून, वैकुंठास निघून गेले ॥३०॥
प्रत्यक्ष अनुभव आलेला असा धर्मदत्त नित्य कार्तिकादिव्रत करीत असतां, देह सोडल्यावर तो दोन्ही स्त्रियांसहवर्तमान वैकुंठास गेला ॥३१॥
ही पूर्वी घडलेली कथा जो कोणी ऐकेल व दुसर्‍याला श्रवण करवील, त्याला विष्णूच्या कृपेनें हरीची प्राप्ति करुन देणारी बुद्धि उत्पन्न होईल ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये त्रयोविंशोऽध्यायः ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP