कार्तिक माहात्म्य - अध्याय ११

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.


नारद म्हणतातः-- राजा, पुन्हां दैत्य आलेला पाहून इंद्रादिक सर्व देव भयानें थरथरां कांपूं लागले व त्यांनीं विष्णूची स्तुति करण्यास आरंभ केला ॥१॥
देव म्हणतातः-- हे विष्णु, तुम्हीं भक्तांच्या कार्याकरितां मत्स्य कूर्म इत्यादि रुपें धारण करुन त्यांचीं दुःखें नाहींशी करणारे, ब्रह्मदेवादिक जगाची उत्पत्ति, स्थिति व नाश करणारे, शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणारे असे आहां; तुम्हांला नमस्कार असो ॥२॥
लक्ष्मीचे पति, दैत्यांचा नाश करणारे, गरुडावर बसणारे, पीतांबर नेसणारे, यज्ञादि कर्मे पूर्ण करणारे, बलियज्ञविध्वंसक, भक्तवत्सल, शरणागतरक्षक अशा तुम्हांला आम्हीं नमस्कार करितों ॥३॥
दैत्यांनीं पीडिलेल्या देवांच्या दुःखरुपे पर्वताला वज्राप्रमाणे भेद करणारे हे विष्णो, जलांत शयन करणारे, शेषराजशय्येवर निजणारे, चंद्र सूर्य ज्याचे दोन नेत्र, अशा हे भगंवता, तुम्हांला वारंवार नमस्कार करितों ॥४॥
नारद म्हणतात - राजा, हें संकटनाश करणारें स्तोत्र जे म्हणतील त्यांना श्रीहरीच्या कृपेनें कधींही संकटाची बाधा होणार नाही. ॥५॥
याप्रमाणे देव दैत्यशत्रु भगवतांची स्तुति करीत आहेत, इतक्यांत विष्णूंनीं देवाचें संकट जाणिलें ॥६॥
दैत्यारि विष्णु देवांचे दुःखानें खिन्नचित होऊन रागानें उठले व वेगानें गरुडावर बसून लक्ष्मीला भाषण करिते झाले ॥७॥
विष्णु म्हणतातः-- तुझा भाऊ जलंधर यानें देवांचा नाश केला म्हणून त्यांनीं साह्यार्थ मला बोलाविलें; करितां त्वरेनें युद्धाला जातों ॥८॥
लक्ष्मी म्हणते - देवा, मी तुमची प्रियपत्नी भक्तीनें जर तुम्हांला प्रिय आहें तर युद्धांत माझे भावाला मारणें कसें योग्य होईल ? ॥९॥
विष्णु म्हणतातः-- हे लक्ष्मी, तो रुद्रांशापासून झालेला आहे व ब्रह्मदेवाचा त्याला वर आहे; करितां तुझ्या प्रीतीस्तव मी त्याला युद्धांत मारणार नाहीं ॥१०॥
नारद म्हणतातः -- विष्णु याप्रमाणें बोलून हातांत शंख, चक्र गदा, खङ्ग घेऊन गरुडावर बसून जेथें देव स्तुति करीत होते तेथें त्वरेनें साहाय्यास आले ॥११॥
तेव्हां गरुडाच्या भयंकर पंखाच्या वार्‍यानें पीडित किती एक दैत्य आकाशांत मेघाप्रमाणें भ्रमण पावूं लागले ॥१२॥
गरुड पक्षाच्या वार्‍याचे योगानें दैत्यांची अशी दशा झालेली पाहून जलंधर रागानें डोळे वटारुन विष्णूजवळ आला ॥१३॥
तेव्हां त्याचें व विष्णूचें मोठें युद्ध झालें. सर्व आकाश त्या दोघांच्या बाणांनीं भरुन गेलें ॥१४॥
विष्णूंनीं बाण मारुन त्या दैत्याचे ध्वज, छत्र, धनुष्य व घोडे छेदून टाकले व त्याचे छातीवर एक बाण मारिला ॥१५॥
तेव्हां दैत्यानें त्वरेनें उडी मारुन हातांत गदा घेऊन ती गरुडाच्या डोक्यावर मारिली व त्याला खालीं पाडिलें ॥१६॥
विष्णूंनीं हसत हसत सहज लीलेनें आपल्या खङ्गानें त्याची गदा तोडिली. इतक्यांत त्यानें विष्णूच्या हदयावर बुक्की मारिली ॥१७॥
नंतर ते महाबली बाहुयुद्ध करिते झाले. दंड, बुक्या गुडघे यांच्या प्रहारांच्या नादानें पृथ्वी दणाणली ॥१८॥
याप्रमाणें उत्कृष्ट प्रकारचें युद्ध केल्यावर प्रतापी विष्णु मेघासारख्या गंभीर वाणीनें त्या दैत्याला बोलले ॥१९॥
विष्णु म्हणाले - दैत्येंद्रा ! तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालों. वर माग, न देण्यासारखें असेल तें सुद्धां देईन तुझ्या मनांत असेल तें माग ॥२०॥
जलंधर म्हणतोः-- हे भाऊजी ! तूं संतुष्ट आहेस तर एक वर मला दे. माझी बहिण जी लक्ष्मी तिला घेऊन सर्व सेवकांसह आजपासून तूं माझे घरीं वास्तव्य कर ॥२१॥
नारद म्हणतात - राजा, ते विष्णु, जलंधरास वर देऊन देवगण व लक्ष्मी यांसह जलंधराच्या नगरांत जाऊन राहिले ॥२२॥
तो महा पराक्रमी जलंधर देवांच्या अधिकारांवर दैत्यांस नेमून पुन्हा पृथ्वीवर येता झाला ॥२३॥
तो सागरपुत्र जलंधर, देव, गंधर्व, सिद्ध यांजपाशीं जेवढीं म्हणून रत्नें होतीं, तीं सर्व आपले स्वाधीन करुन घेऊन राहिला ॥२४॥
पातलामध्यें निशुंभ नांवाच्या पराक्रमी दैत्यास अधिकारी नेमून शेषादिकांना पृथ्वीवर आणिलें ॥२५॥
देव, गंधर्व, सिद्ध, सर्प, राक्षस, मनुष्यें यांना आपल्या नगरच्या रहिवासी प्रजा करुन तिन्ही लोकांचें राज्य करुं लागला ॥२६॥
याप्रमाणें जलंधरानें सर्व देवादिकांना आपले ताब्यांत ठेवून तो प्रजेचें रक्षण पोटच्या मुलांप्रमाणें मोठ्या धर्मानें करुं लागला ॥२७॥
यामुळे त्याचे राज्यांत रोगी, दरिद्री, कृश, दुःखी, अनाथ असा कोणीही दिसत नव्हता ॥२८॥
याप्रमाणें तो जलंधर धर्मानें राज्य करीत असतां, त्याचें ऐश्वर्य पहावें व लक्ष्मीपति भगवान याचें दर्शन घ्यावें अशा हेतूनें एकदां मी त्याचे नगरास गेलों ॥२९॥
इति श्रीप० का० मा० जलं० एकादशोऽध्यायः ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP