षष्ठस्कंधमुखीं अजामिळ कथा संक्षेप टीका निची
श्रीगोविंद करील वामनमुरवें छायाऽत्मविश्रांतिची
श्रोत्यांच्या श्रवणोदरांत अळस त्रासें समासें करी
व्याख्या नामसुधा हरी करिनसे जे पाप तापा हरी ॥१॥
परिसुनि शुकवाक्यें सर्व भूगोळ भूपें
नरककथनकाळीं तेथ ऐकोनि पापें
जननरकनिपातें फार संतप्त झाला
जगदघहर रायें श्रीशुका प्रश्न केला ॥२॥
शुकाच्या मुरवें पंचमस्कंध कानीं
परीक्षिन्नृपें आदरें आयकोनी
चुके यातना केविं हा प्रश्न केला
पुढें षष्ठ हा तेथुनि ग्रंथ झाला ॥३॥
जें पंचमीं हरिकथामृत दिव्य प्याला
उद्गाररुप अवघा अनुवाद केला
यानंतरें पुसतसे परिहार पापा
जो चूकवी नरक नामक - अग्निताथा ॥४॥
नृप म्हणे कथिल्या तुम्हि दुर्गनी
परि वदा चुकती कवणे रिती
पुरुष आचरल्या कवणे स्थिती
गमन तो न करी नरकाप्रती ॥५॥
प्रायश्चित्त अधानुरुप करितां हीं नासती पातकें
ऐशा दुर्गनिनिर्गती कथियल्पा रायासि आधीशुकें
प्रायश्विन समस्त कर्ममय हें रायासि वाटे वृथा
बोले कीं गजशौच हें सकळही याची नृथा कां कथा ॥६॥
हस्तीतें धुतलें जळीं बसविलें मालिन्यही नाशिलें
तेणें तें पहिलें स्वकर्म वहिलें तीरींच आरंभिलें
शुंडाग्रें धरिलें धुळीस भरिलें सर्वागही आपुलें
प्रायश्र्वित दिल्हें तथापि न भलें ज्याचें मन क्षोभलें ॥७॥
प्रायश्र्वित जना कृपामृतघना तें सांग कीं या मना
पापाच्या दहनावरील पवना वारी हेरी कामना
जो पापी घटना प्रवृत्ति - रचना दुर्वार ते यातना
प्रायश्र्वित्त पुन्हा स्मरोनि वचना बोलें जगत्पावना ॥८॥
करी असा प्रश्न नरेंद्र जेव्हां
रहस्य सांगे मुनिवर्य तेव्हां
म्हणे खरें होतिल शुद्ध पायी
न पापबीजें जळती तथापि ॥९॥
अज्ञा जनाला अधिकार जेथें
न पापबीजें जळतील तेथें
या कर्मशुद्धी गजशौचरुपा
हें ही खरें तूं वदलासि भूपा ॥१०॥
मोठें प्रायश्र्वित तें आत्मविद्या
नाशी जे कां पापमूला अविद्या
विद्या नाशी पानकें आणि पुण्यें
नानाजन्मीं संचितें जीं अगण्यें ॥११॥
हें तों खरें परि न जोंवरि चित्तशुद्धी
तों प्राणियांसि न घडे निजबोधसिद्धी
ते शुद्धि तों भगवदर्पणकर्मयोगें
पापे स्वयें जळति सर्वहि त्या प्रसंगें ॥१२॥
कर्मे दासपणें करुनि निपुणें नारायणीं अर्पणें
यापातें क्षपणें रमापतिगुणें प्रेमामृता सेवणें
सत्संगीं वसणें स्मृतींत असणें एकांतिंचें बैंसणें
सर्वा हें करणें भवाब्धि तरणें दुर्वासना मारणें ॥१३॥
ऐसी केवळ भक्तिमात्र करितां कैवल्यही पावती
भक्तीवांचुनि अन्यथा न चुकती तेव्हां तरी दुर्गती
मद्याच्या कलशासि शुद्ध करितां व्यर्थेचि तीर्थे जसीं
श्रीगोविंद पदारविंद - विमुखा कर्मे समस्तें तसीं ॥१४॥
कृष्णार्पणें करिति जे निज सर्व कर्मे
सिद्धी अनेक घडती हरिदास्य कर्मे
पापें समस्त जळती उठती विरक्ती
वाढे जसी जसि मुकुंद - पदाब्ज - भक्ती ॥१५॥
हरिभजनि असे तो शीघ्र कैवल्य लाधे
नरक चुकति हें तों थोडियामाजि साधे
म्हणउनि शुक बोले श्लोक ते व्यासवाणी
सुजन धरुन चित्तीं हेचि गीर्वाण वाणी ॥१६॥
आयासाविण ही कथा परिसतां गोडी हरीच्या गुणीं
ज्या चित्ता उपजे निघे सहज तें त्याच्या पदीं तत्क्षणीं
ऐसें ये रिति अर्पिनी सहजही जे एकदां त्या मना
ते स्वप्नीं नयनी न देखति यमा कैंच्या तयां यातना ॥१७॥
इतुकि ही हरिभक्ति कसी जना
म्हणसि साध्य जडा मलिना मन
तरि नृपा हरि - नाम - सुधा - गुणें
सकळ साधनमात्र गमे उणें ॥१८॥
नकळतां हरि - नाम - सुधा मुखीं
जरि महत्व कळोनिहि वैखरी
हरि म्हणे मग काय तया उरी ॥१९॥
सुतमिसें हरिनाम अजामिळें
वदनिं आणुनि उद्धरिलीं कुळें
शुक म्हणे इतिह सहि तो नृपा
तुज वदेन करुनि महाकृपा ॥२०॥