॥ श्रीगणेशाय नमः ॥
जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ सौप्तिक कथिलें संकलोनी ॥ आतां स्त्रीपर्व मुळींहूनी ॥ सांगिजे मज ॥१॥
सर्व सैन्यासहवर्तमान ॥ रणीं पडिला दुर्योधन ॥ हें धृतराष्ट्रें ऐकोन ॥ काय करिता जाहला ॥२॥
तंव ह्मणे ऋषीश्वर ॥ रणीं पडलिया शतपुत्र ॥ छिन्नशाखा जैसा तरुवर ॥ तैसा धृतराष्ट्र शोकावला ॥३॥
मग संजयो ह्मणे तयासी ॥ कां गा वृथा शोक करिसी ॥ अकरा अक्षौहिणी सैन्येंसीं ॥ पडिला दुर्योधन ॥४॥
आणि सातक्षोणी पांडवदळ ॥ नानादेशींचे भूपाळ ॥ दुर्योधनानिमित्त सकळ ॥ पावले निधना ॥५॥
आतां पितरपुत्र पौत्रांचें ॥ सकळज्ञाति कौरवांचें ॥ क्रियापार करीं साचें ॥ सांडीं अज्ञान अंतरीं ॥६॥
ऐसें ऐकोनि संजयोक्त ॥ धृतराष्ट्र जाहला मूर्छागत ॥ अश्रुधारां नेत्र स्त्रवत ॥ परमदुःखें आहाळला ॥७॥
क्षणां एकें सावध जाहला ॥ आपणा निंदोनि बोलूं लागला ॥ ह्मणे पुत्रक्षण जाहला ॥ पडिले सुहद्दर्ग ॥८॥
सोयरे यांचीं वचनें काहीं ॥ म्यां लोभें ऐकिलीं नाहीं ॥ नारदें व्यासें कृष्णेंही ॥ शिकविलीं हितवाक्यें ॥९॥
अरे म्यां वैर केलें जाणोन ॥ मूर्ख नाहीं मजसमान ॥ अवगणिलें भीष्मवचन ॥ हतदैविकें म्यां ॥१०॥
लोभ धरिला राज्याचा ॥ आतां भीष्मद्रोणादिकांचा ॥ वध ऐकोनि सर्वाचा ॥ विदारतें हृदय ॥११॥
माझें पूर्वकर्म जैसें ॥ ब्रह्मादेवें देखोनि तैसें ॥ फळ संर्जिलें विशेषें ॥ तें मोगणें आजी ॥१२॥
ऐसा धृतराष्ट्रें तये वेळां ॥ शोकें बहुत विलाप केला ॥ तंव संजयो बोलों लागला ॥ तयाप्रती ॥१३॥
राया तूं शोकातें सांडोनी ॥ राहे शास्त्रागम धरोनी ॥ जो दुःखितां प्रति मुनी ॥ बोलिले पुर्वी ॥१४॥
दुर्योधनाचें तारुण्य देख ॥ तुज वृद्धपणीं जाहलें दुःख ॥ कां तरी सुहदांचें वाक्य ॥ तेणें अवगणिलें ॥१५॥
ते सर्व हतबुद्धि जाण ॥ दुःशासन शकुनी कर्ण ॥ दुर्मती शल्य चित्रसेन ॥ दुर्योधन अभिमानी ॥१६॥
वृद्ध भीष्म गांधारी विदुर ॥ द्रोण कृप कृतवर्मा ऋषीश्वर ॥ नारद व्यास चक्रधर ॥ महाबाहु ॥१७॥
नायके यांचें शिकविलें ॥ युद्ध करणें हेंचि बोले ॥ क्रूरपणें दवडिले ॥ तेणें अवघेंही ॥१८॥
ह्मणोनि पावला नाशासी ॥ तूं शोका योग्य नव्हसी ॥ पडिले कृष्णार्जुनवन्हीसी ॥ तुझे पुत्रवीर ॥१९॥
आतां दीनवदन न होई ॥ रडोनियां करिसी काई ॥ पंडित न बोलती कहीं ॥ वृथालाप ॥२०॥
स्फुलिंगापरि तुझे सुत ॥ उपजोनि जाहले वाताहत ॥ हा संसार स्वप्नवत ॥ असे राया ॥२१॥
ऐसा संजयें आश्वासिला ॥ तंव विदुर बोलूं लागला ॥ परम करुणावक्यें भला ॥ बोधपूर्वक ॥२२॥
राया जग हें विचित्र जाण ॥ ह्मणोनि कीजे आत्मसाधन ॥ स्थावरजंगमां जन्ममरण ॥ चुकलें नसे ॥२३॥
युद्धीं मरे तो जीवंत ॥ आणि न मरे तो जाण मृत ॥ कीर्तीं अपकीर्तीं जनाआंत ॥ तदनुरोधें ॥२४॥
हें शास्त्रप्रमाण मानिसी ॥ तरी ते पावले परमगतीसी ॥ युद्धहोमीं होमिलें देहासी ॥ तेथें शोक कासया ॥२५॥
तयां स्वलोंकीं जाहली स्थिती ॥ सदा स्वर्गसुखें भोगिती ॥ जैसे योगी ब्रह्मलोकीं जाती ॥ स्वतपोबळें ॥२६॥
पाहें पां पुत्र मित्र कलत्र ॥ कोणी कोणाचें नाहीं क्षणमात्र ॥ ऐसें जाणोनि क्षणभंगुर ॥ शोक न कीजे ॥२७॥
हर्षाचीं स्थाने शतावधी ॥ आणि शोकाची सहस्त्रावधी ॥ प्रतिदिनीं काळ निरवधी ॥ अप्रिय सर्वा ॥२८॥
एका मिजवी एका जागवी ॥ एका भोगवी एका भ्रमवी ॥ ऐसा काळ सर्व जीवीं ॥ व्यावर्तक ॥२९॥
धन्यधन्य ते कौरववीर ॥ शौर्यं लाधलें अमरपुर ॥ तरी अल्पबुद्धी जे नर ॥ तेचि पीडा पावती ॥३०॥
अगा बाळकाच्या रीतीं ॥ तुजलागीं सांगावें किती ॥ आतां मूळीं सांडोनि भ्रांती ॥ विचारीं आत्मतत्त्व ॥३१॥
राया कर्मानुसार अनेग ॥ सुखदुःखकळें भोगाभोग ॥ नरक आणि मृत्यु स्वर्ग ॥ कर्मवशेंची ॥३२॥
जैसें कर्म आचरिजे ॥ काळें तैसेंचि चेष्टविजे ॥ तरी वृथा कां पां रडिजे ॥ कोपावेशें ॥३३॥
आपण आपुला बंधु पाहें ॥ आपण आपुला रिपु होय ॥ आपण आपुली साक्षी होय ॥ कृतोपकृताचा ॥३४॥
ऐसें विदुरोक्त ऐकोनी ॥ अंध बोलतसे वचनीं ॥ विदुरा तवनिरूपणीं ॥ मम शोक निवारला ॥३५॥
परि इष्टानिष्टापासोनी ॥ केवीं मुक्त होय प्राणी ॥ तें सांगावे सद्दचनीं ॥ बंधुराया ॥३६॥
यावरी विदुर बोलिला ॥ इहलोकीं सारसुख पावला ॥ तो इष्टगतीतें लाधला ॥ असारें अनिष्ट ॥३७॥
कुपत्थ्यें ज्वराचिये परी ॥ कर्म भोगावें प्राणिमात्रीं ॥ एका वांचवी एक मारी ॥ जैसा सन्निपांत ॥३८॥
जीर्णवस्त्र टाकिजे ॥ आणि जैसें नवें घेइजे ॥ तैसें सुखदुःख भोगिजे ॥ देहांतरीं ॥३९॥
राया चित्रलिखितापरी ॥ सुखदुःख कर्मभरोवरी ॥ वर्ष अयन ऋतु अवधारीं ॥ मासार्धमास ॥४०॥
यौवन मध्यस्थ वृत्धत्व ॥ कौमार आणि जरा मृत्य ॥ कर्में फळभोग अनंत ॥ पावे प्राणी ॥४१॥
जे सत्यधर्में वर्तती ॥ कर्में अकर्में जाणती ॥ ते परमगतीतें पावती ॥ इष्टतेचे ॥४२॥
यये संसारवनीं सदा ॥ प्राणी भोगिती आपदा ॥ तंव अंध ह्मणे प्रबुद्धा ॥ सांगे संसारवन ॥४३॥
विदुर ह्मणे परियेसीं ॥ संसारवनीं गर्भवासी ॥ पूर्ण राहिला दशमासीं ॥ पूर्वकर्मास्तव ॥४४॥
तेथें अधोमुख ऊर्ध्वपाद ॥ जठरानल जंतु आपाद ॥ वायुवेगें यातना विविध ॥ भोगी प्राणी ॥४५॥
मग जन्मोनि योनिद्वारीं ॥ पचला मळमुत्र अधोरीं ॥ कुकमें तारुण्यामाझारी ॥ वृद्धपणीं लौल्यता ॥४६॥
जो ऐसिया सुटे ॥ तोचि पद लाहे गोमटें ॥ अधोगती कर्में वाइटें ॥ भोगी यमलोकादी ॥४७॥
हें सविस्तर सांगतां ॥ येथेंचि विस्तार होईल ग्रंथा ॥ हे सकळही कथिली व्यवस्था ॥ षष्ठस्तबकीं ॥४८॥
ह्मणोनि राया संसारांत ॥ जो नव्हें व्यसनभूत ॥ तो पावे मुक्तिपथ ॥ शुद्धचरणें ॥४९॥
ऐसा मुख्यार्थ जाणोनी ॥ राया शोकदुःख सांडोनी ॥ मोक्षमार्गाची निश्रेणी ॥ पाहें ज्ञानदृष्टीं ॥५०॥
तंव धृतराष्ट्र करी विनवणी ॥ या कर्मवनापासोनि प्राणी ॥ कोणे उपायें धर्मवनीं ॥ पाविजे श्रेष्ठा ॥५१॥
विदुर ह्मणे ऐकें राया ॥ परब्रह्मा वंदोनियां ॥ संसारविपिन तरावया ॥ उपाय असे ॥५२॥
कोणे एके वनाआंत ॥ ब्राह्मण गेला फिरत फिरत ॥ तंव तो जाहला असे व्याप्त ॥ सिंहव्याघ्रादिकीं ॥५३॥
येरु देखोनि भय पावला ॥ शरीरीं कंप असे सुटला ॥ ते न भक्षितां तयाला ॥ चालती समागमें ॥५४॥
विप्रवनांतूनि चालिला ॥ पुढें थोर वृक्ष देखिला ॥ तया खालीं जंव गेला ॥ तंव जाहला नवलावो ॥५५॥
येकी कामिनी शोभली ॥ ते विप्राजवळी पातली ॥ वृक्षी हात लावोनि राहिली ॥ उभी सन्मुख ॥५६॥
तंव पंचफणा सर्प आले ॥ त्याहीं भोंवतें व्यापिन्नलें ॥ विप्रें पळों मांडिलें ॥ तंव पडिला कूपांत ॥५७॥
तेथ वल्ली लागली हातीं ॥ ते धरिली काकुळती ॥ तंव कुंजर उदकाप्रती ॥ तेथें येक पातला ॥५८॥
बारापाय सहामुखें थोरें ॥ मदधारीं सदा पाझरे ॥ देखोनि कंप न सांबरे ॥ सुटली वल्ली हातींची ॥५९॥
मग तो कूपामाजी पडिला ॥ उदकीं बुडोनियां मेला ॥ येथें पोहूं जाणे तो वांचला ॥ तरोनि उदकावरी ॥६०॥
तंव धृतराष्ट्र ह्मणे मातें ॥ हें उगवोनि सांगें येथें ॥ मग विदुर ह्मणे निरुतें ॥ ऐकें राया ॥६१॥
ब्राह्मण तो जीव जाण ॥ संसार तें गहन वन ॥ सिंहव्याघ्रादि दरुण ॥ गर्भदुःखें ॥६२॥
वृक्ष स्वशरीर बोलिजे ॥ नारी ते माया जाणिजे ॥ सर्पस्थानीं लक्षिजे ॥ कामादिक ॥६३॥
पडिला चिंतारूपीं कूपांत ॥ उदक महाकाळ सत्य । वल्लीप्रति घातला हात ॥ ते जीविताशा ॥६४॥
कुंजर संवत्सर पाहें ॥ द्वादशमास तेचि पाय ॥ आणि साही ऋतु तिये ॥ षड्मुखें जाण ॥६५॥
मदधारा ते विशेष ॥ कालक्रमण समरस ॥ शरींरी कंप तो बहुवस ॥ संसारदुःखें ॥६६॥
वल्ली हातांतूनि सुटली ॥ ते जीवितांशा तुटली ॥ बुडोनियां मेला जळीं ॥ तो काळें ग्रासिला ॥६७॥
पोहूं जाणे तो वांचला ॥ गुरुंपदिष्टज्ञानें तरला ॥ तोचि काळातें अतिक्रमला ॥ गेला धर्मारण्यीं ॥६८॥
धर्मस्थान मोक्षभुवन ॥ हें तुज काथिलें संक्षेपोन ॥ तंव अंध ह्मणे तरणाख्यान ॥ सांगें आतां ॥६९॥
विदुर ह्मणे गा आइक ॥ संसारदुःखातें नाशक ॥ आख्यान मुक्तिदायक ॥ तुज सांगतों ॥७०॥
जैसे दोघे मार्गी जातां ॥ एक विश्रामला चालतां ॥ परि दुजा बैसोनि रथा ॥ पावला राज्यभुवन ॥७१॥
संसारमार्गगर्भवासीं ॥ अज्ञानी स्थिरावे विशेषीं ॥ साधु ज्ञानिया ठायासी ॥ पावे शीघ्र ॥७२॥
साधु ज्ञानिये एतदर्थी ॥ संसारमार्ग दुर्गम बोलती ॥ तिये वनाची वित्पत्ती ॥ ऐकें राया ॥७३॥
मनुष्यें चराचर शरीरें ॥ आधीं श्वापदें अपारें ॥ उद्देग पावविती निरंतरें ॥ जराव्याधी ॥७४॥
संवत्सर ऋतु मास ॥ पक्षाहोरात्रें विशेष ॥ लोपत असे आयुष्य ॥ अनुक्रमेंसीं ॥७५॥
पंचविषयकर्दमनदी ॥ प्राण वाहती अविद्यीं ॥ तेथें तरणोपाय बुद्धी ॥ असे ते ऐकें ॥७६॥
कल्पोनि शरीररूप रथ ॥ चित्त सारथी निम्रांत ॥ इंद्रियें तरी अश्व तेथ ॥ जुंपिले युक्तीं ॥७७॥
कर्मबुद्धीचें प्रवर्तन ॥ तेंचि अश्वांचे प्रेरण ॥ स्वेच्छाचारें होय भ्रमण ॥ संसारचक्रीं ॥७८॥
आणि जे कां अश्व सारथी ॥ गुरुपदिष्ट मार्गे जाती ॥ ते मोहातें न पावती ॥ जाती चिंतिलिये ठायां ॥७९॥
राया शतपुत्र नाशले ॥ ह्मणोनि तुझें मन भ्रमलें ॥ तरी कुमार्ग सांडोनि वहिलें ॥ करीं आत्ममैत्री ॥८०॥
देहदमनातें करोनी ॥ मानसरथीं बैसोनी ॥ शोकमार्गातें टाकोनी ॥ परमात्मपदीं जाइंजे ॥८१॥
ऐसें विदुरें उपदेशिलें ॥ परि शोकदुःखभरतें आलें ॥ अंधें मूच्छें देह टाकिलें ॥ धरणीयेसी ॥८२॥
तंव व्यासें संजयें विदुरें ॥ सेवकादिकीं सत्वरें ॥ बैसविलें प्रयासें थोरें ॥ धृतराष्ट्राप्रती ॥८३॥
येरू बोले आरंबळोन ॥ अहा जाहलें पुत्रहनन ॥ राज्यार्थ केलें कुलोच्छेदन ॥ शोक न शमे सर्वथा ॥८४॥
वेदव्यास ह्मणती राया ॥ होणार जाहलें कौरवां तयां ॥ दुर्योधनकर्में करोनियां ॥ वृथा शोक करितोसी ॥८५॥
ते पावले स्वर्गलोक ॥ तरी तूं कां करिसी शोक ॥ वृत्तांत एक सांगतों ऐक ॥ दत्तचित्तें ॥८६॥
मी मांगा एके दिवशीं ॥ गेलों होतों स्वर्गस्थानासीं ॥ तंव देखिले देवसभेसी ॥ नारदादिक ॥८७॥
तयांसमीप पृथ्वी देखिली ॥ कार्यकरणार्थी पावली ॥ ह्मणे माझें कार्य सकळीं ॥ करा ब्रह्मादिक हो ॥८८॥
माझा फेडा क्रांतभार ॥ तंव बोलिला शारंगधर ॥ कीं तवकार्य धृतराष्ट्रपुत्र ॥ करील जाई स्वस्थानीं ॥८९॥
राजे परस्परें झुंजोनी ॥ सैन्येंसह पडतील रणीं ॥ हें ऐकोनि आली मेदिनी ॥ मृत्युलोका ॥९०॥
त्याउपरी तुझा नंदन ॥ उत्पन्न जाहला दुर्योधन ॥ दैवयोगें सेवकजन ॥ मीनले तैसेची ॥९१॥
ह्मणोनी युद्धीं कौरवीं ॥ झुंजोनि पांडवांसीं आहवीं ॥ सुखी केली असे पृथिवी ॥ फेडोनि क्रांतभांर ॥९२॥
हें पूर्वींचि होतें वर्तविलें ॥ तेंचि सर्व असे घडलें ॥ तें अवघे स्वर्ग पावले ॥ तरी शोक न कीजे ॥९३॥
मग बोलिला धृतराष्ट्र ॥ शोकें पडिलों होतों थोर ॥ परि ऐकोनि तुमचें उत्तर ॥ शांत जाहलों ॥९४॥
अंतरीं निश्वळ राहिला ॥ तंव व्यास अदृश्य जाहला ॥ पुढां वृत्तांत जो वर्तला तो सांगेल मधुकर ॥९५॥
इति श्रीक० ॥ द्वादशस्तबक मनो० ॥ धृतराष्ट्रव्याससंवादप्र० ॥ पंचमाऽध्यायीं कथियेला ॥९६॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्वादशस्तबके पंचमोऽध्यायः समाप्तः ॥