कथाकल्पतरू - स्तबक १२ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ सांगा अग्रकथान्वयो ॥ जो सांगता जाहला संजयो ॥ धृतराष्टासी ॥१॥

मुनि ह्मणे ऐकें राया ॥ दुर्योधन रणीं पडलिया ॥ अस्तमान जाहला सूर्या ॥ सांयकाळीं ॥२॥

कौरवांचे वीर सेवक ॥ उरले होते काहीं येक ॥ ते पळाले प्यादे धानुष्कं ॥ आदिकरोनी ॥३॥

एकीं वाहनें घेतलीं ॥ डेरे दुसें उचलिलीं ॥ दक्षिणदिशे चालिली ॥ दीनवदनें ॥४॥

तंव रण थोर उठावलें ॥ घोरशब्दें जाजावलें ॥ घेघेमारीं प्रवर्तलें ॥ हुंबती येक ॥५॥

तें पाहोनि अद्भुत ॥ वाहनें दुसें सांडोनि तेथ ॥ भयें पळाले धांवत ॥ वनामाजी ॥६॥

परि कृप कृतवर्मा द्रौणी ॥ पहिलेचि गेले होते तेथुनी ॥ ते दुर्योधनाप्रति भेटोनी ॥ वटातळीं पातलें ॥७॥

कवचाभरण फेडिलें ॥ रथींहूनि अश्व सोडिले ॥ मग संध्यास्नान सारिलें ॥ सरोवरीं तेथें ॥८॥

रात्री थोर प्रवर्तली ॥ तारागणीं मिरवली ॥ भिल्ल मनुष्यें निजेली ॥ प्राणिमात्र ॥९॥

कृपा कृतवर्मा द्रौणी ॥ शोकयुक्त-बैसले तिन्ही ॥ मग वटातळीं धरणीं ॥ निजते जाहले ॥१०॥

धनुष्यें दृढ असती केलीं ॥ कृपा कृतवर्म्या निद्रा आली ॥ परि क्रोधें द्रौणी घाली ॥ श्र्वासोच्छावास ॥११॥

सर्पापरीं फुंफावत ॥ दुःखें चौफेरीं पाहत ॥ तंव नानापक्षिगणीं सेवित ॥ वटवृक्ष तो ॥१२॥

तये वटवृक्षी वायस ॥ व्याप्त असती बहुवस ॥ तंव घुवड आला काकांस ॥ मारावया ॥१३॥

महाबळी महाशब्दी जाण ॥ तीक्ष्णचंचु पिंगटचर्ण ॥ नीललोचन दीर्ध मान ॥ नखें भ्यासुर जयाचीं ॥१४॥

काळा ऐसा वेगवंत ॥ वटशाखे जाहला प्राप्त ॥ वरी चढला मारित ॥ वायसांसी ॥१५॥

कोणाचे नेत्र फोडिले ॥ कोणाचे करपाद मोडिले ॥ एकाचे पक्ष छेदिले ॥ तोडिली मस्तकें ॥१६॥

ऐसे उलूकें वायस ॥ तेथें मारिले बहुवस ॥ मनीं पावोनि उल्हास ॥ जाता जांहला यावरी ॥१७॥

हा प्रतिकार करोनी ॥ गेला निद्रिस्थ शत्रु मारोनी ॥ तें अश्वत्थामें देखोनी ॥ चिंतिता जाहला ॥१८॥

ह्मणे हा पक्षी बहु भला ॥ येणें आह्मां उपदेश केला ॥ पांडवीं गांधार मारिला ॥ सैन्यासहित ॥१९॥

परि ते आह्मां न मारवती ॥ तरी येणेंचि प्रकारें राती ॥ शत्रुक्षय करावा एतदर्थीं ॥ संदेह नाहीं ॥२०॥

प्रस्थानप्रवेशीं रिपुसैन्य ॥ मारावें पहिलें भेद करोन ॥ तरी ये अर्धरात्रीस हनन ॥ करूं निद्रिस्थांचें ॥२१॥

कां जे भलतेही प्रकारें ॥ वैरी मारावे चातुरें ॥ तेथ धर्माधर्मविचारें ॥ कार्य नाहीं ॥२२॥

ऐस प्रयत्‍न विचारोनी ॥ पांडव पांचाल्यांसी द्रौणी ॥ कठिणमती धरोनी ॥ दोघां उठविता जाहला ॥२३॥

तयांप्रति रडत रडत ॥ क्षणाक्षणा द्रोणासुत ॥ ह्मणता जाहला कीं महंत ॥ गांधारराव आपुला ॥२४॥

जयानिमित्तें आपणासी ॥ वैर पडिलें पांडवांसीं ॥ भीमें मारिलें तयासी ॥ जंधेवरी हाणोनियां ॥२५॥

तेथें पांचाळांही हांसोनी ॥ वाद्यघोष उल्हासोनी ॥ केला पावले ह्मणोनी ॥ राज्य‍अर्थ ॥२६॥

तंव कृप ह्मणे द्रौणीलागुनी ॥ मी संतोषलों तुझे वचनीं ॥ परि ऐकें चित्त देवोनी ॥ वाक्य माझें ॥२७॥

कर्मेकरूनि मनुष्यें बांधलीं ॥ परि दैवें पुरुषार्थ लाधलीं ॥ आणि दैवयोगेंचि सिद्ध जाहलीं ॥ दैवकर्में दोनी ॥२८॥

दैवें सकलकार्यें होती ॥ परि कर्में समस्त वर्तती ॥ जेवीं पर्जन्यें पिकप्राप्ती ॥ कृषिकारांसी ॥२९॥

जे तरी दैवकर्में हीन ॥ ते मनुष्य जैसे दीन ॥ आणि दैवकर्में संपन्न ॥ ते समर्थ प्राणिये ॥३०॥

कुशळ अकुशळ दोघे पाहीं ॥ माजी अकुशळा सुखेच्छा नाहीं ॥ कुशळ आसक्त सर्वही ॥ इच्छी सुखभोग ॥३१॥

कुशळ प्रवर्तले हितीं ॥ अकुशळ ते अहितीं ॥ दैवकर्मासारिखी मती ॥ उपजे दोघां ॥३२॥

जो कुशळ वृद्धसेवा करी ॥ सुमार्ग पुसोनि आचरी ॥ ऐके वृद्धवाक्यें श्रोत्रीं ॥ तो पावे सर्वसुखें ॥३३॥

आणि जो राग क्रोध भय ॥ यांतेचि इच्छिता होय ॥ तयाची राज्यलक्ष्मी जाय ॥ अंतीं पावे नाशातें ॥३४॥

तरी तैसा हा दुर्योधन ॥ राज्यलुब्धक अज्ञान ॥ पांडव बळिष्ठ परि दाटोन ॥ वैर केलें तयांसीं ॥३५॥

तया प्रमादाचें फळ ॥ प्रत्यक्ष पावला हें सकळ ॥ जो आपणाहूनि सबळ ॥ त्यासी वैर न करावें ॥३६॥

जो सोईरेयावडिलां पुसे ॥ तयांचें सांगीतलें परिसे ॥ तरी तो बुद्धिमंत विशेषें ॥ पावे सर्वसुखें ॥३७॥

गांधारिये धृतराष्ट्रा ॥ न पुसोनियां विदुरा ॥ तेणें केलें अविचारा ॥ तैसें फळ पावला ॥३८॥

यथार्थ कार्यारंभाविण ॥ अर्थप्राप्ती नाहीं जाण ॥ ऐसाही पुरुषार्थ करोन ॥ नव्हे कार्यसिद्धी ॥३९॥

तरी ते दैवोपहत जाहले ॥ ह्मणोनि कार्य नाहीं सिद्धलें ॥ ऐसें कृपाचार्य बोलिलें ॥ द्रौणीप्रती ॥४०॥

ऐसीं वाक्यें बहुतांपरी ॥ ऐकोनियां निजश्रोत्रीं ॥ दुःखशोकें भूमीवरी ॥ पडिला अश्वत्थामा ॥४१॥

तंव कृप कृतवर्मा दोघेजण ॥ उद्विग्नपणें बोलिले वचन ॥ कीं पुरुषाच्या ठायीं बुद्धि जाण ॥ ते परम शोभा ॥४२॥

सर्वप्रकारीं मानीं निर्धार ॥ तोचि प्राणी बुद्धिसागर ॥ बुद्धीतें निंदी तो गव्हार ॥ क्रूरपणें ॥४३॥

जयाचें अंतःकरण जैसें ॥ तया कर्म होय तैसें ॥ तैसीच बुद्धी विशेषें ॥ उपजे तया ॥४४॥

जेवीं रोग जाणोनि वैद्य ॥ तैसेंचि देयी औषध ॥ मग तेणें रोग प्रसिद्ध ॥ तत्काळ नासे ॥४५॥

ह्मणोनि कार्ययोगानिमित्त ॥ पुरुष बुद्धींतें करितात ॥ स्वबुद्धयनुसार वर्ततात ॥ संतुष्टचित्तें ॥४६॥

जयाची बुद्धी परियेसीं ॥ क्षणाक्षणा अनारिसी ॥ बरवें न पाहवे तयासी ॥ सर्वथैव ॥४७॥

तंव ह्मणे अश्वत्थामा ॥ एकी सांगतों बुद्धी तुह्मां ॥ पूर्वी निर्मिता जाहला ब्रह्मा ॥ सुष्टीलागीं ॥४८॥

दैव आणि कर्म पाहीं ॥ वर्णावर्णचिये ठायीं ॥ तेणें लाविलीं सर्वहीं ॥ प्राणिमात्रां ॥४९॥

ब्राह्मंणासीं शांतता ॥ क्षत्रियासी तेजोत्तमंता ॥ वैश्यालागीं कुशळता ॥ सेवा शुद्रालागीं ॥५०॥

निंद्य अशांत ब्राह्मण ॥ क्षत्रिय निस्तेजी अधय जाण ॥ अदक्ष वैश्य तो हीन ॥ असेवक शूद्र निंद्य ॥५१॥

मी ब्राह्मणकुळीं उपजलों ॥ मंदभाग्यें अशांत जाहलों ॥ क्षत्रियधमीं राहिलों ॥ यास्तव तेजबुद्धी ॥५२॥

आतां क्षत्रियधर्म आचरणें ॥ आणि विप्रवृत्तीतें टाकणें ॥ महात्कार्य असे करणें ॥ तरी टाकणें साधुत्वा ॥५३॥

दिव्यधनुष्य माझ्या पाणीं ॥ दिव्यास्त्रांचा मी विंदानी ॥ पिता मारिला तरी उगलेनी ॥ राहवे कैसें ॥५४॥

मी क्षात्रधर्मी राहिलों ॥ थोर पदवीतें पावलों ॥ ह्मणोनि आजी इच्छिता जाहलों ॥ पांचाळघात ॥५५॥

तरी या शिबिराप्रतिं जाण ॥ होऊं कृतांतरूपी आपण ॥ पांचाळातें मारोन ॥ करूं पूर्ण मनोरथ ॥५६॥

जेवीं रुद्र प्राणियांचा ॥ संहार करी सर्वाचा ॥ तैसा आजि पांचाळांचा ॥ करीन संहार ॥५७॥

मग आपुले बाणें करूनी ॥ पांडवांतेंही मारीन रणीं ॥ तरीच फेडिलें निर्वाणीं ॥ पितृऋण ॥५८॥

भीष्मादिकांचेंहीं ऋण ॥ पांचाळां मारितां फिटेल जाण ॥ आजि रात्रीं शिरश्छेदन ॥ करीन धृष्टद्युम्नाचें ॥५९॥

आजि सर्वसैन्य मारीन ॥ सौप्तिककर्म आचरीन ॥ परम सुखिया होईन ॥ कृपाचार्या ॥६०॥

जेवीं पितेयाची गाय ॥ हरिली सहस्त्रार्जुनरायें ॥ रामें येकवीसवेळां पाहें ॥ मही केली निक्षत्री ॥६१॥

कृपाचार्य ह्मणे गा द्रौणी ॥ हे मती उपजली तुझ्या मनीं ॥ ते वाराया वज्रपांणी ॥ नव्हे समर्थ ॥६२॥

तरी प्रातःकाळीं जाण ॥ आपण करूं तयाचें हनन ॥ मग सकळही शिबिरें जाळोन ॥ उरवूं कीर्ती ॥६३॥

जैसी दैत्यांची मंडळी ॥ संहारिता जाहला वनमाळी ॥ तैसें करूं प्रातःकाळीं ॥ कर्म आपण ॥६४॥

ऐसें मातुलोक्त ऐकोनी ॥ क्रोधावेशें बोलिला द्रौणी ॥ अरे आतुंरासी रजनी ॥ प्रतिबंधक काय ॥६५॥

जो पुरुष आर्तभूत ॥ तयातें स्वस्थ नसे चित्त ॥ जैसा कामिया दत्तचित्त ॥ कामिनीसी ॥६६॥

क्रोध आला माझ्याठायीं ॥ मामा माझें कौतुक पाही ॥ पितृवधासमान नाहीं ॥ त्रिलोकीं दुःख ॥६७॥

द्रोणवधाग्नी परियेस ॥ अंतरीं जाळी अहर्निश ॥ तरी न वधितां धृष्टद्युम्नास ॥ वांचेन कैसा ॥६८॥

जरी पार्थ आणि श्रीपती ॥ तया पांचाळा रक्षिती ॥ तरीही शस्त्रघातें शांती ॥ त्याची करीन ॥६९॥

कृप ह्मणे अश्वत्थामया ॥ भावीपराक्रम जाणावया ॥ प्रबुद्ध कोणीही प्राणिया ॥ नसे जाण ॥७०॥

जो कुबुद्धि सांडोनि दुरी ॥ श्रेष्ठबुद्धीतें धरी अंतरीं ॥ आणि आत्मनियमन करी ॥ आत्मज्ञानें ॥७१॥

तोचि अभिताप न पावे ॥ ह्मणोनि शास्त्र अभ्यासावें ॥ धर्मशास्त्रजाणत्या न करवे ॥ घातपात ॥७२॥

अगा जे जाहले धर्मलुप्त ॥ तयांचा वधही अनुचित ॥ जेवीं रथारूढ शस्त्रहस्त ॥ राहिले समरीं ॥७३॥

पांचाळ तरी धर्मलुप्त ॥ कां जे पांडवांचे शरणागत ॥ आणि शस्त्रवाहनरहित ॥ मुक्तकवची ॥७४॥

ते रात्रिमाजी निद्रिस्थ ॥ प्रेतसदृश आहेत ॥ तयां मारितां होय पात ॥ महानरकीं ॥७५॥

तूं नामांकित वीरू ॥ सुर्यसदृश झुंजारु ॥ तरी हें निंद्यकर्म करूं ॥ नये सर्वथा ॥७६॥

प्रातःकाळीं पाचारोनी ॥ शत्रुंसि जिंकीं समरंगणीं ॥ तेणें तुझी कीर्ती त्रिभुवनीं ॥ वाखाणेल ॥७७॥

अश्वथामा ह्मणे मामा ॥ ऐसी बुद्धी सांगतां आह्मां ॥ परि त्यांहीं निंद्यकर्मा ॥ आचरिलें कैसें ॥७८॥

धर्मरायासि पुढें केलें ॥ मागोनि सैन्य मारविलें ॥ धृष्टद्युम्रें द्रोणा हाणिलें ॥ तुमचे समक्ष ॥७९॥

नानाकापट्य करोन ॥ पार्थें मारिला सूर्यनंदन ॥ शिखंडीसि पुढें घालोन ॥ घेतला प्राण भीष्माचा ॥८०॥

भीमें दुर्योधन पाडिला रणीं ॥ सर्वा देखतां गदा हाणोनी ॥ तेथही कपट केलें निर्वाणी ॥ हाणोनि लाथ ॥८१॥

भग्नजंघा दुर्योधन ॥ बोलिला विलाप करोन । तें दुःख आयकोन ॥ मज जाहलें असह्य ॥८२॥

ऐसे पांचाळ पापिष्ठ ॥ निर्मर्यादी महा नष्ट ॥ ते निद्रिस्थ मारितां स्पष्ट ॥ होईल कीर्ती त्रिभुवनीं ॥८३॥

असो पितुऋवध आठवोनी ॥ मग अश्व रथीं जुंपोनी ॥ शत्रुनिर्दाळणा द्रौणी ॥ चालिला रात्रिमाजी ॥८४॥

ते दोघे दुःखी जाहले ॥ आग्रहास्तव रथीं बैसले ॥ सज्ज होवोनियां वहिले ॥ कवचखडीं ॥८५॥

पांचाळ निद्रिस्थ असती दुशीं ॥ तंव तिघे आले तयापाशीं ॥ द्रौणी पातला द्दारदेशीं ॥ दोघे दुर राहिले ॥८६॥

तंव हरिहर मूर्तिमंत ॥ तेथ जाहले महाभूत ॥ चंद्रार्कसमान प्रदीप्त ॥ तेज अंगीं झगझगे ॥८७॥

महादेही लोमहर्षण ॥ केलें व्याघ्रचर्म परिधान ॥ सर्प यज्ञोपवीत जाण ॥ विक्राळदाढा ॥८८॥

भयानक दिसे वदन ॥ सहस्त्रनेत्र सहस्त्र श्रवण ॥ नासिकाग्रापासोन ॥ महाज्वाळा निघताती ॥८९॥

तया ज्वाळांपासोनि बाहेरी ॥ शंखचक्रगदाब्जधरी ॥ दिसती निघाले कोटिवरी ॥ह्रुषीकेश ॥९०॥

तें रूप द्रौणीनें देखिलें ॥ शरीर पीडाग्रस्त जाहलें ॥ परि वीरश्रियें मोकलिलें ॥ शस्त्रजाळ ॥९१॥

तीं येतांचि शस्त्रास्त्रें ॥ उदरीं सामाविलीं शंकरें ॥ तंव क्रोधें द्रोणकुमरें ॥ टाकिली शक्ती ॥९२॥

ते गिळिली महाभुतें ॥ ह्मणोनि टाकिलें खड्‌गातें ॥ तेंही गिळितां शिवें तेथें ॥ येरें गदा टाकिली ॥९३॥

भुतें गदा येतांचि गिळिली ॥ द्रौणीचीं शस्त्रास्त्रें भंगलीं ॥ मग सर्वत्र न्याहाळी ॥ तंव दिसे शस्त्रमंडित ॥९४॥

तया उपरी घाली दृष्टी ॥ तंव आकाशीं अनंतकोटी ॥ प्रकटोनियां जगजेठी ॥ व्यापिन्नलें अंबर ॥९५॥

तें देखोनि अद्भुत ॥ द्रौणी संतापला अत्यंत ॥ मग स्मरिलें मनाआंत ॥ वचन येक ॥९६॥

ह्मणे सुहुदांची उक्ती ॥ जो नायके हीनमती ॥ तो बहुविधा विपत्ती ॥ मोगीं ऐशाच ॥९७॥

मी शस्त्रोक्तमार्ग सांडोनी ॥ ऐसें राहाटिलें ह्मणोनी ॥ इया आपत्ती निर्वाणीं ॥ प्राप्त जाहल्या ॥९८॥

ऐसें बोलोनि तटस्थ ॥ तेथेंचि राहिला द्रोणसुत ॥ ह्मणे परतेन तरी सत्य ॥ येईल हारी ॥९९॥

आतां आराधूं सदाशिवु ॥ तयासीच शरण जाऊं ॥ तेणें मनींचे अर्थ सर्वु ॥ करूं पूर्ण ॥१००॥

शंकर प्रसन्न होईल ॥ तरीं भयताप निवारील ॥ तो शुभं मातें देईल ॥ पुण्यमागा ॥१॥

ऐसें ह्मणोनियां त्वरित ॥ शिवा जाहला शरणागत ॥ असो हें भूतयुद्ध किंचित ॥ द्रौनि पराभवात्मक ॥२॥

द्रौणीनें यापरि विचार केला ॥ मग रथाखाली उतरला ॥ तेथेंचि ध्यानीं बैसला ॥ शंकराचे ॥३॥

मांडिली असे रुद्रस्तुती ॥ जय कपदीं विश्वमूर्ती ॥ शिव उग्रा उमापती ॥ शितिकंठा नीलकंठा ॥४॥

जय जटिल ब्रह्माचारी ॥ वृषभवाहना त्रिपुरारी ॥ चंद्रमौळिया त्रिनेत्री ॥ अघोरवक्त्रा ॥५॥

ऐशा नामातें स्मरिलें ॥ नानापरी स्तविन्नलें ॥ मनीं वैराग्य उपनलें ॥ द्रौणीचिये ॥६॥

तंव स्वर्णवेदिका अकस्मात ॥ तेथें देखे द्रोणसुत ॥ सूर्यापरी दीप्तिमंत ॥ धडकती ज्वाळा ॥७॥

तेजें व्यापिन्नलें गगन ॥ मग तया तेजापासोन ॥ अश्वगजरथपदाती जाण ॥ निघते जाहले ॥८॥

श्वानमुखी रानसोर ॥ जाहले उंटमुखी मार्जार ॥ सिंह जंबूक रिसें व्याघ्र ॥ चक्रवाक नानापक्षीं ॥९॥

नानाविध मुखें अनेक ॥ सहस्त्राक्ष कितीयेक ॥ निर्मासक काकमुख ॥ ऐसे प्राणिये ॥११०॥

पद्य चक्र मुकुटधारी ॥ ऐसें अनंतकोटिवरी ॥ निघाले पाशगदाधारी ॥ भुशुंडायुध ॥११॥

कार्मुक‍इषुधर रणोत्कट ॥ सध्वज सपतका सघंट ॥ लगुडपाणी बळिष्ठ ॥ खड्‌गपाणी ॥१२॥

सकळां सर्पभुषणें शोभती ॥ एक गाती गर्जती नाचती ॥ एक आनंदे डुल्लती ॥ महाबळाढ्‍य ॥१३॥

कितीयेक महाघोर ॥ चूडाळकर्णीं ॥ लंबोदर ॥ ऐशागणीं युक्त शंकर ॥ संगें पार्वती ॥१४॥

आला अश्वत्थाम्याप्रती ॥ भूतगण स्तुति करिती ॥ नानाभयानक रूपें धरिती ॥ वोळंगती पुढारां ॥१५॥

परि नर्भयपणें द्रौणी ॥ राहिला हात जोडोनी ॥ शिवासि नमस्कार करोनी ॥ घेतले धनुष्यबाण ॥१६॥

शर गुणीं असे सादिला ॥ सौम्यें मंत्र उच्चारिला ॥ महकोप दूरी केला ॥ होवोनि येकचित्त ॥१७॥

मग द्रौणी तियेवेळीं ॥ ह्मणे अगा ये चंद्रमौळी ॥ हा देह आंगिरसकुळीं ॥ जाहला उप्तन्न ॥१८॥

यातें अग्निमाजी होमीन ॥ भक्ति तुजसी समपींन ॥ हे आपत्ती दुर करीन ॥ तुजदेखतां तुजपुढें ॥१९॥

तुजमाजी सर्व प्राणी ॥ व्याप्त असती गुणप्रधानीं ॥ तो तूं मज शूळपाणी ॥ जोडलासी ॥१२०॥

ऐसें बोलोनि प्रज्वळित ॥ प्रवेशला वेदीआंत ॥ ऊर्ध्वबाहू करोनि निश्चित ॥ तो देखिला शंकरें ॥२१॥

मग तयासि पंचानन ॥ बोलता जाहला प्रीतीकरोन ॥ ह्मणे मज वश केलें जाण ॥ तुवां सामर्थ्यें आपुले ॥२२॥

सत्य शौच ममत्वदमन ॥ तपस्त्याग शांति दान ॥ धृति बुद्धि भक्ति वचन ॥ इतुके पदार्थी ॥२३॥

तुवां जैत इच्छे धरिलें ॥ तरी म्यां आतां पांचाळ मारिले ॥ तयांचें आयुष्य असे खुंटलें ॥ आजपासोनी ॥२४॥

ऐसें महादेव बोलिला ॥ तेणें द्रौणी आश्वासिला ॥ मग देहांत प्रवेशला ॥ स्वयें तयाचे ॥२५॥

हातीं विमळखड्‌ग शोभलें ॥ शिवप्रवेशतेक आलें ॥ जाणों कोटिसूर्य प्रकाशलें ॥ देहीं तयाचे ॥२६॥

तेजें युद्ध करिता जाहला ॥ देखोनि भूतां पळ सूटला ॥ मग तो प्रवेशता जाहला ॥ शत्रुशिविरीं ॥२७॥

द्रौणी प्रवेशतां शिबिरीं ॥ कृप कृतवर्मा राहिले बाहेरी ॥ तयां अश्वत्थामा बक्त्रीं ॥ बोलता जाहला ॥२८॥

मी जावोनि शस्त्रेंसीं ॥ जीवें घेईन समस्तासीं ॥ संहारकाळ सर्वासी ॥ भक्षी जैसा ॥२९॥

त्यांतोनि कोणी चुकवील ॥ पळोनि बाहेर येईल ॥ तयांसि तुह्मीं उतावीळ ॥ वधविं खड्‌गें ॥१३०॥

ऐसें बोलोनि द्रोणसुत ॥ गेला पांडवांचे शिबिरांत ॥ तंव धर्मादि नाहीं तेथ ॥ ऐसें पाहता जाहला ॥३१॥

मग अन्यमार्गें भयरहित ॥ धृष्टद्युम्नाचे शिबिरांत ॥ प्रवेशला द्रोणसुत ॥ तये वेळीं ॥३२॥

तंव धृष्टद्युम्न तेथ ॥ निजेलासे सैन्यसहित ॥ पलंग सुगंधें बहकत ॥ पुष्पशय्या ॥३३॥

घोरत असे पलंगावरी ॥ तो द्रौणीनें हाणिला पांपरीं ॥ येरु जागृत होवोनि समरीं ॥ प्रवर्तला देखा ॥३४॥

परि तो निद्राभुत अश्वत्थामेनी ॥ पासला पाडिला केशीं धरोनी ॥ हस्तपाद दडपोनी ॥ मारिता जाहला ॥३५॥

तंव तयासि ह्मणे येरू ॥ मातें सोडी़ नको मारुं ॥ करितां निद्रिस्थाचा संहारु ॥ होय नरकपात ॥३६॥

येरें शब्द अवगणिला ॥ लत्ताप्रहारें मारिला ॥ निश्वेतन जीवें घेतला ॥ तंव स्त्रिया जाहल्या जागृत ॥३७॥

येरू पांचाळातें मारोनी ॥ तयाच्या रथावरी बैसोनी ॥ घराबाहेर निघोनी ॥ थापटिले वारु ॥३८॥

रथ घडघडाट जाहला ॥ तेणें दळभार जागिन्नला ॥ तंव स्त्रियांहीं मांडिला ॥ शोककल्होळ ॥३९॥

कोण कोण ऐसें ह्मणती ॥ एकमेकां पाचारिती ॥ राक्षस मनुष्य कीं भूतजाती ॥ कवणरे कवण ॥१४०॥

एक ह्मणती सांडा भ्रांती ॥ पांचाळराया करोनि शांती ॥ जात असे बैसोनि रथीं ॥ तरी होय कौरववीर ॥४१॥

यानंतरें संसारले ॥ तयावरी उठावले ॥ सकळही युद्ध करूं लागले ॥ नानापरी ॥४२॥

अश्वत्थामें नाम सारिलें ॥ मी द्रौणी ऐसें सांगीतलें ॥ अरे पांचाळासी मारिलें ॥ आतां मारीन तुह्मांसी ॥४३॥

ह्मणोनि सर्व योद्धे वाणीं ॥ दूरी पळविले पिटोनी ॥ आट केला तिये स्थानीं ॥ समस्तांसी ॥४४॥

चांदिणी प्रवर्तली निशी ॥ झावळपणें येकमेकांसी ॥ ओळखी नोळखी निश्वयेंसीं ॥ होववेना ॥४५॥

परि तो रथघडघडाटें ॥ आणि वीरश्रीचे लाठें ॥ वोळखिजेला सुभटें ॥ पारका ह्मणोनी ॥४६॥

यावरी तो वीर द्रौणी ॥ मागुता गेला फिरोनी ॥ कंठीं आणि हृदयस्थानी ॥ मारी धृष्टद्युम्ना मेलिया ॥४७॥

तंव पातला युधामन्य ॥ राक्षसें मारिला ह्मणोन ॥ तोही मारिला खड्‌ग हाणोन ॥ द्रोणपुत्रें ॥४८॥

यापरि सर्व योद्धें मारिले ॥ मग अश्वहत्ती छेदिले ॥ उष्ट्ररासभ हाणिले ॥ उरों न दिलें एकही ॥४९॥

रुद्रदत्त खड्‍गाचेनी ॥ आवरणप्रक्षेपें करूनी ॥ सर्वागीं रक्तें भरला द्रौणी ॥ जैसा दिसे राक्षस ॥१५०॥

ऐसें पांचाळंतें मारोनी ॥ पांडवशिबिरामाजी द्रौणी ॥ प्रवेशला तत्क्षणी ॥ जेथ द्रौपदी पुत्रेसीं ॥५१॥

ते पांडवचि जाणोन ॥ हाणित जाहला द्रोणनंदन ॥ तेणें शब्दें शिखंडी जागोन ॥ त्राणे तेथें पातला ॥५२॥

द्रौणियें सिंहनाद केला ॥ तेणें सर्वा कंप सूटला ॥ येरू रथाखालीं उतरला ॥ जात‍असे त्वरेनें ॥५३॥

हातीं सहस्त्रचंद्राकार ॥ खड्‍ग घेवोनियां शीघ्र ॥ द्रौणी द्रौपदेयां मार ॥ करिता जाहला कुक्षिदेशीं ॥५४॥

मग श्रुतसोम शतानीक ॥ श्रुतकर्मा आणि श्रुतकीर्ति देख ॥ प्रभद्रकादि वीर सकळिक ॥ शिखंडीसहित मारिले ॥५५॥

विराटाचें सैन्य देखिलें ॥ तेंही सकळ खड्‌गें छेदिलें ॥ तैसेंचि द्रुपदाचें मारिलें ॥ सकळ सैन्य ॥५६॥

मग धांवोनियां पुढें ॥ मारिले कुंजर आणि घोडे ॥ तंव योद्धे आले वेगाढे ॥ संसारोनी ॥५७॥

ह्मणती कौरवपांडवांतें ॥ युद्ध प्रवर्तलें मागुतें ॥ ऐसें ह्मणोनि पाहती तेथें ॥ तंव द्रौणी एकलाची ॥५८॥

समस्तही मारीत चालिले ॥ द्रौणीनें अवघेही कापिले ॥ शंखवादन घोर केलें ॥ गर्जिन्नला सिंहनादीं ॥५९॥

तेणें नादें शिबिरांत ॥ पांडव सैन्या जाहला आकांत ॥ तंव सकळांचीं मस्तकें कापित ॥ आला द्रौणी ॥१६०॥

एकाचे करपाद छेदिले ॥ एक कटीं कंठीं निवटिले ॥ ऐसे सहस्त्रावधी मारिले ॥ एक उरले ते बोलती ॥६१॥

अरे हा कायसा शब्द ॥ कवण मारा पेटला जोध ॥ ऐसा थोर केला प्रमाद ॥ वीर हाका देताती ॥६२॥

ऐसे बहुतेक मारिले ॥ एकीं मनीं विचारलें ॥ कीं बाहेर पळूं वहिले ॥ तरी वांचूं प्राणेसीं ॥६३॥

ह्मणोनि बाहेर जाती पळोनी ॥ तेथें कृप कृतवर्मा दोनी ॥ मारिते जाहले मग कोणी ॥ उरलेंचि नाहीं ॥६४॥

एक कर जोडोनि काकुळतीं ॥ सोडासोडा जी ह्मणती ॥ परि तयांचीही शांती ॥ केली दोघीं ॥६५॥

ऐसे समस्तही मारिले ॥ मागुते शब्दघोष केले ॥ द्रौणीसी प्रिय मानविलें ॥ दोघांजणीं ॥६६॥

मग सर्वीकडोनि तेथें ॥ आगी लाविली दुसांतें ॥ अश्वगजादि समस्तातें ॥ जाळिलें देखा ॥६७॥

पांडवांचें अवघें सैन्य ॥ सात‍अक्षौहिणी परिमाण ॥ माजी पहिलें झुंजतां न्यून ॥ जाहलें कितीयेक ॥६८॥

जें उरलेंसुरलें होतें ॥ तें मारिलें द्रोणसुतें ॥ कोणी शेषोर्वरित होते ॥ ते बोलते जाहले ॥६९॥

जें नव्हें दुर्योधनाचेनी ॥ तें केलें अश्वत्थामेनी ॥ हा अजित असे त्रिभुवनीं ॥ देवांदानवां ॥१७०॥

महासमर्थ वीर पार्थ ॥ ज्याचा साह्यकारी भगवंत ॥ तयाचाही येणें निःपात ॥ केला आजी ॥७१॥

परि ते पांचहीजण देवें ॥ वांचविले स्नेहमावें ॥ हें सामर्थ्य केवीं जाणवे ॥ त्रैलोक्यासी ॥७२॥

एक छेदन होवोनि पडिले ॥ एक अग्नीनें माजले ॥ रक्तमांसें भूतळ भरलें ॥ हर्ष जाहला भूतां राक्षसां ॥७३॥

ह्मणती ऐसें सदा होय ॥ तरी क्षुधातृषा जाय ॥ मांसें भक्षूनियां लाहें ॥ पिती अशुद्धें ॥७४॥

यापरि ते रात्रि क्रमली ॥ मग द्रौणी प्रातःकाळीं ॥ रक्तें भरलें खड्‌ग जळीं ॥ धुता जाहला ॥७५॥

अग्नीसमान शोभिन्नला ॥ बोलिला बोल सत्य केला ॥ द्रौणी विजयी जाहला ॥ गर्जिन्नला सिंहनादें ॥७६॥

सात्यकीनें द्रौपदी पळविली ॥ ह्मणोनि ती दोघें वांचलीं ॥ येरांची शांती जाहली ॥ सिद्धी पावली प्रतिज्ञा ॥७७॥

परि ग्रंथांतरीं अनारिसें ॥ कीं द्रौपदीपुत्रांचीं पंच शिसें ॥ कापोनि घातलीं आवेशें ॥ द्रौणीनें रथावरी ॥७८॥

दुर्योधनासि दावावया ॥ परि हें भारतीं नाहीं राया ॥ असो आला लवलाह्यां ॥ द्रौणी तया दोघांजवळी ॥७९॥

आनंदें असे सांगत ॥ पांचाळ सृंजय होते पळत ॥ ते म्यां मारिले समस्त ॥ सैन्यासह पांडव ॥१८०॥

पांचाळ द्रौपदेय सोमक ॥ मत्स्यसैन्येंसीं सकळिक ॥ म्यां मारोनि येकयेक ॥ कृतकृत्यता पावलों ॥८१॥

आतां चला दुर्योधनापाशीं ॥ जिवंत असेल तरी त्यासी ॥ हा आनंद सांगूं विशेषीं ॥ ह्माणोनि चालिले तिघेही ॥८२॥

ऐसें दुर्योधनाज्ञें करोनी ॥ सौप्तिकपर्वामाजी द्रौणी ॥ कर्म करोनियां रजनीं ॥ मारिता जाहला निद्रिस्थां ॥८३॥

असो उभयसैन्या अंत ॥ येथोनि जाहला समाप्त ॥ ऐका पुढील वृत्तांत ॥ ह्मणे मधुकरकवी ॥८४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वादशस्तबक मनोहरू ॥ द्रौणीविजयप्रकारू ॥ द्दितीयाध्यायीं कथियेला ॥१८५॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्वादशस्तबके द्वितीयोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP