कथाकल्पतरू - स्तबक १२ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

दोनी अस्त्रांचिये निर्घाती ॥ कंपायमान जाहली क्षिती ॥ सिंधुजळें खळबळती ॥ वनस्पतीं भ्यालिया ॥१॥

तेथें ऋषीश्वर होते ॥ तेजें व्यापिलें तयांतें ॥ मग काय जाहले करिते ॥ नारदव्यास ॥२॥

द्रौणी आणि धनंजया ॥ दोघांतेंही वारावया ॥ त्रैलोक्यासी वांचवाया ॥ सांगती उभय ॥३॥

परि प्रज्वळित अस्त्रें दोनी ॥ वाराया समर्थ नाहीं कोणी ॥ ह्मणोनि बोलिला चक्रपाणी ॥ पार्थाप्रती ॥४॥

हीं अस्त्रें पूर्वापारीं ॥ कोणीच नव्हतीं प्रेरिलीं समरीं ॥ तरी आतां आंवरा झडकरी ॥ दोनी आपुलालीं ॥५॥

मग पार्थें आपुलें ब्रह्मास्त्र ॥ आवंरोनि घेतलें शीघ्र ॥ परि तेव्हां चितांतुर ॥ जाहला द्रौणी ॥६॥

अस्त्र नावरे आपुलें ॥ ह्मणोनि दीनवदन केलें ॥ मग व्यांसांसि काय बोले ॥ प्रार्थनावचनीं ॥७॥

ह्मणे म्यां प्राणमात्र इच्छें ॥ आणि भीमभयें विशेषें ॥ अस्त्र सोडिलें आवेशें ॥ परि तें मज नावरे ॥८॥

मारावयासी पांडवां ॥ सोडिलें जी व्यासदेवा ॥ व्यास ह्मणती ऐकें बरवा ॥ उपदेश माझा ॥९॥

पार्थें सोडोनि ब्रह्मशिरास्त्र ॥ स्वकीय आवरिलें ब्रह्मास्त्र ॥ कां जे होईल ब्राह्मणसंहार ॥ त्रैलोक्येंसीं ॥१०॥

तो धर्मवंत असे भला ॥ क्षात्रधर्मी नाहीं चळला ॥ तुवां मरणधाक मानिला ॥ ह्मणोनि न चाले तवास्त्र ॥११॥

तूं गुरुबंधू मुख्यांतें ॥ मारूं इच्छितोसि घातें ॥ तरी पांडव धर्मज्ञ तूतें ॥ न मरती कदा ॥१२॥

अगा तुज आणि पांडवां पाहीं ॥ येथोनि वैरसंबंध नाहीं ॥ पार्थ तवास्त्र आवरील देयीं ॥ मणीं आपुलें मस्तकींचा ॥१३॥

मणीं देतां पंडुसुतां ॥ तुज रक्षितील सर्वथा ॥ तरी जावोनि आतां ॥ करीं ह्मणितलें ॥१४॥

द्रौणीं ह्मणे पंडुसुत ॥ पावले सर्व राज्यपदार्थ ॥ रत्‍ने अमोलिक असख्यांत ॥ कौरवांची ॥१५॥

तयारत्‍नांहूनि कांहीं ॥ हा मणी अधिक नाहीं ॥ व्यास ह्मणती परि देयीं ॥ जाणोनि संकट ॥१६॥

श्वत्थामा ह्मणे पुढती ॥ हा मी नेदीं सर्वार्थी ॥ याची मज अति प्रीती ॥ असे ह्मणोनी ॥१७॥

येणें क्षुधातृषा शस्त्रास्त्रें ॥ कदा न बाधिती निर्धारें ॥ आणि देवगंधर्व निशाचरें ॥ नगनाग तस्करादी ॥१८॥

यी कोनाचें भय नाहीं ॥ ह्मणोनि हा मी नेदीं सही ॥ प्राण जाईल तरीही ॥ न टाकीं यातें ॥१९॥

इये इषीकास्त्रामधीं ॥ ब्रह्मास्त्रादि अस्त्रें सविधी ॥ प्रेरोनियां स्वबुद्धीं ॥ मारीन पांडवांसी ॥२०॥

पांडवांचे गर्भजात ॥ आजि संहारीन समस्त ॥ प्रेरण जाणें परि समर्थ ॥ नसें आवरावया ॥२१॥

व्यास ह्मणती रे द्रौणी ॥ ऐसें न करीं निर्वाणीं ॥ देई मस्तकींचा मणीं ॥ कां करिसी अनर्थ ॥२२॥

जरी करिसील गर्भपात ॥ तरिही रक्षितील पंडुसुत ॥ ते सर्वार्थी समर्थ ॥ श्रीकृष्ण सारथी जयांचा ॥२३॥

हें ऐकतां कोपला ॥ ह्मणे मणी नेदीं आपुला ॥ मग अस्त्रें योजिता जाहला ॥ इषिकास्त्रांत ॥२४॥

गर्भपात होवो ह्मणोनी ॥ अस्त्र प्रेरिता जाहला द्रौणी ॥ तें जाणोनि चक्रपाणी ॥ बोलता जाहला ॥२५॥

ह्मणे रे द्रौणे अवधारीं ॥ गर्भ असे उत्तरे उदरीं ॥ जे विराटाची कुमरी ॥ स्नुषा अर्जुनाची ॥२६॥

तिये वर दिला ऋषीश्वरीं ॥ कीं कौरव नाशलियावरी ॥ तुज पुत्र होईल अधिकारी ॥ तो करील राज्य ॥२७॥

ऐसिया ऋषिवरदाचा ॥ बाळक उदरीं उत्तरेच्या ॥ नाश केवीं त्या परिक्षितीचा ॥ होईल तुझेनी ॥२८॥

तया रक्षितील हरिहरू ॥ वृथाभिमान नको करूं ॥ अस्त्रें सांवरोनि शीघ्रु ॥ वांचवीं प्राण आपुला ॥२९॥

तंव क्रोधें ह्मणितलें द्रोणसुतें ॥ काय होईल तुझे पक्षपातें ॥ परि माझें वचन निरुतें ॥ अन्यथा नव्हे ॥३०॥

गर्भ उत्तरेचा पडेल ॥ तूं कैसा वांचविशील ॥ तंव ह्मणे श्रीगोपाळ ॥ ऐकें मूर्खा ॥३१॥

तुझिये अस्त्राचें सामर्थ्ये ॥ सफळ होईल निभ्रांत ॥ गर्भ उदरींहूनि मृत ॥ पडेल अस्त्रपातें ॥३२॥

परि मी तया जीववीन ॥ दीर्घायुषी करीन ॥ तूं बाळघाती दारूण ॥ होसी पापात्मा ॥३३॥

तुज सकळ निंदितील ॥ पापाचें फळ पावशील ॥ पिशाचपणें भ्रमसील ॥ भूंमडळीं ॥३४॥

निर्जनवनीं वास करिसी ॥ लोकस्थिती न पावसी ॥ व्याधींनीं वाहेल पूलसी ॥ दुर्गंधशोणितें ॥३५॥

आणि उत्तरासुत वांचेल ॥ कृपाचार्यापासोनि सकळ ॥ शस्त्राविद्या अभ्यासील ॥ क्षात्रधर्में ॥३६॥

तो परिक्षिती नामें नृपती ॥ धर्मवंत पाळील क्षिती ॥ जरी जळेल शस्त्राग्निदीप्तीं ॥ तरी जीववीन ॥३७॥

ऐसें बोलिला यदुरावो ॥ आणि शापिते जाहले व्यासदेवो ॥ कीं हा अपमानातें पावो ॥ द्रोणनंदन ॥३८॥

हें ऐकोनि शापदान ॥ द्रौणी बोलिला कोपोन ॥ ह्मणे ऐसें जरी पावेन ॥ तरी राहीन किंपुरुषखंडीं ॥३९॥

यावरी तो पांडवांसी ॥ मणी देवोनि उत्तरदिशेसी ॥ स्नान करोनि गंगेसी ॥ प्रवेशला घोरवनीं ॥४०॥

व्यासनारद चक्रपाणी ॥ यांसी पांडवीं पुढें करोनी ॥ येतेजाहले मणी घेवोनी ॥ द्रौपदीजवळी ॥४१॥

अवघे शिबिरीं पावले ॥ रथाखालीं उतरले ॥ तंव द्रौपदीतें देखिलें ॥ निरानंद ॥४२॥

मग धर्माज्ञा घेवोन ॥ कृष्णादेखतां भीमसेन ॥ देवीतें मणी देवोन ॥ बोलता जाहला ॥४३॥

अहो भदे तवपुत्रहंता ॥ आह्मीं जिंकिला उठें सर्वथा ॥ मागां निंदिलें आह्मां समस्तां ॥ क्रोधें तुवां ॥४४॥

तें कार्य सिद्धिसि नेलें ॥ सर्वही वैरी मारिले ॥ मणीं घेवोनियां सोडिलें ॥ अश्वत्थामेयासी ॥४५॥

आतां तो पिशाचवत् होवोनी ॥ गेलाअसे अटव्यरानीं ॥ मग द्रौपदी संतोषवचनीं ॥ बोलती जाहली ॥४६॥

ह्मणे सर्व ऋण फेडिलें ॥ बरवें मण्यातें हरियेलें ॥ तरी यासी बांधा वहिलें ॥ धर्ममुकुटीं ॥४७॥

मणी धर्माचें मुकुटीं बांधिला ॥ जैसा उदयींचा चंद्र शोभला ॥ मग उठोनि द्रुपदबाळा ॥ पांडवां करी कुर्वंडी ॥४८॥

द्रौपदीयें कृष्णाप्रती ॥ मणी घेतला ते सर्व स्थिती ॥ पुसिली तेव्हां श्रीपती ॥ सागता जाहला ॥४९॥

हे कथा अलोलिकीं ॥ असे भारती सौप्तिकीं ॥ परि पुराणांतर आणिकी ॥ एकें राया ॥५०॥

द्रौणियें सौप्तिककर्म केलें ॥ पांचाळादिकां मारिलें ॥ मग तिहीं बिजें केलें ॥ दुर्योधनाजवळी ॥५१॥

सर्ववृत्तांत सांगोनी ॥ शिरें दीधलीं गांधारपाणीं ॥ तेव्हां दुर्योधन हर्षोनी ॥ बोलता जाहला ॥५२॥

ह्मणे बाळें मारिलीं जीवें ॥ आतां पांडव येतील आघवे ॥ ते मारितील स्वभावें ॥ तुह्मालागीं ॥५३॥

ऐसा हर्षविषाद जाहला ॥ तो अश्वत्थामें जाणितला ॥ परि सवेंचि प्राण त्यजिला ॥ दुर्योधनें ॥५४॥

तेथेंचि सांडोनि शिरकमळें ॥ अश्वत्थामा वनीं पळे ॥ इकडे सात्यकी वांचला स्वबळें ॥ अपराजित ह्मणोनी ॥५५॥

तेणें जावोनि सर्व वृत्तांत ॥ पांडवांसी केला श्रुत ॥ तेव्हां समस्तां आकांत ॥ प्रवर्तला ॥५६॥

मग द्रौपदी ह्मणे भीमा ॥ तुवां मारावा अश्वत्थामा ॥ येरू निघाला साउमा ॥ तंव निवारिला श्रीकृष्णें ॥५७॥

तेथ पार्थ ह्मणे तयां ॥ तुह्मी दुःखी करितां वायां ॥ मी मारीन अश्वत्थामया ॥ अहो द्रौपदीये ॥५८॥

जरी तयासि न मारीं ॥ तरीं गांडीव न घृरीं करीं ॥ ऐकोनि हर्षली सुंदरीं ॥ पार्थ रथावरी बैसला ॥५९॥

कृष्णा सारथी होवोनी ॥ पावेल दुर्योधननिपातस्थानीं ॥ माग निघाला तेथोनी ॥ अश्वत्थामयाचा ॥६०॥

देखिल्या रथचक्रवाटी ॥ मग वेगें लागले पाठी ॥ येरू मार्ग दरकुटी ॥ जाताअसे ॥६१॥

लागवेगें दारुण वन ॥ पावते जाहले कृष्णार्जुन ॥ वारुवां पाजोनि जीवन ॥ क्रमिती पंथ ॥६२॥

तंव द्रौणीचे वारु भागले ॥ ते न पळती काहीकेलें ॥ मग राहिला वृक्षाखालें ॥ तंव आले कृष्णार्जुन ॥६३॥

द्रौणियें ब्रह्मास्त्र प्रेरिलें ॥ तेणें वटवृक्ष जाळिलें ॥ अवघे प्राणी संहारले ॥ पडले अग्निआंत ॥६४॥

ह्मणोनि सकळा वनस्पतींयां ॥ कृष्ण प्रार्थिला लवलाह्यां ॥ देवें आज्ञा धनंजयां ॥ दीधली निवारणार्थी ॥६५॥

पार्थें अग्निबाण प्रेरिला ॥ दोहीं अस्त्रां मेळ जाहला ॥ सवेंचि उपशंम असे केला ॥ महावीरें ॥६६॥

तैं धनंजय मारावया ॥ धाविन्नला अश्वत्थामया ॥ तंव कृष्णे वारिलें तया ॥ कीं ब्राह्मण वधूं नये ॥६७॥

हे प्रतिज्ञा जाईल वृथा ॥ मग पार्थें धरिलें गुरुसुता ॥ बांधोनियां मागुते हातां ॥ मारुंचि ह्मणे ॥६८॥

त्यातें वारुनि कृष्ण बोले ॥ हा कर्म भोगील आपुलें ॥ नेवों द्रौपदीजवळी वहिले ॥ ते सांगेल तेंचि करूं ॥६९॥

मग ध्वजस्तंभीं ॥ बांधिला ॥ द्रौपदीजवळी ॥ आणिला येरु अधोमुखें राहिला ॥ दुष्टकर्मीं ॥७०॥

अर्जुन ह्मणे द्रौपदीसी ॥ सांगे काय करूं यासी ॥ तंव कृपा येवोनि तियेसी ॥ बोलिली पतिव्रता ॥७१॥

ह्मणे प्रेतोन्मत्त सुप्त ॥ स्त्री बालक ब्राह्मण गुरुसुत ॥ न कीजे ययांचा घात ॥ तरी सोडा द्रोणी हा ॥७२॥

जैसा पूज्य गुरुद्रोण ॥ तैसाचि हा गुरुनंदन ॥ सोडासोडा झडकरोन ॥ याचें हाचि भोगील ॥७३॥

समस्तां आनंद जाहला ॥ परि भीम मारूं निघाला ॥ त देवें वर्जिन्नला ॥ शास्त्रमार्गें ॥७४॥

यावरी कृष्ण पार्थासि ह्मणे ॥ याचें शिरपवन करणें ॥ अपमानें सोडोनि देणें ॥ जाईल बापुडा ॥७५॥

तें पार्थें मानोनि वचन ॥ त्यासी दीधलें जीवदान ॥ ऐसा दवडिला अपमानोन ॥ व्यासवचनास्तव ॥७६॥

पूर्वी अश्वत्थामा सर्वथा ॥ व्यासदेवें शापिला होता ॥ तये शापाची निर्गता ॥ जाहली येवेळे ॥७७॥

तो शाप फळासि आला ॥ अश्वत्थामा वनीं गेला ॥ ऐसा वृत्तांत असे कथिला ॥ पुराणांतरीं ॥७८॥

मुनि ह्मणे राया अवधारीं ॥ सौप्तिकीं सर्व मारिल्यावरी ॥ धर्मराजा ॥ प्रश्न करी ॥ श्रीकृष्णासी ॥७९॥

माझे पुत्र वीर समस्त ॥ आणि द्रुपदाचेही सुत ॥ धृष्टद्युम्रादि प्रसुप्त ॥ मारिले अश्वत्थामें ॥८०॥

एतुलें द्रौणीसि कैसें बळ ॥ जेणें अनर्थ केला सकळ ॥ तंव बोलिला गोपाळ ॥ ऐकें धर्मा ॥८१॥

द्रौणियें भुतें देखोनि शिबिरीं ॥ प्रसन्न केला त्रिपुरारी ॥ तेणें खड्‍ग दीधले करीं ॥ मग तो शिबिरीं प्रवेशला ॥८२॥

अंगीं प्रकटली रुद्रशक्ती ॥ अभंगखड्गें केली शांती ॥ स्वयें मारिले उमापतीं ॥ द्रौणी निमित्तमात्र ॥८३॥

तो प्रसन्न शूळपाणी ॥ ह्मणोनि पाचाळांतें द्रौणी ॥ मारिता जाहला खड्‍गें करोनी ॥ हें कर्तुत्व रुद्राचें ॥८४॥

आतां मुत्युपावले याचें ॥ उत्तरकर्म करीं साचें ॥ संकल्प विकल्प मनींचें ॥ सांडीं धर्मा ॥८५॥

ऐसा कृष्णें उपदेश करोनी ॥ धर्म आनंदला मनीं ॥ तें उत्तरकर्म येथोनी ॥ स्त्रीपर्वीं आयकिजे ॥८६॥

हें सौप्तिकपर्व संपलें ॥ संकलोनि सांगीतलें ॥ जें वैशंपायनें कथिलें ॥ जन्मेजयासी ॥८७॥

आतां स्त्रीपर्व संक्षेपता ॥ सावधान ऐकावें श्रोतां ॥ दूषण न ठेवावें उपसितां ॥ शब्दसिंधु ॥८८॥

हे भारत व्यासवाणी ॥ मोक्षपदाची निश्रेणी ॥ पदप्रसंगीं चक्रपाणी ॥ साह्य कर्ता ॥८९॥

संस्कृताचा गुप्तार्थ ॥ दुर्बळांसी नव्हे प्राप्त ॥ ह्मणोनि केलें प्राकृत ॥ ग्रंथातरें लक्षोनी ॥९०॥

कथा नानापुराणोक्त ॥ श्रुतमात्र लिहिल्या येथ ॥ येर असती अगणित ॥ ज्या अश्रुत मजलागीं ॥९१॥

आतां सकळ श्रोतांजनीं ॥ कथा ऐकिजे परमपावनी ॥ समस्तां विनवी कर जोडोनी ॥ कवि मधुकर ॥९२॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वादशस्तबक मनोहरू ॥ सौप्तिकपर्वसमाप्तिप्रकारू ॥ चतुर्थोऽध्यायीं कथियेला ॥९३॥

॥ श्रीकष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्वादशस्तबके चतुर्थाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP