कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायना पुसे भारत ॥ कीं दक्षयागीं प्रकटला अनंत ॥ तो सविस्तर सांगा वृत्तांत ॥ कृपा करोनी ॥१॥

अंतरीं करोनि भगवच्चिंतन ॥ कथा वर्णिती वैशंपायन ॥ ह्नणती दक्षें यज्ञदीक्षा घेऊन ॥ यागकार्यी प्रवर्तला ॥२॥

मग बोलाविले प्रजाभूपती ॥ नागरिकेंसीं प्रधान सुमती ॥ आणि घातले पूर्वस्थिती ॥ यागमंडप ॥३॥

पूर्वकर्माचे पद्धतीं ॥ केली यागपात्रांची आइती ॥ याज्ञिकीं मांडिला सुमुहूर्ती ॥ याग देखा ॥४॥

दक्षें घेवोनि पूर्वस्थिती ॥ द्रव्यदानाची आइती ॥ तैं आणिल्या हवनाप्रती ॥ अष्टसिद्धी ॥५॥

ब्रह्मा अध्वर्यु आणि होता ॥ आचार्य आणि उद्नाता ॥ कांकणें बांधिलीं समस्तां ॥ ॠत्विजांसी ॥६॥

सांग करोनि पुण्याहवाचन ॥ वंदिले विरिची ब्राह्मण ॥ मग केलें आवाहन ॥ ॠषेश्वरीं ॥७॥

जाहली अग्नीची स्थापना ॥ गंधाक्षता करुनि ब्राह्मणां ॥ मग प्रवर्तले हवना ॥ ॠषेश्वर ॥८॥

बावनचंदनाची काष्ठें ॥ बेल आंब्याचीं चोखटे ॥ हवनीं रचिलीं एक दाटें ॥ पुण्यतरुंची ॥९॥

यागविधीचे पद्धतीं ॥ अग्नीत घालिती आहुती ॥ देवांदिक्पाळांची भागस्थिती ॥ वेदमंत्री ॥१०॥

मद्य मांस क्षीर घृतीं ॥ द्रव्य पुष्पें नानावृत्तीं ॥ मग पंचामृतें शिंपिती ॥ अध्वरासी ॥११॥

जाणोनि पूषा अदंतु ॥ त्यासी पीठ देती जव सातु ॥ विनोद पाहे जगन्नाथु ॥ यागाचा तो ॥१२॥

जाहली देवांची भागस्थिती ॥ तंव आली रुद्रभागाची वृत्ती ॥ मग विधिमंत्रें दीधली आहुती ॥ महादेवासी ॥१३॥

सकळां पावलें सोमपान ॥ सोमवल्लींचे करोनि कांडण ॥ मग देवोनि अवदान ॥ घेती मुखामृत ॥१४॥

ऐसा जाहला यागविधी ॥ पावली पूर्णाहुतीची संधी ॥ मग दक्षें घेतलें मंत्रविधीं ॥ बस्तशिर तें ॥१५॥

तें घातलें कनकाचे ताटीं ॥ वरी वेष्टिली रत्नगांठी ॥ आणि गुंफिलेंसे चोखटीं ॥ दिव्यांबरीं ॥१६॥

चर्चिलीं चंदनकस्तुरी ॥ जवादी केशर मोगरी ॥ ऐसें दक्षें घेतलें करीं ॥ तें बस्तशिर ॥१७॥

उभे राहोनि ॠषेश्वर ॥ ह्नणती पूर्णाहुतीचे मंत्र ॥ प्रसूतीनें लाविले उंभय कर ॥ स्त्रुवायातें ॥१८॥

जंव करिती हरिअर्पण ॥ तंव सद्नदित जाहलें मन ॥ ह्नणे माझें पावो अवदान ॥ तुह्यांसि देवा ॥१९॥

एका अर्पिले शरीरा ॥ आणि हेंही अर्पितों दातारा ॥ तरी तुह्मां आणि शारंगधरा ॥ होवो भेटी ॥२०॥

तुज अर्पितां धन शरीरा ॥ परि उत्तीर्ण नव्हे जी दातारा ॥ तुजवांचोनि शारंगधरा ॥ तारिल कवण ॥ ॥२१॥

उदंड केले अध्वर ॥ तुझें तुज मी अर्पी किंकर ॥ हेंही वेंचावें कीं शरीर ॥ तवभक्तीसी ॥२२॥

ऐसें चिंतोंनियां मनीं ॥ पूर्णाहुती घातली हवनीं ॥ त्याचें सात्विकपण जाणोनि ॥ प्रकटला हरी ॥२३॥

तो भावाचा परम भोक्ता ॥ स्वयें ज्ञानी स्वयें मागता ॥ तो हातीं घेवोनि होय भक्षिता ॥ पूर्णाहुतीतेम ॥२४॥

तो पद्मनाभ अनंत ब्रह्मादिकां न कळे अंत ॥ त्रिजगतीं महा समर्थ ॥ शेषशयन ॥२५॥

तो तेजःपुंज विशाळ ॥ कोटि विजूंचे झळाळ ॥ कीं कोटि सूर्यचि एक वेळ ॥ उदेले कुंडी ॥२६॥

तेजें दाटल्या दाही दिशा ॥ नयनीं न दिसे महेशा ॥ दृष्टी ढळलिया प्रकाशा ॥ ॠत्विजांच्या ॥२७॥

शंख चक्र पद्म बाण ॥ अर्धागीं लक्ष्मी आपण ॥ गदा खेटक सुदर्शन ॥ खड्र् हातीं ॥२८॥

अष्टभुज महा मूर्ती ॥ मेघश्याम वर्ण दीप्ती ॥ कनकमेखला शोभती ॥ दिव्यपुंज ॥२९॥

हदयीं विप्रपादकमळ ॥ कर्णी कुंडले झळाळ ॥ कंठीं वैजयंती माळ ॥ अमलकमळांची ॥३०॥

माथां झळके रत्नमुकुट ॥ मागें कुरळ सुनीळवट ॥ ललाटी शोभे मळिवट ॥ मृगमदाचा ॥३१॥

नेत्र जणूं शुद्ध कमळ ॥ मुखसरोवरीं भ्रमर बुबुळ ॥ पातयांमाजी शोभेयुगुळ ॥ धणी दीप जैसे ॥३२॥

मग तयांचे उपकंठीं ॥ भोंवया विशाळ व्यंकटी ॥ उघडिली असे नासापुटी ॥ पुण्यगंधाची ॥३३॥

वदनीं शोभे दंतपंक्ती ॥ रातली रसाचे संगतीं ॥ मध्यें रसनेसि हेळावंती ॥ अधरतटीं ते ॥३४॥

करीं कंकणे मुद्रिका ॥ सहस्त्रबाहो सहस्त्रशिखा ॥ माथां छत्र शोभे शेषा ॥ फणिवराचें ॥३५॥

कीं नयनशेषाच्या तारां ॥ मध्यें शोभा अमृतकरा ॥ कीं वोंवाळूं आल्या यज्ञेश्वरा ॥ भूमंडळी त्या ॥ ॥३६॥

ब्रह्मा रुद्र प्रजापती ॥ तयाची करिते जाहले स्तुती ॥ सकळजन प्रेमें घालिती ॥ लोटांगणें ॥३७॥

देव्हडा पायीं द्विजवर ॥ ते राजहंस चामरधर ॥ यापरी पाहते जाहले सुरवर ॥ अनंतासी ॥३८॥

मग पूजा घेवोनि हातीं ॥ उभा राहिला प्रजापती ॥ म्हणे ज्याची ऐकितों कीतीं ॥ तोचि तूं देवा ॥३९॥

जयजयाजी पद्मनाभा ॥ जयजय अक्षरा स्वयंभा ॥ जयजय प्रलयस्तंभा ॥ वेगळा तूं ॥४०॥

जयालागीं तपसाधनें ॥ करिताजाहलों महाहवनें ॥ तोचिं तूं गा ब्रह्मनिर्गुण ॥ आलासि यागा ॥४१॥

तुझें करितां नामस्मरण ॥ भवपतिता होय उद्धरण ॥ तुझें अगम्य पाविजे दर्शन ॥ पूर्वभाग्ये ॥४२॥

मी तुझे रंक गा नागरी ॥ तूं रुद्रादिक पाळिसी द्वारीं ॥ तो तूं येथें आलासि हरी ॥ पूर्णाहुतीसी ॥४३॥

तुझी त्रिभुवनीं न माय संतती ॥ ऐसा तूं समर्थ श्रीपती ॥ मज रंकाचे काकुळती ॥ पावलासी तूं ॥४४॥

कीं कोटिजन्मांची पातकें ॥ आतां गेलीं सर्व अशेषें ॥ देवा तुझेकृपाकटाक्षें ॥ उद्धरलों मी ॥४५॥

मी पावलों सर्व फळा ॥ जे तुज देखिलें डोळां ॥ तरी आतां त्रिविधंतापांवेगळा ॥ करीं स्वामी ॥४६॥

स्त्री अपत्यें आणि आपण ॥ कालसंकेतें पावे मरण ॥ तें दुःख महादारुण ॥ आधिदैविक ॥४७॥

भूत भैरव जखिणी ॥ या दुष्टांची होय पीडणी ॥ ते दुर्धर जाणिजे जाचणी ॥ आधिभूताची ॥४८॥

पशुकलत्र द्रव्यहरण ॥ गोत्रवध कां श्वानभक्षण ॥ जीवांपासाव होय पीडण ॥ तो अध्यात्म ताप ॥४९॥

देवातुझे दर्शन मात्रें ॥ गेलीं त्रिविध महातापत्रें ॥ जैसें पळविजे सहस्त्रकरें ॥ निशितमासी ॥५०॥

त्वांचि साच केलें स्वप्न ॥ मज चुकविलें जन्ममरण ॥ वदलासि अंतीं देईन दर्शन ॥ तें केलें सत्य ॥५१॥

सित्धी पावविला अध्वर ॥ तोचि तूं सत्य शारंगधर ॥ स्वप्नीं दीधला मजला वर ॥ साक्षांत देवा ॥५२॥

तुजकेलिया प्रसन्न ॥ माझें सफळ जाहलें जन्म ॥ ह्नणोनि मग घातलें लोटांगण ॥ दक्षरायें ॥ ॥५३॥

तरी हें संसारीचें सुख ॥ म्यां देखिलें नाहीं पुत्रमुख ॥ हेंचि राहिलें असे कुळक ॥ शारंगधरा ॥५४॥

देव ह्नणे गा प्रजापती ॥ तुझे भक्तीची मज प्रीती ॥ शिरकमळ दिलें शिवाप्रती ॥ तें पावलें मज ॥५५॥

आतां दक्षा तूं अवधारीं ॥ मी जाहलों तुझा आभारी ॥ तरी बस्तमुख जावोनि जन्मांतरीं ॥ पावसी नरमुख ॥५६॥

आणिक ऐकें प्रजापती ॥ तुज वरुणापासाव संतती ॥ एकलक्ष पुत्रगणती ॥ पावसील तूं ॥५७॥

जन्मेजय ह्नणे वेदमूर्ती ॥ दक्षासी लक्ष पुत्रसंतती ॥ परी त्यांची नायकों ख्याती ॥ श्रवणीं आह्मी ॥५८॥

वैशंपायना ह्नणे भूपती ॥ लक्ष पुत्र जाहले प्रजापती ॥ जे वरुणापासाव उत्पत्ती ॥ जाहली दक्षा ॥५९॥

तें सुरेश्वरा जाहलें श्रत ॥ कीं हे पराक्रमी दक्षसुत ॥ यांसि अमरावती घेतां किंचित ॥ नलगे वेळ ॥६०॥

मग इंद्रे बोलावोनी नारद ॥ सांगे दक्षपुत्रांचा विनोद ॥ कीं तयां करोनि आत्मबोध ॥ दवडी सकळां ॥६१॥

दक्षापाशीं आला नारद ॥ ह्नणे तवपुत्रांसि सांगतों वेद ॥ नानाविद्यांचा प्रबोध ॥ करीन यांसी ॥६२॥

तें मानवलें प्रजापती ॥ पुत्र दीधले नारदाहातीं ॥ तेणें उपदेशिली ब्रह्मश्रुती ॥ दहासहस्त्रांसी ॥६३॥

मग ते वीतरागी विरक्त ॥ गेले सिद्धपंथें त्वरित ॥ ऐसे दवडी ब्रह्मसुत ॥ पुत्र सकळ ॥६४॥

दक्ष आला मठाप्रती ॥ तंव पुत्र न देखे भूपती ॥ मग जीवीं धरुनि खंती ॥ शापिलें नारदा ॥६५॥

दक्ष बोले शापवचन ॥ तुझें निश्वळ न राहो आसन ॥ तीन घटिकांवरी पर्यटन ॥ होईल तुज ॥६६॥

ह्नणोनीच कीं जाहलिया श्रीहरीचें दर्शन ॥ मग जन्मासि कारण ॥ तेथें कैचें ॥६८॥

परि देव इच्छेचा महादनी ॥ आणि पुत्रेच्छा दक्षाच्या मनीं ॥ कीं वदनीं बोलिला निंदोनी ॥ ह्नणोनि दीधला वर ॥६९॥

दक्षासि ह्नणे अनंत ॥ तूं माझा परम भक्त ॥ तुझा पाहिला म्यां अंत ॥ भक्ती भावाचा ॥७०॥

तुवां हरिहरां केला भेद ॥ ह्नणोनि पावलासि खेद ॥ कर्म करितां हा प्रसाद ॥ जाहला तुज ॥७१॥

जैसी रत्नाची काढिता किळ ॥ उरे केवों अभिमानपरिमळ ॥ आणि तंतु वेगळें कमळ ॥ निवडे कैसें ॥७२॥

कीं प्राण प्रकृतिभिन्नता ॥ ना तरी पयनभींचे घृता ॥ त्या निवडितां क्षीरामृता ॥ होय नाश ॥७३॥

तैसे हरिहर भिन्न पाहती ॥ ते विटंबनेतं पावती ॥ महा रौरव भोगिती ॥ हरिहरभेदें ॥७४॥

असो पाहोनि तया जगत्पती ॥ दृष्टीं लोपला पशुपती ॥ मग हदयीं पाहिली मुर्ती ॥ नित्यध्यानाची ॥७५॥

नेत्र उघडोनि पाहिलें रुद्रें ॥ तंव तेचि मूर्ति साक्षात्कारें ॥ जैसें प्रतिबिंब सहस्त्रकरें ॥ प्रेरिलें उदकीं ॥७६॥

कीं चंडकिरणीं सविता ॥ सिंधुजळ विखुरी तत्त्वतां ॥ परिपूर्ण भरुनि सर्वथा ॥ जैसा तैसाची ॥७७॥

मग आदरेम ह्नणे पशुपती ॥ दक्षा तुझिये प्रेमभक्तीं ॥ म्यां देखिली दिव्यमूर्ती ॥ शेषशयनाची ॥७८॥

जो दुर्लभ योगेश्वरां ॥ ब्रह्मादिकां सुरेश्वरां ॥ तो आजी तव अध्वरा ॥ आला हरी ॥७९॥

मग स्तविती जाहली प्रसूती ॥ ह्नणे जयजयाजी प्रकृती ॥ तुझेनि जाली पूर्णाहुती ॥ देवाधिदेवा ॥८०॥

तुझें स्वरुपलक्षण सागर ॥ माझें मानसमीन आहे निरंतर ॥ तरी निद्राभोजनीं विसर ॥ न पडावा कांहीं ॥८१॥

मग देवासि सित्धदेव स्तविती ॥ कीं आमुचे मनीं लक्ष्मीपती ॥ तेंचि हें ब्रह्म प्रत्यक्ष स्फूर्ती ॥ अनंतरुपें ॥८२॥

मग ह्नणती लोकपाळ ॥ देवा तूं शुद्ध ज्ञान केवळ ॥ योगियांचे हदयीं अचळ ॥ तेचि मूर्ति तूं ॥८३॥

मग देव करिती स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥ तुझिया रुपाची निर्गती ॥ नेणवे आह्मां ॥८४॥

सर्वभक्तींचा प्रकाश ॥ तोचि तूं देवा परमहंस ॥ ह्मणोनि ब्रह्मादिकांचा ईश ॥ ह्नणती तुज ॥८५॥

उत्पत्ति स्थिती प्रळ्यो ॥ प्रळयीं होय सकळ क्षयो ॥ परि सर्वात्मया निश्वयो ॥ ह्नणती तूतें ॥८६॥

तूं सच्चिदानंदघन ॥ बाह्य अंतरीं परिपूर्ण ॥ तूं शुद्ध अक्षर निर्गुण ॥ अनंता देवा ॥८७॥

तुझिया रुपापासोनि वेगळें ॥ तेथें आमुची दृष्टी नातळे ॥ चतुर्विध वाचा ही मावळे ॥ बोलतां आह्मां ॥८८॥

मग अग्नि करी स्तवन ॥ कीं माझे अंगीं तेज दारुण ॥ आणि पंचविध यागहवन ॥ हे तुझीच शक्ती ॥८९॥

अग्निहोत्र पौर्णमासी ॥ आणि कार्तिक पर्वणीसी ॥ तैसाचि पशु सोमयागासी ॥ तूंचि कारण ॥९०॥

मग देव ह्नणती अनंता ॥ जैं प्रळ्य होय महाभूतां ॥ तैं आह्मां सामाविसी समस्तां ॥ तोचि तूं जलशायी ॥९१॥

तुह्मां शरण जी दातारा ॥ अहो अगम्य अगोचरा ॥ तुमच्या प्रसादें अध्वरा ॥ देखिलें आह्मीं ॥९२॥

उत्पत्ति प्रलय स्थिती ॥ हे तुझी लीला गा त्रिमूर्ती ॥ तुझेचि आझेनें वर्तती ॥ ब्रह्मादि देव ॥९३॥

ऐसिया तुज नमस्कार ॥ जरा जन्म ना आकार ॥ अव्यक्त परी सभराभर ॥ आलासि जगीं ॥९४॥

आणिक स्तविती विद्याधर ॥ देवा तूं कृपेचा सागर ॥ तुझेचि रिघावें निरंतर ॥ भक्तिडोहीं ॥९५॥

मग ह्नणती ॠषेश्वर ॥ अग्नि द्रव्य पशु समग्र ॥ पत्नी सुत सर्व मंत्र तंत्र ॥ तूंचि कारण ॥९६॥

कमलपुष्प धरिजे हस्ती ॥ तैसी पृथ्वी तव दांती ॥ तुज नमस्कार करुं महापती ॥ यज्ञवराहा ॥९७॥

तुझेनि दर्शनावलोकें ॥ गेली अखिलजन्माची पातकें ॥ आतां दवडी भुतें असंख्ये ॥ इहीं दंडिले थोर ॥९८॥

मग ब्रह्मा करीतसे स्तुती ॥ तूं परमात्मा गा श्रीपती ॥ तूं व्यापोनि सर्वाभूतीं ॥ अलिप्त देवा ॥९९॥

जैसें कमळ आणि त्याचा नाल ॥ दोघां एकचि असे मेळ ॥ एक व्यक्त एका शेवाळ ॥ लिंपे जैसी ॥१००॥

या पृथ्वीचे रेणुरज ॥ चातुर्यबळें मोजवती मज ॥ परि तुझें रुप आणि तेज ॥ न वर्णवे गा ॥१॥

जो निर्गुण निराकार ॥ अभंग आणि अजरामर ॥ तो तूं जाहलासि साकार ॥ भक्तिभावें ॥२॥

जै सें पयगभींचें नवनीत ॥ कां शीतकाळीं मुरे शीत ॥ तैसा तूं असोनि अव्यक्त ॥ आलासि व्यक्ती ॥३॥

कीं उद्धारावया जीवांते ॥ ह्नणोनि नटलासि सगुणातें ॥ याग स्थापिला युक्तें ॥ भूमंडळीं तुवां ॥४॥

ह्नणोनि घातलें लोटांगण ॥ असो जाहलें सर्वदेवांचे स्तवन ॥ तंव अनंतें केले मोहन ॥ सकळिकांसी ॥५॥

घातळें मायेचें पांघरुण ॥ रुद्रदेवासवेंचि अवदान ॥ आहुती देवोनि परिपूर्ण ॥ केली तृप्ती ॥६॥

सकळां करोनियां तृप्ती ॥ यागकर्म स्थापिलें क्षिती ॥ मग बोलिले दक्षाप्रती ॥ श्रीअनंत ॥७॥

कीं ब्रह्मा विष्णु महारुद्र ॥ तेथें न ठेवीं भेदांकुर ॥ जैसा एकचि असोनि तरुवर ॥ धडमूळ पाला ॥८॥

कां शरीरासी धड चरण ॥ व्यापारीं दिसे भेद भिन्न ॥ परि विचारितां एकचि जाण ॥ पिंड जैसा ॥९॥

हें कां केलें भिन्नाभिन्न ॥ तरी एक उत्पत्ति एक मरण ॥ एकें कीजे प्रतिपाळण ॥ संसारिकांचें ॥११०॥

स्वयंज्योति अविकार ॥ तो परमात्मा पैं ईश्वर ॥ जेथोनि उठला ओंकार ॥ सृष्टिमूळ ॥११॥

तो आमुचा स्वामी वेगळा ॥ तया नाम रुप ना कर्म लीला ॥ ऐसी माया घालूनि बोलिला ॥ अनंत देवो ॥ ॥१२॥

ह्नणे हरिहरां करिता भेद ॥ त्यासि कोटि ब्रह्महत्या अपराध ॥ नातरी कोटि कपिला गोवध ॥ घडे तयासी ॥१३॥

तुवां आह्मां केलें विभक्त ॥ ह्नणोनि मुखा दीधलें प्रायश्वित ॥ आणि सहस्त्रवर्षे प्रेत ॥ केलें तुज ॥१४॥

जे जन या त्रिमूर्तीप्रती ॥ भक्तिभावें करुनि भजती ॥ तयां सदैव होईल प्राप्ती ॥ मुक्तिपदाची ॥१५॥

येथें साक्षीसि नाहीं कारण ॥ जें त्रयमूर्तींचें करावें भजन ॥ तरी हरिहर दोघे जण ॥ ऐकती जगीं ॥१६॥

सकळी पूजावे हरिहर दोही ॥ तेथें ब्रह्मा आहे नाभिभुवनी ॥ जैसा गर्भ पोखी जननी ॥ एकेचि वदनें ॥१७॥

मग धरोनि आपुले पाणीं ॥ दक्ष घातला रुद्रचरणी ॥ ऐसे बुझावलें दोही ॥ शुद्धभावें ॥१८॥

मग द्रव्यदर्भाची शेष सामुग्री ॥ सर्व समर्पिली त्रिपुरारी ॥ शुद्धभावें नाना उपचारीं ॥ पुजिलें रुद्रा ॥१९॥

ह्नणे देवा तूं भोळा चक्रवतीं ॥ तुज हरिख ना खंती ॥ तूं प्राणलिंग गा पशुपती ॥ सुरनरांचे ॥१२०॥

तूं प्रलय आणि सिद्धी ॥ धर्मकर्माची अभिवृद्धी ॥ तूंचि ज्ञानाची तत्त्वबुद्धी ॥ जगदीश्वरा ॥२१॥

मग उभविले पताका फरारे ॥ गुढिया तोरणें मखरें ॥ देवद्विजांही विधिमंत्रें ॥ विसर्जिला याग ॥२२॥

जाहलिया यागाची समाप्ती ॥ स्त्रान केलें अवभृती ॥ दीक्षा त्यजोनि प्रजापती ॥ घेतली वस्त्रें ॥२३॥

देव दिक्पाळ आदिकरोनी ॥ ॠषी ब्राह्मण सुवासिनी ॥ सर्वा देवोनि वस्त्रेलेणीणं ॥ मांडिलें दान ॥२४॥

पांच लक्ष कनक श्रृंग ॥ आणि एकलक्ष तुरंग ॥ दहासहस्त्र मातंग ॥ भद्रजाती ॥२५॥

अठ्यायशीं सहस्त्र अंगभार ॥ केला कनकाचा विस्तार ॥ नव रत्नांचा आदर ॥ येणेंचि तुकें ॥२६॥

वृषभ आणि शकट दासी ॥ भूमि सरस्वती महिषी ॥ गृहें वस्त्रें सकल द्विजांसी ॥ दीधलीं दानें ॥२७॥

तयापरतें भूरिभोजन ॥ अन्नपान सेवादान ॥ सुखी केले विश्वजन ॥ दक्षरायें ॥२८॥

जाहलें अवभृत स्त्रान ॥ होम दक्षिणा भुरिभोजन ॥ मग क्षिप्रे करोनियां वंदन ॥ निघते जाहले ॥२९॥

लागलें दुंदुभी निशाण ॥ थोर आनंदले सुरगण ॥ विप्र करिती वेदपठण ॥ आले याग मंडपा ॥१३०॥

आतां असो हें स्त्रानदान ॥ प्रसूतें केलें जें पक्कान्न ॥ तें सांगेन रुचिभोजन ॥ श्रोतयांसी ॥३१॥

ऐसा तो त्रिदेवां सहित ॥ मंडपा आला दक्षनाथ ॥ तंव सकळां जाणविली मात ॥ आरोगणेची ॥३२॥

करावया ऋषींची पंक्ती ॥ देव दिक्पाळ भूपती ॥ ताटें विस्तारी प्रसूती ॥ जांबूनदाचीं ॥३३॥

माणीक कनकाचीं फिरंगाणी ॥ ताटें ठेविली दोनी दोनी ॥ आणिक घ्यावया शिखरिणी ॥ ठेविले सोमकांत ॥३४॥

कमोद रायभोगांचा तप्त ॥ ताटीं विस्तारिल दिव्य भात ॥ उदकें शिंपोनियां हात ॥ सरसाविला सकळीं ॥३५॥

जाणों तो कनकाचिये ताटीं ॥ वोगर भासला कैसा दृष्टी ॥ कीं कनक कमळा उपकंठीं ॥ कर्णिका जैसी ॥३६॥

तो चंद्र जैसा निर्मळ ॥ वरी दाळीचा कळस केवळ ॥ तयाहोनि अधिक परिमळ ॥ असे यासी ॥३७॥

मालतीपुष्पांचा कवल ॥ कीं तो अमृतचि निश्वळ ॥ नातरी उगवला प्रत्यक्ष परिमळ ॥ कर्पुराचा ॥३८॥

फेरी शाकांचिया प्रभावळी ॥ मनोहर दिसती पात्रमंडळीं ॥ कीं चंद्रा गगनमंडळीं ॥ नक्षत्रें जैसीं ॥३९॥

तरुमूळींचे चाकवत ॥ शिजलें थोडे आम्ल बहुत ॥ आणिक वृंताकांचे भरित ॥ स्वादिष्ट पैं ॥१४०॥

रुचिक मेथी आणि सुरण ॥ घृतें पचविलीं कडु हरण ॥ वरी पसरिलें असे चूर्ण ॥ मिरेयांचे ॥४१॥

कोंहळे कडोची कारलीं ॥ दोडकें पडवळें तोंडली ॥ वाघारसुवास परिमळीं ॥ कोंदला मंडप ॥४२॥

आलें लिंबुवाची चिरी ॥ मध्ये वाळकांची कोशिंबिरी ॥ लवणशाकांची कुसरी ॥ असंख्यात ॥४३॥

कांकडी कारलें सालफळें ॥ निंब त्रिकुटें आणि बेलें ॥ आंबे भोकरें सेउगेमूळें ॥ कर्वेदें मायणी ॥४४॥

आंवळें कुहिरी पिंपळी ॥ देंट वासदें भंवरसाली ॥ दधिसाय रायआंवळी ॥ राइतीं पैं ॥४५॥

घारी पुरी आणि मंडक ॥ वरी शोभती पिंजरवटक ॥ जाणे सुलाखिले कनक ॥ मध्यभागीं ॥४६॥

खाजी साजुरी वेढनिया ॥ लाडूतिळवे साखरफेणिया ॥ घृतें घातली नेऊनियां ॥ धेनूंचीं पैं ॥४७॥

नानाकेळियांच्या शिकरिणी ॥ लेह्य पेह्य वाघारणी ॥ तेणें ते भरिली पिंगाणी ॥ सोमकांताची ॥४८॥

शुद्धताकाची रामकढी ॥ नाना सांबारीं याची गोडी ॥ तेणें जाहली देशधडी ॥ बापुडी क्षुधा ॥४९॥

सांडगे कुरवडे यांची बवडें ॥ गुळमिरीं यांचे कोंहाळवडे ॥ पापड कोशिंबिरी गोडें ॥ शुष्क काचरिया ॥१५०॥

बोटवे शेवया सरवळी ॥ साखर मिरियांसी घोळिली ॥ आणि साखरे घोळोनियां केळीं ॥ वाढिलीं पैं ॥५१॥

शुद्ध गोदुग्धाच्या खिरी ॥ वरी पंचधारांची चुरी ॥ आणि अमृतफळें शेजारीं ॥ विस्तारिलीं पैं ॥५२॥

आतां असो हा विस्तार ॥ भोजना होईल कीं उशीर ॥ जेथे हरीचा कृपाकर ॥ तेथें न्यून कांहीं नसे॥५३॥

ऐसी जाहली ताटांची आइती ॥ मग ब्राह्मणां बोलावी प्रजापती ॥ चरण क्षाळोनि पात्रांप्रती ॥ बैसविले ते ॥५४॥

दोहीं बाहीं ब्रह्मारुद्र ॥ मध्ये विष्णु शारंगधर ॥ सुरवरेंसी सुरेश्वर ॥ उंचपंक्ती ॥५५॥

दक्षें संकल्पिलें विष्णुप्रती ॥ ऋषी घेती प्राणाहुती ॥ तंव ढेंकर दीधला श्रीपती ॥ घाले पणाचा ॥५६॥

ऋषि जेवितां तूपभात ॥ वरी कथिका वाजत ॥ जाणों पडिसाद गर्जत ॥ गिरिगव्हरीं ॥५७॥

क्षीरीं घालोनी शर्करा ॥ वरी घृताचा घेती फरारा ॥ जिव्हे लाविती आलेंकोरा ॥ निंबुरसेंशी ॥५८॥

ॠषी जेवितां घृतमांडे ॥ देवढामुखीं कवळ सांडे ॥ शाकाफळांचेनि दांडे ॥ ठेविताती ॥५९॥

मुखीं भवंडिती अंगुष्ठे ॥ कुरवाळिती कुशी पोटे ॥ ह्नणती मुखें पाडिली आव्हाटें ॥ विरिचि देवें ॥१६०॥

मस्तकीं पाडितां कां द्वार ॥ तरी हें भरितों सभराभर ॥ सहस्त्रवर्षी आजि पवित्र ॥ जोडलें अन्न ॥६१॥

वळवटेंसी मोदक ॥ वरी क्षीर घृतपाक ॥ ऋषी घालिती निःशंक ॥ मुखामाजी ॥६२॥

ॠषी सतृप्त देती ढेंकर ॥ जाणों गर्जताहे अंबर ॥ मुखीं वर्षती जलधार ॥ कमंडलूंचे ॥६३॥

ऐसी सकळां जाहली तृप्ती ॥ उत्तरापोशन घाली प्रजापती ॥ तंव उष्णोदकांचीं प्रसूती ॥ आणित पात्रें ॥६४॥

तेणें जाहलें कर मुख क्षाळण ॥ मग सर्वागी लाविले चंदन ॥ विंझणे वारिताती जन ॥ प्रजापतीचे ॥६५॥

कापुरें घोळिल्या पुगफोडी ॥ पानें चोखी नागरखंडीं ॥ गधाक्षता लावोनि उदंडीं ॥ विनवी दक्ष ॥६६॥

यागशेषाचा उपहार ॥ दक्षें पत्नी सह केला स्वीकार ॥ आतां असो हा विस्तार ॥ आरोगणेचा ॥६७॥

ऐसें सकळ विश्वजन ॥ भोजनें तृप्त जाहलें संपूर्ण ॥ वेद मंत्र ह्नणती ब्राह्मण ॥ यागहवनाचे ॥६८॥

दक्ष बैसला कनकपार्टी ॥ वामांगीं प्रसूती गोमटी ॥ मग वोंवाळिला रत्नताटीं ॥ लक्ष्मी देवीनें ॥६९॥

यापरी सकळ सुवासिनी ॥ इंद्रदेवाची इंद्राणी ॥ सावित्री करी अक्षय्यवाणीं ॥ दोघांजणांसी ॥१७०॥

भरोनियां मोत्यांचा चौक ॥ मध्ये बैसविला दक्षनायक ॥ मग करिता जाहला अभिषेक ॥ विरिंचिदेवो ॥७१॥

येथें श्रोता ठेवील दूषण ॥ कीं ॠषिवाक्यावेगळें वचन ॥ तरी अनुक्रमें अनुसंधान ॥ बोलिलों असें ॥७२॥

व्यास बोलिला किंचीत ॥ परि गर्भी गौरव समस्त ॥ तें जाणोनि समयोचित ॥ बोलिलों मी ॥७३॥

जैसें तडागीं नसतां पाणी ॥ आणि करुं गेला वहाणी ॥ तरी अन्यत्र खणिंलें ऐसें कवणीं ॥ ह्नणिजे तया ॥७४॥

कन्या देइजे कुळवरा ॥ तेथें कारण काय डांगोरा ॥ तरि वेदमंत्रेंविण वधुवरा ॥ शोभा कैंची ॥७५॥

असो विधि घेवोनि अक्षता ॥ आशीर्वाद जाहला देता ॥ तूं राज्य करीं रे दक्षनाथा ॥ प्रजापतिलोकीचेम ॥७६॥

तंव जाहला जयजयकार ॥ दक्षें नमिले विधिहरिहर ॥ वर्षते जाहले सुरवर ॥ पुष्पवृष्टी ॥७७॥

तो आनंदाचा अवसर ॥ दक्ष हरुषें जाहला निर्भर ॥ प्रदक्षिणा करोनि शारंगधर ॥ वोंवाळिला तेणें ॥७८॥

मग इतुकिया उपरी ॥ हिमवंता ह्नणती ब्रह्माहरी ॥ कीं दाक्षायणी तुझ्या उदरीं ॥ येईल आतां ॥७९॥

ते आद्यकुमरी अंबिका ॥ तयेची त्वां करावी शुश्रुषा ॥ मग ते वरील या त्र्यंबका ॥ महादेवासी ॥१८०॥

असो सकळां करोनि पाठवणी ॥ दक्ष बैसघिला विमानीं ॥ सुरवरही आपुले स्थानीं ॥ जाते जाहले ॥८१॥

वैशंपायन ह्नणे भारता ॥ तुवां पुसिली रुद्रकथा ॥ ते पूर्ण जाहली श्रीभागवता ॥ अनुमतेंसीं ॥८२॥

जाहलें दाक्षायणीचरित्र ॥ हे जाणिजे महापवित्र ॥ संपूर्ण जाहला अध्वर ॥ कर्महोमेंसी ॥८३॥

जगीं मेष हा अपवित्र ॥ परि तें समर्थे प्रतिष्ठिले वक्त्र ॥ कीं सिंहस्थीं जाहली पवित्र ॥ आपण गोदा ॥८४॥

विष्णु भेटला यागांतीं ॥ आतां ऐका फळश्रुती ॥ कथाश्रवणमात्रें नासती ॥ महादोष ॥८५॥

हा ऐकतां दक्षवध ॥ महादेवाचा क्रीडाविनोद ॥ तेणे नासेल भवकंद ॥ महापातकेंसीं ॥८६॥

निर्धना होय धनसंपत्ती ॥ निपुत्रिकांसी पुत्रसंतती ॥ यापरि देईल उमापती ॥ सत्यभावें ॥८७॥

हे महारुद्राची कथा ॥ भावें सिद्धी ऐकतां श्रोता ॥ तया दोष दैन्यही सर्वथा ॥ न लिंपे कधीं ॥८८॥

जेणें पूजिली कल्याणमूर्ती ॥ कां केदारीं घातली दीपा वाती ॥ अथवा पांच प्रदक्षिणा सिंहस्थीं ॥ ब्रह्मगिरीसी ॥८९॥

कीं जान्हवीस्नानाचें फळ ॥ नातरी द्वादशलिंगें पूजिजे निर्मळ ॥ तें हें ऐकतां होय फळ ॥ या पुण्य़ाचें ॥१९०॥

जैसें जाहलें प्रसूते प्रजापती ॥ तैसेंचि कमळजे आणि श्रीपती ॥ ऐसाचि घडला विपावो विपत्ती ॥ अनंतासी ॥९१॥

बारावर्षे भिन्नाभिन्न ॥ दोघीं सेविलें महा अरण्य ॥ शाप जाहले ते दारुण ॥ परस्परें दोघां ॥९२॥

जन्मेजय ह्नणे गा वेदमूर्ती ॥ अनंत श्री हे प्राणप्रकृती ॥ त्या दोघां कां जाहली विपत्ती ॥ तें सांगें मज ॥९३॥

आतां हरिलक्ष्मीची कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें सकळ ऐकावें श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥९४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ दक्षपुराणसमाप्तिप्रकारु ॥ पंचदशोऽध्यायीं सांगितला ॥१९५॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP