कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्री गणेशाय नमः

आवडी पुसे जन्मेजयो ॥ आतां सांगा जी पुढील अन्वयो ॥ कैसा आणिला मुनिरावो ॥ ॠष्यश्रॄंग ॥१॥

मग ह्णणे वैशंपायन ॥ राया ऐके तो अपूर्व प्रश्न ॥ जेणें सुखिया होय मन ॥ श्रोतयांचें ॥२॥

नगरा पाठवोनि प्रधान ॥ अयोध्ये आणिला रोमचरण ॥ दशरथें करोनियां सन्मान ॥ पुसता जाहला ॥३॥

तुह्मा सांगितले ब्राह्मणीं ॥ कीं आणिजे ॠषिश्रॄंगमुनी ॥ त्याचेनि मंत्रे मेदिनी ॥ पडेल पर्जन्य ॥४॥

आणिक ऐकिला असे मंत्र ॥ त्याचेचि हातें होतां अध्वर ॥ तरीच दशरथासि पुत्र ॥ होतील सत्य ॥५॥

मग बोले रोमपाद ॥ राया हा सत्य अनुवाद ॥ परि तो आणावया वेदविद ॥ दुर्घट असे ॥६॥

तो देदज्ञ आणि वनचर ॥ फळमूळकंदांचा आहार ॥ पितयाविण नेणें संचार ॥ मनुष्याचा ॥७॥

तंव सुमंत बोले उत्तर ॥ राया ऐकावा विचार ॥ गंणिकांसि देवोनि श्रॄंगार ॥ पाठवूं तेथें ॥८॥

प्रौढवयसेचिया सुंदरा ॥ गीतसंगीत सुस्वरा ॥ ॠषिप्रबोधितउत्तरा ॥ देऊं जाणत्या ॥९॥

नानापरींची पक्कान्नें ॥ लेह्य पेह्य सुगंधजीवनें ॥ गंध धूप देवोनि वीणे ॥ पाठवूं तेथें ॥१०॥

नट देवोनि भगवानां ॥ मग पाठवूं ॠषीच्या वना ॥ गांवा आणोनि द्यावी कन्या ॥ रोमपादाची ॥११॥

तंव ह्नणे पारिक्षिती ॥ रोमपादास कन्या नव्हती ॥ तरी ते कोणाची निगुर्ती ॥ हें सांगे मज ॥१२॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ ते कन्या दशरथाची निर्धांर ॥ मूळीं लागली ह्नणोनि अव्हेर ॥ केला तियेचा ॥१३॥

ते कौसल्येचे उदरीं ॥ प्रथम वयसेभातरीं ॥ कन्या जन्मली मूळनक्षत्रीं ॥ शांता नामें बोलिजे ॥१४॥

रोमपादासि नाहीं अपत्यं ॥ यास्तव तेणें पाठवोनि दुत ॥ दशरथाजबळी मागीतली सत्य ॥ शांता पोखणीतें ॥१५॥

आतां असो हे आडकथा ॥ दशरथ लागली अवस्था ॥ गणिक बोलावोनि समस्ता ॥ केला निर्धार ॥१६॥

मग त्या निघाल्या सुंदरा ॥ उत्तरदेशींचे मोहरां ॥ वेगें लंघिती गिरिकंदंरां ॥ महावनातें ॥१७॥

उभ्या राहोनि उपकंठीं ॥ तंव धूस्त्र देखिला दृष्टीं ॥ पाहती तंव पर्णकुटी ॥ सेजीं तयांचे ॥१८॥

मृगांचा दिसे कळप एक ॥ त्यांमाजी तो ॠषिबाळक ॥ जैसा तारांमाजी मर्यक ॥ शोभायमान ॥१९॥

तो जाणोनि ॠषिश्रॄंग ॥ त्यांही धरिला गीतानुराग ॥ तें ऐकोनि गायन कुरंग ॥ पावला वेध ॥२०॥

मग लावोनि वेणु वीणे ॥ सप्तस्वर मधुर गायनें ॥ तें ऐकोनि पंचबाणें ॥ मोहिला तो ॥२१॥

काहीं राहे पाहे चमके ॥ मध्ये नाद नृत्य संतोषें ॥ ह्नणे हें कैंचे आदिपुरुषें ॥ निर्मिलें येथें ॥२२॥

जैसा गारोडी मोही विखारा ॥ कीं चुंबक वेधी लोहचुरा ॥ तैंसे वेधिलें ॠषीश्वरा ॥ न शके जाऊं ॥२३॥

मग गणिका जालिया शरण ॥ ओंनमो ह्नणती नारायण ॥ आणि भेटी केली पक्कान्न ॥ नानापरींची ॥२४॥

त्यांतें ॠषि ह्नणे आपण ॥ तुह्नी सत्य सांगा कोण ॥ तंव त्या ह्नणती भगवान ॥ गलंडॠषि आह्नी ॥२५॥

पृथ्वीचीं जीं सकल तीथें ॥ तीं आह्नां जाहली समस्तें ॥ परि निवालों आजि येथें ॥ तवदर्शनें ॥२६॥

मग बोले ऋषिनंदन ॥ साउमे या जी द्या आलिंगन ॥ तुह्नां भगवंतातें नारायणें ॥ धाडिलें येथें ॥२७॥

ह्नणोनि दीघलें आलिगन ॥ ह्दयीं आदळले पीनस्तन ॥ तेणें भ्रमित जाहलें मन ॥ ॠषिपुत्राचें ॥ ॥२८॥

जैसा घृतें शिंपिजे कृशान ॥ कीं कोपें खवळे पंचानन ॥ तैसा चेतला पंचबाण ॥ ऋषिरायाचा ॥२९॥

जंव मुखी सूदली पक्कन्नें ॥ तेणें मोहन जाहलें रसने ॥ वरी पाजिलें असे जीवन ॥ इक्षुरसाचें ॥३०॥

दाळिंबे द्राक्षे कदलीफळें ॥ उतोतिया फणस नारिकेळें ॥ तीं चाखविलीं सकळें ॥ ॠषिश्रृंगासी ॥३१॥

ऐसीं पांच ज्ञानेंद्रियें निर्धांरें॥ तीं मोहीलीं उपचारें ॥ तेणें विसरला तो निर्धारें ॥ पर्णशाळेसी ॥३२॥

रुप रेखेनें बरवेपणें ॥ नयनां जाहले माजवणें ॥ चाखविलीं कामिक पक्कन्नें ॥ तेणें चेतला मन्मथ ॥३३॥

शब्द स्पर्श रुप रस गंध ॥ हें पंचविषयांचे वृंद ॥ तेणें पावला उन्माद ॥ तयांसगें ॥३४॥

सांडोनियां आत्मानिर्ष्ठा ॥ वरपंडा जाहला तो स्पष्टा ॥ ऐसी विषयांची चेष्टा ॥ दुर्घट असे ॥३५॥

तयांसि ह्नणे आपण ॥ ऐसें मधुर कोठील जीवन ॥ आणि या फळांचे मधुरपण ॥ काय वानूं ॥ ॥३६॥

मग त्या ह्नणती सुंदरा ॥ आमुचे आश्रमींचे गिरिवरां ॥ हीचि फळें तरुवरां ॥ समग्रांसी ॥३७॥

आणि तेथें मधुर सुरस ॥ नदी वाहतसे बारा मास ॥ शर्करा असे बहुवस ॥ वाळू तेथें ॥३८॥

कीं सुगंधाचेचि सुरस ॥ कूप भरले आसमास ॥ पक्क सुफळें बहुवस ॥ आमुचे आश्रमी ॥३९॥

मग बोले ॠषिश्रृंग ॥ जरी आह्नां घडे तुमचा संग ॥ तरी लागेल सन्मार्ग ॥ संसाराचा ॥४०॥

तुमचें कवण उपास्यदैवत ॥ कवण तप कवण व्रत ॥ तुमचे हदयी गलंडें दीसत ॥ लिंगांपरी ॥४१॥

कैसे समाधिलक्षण ॥ आणि तुमचें प्रणवसाधन ॥ हें करावें जी निरोपण ॥ कृपा करोनि ॥४२॥

गणिका मनीं विचारिती ॥ ऋषि येथोनि न्यावा एकांती ॥ मग दुर नेवोनि मोहें बांधिती ॥ तयालागीं ॥४३॥

झणीं ऐकेल विभांडिक ॥ हा सकळांचे मनीं धाक ॥ ह्नणोनि उंचवृक्ष पाहोनि एक ॥ स्थिरावती तेथें ॥४४॥

तयासि सांगती कथना ॥ आह्नां आलिगनाची उपासना ॥ त्याचेचि करितसे घ्यान ॥ निरंत्र ॥ ॥४५॥

अंतरी जें करितों ध्यान ॥ तेंचि बाहेरी उमटे चिन्ह ॥ लिंगरुपे आपण ॥ प्रगट होय ॥४६॥

हदयावरी या शाळुंका ॥ आह्नीं स्थापिल्या असती देखा ॥ त्यांचे दर्शनमात्रें लोकां ॥ विसर पडे ॥४७॥

आणि स्पर्श करिता यांसी ॥ नासती पापचिया राशी ॥ मग हेंचि धरुनि मानसीं ॥ वर्तती लोक ॥४८॥

त्वां पुसिला आमुचा आचार ॥ तरी चंदन चचु विभूतिसार ॥ मुखीं कामबीजाचा उच्चार ॥ करुं सदा ॥४९॥

जटाकलाप तो वेणीदंड ॥ कस्तुरी मळिवट तो त्रिपुंड्र ॥ हातीं घेतलासे दंड ॥ पुष्पशंराचा ॥५०॥

आतां समाधींचे लक्षण ॥ तुज दाखवूं परिपूर्ण ॥ जेणें होय समाधान ॥ मानसीं तुझे ॥५१॥

मग बैसोनि पद्मासनीं ॥ चरण वारिले दोनी ॥ कामचेष्टी नानाप्रयत्नीं ॥ केला वश ॥५२॥

श्रृंगीसि उमटले अष्टभाव ॥ जें कामतत्त्व अभिन्नव ॥ स्वेद कंपादि वैभव ॥ आनंदाश्रु पैं ॥५३॥

तेणें संतोषोनि ॠषि ह्नणे ॥ अद्नुत या ॠषींचे करणें ॥ हें आमुचे पितयानें ॥ सांगितलें नाहीं ॥५४॥

बापरे अंनंगाची करणी ॥ क्षणामाजी जिंकिला मुनी ॥ मग घालोनि मोहनी ॥ चालविला तो ॥५५॥

अनुसर जाणोनि सुंदरा ॥ तेथोनि निघाल्या सत्वरा ॥ जातां जातां मनोहरा ॥ करिती गायन ॥५६॥

संगें निघाला वेदविद ॥ जैसा पुष्पगंधीं षटपंद ॥ कीं डोळससूत्रें चाले अंध ॥ मार्ग जैसा ॥५७॥

मार्गी करिती नृत्यगायन ॥ मुखीं घालिती पक्कान्न ॥ शिणेल ह्नणोनियां चरण ॥ चुरिती त्याचे ॥५८॥

ऐसें अंगदेशाचे प्रदेशा ॥ आणिले विभांडिकाचे वत्सा ॥ मग धाडिला संदेशां ॥ रोमचरणासी ॥५९॥

गुढिया मखरें तोरणें ॥ नगरीं वाइलीं वाधावणें ॥ तंव राव आला सुखांसनें ॥ घेवोनि तेथें ॥६०॥

राव जाहला शरणागत ॥ ह्नणे मी भृत्याचा भृत्य ॥ आजि जाहलों कृतार्थ ॥ तवदर्शनें ॥६१॥

घालोनियां सुखासनीं ॥ ॠषि आणिला राजभुवनीं ॥ पुजा करोनी सिंहासनीं ॥ बैसविला तो ॥६२॥

पाहोनियां सुमुहूर्ती ॥ ॠषीस अर्पिली कन्या शांती ॥ मग मांडिली घरस्थिती ॥ उभयवर्गी ॥६३॥

ऐसिया परी तो मुनी ॥ स्थीर केला राजभुवनी ॥ जैसा भद्रंजाती आकळोनि ॥ वश करावा ॥६४॥

स्वर्गी आनंदला वज्रपाणी ॥ ह्नणे अमरावती वहारे वाघावणीं ॥ बैसला आजि सिंहासनीं ॥ ॠषिश्रृंगी ॥६५॥

सुफळ जाहले मनोरथ ॥ श्रृंगी जाहला गृहस्थ ॥ तप सरलें असे निश्वित ॥ यया प्रसंगे ॥६६॥

रायें धाडोनि प्रधान ॥ विभांडका विनविलें जाण ॥ कीं ॠषिशृंगी आमुचे सदन ॥ पावला असे ॥६७॥

देशीं नव्हती उदकवृष्टी ॥ तेणें आटली जीवसृष्टी ॥ तुमचे उपकारें रहाटी ॥ चालेल पुन्हां ॥६८॥

मनी विचारी मुनीराया ॥ दृष्टी घ्यावी पुढील कार्या ॥ तरी आपण चलावें ठाया ॥ अंगदेशी ॥६९॥

ऐसा प्रार्थिला तो मुनी ॥ तेणें कोप सांडिला अंतःकर्णी ॥ परोपकारीं दृष्टी देवोनि ॥ निघता जाहला ॥७०॥

पावतांचि चंपावती ॥ सामोरा पुढें आला नृपती ॥ विभांडकाची करोनि स्तुती ॥ आणिला नगरीं ॥७१॥

प्राथोंनि ह्नणे नृपवर ॥ ही तुमची स्नुषा आणि कुमर ॥ मी तुमचा जी किंकर ॥ करावी क्षमा ॥७२॥

मग मांडिले होम हवन ॥ श्रृंगी देतसे अवदान ॥ तंव वर्षा लागला धंन ॥ पृथ्वीवरी ॥७३॥

विश्वासि जाहला आनंद ॥ तुटला पातकाचा बांध ॥ ऐकिला अयोध्येसि अनुवाद ॥ दशरथरायें ॥७४॥

प्रधानासी करी गोष्टी ॥ ह्नणे ऋषीची जाहली कसवटी ॥ तरी पुत्र होतील ह्नणोनि गांठी ॥ बांधावी पल्लवीं ॥७५॥

मग घाव देवोनि निशाणां ॥ पालाणिली चातुरंगसेना ॥ वाजंत्राची होत गर्जना ॥ अंगदेशा पावले ॥७६॥

आनंदे गेला दशरथ ॥ सवें सुमंत अमात्य ॥ रायें जावोनि प्रणिपात ॥ केला ॠषीसी ॥७७॥

पूजा करोनि दिव्यरत्नीं ॥ आणि चर्चिला दिव्यचंदनीं ॥ सांगपूजा करोनि चरणीं ॥ ठेविला माथा ॥७८॥

शांतेने पतीसि करोनि एकांत ॥ सांगे समूळ वृत्तांत ॥ ह्नणे हा माझा पिता दशरथ ॥ सत्य स्वामी ॥७९॥

ॠषीस ह्णणे दशरथ ॥ त्वां रोमचरण केला सनाथ ॥ तरी आतां पुरवी मनोरथ ॥ माझे भनींचा ॥८०॥

तुझे चरणींचे रजःकण ॥ जै अयोध्ये पडती तैंच धन्य ॥ तवप्रसादें माझे प्रयत्न ॥ होतील सिद्ध ॥८१॥

मग रायें तो पत्नीसहित ॥ अयोध्ये आणिला ॠषिसुत ॥ रोमपाद आला बोळवित ॥ सहजें तेथें ॥८२॥

ठाईठाई ध्वजा मखरीं ॥ दशरथें शृंगारिली नगरी ॥ ॠषिशृंगी पाहे कुंसरी ॥ अयोध्येची ॥८३॥

पूजा वाहोनि स्वहस्तीं ॥ भोजनाची जाहली पंक्ती ॥ मग मांडिली आयती ॥ अश्वमेधाची ॥ ॥८४॥

शरयू महानदीचे तीरीं ॥ मंडप घातले नानापरी ॥ सकल सिद्ध केली सामुग्री ॥ यज्ञद्रव्यांची ॥८५॥

मग मूळें पाठवोनि शीघ्र ॥ ॠषी आणिले समग्र ॥ नानादेशींचे नृपवर ॥ आणिले शोभनासी ॥८६॥

वामदेव जाबाली शातातप ॥ संजय वसिष्ठ कश्यप ॥ कौडण्य कण्व गौरमुख ॥ आणि पाराशर तो ॥८७॥

बकदाल्म्य शतानंद ॥ सुमंतु सौभरी वेदविद ॥ गार्ग्य मार्केडेय नारद ॥ आणि कौशिक तो ॥८८॥

सकलपृथ्वीचे नरेंद्र ॥ तेही आले जी समग्र ॥ मग मुहूर्त पाहोनि सुंदर ॥ मांडिला याग ॥८९॥

अठ्यायशी सहस्त्र ॠषी ॥ छपन्नदेशींचे राव परियेसीम ॥ आले दशरथयागासी ॥ आबालवृद्ध ॥९०॥

मग ह्नणे शृंगऋषी ॥ यज्ञ करित्या या दशरथासी ॥ जोडोनियां पुण्यराशी ॥ नासेल दुरित ॥९१॥

आणि चार पुत्र तेजोराशी ॥ होतील दशरथरायासी ॥ जे जिंकितील त्रैलोक्यासी ॥ स्वपराक्रमें ॥९२॥

मग कैकेयनाथ आणि काशीश्वर ॥ जनक मिथुळेचा नृपवर ॥ रोमचरणादि एक सहस्त्र ॥ मिळाले राजे ॥९३॥

पृथ्वी फिरोनि वेगीं ॥ श्यामकर्ण आणिला प्रसंगी ॥ मग दिक्षा घेतली स्वांगी ॥ दशरथरायें ॥९४॥

यागपात्रें आणि उद्नाते ॥ ॠत्विज पारायणी होते ॥ वसंतकाळी सुमुहूर्ते ॥ स्थापिले अग्नी तिन्ही ॥९५॥

द्रव्य गंध आज्य सुमनीं ॥ अवदानें घालिती अग्नीं ॥ इत्सादान अन्नपाणी ॥ देती सकळिकांसी ॥९६॥

कंठी घालोनि सूत्र हस्तें ॥ आकर्षिलें कौसल्या दशरथातें ॥ वेदविदमंत्रघातें ॥ पाडिला वारु ॥९७॥

अंगभागाचिया आहुती ॥ वेदप्रमाण मुनि होमिती ॥ मग शिर घालोनि पूर्णाहुती ॥ विसर्जिला याग ॥९८॥

माजी वसु पूर्ण शतें ॥ काही होमिता उरलें होतें ॥ तें अन्नादि सांडिले भोंवतें ॥ भूतादिकांसी ॥९९॥

आतां असो हे होमकथन ॥ जाहले अवभृंथ स्त्रान ॥ मग मांडिले पृथ्वीदान ॥ दशरथरायें ॥१००॥

चतुर्दिशा महीमंडळ ॥ रायें संकल्पास घेतलें जळ ॥ तंव विप्र ह्नणती भूमंडळ ॥ न राखवे आह्नां ॥१॥

आह्नीं करावे वेदपठण ॥ आणि तुमचे घरी भोजन ॥ षटकर्माचें संरक्षण ॥ करावें कीं ॥२॥

तूं रायांमाजी पंचानन ॥ आणि आमुचा यजमान ॥ तरी सर्वालंकारीं दान ॥ धेनु घ्याव्या आह्नासी ॥३॥

मग एकलक्ष सालंकृता ॥ धेनु दीधल्या महंतां ॥ मुनी ह्नणती राया दशरथा ॥ जाहलासी निःपाप तूं ॥ ॥४॥

सकळरायांहूनि आगळा ॥ तूं पवित्र जालासि भूपाळा ॥ मग दशरथ अनुवादला ॥ ॠषिश्रृंगाते ॥५॥

राव ह्नणे हो ॠषिसुता ॥ मजला पुत्राची अवस्था ॥ तरी ॠणत्रयाची व्यथा ॥ शीघ्र हरीं कां ॥६॥

मग ह्नणे ॠषिश्रृंग ॥ तुवां केला अश्वमेघ याग ॥ तेणें जाहला सर्वभंग ॥ महादोषांचा ॥७॥

आतां करीन पुत्रइष्टी ॥ तैं कामना तुझी होय संतुष्टी ॥ भूमीवरी जाहल्या वृष्टी ॥ विरुढे धान्य जैसें ॥८॥

पुत्रइष्टी केलिया हवन ॥ चार पुत्र देवांसमान ॥ तुज होतील हें सत्य वचन ॥ ॠषिश्रृंगीचें ॥९॥

ते होतील धनुर्धर ॥ अरिदुमांचे कुठार ॥ समरभूमीसि महाधीर ॥ आणि शीळशांत ॥११०॥

मग तये शरयूनदीतटीं ॥ रायें मांडिली पुत्रइष्टी ॥ देव आव्हानिले वेदपाठीं ॥ ॠष्यश्रृंगे ॥११॥

गणगंधर्व विद्याधर ॥ यक्षकिन्नर सनत्कुमार ॥ ब्रह्मा इंद्र आणि हरिहर ॥ आले अयोध्येसी ॥ ॥१२॥

मग समस्तांसी दंडवतें ॥ घातलीं रायें दशरथें ॥ आणि करिता जाहला पूजेतें ॥ तये वेळीं ॥ ॥१३॥

षोडशउपचारीं पूजा ॥ करिता जाहला राजा ॥ तंव ॠषि मंत्रबीजा ॥ उच्चारित ॥१४॥

श्रृंगी प्रत्यक्ष घेवोनि पात्रें ॥ अवदान बोले वक्त्रें ॥ मग देतसे विधिमंत्रे ॥ यथायोग्य ॥१५॥

त्या मंत्रांची प्रौंढी ऐशी ॥ प्रत्यक्ष येवोगि कुंडापाशीं ॥ घेती आपुले अवदानासी ॥ देवगण ते ॥१६॥

ऐसी देखोनि मंत्रशक्ती ॥ देव संतोषले चित्तीं ॥ ह्नणती या ॠषीचे हातीं ॥ जाहलों तृप्त ॥१७॥

तो देखोनियां दशरथ ॥ सुखी जाहले रुद्र अनंत ॥ अंतरीं राहोनियां येकांत ॥ करिती येकमेकांसीं ॥१८॥

यासी होतील चारी पुत्र ॥ प्रतापीये महावीर ॥ रावणकुंभकणीचें शिर ॥ छेदितील ते ॥१९॥

मग विष्णूसि देवगण ॥ समस्त विनविती वचन ॥ तुजवांचोनि हे अंगवण ॥ न करवे कवणा ॥१२०॥

गणगंधर्व किन्नर पितरां ॥ यक्षराक्षस सुरवरां ॥ याते अवध्य समग्रां ॥ दशानन तो ॥२१॥

ब्रह्याचेनि वरदहस्तें ॥ तो न मानी सर्वातें ॥ तरी मनुष्यरुपें तयातें ॥ वधावें तुवां ॥२२॥

तरी हा सूर्यवंशी दशरथ ॥ महाशीळ यातिवंत ॥ कौसल्यासुमित्रेंशीं शोभत ॥ तिसरी कैकेयी ॥२३॥

तेथें तूं अवतरतां पावेल काज ॥ आणि जनीं वानितील भोंज ॥ आह्मी होऊं गा निश्वयें तुज ॥ सेवकजन ॥२४॥

मग ह्नणे श्रीअनंत ॥ तुह्मी चिंतिता जो अर्थ ॥ तो पूर्ण होईल सत्य ॥ मनोरथ तुमचा ॥२५॥

ॠष्यश्रृंगें केलें हवन ॥ तेणें संतोषलें मन ॥ आतां सत्य करीन वचन ॥ तुमचें देखा ॥२६॥

ॠषिश्रृंगें मंत्रशक्तीं ॥ स्त्रुवा दीघला रायाचे हातीं ॥ मग हरीप्रीत्यर्थ पूर्णाहुती ॥ घातली कुंडी ॥२७॥

तंव निघालें महाअद्भुत ॥ प्रजापती नामें दैवत ॥ महादीप्तिवंत गर्जत ॥ थोरशब्दें ॥२८॥

महाविशाळ मेरुप्रमाण ॥ कृष्णवस्त्र कृष्णवर्ण ॥ कोटिसूर्यप्रभाकीर्ण ॥ आरक्त पैं ॥२९॥

नानाआभरणी परिपूर्ण ॥ दिसे मेषांचे वाहन ॥ तेजःपुंज प्रभा गहन ॥ उदेला कूडी ॥१३०॥

कनकताटी वोगर ॥ कामधेनुक्षीरें सपवित्र ॥ घे घे ह्नणोनियां श्रीकर ॥ उभा राहिला तेथें ॥३१॥

तो ह्नणे ॠषीप्रती ॥ माझे नाम प्रजापती ॥ हा प्रसाद दे गा वेदमूर्ती ॥ दशरथासी ॥३२॥

हें क्षीरयुक्त दिव्यान्न ॥ स्त्रियांसि द्यावें भोजन ॥ तरी पुत्रप्रजा सुलक्ष ॥ होतील सत्य ॥३३॥

ऐसें वदोनि प्रजापतो ॥ अदृश्य जाहला शीघ्रगती ॥ जैसी विजु जाय निगुती ॥ निजस्थानी ॥३४॥

मग तो प्रसाद परिमेळी ॥ ॠषीचे होता करकमळीं ॥ तो दीधला पुण्यकाळीं ॥ दशरथासी ॥३५॥

जैंसे निर्धना सांपडे घन ॥ कीं अंधा येती दिव्य नयन ॥ तैंसें आनंदें जाहलें मन ॥ दशरथाचें ॥३६॥

मेलियाचे येती प्राण ॥ कीं मार्गी लंधिजे दुष्टवन ॥ तैसें आनंदलें मन ॥ दशरथाचें ॥३७॥

अथवा दुर्भिक्षाच्या अंतीं ॥ विपुल पीक पावे शेती ॥ तैसे जाहलें त्या भुपती ॥ दशरथासी ॥३८॥

ऐसा रावो हर्षनिर्भर ॥ मग घेतले तें क्षीर ॥ तें विभागिलें समग्र ॥ स्त्रियांप्रती ॥३९॥

कौसल्येसी अर्ध दीधलें ॥ अर्धाचें अर्ध सुमित्रे लाधलें ॥ मागुती उरलें त्याचे केले ॥ भाग दोन ॥१४०॥

एक भाग कैकेयी प्रती ॥ दुसरा दशरथाचे हातीं ॥ तोही दीघला निजप्रीतीं ॥ सुमित्रेतें ॥४१॥

आणि कविकालिदासमत ॥ रामलक्ष्मण प्रीतिवंत ॥ तैसेचि शत्रुघ्न भरत ॥ एकांश पैं ॥४२॥

कौसल्येनें स्वभागांतून ॥ सुमित्रे देतां प्रीतिकरुन ॥ तो एकपिंड रामलक्ष्मण ॥ येणें गुणें ॥४३॥

परि अनारिसा प्रीतिगुण ॥ शेषाचा अंश लक्ष्मण ॥ तो हरिवांचोनियां क्षण ॥ राहे कैसा ॥४४॥

आतां असो हें नानामत ॥ ॠषिवचनावेगळे जें कल्पित ॥ तें टांकसाळेचें गणित ॥ न सरे जैसें ॥४५॥

मग तीन भागाचें अन्न ॥ तिर्घीसि जाहले भोजर ॥ तोचि मास सुलक्षण ॥ राहिला गर्भ ॥४६॥

आणिक येक भागाचा वांटा ॥ घारीनें पिंड नेला त्रिकुटा ॥ तो बिभीषण आणि त्रिजटा ॥ जाहलीं दोनी ॥४७॥

येथें प्रत्यक्षा काय प्रमाण ॥ हस्नकंकणा आरिसा जाण ॥ नेत्रीं दिसतां अंजन ॥ कासयासी ॥ ॥४८॥

ते तरी बहुतयुगांचे राक्षस ॥ रामलक्ष्मण जाहले मागस ॥ जैं रावणाचे उरले दिवस ॥ वर्षे वीस ॥४९॥

आतां असो हें फळकट ॥ जैसे गजमळाचें कवीठ ॥ कां पुरुषाकृती ब्रह्मनट ॥ नसरे जैसा ॥१५०॥

ह्नणोनि ऋषिवचनानुवाद ॥ तो आहाए अथवा अगाध ॥ परि तो शिरसावंद्य ॥ सुबुद्धांसी ॥५१॥

मग तो ॠषिश्रृंग सपत्नी ॥ दशरथादि सर्वांस पुसोनि ॥ दिव्यरथा वळंघोनी ॥ गेला अंगदेशासी ॥५२॥

ॠषी राजे द्विज समग्र ॥ पाठवणी दीधले अहेर ॥ पूजा करोनियां मनोहर ॥ बोळविलें समस्तां ॥५३॥

आतां असो हें बहुवस ॥ कौसल्ये भरले पूर्णदिवस ॥ व्यथां दाटले गर्भकोश ॥ तिन्ही सुंदरीचे ॥५४॥

जैशा मोहोरल्या आस्त्रवल्ली ॥ संतोषें पाळी वनमाळी ॥ तैशा राणिया प्रतिपाळी ॥ दशरथ तो ॥५५॥

कौसल्ये होती डोहळे ॥ सदा आनंदाने सोहळे ॥ देवविप्रमुनिकुळें ॥ पूजावीं कीं ॥५६॥

सडे रंगमाळा वृंदावनीं ॥ गरुडटके हरिकीर्तनीं ॥ ऐसा उल्हास निजमनीं ॥ प्रवर्तलासे ॥५७॥

ऐसियापरी नवमास ॥ त्र्कमिले कौसल्ये सुफळ दिवस ॥ नाहीं वाटले सायास ॥ गर्भिणींसी ॥५८॥

मग त्रेतायुगाची प्राप्ती ॥ चैत्रशुद्ध नवमी बृहस्पती ॥ पुष्यनक्षत्र चौदाघटिकांतीं ॥ जन्मला राम ॥५९॥

ऐसें कौसल्यात्मज रामरत्न ॥ प्रभें प्रकाशलें गगन ॥ सूर्याचे लोपले किरण ॥ तेणें तेजें ॥१६०॥

स्वर्गी लागलें दुंदुभी निशाण ॥ आनंदे नाचती देवगण ॥ पुष्पीं वर्षला जाणा घन ॥ अयोध्येसी ॥६१॥

रायें केलें पुत्रावण ॥ नानाधर्म भूरितर्पण ॥ मग केलें मुखावलोकन ॥ श्रीरामाचें ॥६२॥

पाहतां आनंदे उल्हासला ॥ ह्नणे जालों ऋणत्रया वेगळा ॥ मग पांचां रत्नी वोंवाळिला ॥ रामचंद्र ॥६३॥

उल्हासेम दाटला दशरथ ॥ जैसा चंद्रोदयीं सरितानाथ ॥ तरी हे उपमा थोडी परमार्थ ॥ नाहीं दुजा ॥६४॥

मग आनंदे जालें वाधावणें ॥ घरोघरीं गुढिया तोरणें ॥ अबंला करिती अक्षय्यवाणें ॥ कौसल्येसी ॥६५॥

पॄथ्वीवरी एकविचित्र ॥ गगनीं त्राहाटिला नाद थोर ॥ तेणें आनंदला कुमर ॥ श्रीरामरावो ॥६६॥

तरी रामासी उपमिजे ॥ ऐसें पाहतां नाहीं दुजें ॥ सूर्य़ा जाहला उल्हास तेजें ॥ त्याचेनि अंशे ॥६७॥

जैसा गंगेसि हेमगिरी ॥ कां मृगनाभीं कस्तुरी ॥ तैसा सूर्यवंशी गळसरी ॥ श्रीरामचंद्र ॥६८॥

त्या अयोध्ये पुण्य नगरीं ॥ वैकुंठउपमे नाहीं सरी ॥ हर्षे उंचावली पांढरी ॥ नगरमंडळींची ॥६९॥

ऐसा जाहला आनंद ॥ तो मज न करवे अनुवाद ॥ तेथें प्रत्यक्ष गोविंद ॥ अवतरलासे ॥१७०॥

वसिष्ठें वर्तविली जन्मोत्री ॥ यासी दोन पुत्र आणि येक स्त्री ॥ राज्य करील एकछत्री ॥ वरुषें अकरासहस्त्र ॥७१॥

शरणागतां वज्रपंजर ॥ आरियांसी वनकुठार ॥ सूर्यवंशी अलंकार ॥ श्रीरामरावो ॥७२॥

भक्तजनांचा कृपाळ ॥ पितृभक्त महाशीळ ॥ एक करोनिया मेळ ॥ नेईल अंती ॥७३॥

पतितां होईल पावन ॥ महावीरां मदभंजन ॥ मज पाहतां नारायण ॥ सामुद्रिकीं हा ॥७४॥

आतां असो हा रघुनाथ ॥ गुण वर्णिता न पुरे ग्रंथ ॥ तंव कैकेयीसी जाहला भरथ ॥ पुत्र दुजा ॥७५॥

आणि सुमित्रेसी लक्षुमण ॥ त्याचिप्रकारें शत्रुघ्न ॥ ऐशा प्रकारें भगवान ॥ आला उदरा ॥७६॥

मग समस्ती सुरवरीं ॥ विचार केला अमरपुरीं ॥ कीं रामासवें सामुग्री ॥ उपजावें आपण ॥७७॥

वानर गोलांगुळ रीस ॥ महापराक्रमी गोपुच्छ ॥ रावणवधावया सायास ॥ अवतरें कीं ॥७८॥

गगनाची वेसण कवळूं ॥ कीं पृथ्वीचा उचलूं गोळूं ॥ उत्पाटावया सकळु ॥ मंदराचळ ॥७९॥

वायुहोनि वेगवत्तर ॥ शिळाद्रुमांचे करावें हातेर ॥ नखदंती विदारोनि भार ॥ मोडावे वैरियांचे ॥१८०॥

महात्र्कोधाचें आथिलें ॥ अन्रितेजाचें वोतलें ॥ समुद्रलंघावया पावलें ॥ वानरसैन्य ॥८१॥

सुग्रीव व्हावें दिनकरें ॥ वाळी व्हावें वज्रधरें ॥ हनुमंत व्हावे रुद्रें ॥ देवी येर प्लवंगम ॥८२॥

ब्रह्यानें व्हावें जांबुवंत ॥ गंधमादन अलकानाथ ॥ अंगद नाम बृहस्पतिसुत ॥ नीळ अग्नी पैं ॥८३॥

आतां असो हा विस्तारु ॥ तेतीसकोटीचा अवतारु वानर जाहले पृथकाकारु ॥ देवअवतार ॥८४॥

ऐसा करोनि निर्धार ॥ देवीं घेतला अवतार ॥ हा नाहीं विचार ॥ राक्षसांसी ॥८५॥

त्यांची उत्पत्ती जन्मकथन ॥ कोणकोणाचें मूळ अवसान ॥ हें पुढें करीन गा ज्ञान ॥ भारता तुज ॥८६॥

आतां असो हे विवंचना ॥ व्रतबंध जाहला रामलक्ष्मणा ॥ भरत आणि शत्रुघ्ना ॥ आदिकरोनि ॥८७॥

तरी हें ऐकें गा भारता ॥ श्रीराम जिंकील सती सीता ॥ तें पुढें ऐकावें श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥८८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तंबक मनोहरु ॥ रामकथा पंरिकरु ॥ तृतीयोऽध्यायीं सांगितली ॥१८९॥ ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP