ओजः सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् ।
सात्वतां नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा ॥३२॥
बळवंतांच्या ठायीं प्रबळ । मनोबळ शरीरबळ ।
धैर्यबळ तें मी गोपाळ । जेणें अळुमाळ डंडळीना ॥४३॥
भक्तांच्या ठायीं भजनकर्म । जेणें माझें अनिवार प्रेम ।
तें कर्म म्हणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥४४॥
नवव्यूह अर्चनस्थिती । सात्त्वतां ज्या नवमूर्ती ।
त्यांत वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवांची ॥४५॥
वासुदेव संकर्षण । अनिरुद्ध आणि प्रद्युम्न ।
हयग्रीव नारायण । वराह वामन नरसिंह ॥४६॥
हे नवव्यूहांची उत्पत्ती । यांमाजी मी प्रथम मूर्ती ।
येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४७॥
हयग्रीव वेदमूर्ती । तेथें श्रीव्यासें करूनि भक्ती ।
वेदव्यासपदप्राप्ती । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥४८॥
नारायण निजमूर्ती । स्रष्ट्यानें करूनि त्याची भक्ती ।
चतुःश्लोकी ज्ञानस्थिती । पावोन निश्चितीं ब्रह्मत्वा आला ॥४९॥
श्वेतवराह महामूर्ती । धरेनें केली पूर्ण भक्ती ।
तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शांती अर्पिली ॥२५०॥
माझी निजमूर्ती वामन । देवीं करूनि पूर्ण भजन ।
त्यांच्या छळें बळी बांधोन । देवांचा सन्मान स्वाधिकार केला ॥५१॥
नरहरि दिव्यमूर्ती । प्रल्हादें करूनि अनन्यभक्ती ।
मी सर्वात्मा सर्वांभूतीं । हे लोकप्रतीती विश्वासिली जेणें ॥५२॥
संकर्षण श्रेष्ठ मूर्ती । ब्रह्माज्ञा रैवतें केली भक्ती ।
अर्पूनियां रेवती । स्वानंदस्थितीं निवाला ॥५३॥
प्रद्युम्न काममूर्ती । सकाम कामुकीं करूनियां भक्ती ।
जे जे काम वांछिती । ते ते निश्चितीं तो पुरवी ॥५४॥
अनिरुद्ध माझा निजसखा । शिवाज्ञा भक्ती केली उखा ।
बाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥५५॥
पूर्णांशे ब्रह्मस्थिती । वासुदेव मी आदिमूर्ती ।
लीलेनें तारिलें नेणों किती । तेथील निजभक्ती उद्धवार्जुनीं नांदे ॥५६॥
नव भक्ति नव मूर्ती । तेथील भक्तीची स्थिती ।
उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ॥५७॥