एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


गृहारम्भोऽतिदुःखाय विफलश्चाध्रुवात्मनः ।

सर्पः परकृतं वेश्म प्रविश्य सुखमेधते ॥१५॥

मूळीं गृहांरभ तें दुःख । कष्ट करितां दुःखकारक ।

निपजविलें त्रिमाळिक । तें अध्रुव देख सर्वथा ॥७२॥

जेथें संसारचि नाशवंत । देह प्रत्यक्षाकारें असंत ।

तेथींचें गृह काय शाश्वत । मूर्ख मानित सत्यत्वें ॥७३॥

जें गर्भीच निमालें । तें उपजतां जातक केलें ।

मृताचें जन्मनांव ठेविलें । तैसें गृह केलें असंत ॥७४॥

तोही असंतू आरंभ कुडा । मृत्तिकेसाठीं लावी झगडा ।

भांडवी दगडासाठीं कां लांकुडा । सुहृदभिडा सांडोनि ॥७५॥

वोळंबा घर करी सायासें । त्यामाजीं सर्प राहे सावकाशें ।

न शिणतां अप्रयासें । परघरवासें संतुष्ट ॥७६॥

तैसाचि योगियाही जाण । न धरी देहगेहअभिमान ।

परगृहीं वसे निरभिमान । सुखसंपन्न सर्वदा ॥७७॥

एकही गृह न करावें । हें सत्य मानिलें जीवें ।

एवढी सृष्टि केली देवें । बाधुं न पवे त्या केवीं ॥७८॥

सृष्टि रचिली कैसेनी । निपजली कोणापासुनी ।

येचि अर्थी गुरु कांतिणी । लक्षण लक्षुनी म्यां केली ॥७९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP