एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सामिषं कुररं जग्मुर्बलिनो ये निरामिषाः ।

तदामिषं परित्यज्य स सुखं समविन्दत ॥२॥

'कुरर' बोलिजे टिटवा । पावला आमिषकवळु बरवा ।

तेणें तेथेंची भक्षवा । तो लोभस्वभावा ठेविला ॥४०॥

तें आमिष देखोनियां फार । बळी जे निरामिष कुरर ।

ते धांविन्नले अतिसत्वर । लहान थोर मिळोनि ॥४१॥

हिरोनि घेऊं पाहती बळें । हें जाणोनियां तो पुढें पळे ।

पळतां देखोनि एक वेळे । त्वरें तत्काळें वेढिला ॥४२॥

त्या आमिषाचिया चाडा । थोर मांडला झगडा ।

मारूं लागले फडफडां । चहूंकडा निष्ठुर ॥४३॥

एक झडपिती पांखीं । एक चपेटे हाणिती नखीं ।

एक विदारिती मुखीं । परम दुःखी होतसे ॥४४॥

आमिष-कवळें गुंतलें मुख । मारितां देऊं न शके हाक ।

खस्तावेस्त करितां देख । बोलावया मुख त्या नाहीं ॥४५॥

हे माझे स्वजाती पहा हो । सांडोनियां सुहृदभावो ।

मज कां करूं आले अपावो । तो अभिप्रावो विवंची ॥४६॥

म्हणे माझिया दुःखासी मूळ । मजपाशील आमिषकवळ ।

तो त्यजोनियां तत्काळ । सुखी सुनिश्चळ बैसला ॥४७॥

जेथ आमिषकवळु पडे । तेथ कलहाचा गोंधळ मांडे ।

परस्परें फुटती मुंडें । ठेंचिती तोंडे येरयेरां ॥४८॥

आमिष त्यजोनि बैसला देख । तो पाहे कलहाचें कौतुक ।

मूळ परिग्रहो तेथें दुःख । परम सुख त्यागितां ॥४९॥

माड्या गोपुरें धवळारा । धनधान्य नाना अंबरा ।

रत्नें प्रवाल धन पुत्रदारा । हा समुदायो खरा परिग्रहो ॥५०॥

या समस्त परिग्रहाचें मूळ । देहबुद्धि गा केवळ ।

तेहीं अभिमानें सबळ । एवं सर्वांस मूळ अभिमानू ॥५१॥

तो अभिमानू जैं सांडे । तैं प्रपंचाचें मूळ खंडे ।

मूळ छेदिल्या जेवीं उलंडे । अतिप्रचंडे तरुवर ॥५२॥

अभिमान देहबुद्धिजीवन । देहबुद्धि संगास्तव गहन ।

उभयसंगू तो आयतन । निवासस्थान परिग्रहो ॥५३॥

एवं अन्योन्य सापेक्षक । येरयेरा आवश्यक ।

याचे त्यागीं परम सुख । अतिदुःख तो परिग्रहो ॥५४॥

परिग्रहत्यागाचें मूळ जाण । आधीं त्यजावा अभिमान ।

तेणेंवीण त्यागु तो विटंबन । केल्या जाण होईल ॥५५॥

अभिमानसहित सकळ सांडे । तैं पडती सुखाचे पायमांडे ।

तें सुख न बोलवे तोंडें । शब्द मुरडे लाजोनि ॥५६॥

अभिमान जाऊन वर्तन । कैसें राया म्हणसी जाण ।

तें अर्भक-गुरुत्वलक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP