एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‍गुरु अमरपती । अनुभवु तोचि ऐरावती ।

स्वानंदेमदें भद्रजाती । उन्मत्तीस्थितीं डुल्लतु ॥१॥

उपदेशाचें वज्र तीख । छेदी संकल्पविकल्पपांख ।

जडजीव ते पर्वत देख । निजस्थानीं सम्यक स्थापिसी ॥२॥

विवेकाचे पारिजात । वैराग्यसुमनीं घमघमित ।

मुमुक्षभ्रमर रिघोनि तेथ । आमोद सेविती चित्सुख ॥३॥

उपशम तोचि बृहस्पती । विश्वासें तुझा निकटवर्ती ।

त्यासी मानिसी अतिप्रीतीं । तो सभेप्रती सदस्य ॥४॥

कृपाकामधेनूंचीं खिल्लारें । श्रद्धावत्साचेनि हुंकारें ।

वोळल्या वोरसाचेनि भरें । तें दुभतें पुरे भागवतां ॥५॥

सतेज चिंतामणीचे खडे । सभोंवतीं लोळती चहूंकडे ।

भक्त न पाहती तयांकडे । चरणसुरवाडें सुखावले ॥६॥

स्वर्गांगना अष्टमासिद्धी । तुजपुढें नाचती नानाछंदीं ।

त्यांतें दास न पाहती त्रिशुद्धी । मंदबुद्धि भाळले ॥७॥

समसाम्यें समान । अढळ तुझें सिंहासन ।

सच्चिदानंदाची गादी जाण । तेथें सुखासन पैं तुझें ॥८॥

पावावया तुझिया पदाप्रती । साधनचतुष्टयसंपत्ती ।

जोडोनियां याजक यजिती । प्रत्यगावृत्तीचेनि यागें ॥९॥

जे मन होमिताति सावधानीं । ऐसें भक्तभजन देखोनि ।

तेणें भावार्थयोगें संतोषोनी । निजपददानी तूं होशी ॥१०॥

त्यांसी निजात्मता देऊनि । बैसविसी निजासनीं ।

मरणेंवीण अमर करूनी । अपतनीं स्थापिसी ॥११॥

इंद्रा अहल्येशीं व्यभिचारु । तुज वृंदेशीं दुराचारु ।

इंद्र जाहला सहस्त्रनेत्रु । तूं सर्वांगे सर्वत्रु देखणा ॥१२॥

इंद्रासी दैत्य करिती दीन । त्याचें पद घेती हिरोन ।

तुज भक्त करिती प्रसन्न । पद चिद्धन ते घेती ॥१३॥

ककुत्स्थ बैसला इंद्राचे स्कंधीं । दुर्वास बैसला तुझ्या खांदीं ।

इंद्र वर्ते विष्णूचे बुद्धी । तूं भक्तच्छंदीं वर्तसी ॥१४॥

रावणें बंदीं घातलें इंद्रासी । तुज बळीनें राखिलें द्वारासी ।

इंद्र याची याग‍अवदानासी । तूं भूमिदानासी याचिता ॥१५॥

इंद्रासी अग्निमुखें प्राप्ती । तुज विश्वतोमुखीं तृप्ती ।

ऐसा सद्‍गुरु तूं कृपामूर्तीं । अमरचक्रवर्ती गुरुराया ॥१६॥

तुझी करावी विनवणी । तंव तेथें न रिघे वाणी ।

वाणीप्रकाश तुझेनी । वक्ता वदनीं तूं सत्य ॥१७॥

एका एक जनार्दनीं । तो जनार्दन वक्ता वदनीं ।

ऐसा वचनामाजीं प्रवेशोनी । ग्रंथकरणी करविता ॥१८॥

तेथें मूळीं निमाली अहंता । अहं दवडूनि तूं कवि कर्ता ।

एका जनार्दनु अभंगी सुता । अभंगता गुरुचरणीं ॥१९॥

त्या गुरुचरणप्रसादें । गुरूचीं लक्षणें विनोदें ।

वाखाणिलीं यथाबोधें । यदुसंवादें अवधूतें ॥२०॥

मागा अष्टमाध्यायाच्या अंतीं । असतां पिंगलेसी एकांतीं ।

विवेकवैराग्य निवृत्तीवृत्ती । निजसुखप्राप्ती पावली ॥२१॥

जंव जंव अपरिग्रह होणें । तंव तंव निजसुख पावणें ।

हेंचि प्रस्तुत बोलणें । तेणें ब्राह्मणें बोलिजे ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP