श्री वेंकटेश विजय - अध्याय १२ वा

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

मागील अकराव्या अध्यायात राजा तोंडमान याने भगवंतांना मंदिर बांधून देऊन तेथे राहविले ही हकीकत येऊन गेली आहे. राजा तोंडमान न्यायनीतीने उत्तम प्रकारे राज्य करीत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होते. या प्रकारे काही दिवस गेल्यावर एक आश्चर्यकारक घटना त्याच्या राज्यात घडली ती अशी-

एके दिवशी एक ब्राह्मण आपली पत्‍नी एक पुत्र यांना राजाकडे घेऊन आला व म्हणाला "राजा मी यात्रेस निघालो आहे. माझा मुलगा लहान असून पत्‍नी गरोदर पाच महिन्यांची आहे. तिला मजबरोबर चालवणे अशक्य असल्याने तू त्यांना आपल्याकडे ठेवून घे "राजाने ब्राह्मणांच्या म्हणण्यास मान्यता देऊन एका व्यवस्थित बंद जागेत चार सहा महिन्यांची शिधा सामग्री देऊन त्यांना ठेवून घेतले. ब्राह्मण यात्रेस गेला. राजास त्याने धन्यवाद दिले.

पुढे ती ब्राह्मणपत्‍नी प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. राजा आपल्या राज्यकारभाराच्या कामात ही गोष्ट विसरून गेला चार सहा महिन्यांची अन्नधान्य सामग्री संपल्यावर ते ब्राह्मण कुटुंब अन्नपाण्याविना तडफडून मरून गेले त्यांच्या अस्थि शिल्लक राहिल्या.

ब्राह्मण यात्रेत रमल्यामुळे त्याला येण्यास २ वर्षे काळ लोटला. परत आल्यावर तो राजास भेटून म्हणाला, "आमचे कुटुंब कोठे आहे? पत्‍नी प्रसूत झाली काय? तिला काय झाले आहे? कन्या की पुत्र ?" इ. याप्रमाणे राजा भानावर आला. त्याने आपणास सावरून म्हटले. तुम्हास कन्यारत्‍न झाले. सर्व मंडळी ठीक आहेत. आताच ते देवदर्शनास गेले आहेत. आपण आपले आन्हिक आटोपून यावे. ब्राह्मण गेल्यावर राजाने ब्राह्मण कुटुंबाची सेवकाकडून चौकशी करविताच त्याला तेथे फक्त अस्थि आढळून आल्या. राजा घाबरला. त्याने भगवंताकडे धाव घेतली. घडलेला सर्व इतिहास सांगितला व आपणास यातून वाचवावे अशी प्रार्थना केली.

भगवंतांनी त्या अस्थि आणवल्या व आपल्या करुणापूर्ण अमृतमयी दिव्य दृष्टीने त्यांचे अवलोकन करताच ते तिघेही पुर्ववत सजीव झाले. राजास आनंद झाला भगवंतांनी ही गोष्ट कोठेही न सांगावी असे सांगून तेव्हापासून ते गुप्त होऊन राहिले आहेत. हे कलियुग आहे अधर्म फार माजणार असा इशारा भगवंतांनी दिला आहे.

पुढे ब्राह्मणास कन्यापुत्र वगैरे भेटले. त्यांनी कोठे गेला होता असे विचारता आपण भगवंताच्या उदरात सर्वविश्व पाहिले असे सांगताच ब्राह्मणास आपल्या विद्वतेबद्दल पश्चात्ताप झाला. त्याने भक्तीची प्रशंसा केली. आपले कन्या पुत्र घेऊन तो राजास भेटून आपल्या गावी गेला.

राजा तोंडमान याने आपल्यावर देवांनी अनंत उपकार केले व आपणास मोठ्या संकटातून वाचविले याबद्दल एकदा सोन्याच्या सहस्त्र तुळशी घेऊन भगवंत दर्शनास आला. त्याने भगवंताच्या चरणी मातीच्या तुळशी पाहिल्या. त्याने देवास विचारताच देवांनी आपला एक कुंभार भक्त आहे त्याने वाहिल्याचे व सर्व भक्तांवर आपली सारखी दृष्टी असल्याचे सांगितले. आपला एक भीम नावा कुलाल भक्त आहे तो उत्तरेस राहतो हे ऐकून राजा त्या गावास गेला इतक्यात देवही तेथे आले. त्याने उभयतांचा सत्कार केला.

श्रीवेंकटेशांनी कुंभारास सायुज्य मुक्ति दिली व तोंडमानाच्या योग्यतेप्रमाणे त्या सरूपता मुक्ति देवांनी दिली.

असा वरदीग्रंथ आहे भक्तांच्या मनकामना पूर्ण करणारा सर्वांनी भक्तीने वाचवा.

श्रीपादोदरेंद्रगिरीनिलयाय नमः ॥ ॐ नमो जी वेंकटाद्रिवासा ॥ भक्तवत्सला पुराणपुरुषा मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा अनंता ॥१॥

जय वैकुंठनिलया मधुकैटभारी ॥ दितिजसंहारा मुरारी ॥ मंदस्मित वदना मीनकेतनारी ॥ अहोरात्र ध्यातो तुज ॥२॥

जय मुनिजनमानसरंजना ॥ पद्मावतीप्राणजीवना ॥ आकाशजामाता भवभंजना ॥ मानववेषधारका ॥३॥

करुणासागरा कंजनेत्रा ॥ कामजनका कौतुभधरा ॥ कमलनाभा कोमलगात्रा ॥ करुणासागरा श्रीहरी ॥४॥

नमो दशावतारवेषधारका ॥ दुर्जनसंहारा त्रिभुवनपाळका ॥ अदितिपुत्रवरदायका ॥ अनंतशयना आदिपुरुषा ॥५॥

तुझ्या कृपाबळे जगन्नाथा ॥ एकादशाध्यायापर्यंत ॥ श्रीवेंकटेशविजय ग्रंथ ॥ संपूर्ण जाहला निर्धारी ॥६॥

शेवटील अध्याय बारावा ॥ बोलवी आता करुणार्णवा ॥ जगज्जीवना केशवा ॥ तुझे चरित्र तूचि बोले ॥७॥

तोंडमान नृपवर ॥ बांधोनिया नूतन मंदिर ॥ स्थापिला तेथे इंदिरावर ॥ गतकथा इतुकी जाहली ॥८॥

यावरी तोंडमान नृपवर ॥ जो वेंकटपतीचे प्रियपात्र ॥ जो धार्मिक उदार धीर ॥ स्वधर्माचारे राज्यकरी ॥९॥

ज्याच्या राज्यात बहुत नीति ॥ वीर सर्व एक पत्‍नीव्रती ॥ सत्यवचनी निर्धारी ॥१०॥

सर्वही वेंकटेशाचे भक्त ॥ स्त्रिया सर्वस्व धर्मे वर्तत ॥ अवर्षण दरिद्र दुष्काळ तेथे ॥ नाही राज्यात सर्वथा ॥११॥

त्रिकाळ वेंकटेशाचे दर्शन ॥ सर्वदा अक्री सच्छास्त्र श्रवण ॥ आल्या अतीतासि अन्नदान ॥ यथाशास्त्रे वर्ततसे ॥१२॥

काही दिवस लोटल्यावरी ॥ जाहली एकनवल परी ॥ वसिष्ठगोत्रींचा ब्राह्मण निर्धारी ॥ कुर्म नाम तयाचे ॥१३॥

राघव नावाचा एक पुत्र ॥ महालक्ष्मी नामे स्त्री पवित्र ॥ पुत्र स्त्री घेवोनि विप्र ॥ नगरा आला रायाच्या ॥१४॥

वेगे येवोनि ब्राह्मण ॥ घेतले रायाचे दर्शन ॥ राये षोडशोपचारे पूजोन ॥ वर्तमान पुसतसे ॥१५॥

म्हणे स्वामि कोठील कोण ॥ काय निमित्त जाहले आगमन ॥ स्त्रीपुत्रांसि संगे घेऊन ॥ कोठे जाता या पंथे ॥१६॥

यावरी बोले तो द्विजवर गंगास्नानासि जातो निर्धार ॥ संगे घेऊनि स्त्रीपुत्र ॥ जात असता नृपवर्या ॥१७॥

स्त्री पंचमासी गर्भीण ॥ पुत्र बालक अज्ञान ॥ पंथ न चालवे याचेन ॥ परम संकट पडियेले ॥१८॥

षण्मासात येतो परतोन ॥ तव वरी करी यांचे पालन ॥ धर्मात्मा तू पुण्यपरायण ॥ करी काज एवढे ॥१९॥

महायात्रेचे फळ ॥ तुज प्राप्त होईल केवळ ॥ विप्रकाजी तू सुशीळ ॥ जाणोनि पातलो तव दर्शना ॥२०॥

अवश्य म्हणोनी तोंडमान ॥ ब्राह्मणासि देवोनि यथेष्टधन ॥ बोलविला यात्रे कारणे ॥ परमादरे करोनिया ॥२१॥

विप्रस्त्रीसी एक मंदिर ॥ देवोनिया राजेश्वर ॥ षण्मासा पुरते समग्र ॥ साहित्य आत भरियेले ॥२२॥

दृढ कपाट लावोन ॥ करोनि ठेविले द्वारबंधन ॥ आपण राज्यकार्यी गुंतलापूर्ण ॥ नाही स्मरण तयांचे ॥२३॥

इकडे ब्राह्मण गेला यात्रेस ॥ तीर्थ हिंडता लागले दिवस ॥ लोटती जाहली दोनवर्षे ॥ विप्र तेथोनि निघाला ॥२४॥

इकडे षण्मासा पुरते अन्न ॥ ठेविले होते राजयाने ॥ ते सरोनि गेले संपूर्ण ॥ परम कठीण वोढवले ॥२५॥

स्त्री पुत्र अन्न अन्न करिता ॥ मरण पावले मंदिरात ॥ रायासि हे नाही श्रुत ॥ स्मरण तयाकारणे ॥२६॥

दोनवर्षे भरता साचार ॥ अकस्मात आला तो द्विजवर ॥ रायासि भेटोनि सत्वर ॥ आशीर्वचन बोलिला ॥२७॥

म्हणे राजचक्रचूडामणी ॥ यात्रा घडली त्वत्कृपे करोनी ॥ माझी स्त्री पुत्र दोन्ही ॥ सुखी आहेत की राजेंद्रा ॥२८॥

स्त्री जाहली की प्रसूत ॥ पुत्र की कन्या जाहली तीते ॥ शिशुसहित यथार्थ ॥ क्षेम आहे की नरेंद्रा ॥२९॥

ऐसे बोलतांचि विप्र ॥ धकधकिले रायाचे अंतर ॥ म्हणे मज स्मरण नाही अनुमात्र ॥ काय गति जाहली कळेना ॥३०॥

षण्मासापुरते अन्न ॥ केले द्वारबंधन ॥ दोन वर्षे लोटली त्या कारण ॥ केवि वाचतील स्त्री सुत ॥३१॥

राये दूत पाठवून ॥ तात्काळ आणवी वर्तमान ॥ तो उभयता पावली मरण ॥ अस्थि पडिल्या तया स्थळी ॥३२॥

आता न देखता तयाते ॥ विप्र कोपेल की मजवरुते ॥ परम संकट पडिले रायाते ॥ घाबरा जाहला अंतरी ॥३३॥

जैसे होता वेद हरण ॥ घाबरा जाहला चतुरानन ॥ तैसा राजा तोंडमान ॥ भयभीत जाहला ॥३४॥

मनी विचारी राजेंद्र ॥ कैसा करावा आता विचार ॥ ब्राह्मणासी प्रत्युत्तर ॥ काय द्यावे यावरी ॥३५॥

अन्याय तो घडला उत्कृष्ट ॥ पुढे काही न सुचे वात ॥ कृपाळू माझा श्रीवेंकट ॥ त्याविणे संकट हरेना ॥३६॥

त्यासी शरण ये अवसरी ॥ जो भक्तजनांचा कैवारी ॥ क्षीराब्धिशयन क्षीराब्धिकुमारी ॥ प्राणवल्लभा जगदात्मा ॥३७॥

बुद्धिप्रेरक भगवंत ॥ राजा धैर्य धरोनि मनात ॥ ब्राह्मणाप्रती निश्चित ॥ काय बोलता जाहला ॥३८॥

राव म्हणे ब्राह्मणा ॥ तुझी स्त्री पतिव्रता सगुणा ॥ प्रसूत जाहली तिजकारण ॥ कन्यारत्‍न जाहले ॥३९॥

पुत्रकन्येस घेऊन ॥ श्रीवेंकटेशदर्शना लागून ॥ आज प्रातःकाळी उठून ॥ वेंकटाद्रीसी गेली असे ॥४०॥

आपण स्नान संध्याकरून ॥ करावे सावकाश भोजन ॥ इतक्यात येतील परतोन ॥ हरिदर्शन घेवोनिया ॥४१॥

ऐकोनि आनंदला विप्र ॥ स्नानासि गुंतला साचार ॥ इकडे गुहामार्गे राजेशरा ॥ धावत आला हरिपाशी ॥४२॥

मुखचंद्र उतरला समस्त ॥ दुःखे नेत्र जाहले आरक्त ॥ नेत्री अश्रुधारा वाहत ॥ चरणधरी श्रीहरीचे ॥४३॥

रायासि म्हणे राजीवनयन ॥ अकाळी का जाहले आगमन ॥ काय संकट पडिले म्हणोन ॥ शोकाकुलित जाहला ॥४४॥

मग राजा कर जोडून ॥ करिता जाहला अपारस्तवन ॥ म्हणे जगद्‌गुरुउ जनार्दना ॥ जगन्निवासा श्रीहरी ॥४५॥

नागेंद्रशयना नारायणा ॥ नागरिशत्रुजनकमर्दना ॥ नागाननजनक कंठभूषणा ॥ नागारीवाहना सर्वेशा ॥४६॥

कमळनाभा कमळलोचना ॥ कमळोद्भवजनका कल्मषमोचना ॥ कमळधरार्चित कमळभूषणा ॥ कमळशयना कमळाप्रिया ॥४७॥

अनंतरूपा अनंतनामा ॥ अनंतगुणमंडिता मेघश्यामा ॥ आद्य अनादि आत्मारामा ॥ परात्परा अनंता ॥४८॥

विश्वेश्वरा विश्वपाळणा ॥ विश्वंभरा विश्वमतिचाळणा ॥ विश्वनाथा विश्वरक्षणा ॥ विश्वोद्धारा विश्वेशा ॥४९॥

दीनबंधो दीननाथा ॥ दितिजसंहारा दिनोद्धर्ता ॥ दिगंबरा अवयवरहिता ॥ दशावताररूपधारका ॥५०॥

बाळकासि होता दुःख फार ॥ जननीपाशी धावे सत्वर ॥ तैसा मी अनाथपामर ॥ आलो शरण तुजप्रती ॥५१॥

मी अपराधी असे नारायणा ॥ रक्षी रक्षी मजकारणे ॥ जनक जननी बंधु स्वजन ॥ तुजवाचोनी नसे ॥५२॥

दोन वर्षामागे अनंता ॥ एक विप्र आला अकस्मात ॥ मजपाशी ठेवोनि स्त्रीसुता ॥ आपण गेला यात्रेसी ॥५३॥

ब्राह्मणाचे स्त्रीसुत ॥ ठेवोनि एका गृहात ॥ षण्मासा पुरते साहित्य ॥ दिधले त्यासि नारायणा ॥५४॥

दृढ कपाट देऊन ॥ मी प्रवर्तलो राज्यकारणां ॥ दोन वर्षे लोटली जनार्दना ॥ स्मरण नाही मजलागी ॥५५॥

आता विप्र येवोनि त्वरित ॥ मज पुशिले कोठे स्त्रीसुत ॥ आजि स्मरण जाहले माते ॥ ब्राह्मणाते पाहोनिया ॥५६॥

दूत धाडोनी पाहिले तेथ ॥ निमाली दोघे अन्न अन्न करित ॥ अस्थींची रास मंदिरात ॥ पडली असे केशवा ॥५७॥

विप्रासि न देववे प्रत्युत्तर ॥ मानसी जाहलो भयातुर ॥ मग धैर्य करोनी साचार ॥ विप्राप्रती बोलिलो ॥५८॥

तुझी स्त्री जाहली प्रसूत ॥ कन्यारत्‍न जाहले तीते ॥ पुत्रकन्या घेवोनि त्वरित ॥ वेंकटाद्रीसी गेली असे ॥५९॥

श्रीहरीदर्शन घेऊन ॥ येईल आता त्वरे करून ॥ ऐसे ब्राह्मणासी बोलून ॥ धावत आलो तुजपाशी ॥६०॥

भक्तपाळक तू परमात्मा ॥ अन्याय माझा करी क्षमा ॥ तुजवाचोनि मेघश्यामा ॥ आश्रय नसे दुसरा ॥६१॥

ऐसे ऐकोनिया जनार्दन ॥ सुहास्यवदन बोले वचन ॥ म्हणे शीघ्र दूत पाठवून ॥ अस्थि आणावी आताची ॥६२॥

मग तात्काळ नृपवर ॥ अस्थि आणविल्या समग्र ॥ ते पाहोनि श्रीधर ॥ काय करिता जाहला ॥६३॥

स्वामीतीर्थाचे पूर्वेसी ॥ सरोवर असे निश्चयेसी ॥ तेथे आपण ह्रषीकेशी ॥ येते जाहले तात्काळ ॥६४॥

सरोवरतीरी ठेविल्या अस्थि ॥ त्यावरी जळ शिंपिले आत्महस्ती ॥ कृपादृष्टीने पाहता श्रीपती ॥ नवल अद्भुत जाहले ॥६५॥

स्त्री आणि कुमार कुमारी ॥ निद्रिस्तापरी उठिले झडकरी ॥ तोंडमान आनंदला अंतरी ॥ म्हणे मुरारी पावला मज ॥६६॥

धन्य धन्य मी कृतकृत्य ॥ मानूनि श्रीहरीचे चरण धरित ॥ म्हणे हे दीनदयाळा अघटित ॥ घडविले आजि समर्था ॥६७॥

तू पूर्ण ब्रह्म सनातन ॥ काय एक न करशी इच्छेकरून ॥ आकारलासि भक्ता कारण ॥ दीनदयाळा श्रीपती ॥६८॥

मग वेंकटेश बोले वचन ॥ कोणासी न सांगे हे वर्तमान ॥ आजि पासोनि साक्षात बोलणे ॥ न घडे जाण सर्वथा ॥६९॥

कलिमाजेल बहुत ॥ लोक होतील अधर्मरत ॥ यास्तव राहू गुप्त ॥ जाण यथार्थ राजेंद्रा ॥७०॥

असो वंदोनि हरीचे चरण ॥ स्त्रीस्तु अर्पी ब्राह्मणालागून ॥ विप्र जाहला आनंदघन ॥ स्त्रियेप्रती पुसतसे ॥७१॥

घेवोनिया कुमार कुमारी ॥ कोठे गेली होतीस सुंदरी ॥ येरी वर्तमान श्रुतकरी ॥ पतिप्रती सर्वही ॥७२॥

यात्रेसि गेलियावरी आपण ॥ मरण पावलो अन्नेविण ॥ वेंकटेशाचे उदरी जाण ॥ गेलो होतो स्वामिया ॥७३॥

अनंत ब्रह्मांड समग्र ॥ देखिले म्या साचार ॥ देवांसहि चतुर्वक्त्र ॥ प्रत्यक्ष म्या पाहिला ॥७४॥

पुत्र म्हणे ताता अवधारी ॥ भुतगणांसहित त्रिपुरारी ॥ सप्तही समुद्र नेत्री ॥ पाहिले म्या तत्वता ॥७५॥

शिशु म्हणे वन उपवन ॥ पर्वत गुहा कठिण स्थान ॥ देवदानव यक्षगण हरीउदरी पाहिले ॥७६॥

स्त्री प्राणेश्वरा ऐका ॥ काय वर्णू तेथीलसुखा ॥ पुन्हा आम्हांसी वैकुंठनायका बोलावोनि आणिले ॥७७॥

ऐसे ऐकोनि उत्तम ॥ विप्र म्हणे धिक् माझे जन्म ॥ वेदाध्ययन शास्त्र उत्तम ॥ धिक् पठण माझे असे ॥७८॥

तीर्थ यात्रा आलो करून ॥ धिक् ते माझे सर्वसाधन ॥ धिक् जळे ते अनुष्ठान ॥ हरिप्राप्ती विण व्यर्थ पै ॥७९॥

हरिप्राप्तिविण कर्म ॥ तेचि जाणावे अकर्म ॥ हरि प्राप्तिविणे दानधर्म ॥ व्यर्थ काय जाळावे ॥८०॥

जैसे उदकेविण सरोवर ॥ की नासिके वाचोनि वक्त्र ॥ की दीपाविण मंदिर ॥ शून्य दिसे ज्यापरी ॥८१॥

तैसे हरिप्राप्तिविणे ध्यान ॥ व्यर्थचि करणे देहदंडण ॥ असो स्त्रीसि म्हणे ब्राह्मण ॥ धन्य तूचि पै ॥८२॥

स्त्री पुत्र पुत्री सहित ॥ विप्र स्वदेशासी जात ॥ हरिगुण मुखी वर्णिता ॥ परमानंदे गेला पै ॥८३॥

इकडे तोंडमान भूपती ॥ सर्वभावे भजे हरिप्रती ॥ सहस्त्रतुलसी मंजरी प्रीती ॥ सुवर्णाच्या करविल्या ॥८४॥

प्रेम भावे वेंकटेशासी ॥ अर्पिता जाहला सुवर्णतुलसी ॥ पूजन करोनी वेगेसी ॥ राव स्वस्थाना पावला ॥८५॥

दुसरे दिवशी तोंडमान म्हणे ॥ पुन्हा आला पूजनालागून ॥ तो मृन्मय तुलसीचे पूजन ॥ नेत्री पाहता जाहला ॥८६॥

तोंडमान म्हणे नारायणा ॥ माझी पूजा अव्हेरून ॥ मृन्मय तुलसी केल्या धारण ॥ श्रीनिवासा नवल हे ॥८७॥

वेंकटेश म्हणे नृपाते ॥ लक्षवधि आहेत माझे भक्त ॥ दरिद्री आणि श्रीमंत ॥ समसमान मजलागी ॥८८॥

उत्तरदिशेसी एकग्राम ॥ एक कोशावरी आहे उत्तम ॥ तेथे भक्त माझा नामे भीम ॥ कुलाल जातीचा वसतसे ॥८९॥

मृन्मयतुलसी करून ॥ भावे अर्पिल्या तेणे ॥ त्याची भक्ति पाहून ॥ परमानंद वाटला ॥९०॥

ऐसे ऐकता नरेश ॥ जाता जाहला तया ग्रामास ॥ कुलाल पाहोन त्यास ॥ काय बोलता जाहला ॥९१॥

मी दरिद्री क्षुद्र याती ॥ काय पातला एथे नृपती ॥ तो इतक्यात खगपती ॥ वैकुंठीहूनि पातला ॥९२॥

स्त्रिये सहित कुलाल ॥ दिव्य रूप जाहला तत्काळ ॥ गरुडारूढ उतावेळ ॥ वैकुंठधामा पातला ॥९३॥

सायुज्यता मुक्ती ॥ दीधली त्यासी रमापती ॥ तोंडमान आपले चित्ती ॥ ते देखोनि दुःखित ॥९४॥

तोंडमान पुसे हरीसी ॥ निजधामा धाडिले कुलालासी ॥ मजवरी कृपा वेगेसी ॥ करी आता नारायणा ॥९५॥

मग त्रो त्रिजगज्जीवन ॥ तोंडमानासि होऊन प्रसन्न ॥ सरूपता मुक्ति देऊन ॥ निजपदी नेऊनि स्थापिला ॥९६॥

द्वादशाध्याय पर्यंत ॥ जाहला वेंकटेशविजय ग्रंथ ॥ जय पुरुषोत्तमा वैकुंठनाथा ॥ तुजप्रीत्यर्थ हो का सदा ॥९७॥

वेंकटेशविजय राजेश्वर ॥ हे द्वादश त्याचे प्रचंडवीर महत्पापाचे संहार ॥ श्रवणमात्रे करती ते ॥९८॥

किंवा द्वादशखणांचे दामोदर ॥ की द्वादश खणीवृंदावन सुंदर ॥ किंवा द्वादशाक्षरी मंत्र ॥ आवडे साचार हरीने ॥९९॥

की द्वादशधारी चक्र ॥ किंवा प्रकटले द्वादश मित्र ॥ किंवा द्वादशी तिथी थोर ॥ पंचशात आगळी ॥१००॥

की वेंकटेशविजय सूर्यनारायणे ॥ एकदाच उघडिले द्वादशनयन ॥ किंवा द्वादश मासपूर्ण ॥ संवत्सरासी ज्यापरी ॥१॥

तैसा हा ग्रंथ पवित्र ॥ वाचिता ऐकता पापसंहार ॥ ग्रंथ संग्रह करिता निर्धार ॥ फळ समान सर्वांसी ॥२॥

जे हे ग्रंथ ऐकती वाचती ॥ यम काळ त्यांसी वंदिती ॥ वैकुंठभुवन अंती ॥ होय प्राप्ति तयाते ॥३॥

ज्याचे गृही असेल ग्रंथ ॥ पिशाच भूत न रिघे तेथ ॥ सर्प व्याघ्र तस्कर न बाधित ॥ काळत्रयी सर्वथा ॥४॥

ज्याचा यावरी पूर्ण विश्वास ॥ त्यासी निजांगे रक्षी श्रीनिवास ॥ लक्ष्मीसहित वेंकटेश ॥ वास करी तेथेची ॥५॥

त्यासी निजांगाची साउली ॥ करोनि रक्षी सर्वकाळी ॥ नाना संकट दुःखसकळी ॥ निवारी त्यांचे परमात्मा ॥६॥

एक आवर्तन करिता ग्रंथासी ॥ भस्म होती पापराशी ॥ अखंड पाहील तयासी ॥ कैवल्यपद प्राप्त होय ॥७॥

हा ग्रंथ कल्पतरु समान ॥ जे वाचिती कामना धरून ॥ त्याचे मनोरथ होती पूर्ण ॥ जे जे इच्छित सर्वही ॥८॥

भृगुवारी ग्रंथ पूजन ॥ करावे एक आवर्तन ॥ शुचिर्भूत करिता शयन ॥ स्वप्नी नारायण प्रकटेल ॥९॥

द्वादशावर्तन करिता साचार ॥ ग्रहबाधा होईल त्याची दूर ॥ जारण मारण तयावर ॥ सर्वथाही न चालती ॥११०॥

चोवीस आवर्तन ग्रंथासि होती ॥ महारोगाची होईल शांती ॥ शत्रुनाशाचे पावती ॥ न चले शक्तितयांची ॥११॥

करिता अठ्ठेचाळीस आवर्तन ॥ सर्वसंकटे जाती निरसून ॥ आणि प्राप्त होईल विद्याधन ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१२॥

आवर्तने अष्टोत्तरशत ॥ जो भक्ति युक्त वाचेल ग्रंथ ॥ पोटा येईल हरिभक्तसुत ॥ श्रीवेंकटेश प्रसादे ॥१३॥

ऐसा हा ग्रंथ फलदायक ॥ वर दीधला वैकुंठनायके ॥ भाविके प्रचीत पहावी देख ॥ नसे कारण अभाविका ॥१४॥

पुर्वमुखे ग्रंथपठण ॥ पुत्रार्थी याने करावे पूर्ण ॥ प्राप्त होय विद्याधन ॥ उत्तर मुखे वाचिता ॥१५॥

दक्षिणमुखे वाचिता निश्चय ॥ होय शत्रूचा पराजय ॥ इतर काम्यार्थी लवलाहे ॥ पूर्वाभिमुखे वाचावे ॥१६॥

जे जे पडेल संकट ॥ ते ते वारील ॥ द्वादशाध्यायाचे फळवरिष्ठ ॥ पृथक् पृथक् लिहिले असे ॥१७॥

प्रथमाध्यायी मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीचे केले स्तवन ॥ सद्‍गुरु संतांसि करोनी नमन ॥ मातापितयांसि वंदिले ॥१८॥

जनकरायासी दुःख फार ॥ जाहले जाणोनि अहल्या कुमार ॥ शतानंद सांगे विचित्र ॥ हेचि कथन निर्धारी ॥१९॥

वृषभासुरासि मारून ॥ ब्राह्मणासि तोषवी जगज्जीवन ॥ वृषभाद्रि नाम पर्वतालागून ॥ दुसर्‍यामाजी हेचि कथा ॥१२०॥

तृतीयाध्यायी कथा दोन ॥ वर्णून हनुमंत जन्म कथन ॥ अंजनाद्रि नाम पर्वतालागून ॥ त्रेतायुगी पाडियेले ॥२१॥

पुढे शेषवायूंचा वाद अद्भुत ॥ वायूने उडविला पर्वत ॥ शेषाद्रिनाम द्वापारात ॥ तै पासूनि पडियेले ॥२२॥

चौथ्यात माधव विप्र ॥ चांडाळीशी रतला अपवित्र ॥ पर्वतदर्शने पाप संहार ॥ जाहले त्याचे निर्धारी ॥२३॥

भृगुऋषीने मारिली लाथ ॥ रमा गेली करवीरात ॥ भुतळी आला जगन्नाथ ॥ वल्मीकामाजी राहिला ॥२४॥

गाय जाहला विधाता ॥ गौळण होऊनि जगन्माता ॥ चोलदेशी शोधित ॥ वनामाजी हरीते ॥२५॥

हरीसि लागला कुठार प्रहार ॥ चोळरायासि श्रापिले मुरहरे ॥ वास केला वेंकटाद्रिवर ॥ पंचमाध्यायी कथियेले ॥२६॥

पद्मावतीचे जन्मकथन ॥ उपवनी आली शुभानन ॥ हरि भाळला तीस देखून ॥ बकुलेसि धाडिले नारायणपुरा ॥२७॥

सहावे अध्यायी साचार ॥ हीचि कथा जाहली मनोहर ॥ पुढे पुलिदिनीवेषे मुरहर ॥ नारायण पुराप्रति गेला ॥२८॥

राजपत्‍नीसी बोधून ॥ कन्या द्यावी हरीलागून ॥ हा निश्चय जाहला परिपूर्ण ॥ सप्तमाध्यायी कथा हेचि ॥२९॥

तेहतीस कोटी सुरवर ॥ ब्रह्मा इंद्र आणि रुद्र ॥ लग्ना आले साचार ॥ अष्टमाध्यायी हेचि कथा ॥१३०॥

करवीराहूनि आली इंदिरा ॥ अष्टवर्ग करोनि सत्वरा ॥ निघोनि गेले नारायणपुरा ॥ नवमाध्यायी वर्णिले ॥३१॥

दहाव्या अध्यायामाजी कथन ॥ जाहले पद्मावतीचे लग्न ॥ अगस्तीआश्रमी नारायण ॥ राहता जाहला येऊनिया ॥३२॥

आकाशराज पावला मरण ॥ कलह मांडला राज्याकारण ॥ विभाग केले जगज्जीवने ॥ अकराव्यात कथा हेची ॥३३॥

बाराव्या अध्यायी वर्णन ॥ विप्रस्त्री पुत्र दोघेजण ॥ अन्नाविणे पावले मरण ॥ हरीने त्यासि जीवविले ॥३४॥

ऐसे हे बाराअध्याय ग्रंथ ॥ जय जय वेंकटेशा रमाकांता ॥ लेखक पाठक वाचका समस्ता ॥ कल्याणकरी सर्वदा ॥३५॥

कुडची वीर करजोडून ॥ संतांसि करी साष्टांग नमन ॥ मजवरी कृपा करून ॥ ग्रंथावलोकन करावे ॥३६॥

श्रीकृष्णवेणीचे दक्षिणतीरी ॥ पट्टण एक पाचयोजनावरी ॥ शहापूर नामे निर्धारी ॥ विख्यात नगरी असे ती ॥३७॥

तेथील रहिवासी ब्राह्मण ॥ श्रीनिवासराव नामाभिधान ॥ सावणूरकर उपनाम पूर्ण ॥ भारद्वाज गोत्रज पै ॥३८॥

चौघे पुत्र त्यासि उत्तम ॥ कोन्हे राघव भास्कर राम ॥ परम निःसीम हरि भक्त ॥३९॥

वडील पुत्र कोन्हेराव ॥ श्रीवेंकटेश त्याचा कुलदेव ॥ प्रतिवर्षी करती उत्सव ॥ नवरात्रामाजी प्रीतीने ॥१४०॥

श्रीकृष्णवेणीचे तीरी ॥ कंकणवाडी नाम नगरी ॥ तेथील रहिवासी विप्र निधारी ॥ नृसिंहाचार्य नाम तयाचे ॥४१॥

वेदशास्त्रप्रवीण ॥ हरिभक्त सुशील ब्राह्मण ॥ कर्मनिष्ठ क्रियावंत पूर्ण ॥ श्रीहरीसी आवडता ॥४२॥

ऐसा तो नृसिंहाचार्य ॥ कोन्हे रायाचा पुरोहित होय ॥ जाणोनिया उत्साह समय ॥ घरा आला अकस्मात ॥४३॥

कोन्हे राये आदरकरोन ॥ ठेऊन घेतले उत्साहाकारण ॥ नित्य सायंकाळी पुराण ॥ त्याच्या मुखे श्रवण ॥४४॥

भविष्योत्तर पुराणोक्त ॥ श्रीवेंकटेश महात्म्य विख्यात ॥ श्रवण केले साद्यंत ॥ अमृताहूनि गोड जे ॥४५॥

कोन्हेरायाच्या मनात ॥ उत्पन्न जाहला हाचि हेत ॥ हा ग्रंथ आहे संस्कृत ॥ अबळा अज्ञान न जाणती ॥४६॥

प्राकृतभाषेत करून ॥ करावे ग्रंथ निर्माण ॥ मग सांगीतले मजकारणे ॥ ग्रंथ एवढा करावा ॥४७॥

ग्रंथ करावया लागूनी ॥ आल्हाद वाटला माझेमनी ॥ परी संस्कृत ज्ञान मुळीहुनी ॥ न कळे मजला सर्वथा ॥४८॥

घुंगुरुड्या एवढे वदन ॥ म्हणे मी सकळा पर्वत गिळीन ॥ खंद्योत स्वतेजे करून ॥ झाको इच्छित सूर्याते ॥४९॥

तैसा मनी धरिला हेत ॥ परे न कळे संस्कृताचा अर्थ ॥ कवित्व कळा किंचित ॥ अंग नसे सर्वथा ॥१५०॥

कैसा होईल हा ग्रंथ ॥ चिंता वाटली मानसी बहुत ॥ नृसिंहाचार्यासी मनोगत ॥ कळला माझा सर्वही ॥५१॥

मग तो होवोनी कृपावंत ॥ दीधला तेणे वर उचित ॥ म्हणे तू आरंभ करी ग्रंथाते ॥ सिद्धिपावेल निर्धारी ॥५२॥

श्रीनिवास शेषाद्रिवासी ॥ कृपाकरील निश्चयेसी ॥ सायास न लागता तुजसी ॥ ग्रंथ करवील जगदात्मा ॥५३॥

मग संस्कृतार्थ उकलून ॥ सांगितला मजकारणे ॥ वंदोनीया आर्यचरण ॥ ग्रंथासि आरंभ पै केला ॥५४॥

मुख्य आचार्य दयार्णव ॥ आणि निजबंधुसि कोन्हेरराव ॥ साह्यकरोनिया सर्व ॥ ग्रंथ सिद्धीसि नेला पै ॥५५॥

ज्याचेनि जाहला ज्ञान बोध ॥ ऐका गुरुमालिका अगाध ॥ सज्जनरंजन घराणे प्रसिद्ध ॥ चैतन्य सांप्रदायिक पै ॥५६॥

मूळपुरुष राघवचैतन्य ॥ जो ज्ञानियांमाजी चूडारत्‍न ॥ इंदापुरी समाधिस्थ होऊन ॥ अखंडवस्ती केली असे ॥५७॥

त्यापासोनी रावगिरिधर ॥ केवळ ज्ञानाचे आगर ॥ मुरहरनामे साधु थोर ॥ तयापासूनि जाहले ॥५८॥

यशवंतराव तेथून ॥ जाहले अद्भुतज्ञान संपन्न ॥ अमृतराव तयापासून ॥ भक्तराज जाहले ॥५९॥

पाहूनि त्याची कवित्व रचना ॥ मान तुकविती विद्वज्जन ॥ गोड केवळ अमृता समान ॥ नामा सारिणी करणी ज्याची ॥१६०॥

त्यापासोनी रावगोविंद ॥ जो साक्षात अवतरला मुकुंद ॥ ज्याच्या दृष्टीसि भेदाभेद ॥ नसे काही सर्वथा ॥६१॥

तो माझा सद्‌गुरु साचार ॥ त्याचेनि झाला ग्रंथपरिकर ॥ करोनिया जयजयकार ॥ वंदिले चरण तयाचे ॥६२॥

ज्याकुळी उद्भवलो साचार ॥ तेही ऐका सर्वज्ञ चतुर ॥ शहापुराहूनि परिकर ॥ पूर्वदिशेस क्रोशावरी ॥६३॥

कुडची नामे लघुग्राम ॥ तेथील कर्णीक वृती उत्तम ॥ शांडिल्य गोत्रज त्याचे नाम ॥ संकरसंपत मूळपुरुष ॥६४॥

त्यापासोनि जाहला वीर ॥ रुद्रनामा त्याचा कुमार ॥ संकरनामाचा निर्धार ॥ त्यापासोनि जाहला ॥६५॥

पुन्हा त्याचा पुत्रवीर ॥ त्यापासोनि जाहला रुद्र ॥ त्यासि जाहला नाही पुत्र ॥ वंश तेथे खुंटला ॥६६॥

मग विश्वामित्र गोत्रापासोन ॥ कन्यापुत्र आणिला पोषणा ॥ त्याचे नाम देव जाणा ॥ वीर तेथोनि जाहला ॥६७॥

त्याचा लिंगनामे पुत्र ॥ त्यासि जाहले पंचपुत्र ॥ सिद्ध बसवंत नृसिंह साचार ॥ विरुपाक्ष राम पाचवा ॥६८॥

त्यात द्वितीय पुत्र बसवंत ॥ त्यासि जाहले तिघे सुत ॥ यशवंत नारायण कृष्ण यथार्थ ॥ नामे त्यांची अनुक्रमे ॥६९॥

त्यात वडील यशवंत ॥ दुसरे नाम बाळाजी पंत ॥ तो माझा पिता यथार्थ ॥ महाज्ञानी भक्तराज ॥१७०॥

तो पिता माझा लवलाही ॥ मातेचे नाव कृष्णाबाई ॥ वीर वंदोनी उभयताही ॥ वेंकटेशविजय संपविला ॥७१॥

याचा मूळग्रंथ संस्कृत ॥ भविष्योत्तरी बोलिले सत्यवतीसुत ॥ एकसहस्त्र पाचशत ॥ ऐशी श्लोक आगळे ॥७२॥

इतक्यांचा मथितार्थ ॥ प्राकृत बोलविला श्रीरमानाथे ॥ त्याची श्लोक संख्या यथार्थ ॥ ऐका चतुर पंडित हो ॥७३॥

शके सत्राशे त्रियाण्णव ॥ प्रजापतिसंवत्सर अभिनव ॥ शुद्ध त्रयोदशी भृगुवार अपूर्व ॥ आषाढमास विख्यात पै ॥७४॥

शहापूर ग्रामी यथार्थ ॥ कोन्हेरायाचे गृहात ॥ साद्यंत अवघाग्रंथ ॥ तेथेचि जाहला जाणिजे ॥७५॥

श्रीमदुरगेंद्रगिरिनिलया ॥ वीरवरदा वैकुंठ राया ॥ करुणासागरा भक्तप्रिया ॥ चिद्धनानंदा जगद्गुरु ॥७६॥

इति वेंकटेशविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत पुराण भविष्योत्तर ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥१७७॥

एकंदर ओविसंख्या ॥२१००॥ श्रीकृष्णार्पण ॥

N/A

References : N/A
Last Updated : July 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP