मागील अध्यायात श्रीभगवान विष्णु बकुलेसहित आनंदाने राहिले असे सांगितले. त्यानंतर श्रीविष्णूंनी अरण्यात शिकारीस जाण्याचा विचार ठरविला. इतक्यात एक उत्तम घोडा त्या ठिकाणी आला. त्या घोड्यावर बसून भगवान शिकारीस निघाले असता बकुलेने विचारले, 'आपण कोठे जाता?' तेव्हा ते म्हणाले, 'मी या वनात शिकारी करिता जातो.' अरण्यात जाऊन अनेक प्राण्यांची त्यांनी शिकार केली. त्यांना तेथे एक मदोन्मत्त हत्ती दिसला. त्याच्या मागून ते धावत जाऊ लागले. तो ते नारायणापुरापर्यंत गेले. हत्ती त्रासून भगवंतास शरण आला, तेव्हा त्यांनी त्यास सोडून दिले.
पुढे त्या नगराजवळ एक सुंदर बगीचा दिसला. तेथे विपुल फुले-फळे होती. त्या उद्यानात सुंदर मुली इकडे तिकडे खेळत होत्या. त्यात एक अतिशय सुंदर कन्या वेंकटेशांनी पाहिली व तिजवर ते मोहित होऊन गेले. मध्येच सूतांना ऋषींनी ' या मुली कोण? ती सुंदर मुलगी कोण?' असे विचारले असता त्यांनी त्या मुलीचा इतिहास सांगावयास सुरुवात केली-
पूर्वी द्वापर युगाच्या शेवटी कौरव पांडवांचे युद्ध झाल्यावर अठ्ठाविसाव्या कलियुगात हजार वर्षे गेल्यावर चंद्रवंशात सुवीर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सुधर्म या नावाचा एक मुलगा होता आणि त्यास आकाशराव व तोंडमान या नावाचे दोन फार उत्तम पुत्र होते. हा आकाशराव म्हणजेच पूर्वीचा माधव ब्राह्मण. तो फार धार्मिक व उदार होता. त्याच्या राज्यात प्रजा फार सुखी होती; परंतु या राजाला संतती नसल्याने तो फार दुःखी होता. त्याने आपल्या गुरूंना एकदा याबद्दल विचारले तेव्हा, 'ईश्वरकृपेने सर्व काही ठीक होईल' असे सांगून राजाचे त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. राजाला गुरूंनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यास सांगितले. त्या करिता राजास सोन्याच्या नांगराने जमीन नांगरण्यास सांगितले असता राजाने सोन्याचा नांगर करवू त्याने नांगरण्यास सुरुवात केली. तेव्हा नांगराच्या दातास सोन्याचे एक कमळ लागले. सर्वांना आश्चर्य वाटून त्यांनी ते राजास दाखविले. राजा तो प्रकार पाहून अतिशय आश्चर्यचकित होऊन कमळ पाहू लागला; तो त्या कमळात एक सहा महिन्यांची अतिशय सुंदर मुलगी त्याला आढळली. राजास पारानंद झाला. त्याला ईश्वरकृपेचे मोठे कौतुक वाटले.
इतक्यात आकाशवाणी झाली. 'राजा ही साक्षात लक्ष्मी आहे. तुझ्या पूर्वपुण्याईने तुला ही मिळाली आहे. तू हिचे उत्तम पालन कर. भगवान प्रत्यक्ष येऊन इचे पाणिग्रहण करतील.' राजा त्या मुलीस घेऊन घरी गेला व आपल्या पत्नीस सर्व हकीकत सांगून तिजकडे तिला दिले. राजाचे हे बोलणे ऐकून धरणीदेवीला अतिशय आनंद झाला. सर्व नागरिकांना आनंद झाला व त्यांनी गावात साखर वाटून आनंदोत्सव केला. कमळातून या मुलीचा जन्म झाला म्हणून त्या मुलीचे नाव राजाने पद्मावती असे ठेवले. ती अतिशय रूपवती होती. चंद्रकलेप्रमाणे वाढत असता ती लग्नास योग्य झाली. त्या मुलीच्या पायगुणाने राणीही गर्भवती झाली. राजाला अतिशय आनंद झाला. राजाने तिचे सर्व डोहाळे पुरवून सर्व सोहळे उत्तम केले. सर्वांना आनंद झाला. नऊ महिने होताच राणीला मुलगा झाला. राजाने पुण्याह वाचन करून जातकर्म केले व पुत्राच्या मुखाचे अवलोकन केले. तेव्हा राजाने मोठा दानधर्म केला. नागरिक सुवासिनींनी राणीची ओटी भरली. सर्वांना अतिशय आनंद झाला. पुढे काही दिवसांनंतर पद्मावती उपवर झाली. राजाला तिच्या योग्यतेचा वर कोठे मिळेना.
एक दिवस ती आपल्या मैत्रिणींबरोबर उद्यानात क्रीडा करण्यास गेली होती. तेव्हा नारदांनी वृद्ध ब्राह्मणाचा वेष घेऊन त्या अरण्यांत प्रवेश केला. तेथे मैत्रिणींच्या समुदायात त्यांनी पद्मावतीस पाहिले. नारद तिच्याजवळ गेले व म्हणाले, 'मी हस्त सामुद्रिक आहे. तुझा हात मला दाखव' मुलगी म्हणाली, 'तू कोण आहेस?' 'मी ब्राह्मण आहे.' तेव्हा ती त्यांच्याजवळ येऊन नमस्कार करून आपला डावा हात तिने त्यास दाखविला. तिच्या हातावरील स्वस्तिक चिन्ह पाहून ते म्हणाले, 'ही साक्षात लक्ष्मी असून कलियुगात हिने जन्म घेतला आहे. अशी मुलगी या पृथ्वीवर कुठेही नाही. ही भगवान विष्णूलाच योग्य आहे. नारद म्हणाले, 'तुला भगवान विष्णू पती मिळेल.' ब्राह्मणाचे बोलणे ऐकून तिला आनंद झाला. नारदांना नमस्कार करून ती घरी परत आली.
घरी आल्यावर तिने ही सर्व हकीकत कुणाला सांगितली नाही. परंतु ती कृष्णाचे ध्यान करू लागली. पुढे ती मैत्रिणींबरोबर त्या उपवनात जात असे. याप्रमाणे एकदा ती गेली असता त्याच अरण्यात श्री वेंकटेश शिकारीकरता गेला होता. त्यांना तेथे क्रीडा करणार्या पुष्कळ मुली दिसल्या. व त्या मेळाव्यात पद्मावतीला पाहिले. पद्मावतीने त्यांना पाहिले. वेंकटेशाला पाहून तिला असे वाटले की, हा जर आपल्याला पति मिळेल तर आपले भाग्य फार मोठे आहे. तिने आपल्या सखीला तो कोण आहे ते विचारण्यास सांगितले. त्या वेंकटेशाला विचारू लागल्या, 'तुम्ही कोण? तुमचे आईवडील कोठे असतात. तुम्ही येथे का आलात? तुमचे नाव काय? हे आम्हाला सांगा?'
तेव्हा घोड्यावर बसलेले वेंकटेश त्या मुलीपाशी येऊन म्हणाले, 'हे सुंदरी चंद्रवंशात माझा जन्म झाला. वसुदेव हे माझे वडील. देवकी ही माझी आई. बलराम हे माझे बंधु. सुभद्रा ही बहीण. अर्जुन हा माझा मेहुणा. माझे नाव श्रीकृष्ण. मला लग्न करावयाचे आहे. म्हणून मी येथे आलो. तू कोण सांग?' तिने आपली हकीगत सांगितली-
'सोमवंशात आकाशराजा नावाचा प्रसिद्ध राजा आहे. त्याची मी मुलगी. मग वेंकटेश म्हणाले, 'तुझ्याशी मी विवाह करू इच्छितो.' पद्मावती म्हणाली, 'भिल्ला! ही हकीकत राजाच्या कानावर पडली तर फार मोठी हानी होईल. असे म्हणून त्या मुलींच्यासह ती निघून गेली. श्री वेंकटेश तिच्या मागून चालले. आपल्या मागून हा येतो आहे हे पाहून त्या मुलींनी त्याच्यावर दगड मारले. त्यांनी त्याचा घोडा पाडला. घोड्यास सोडून ते आपल्या मंदिराला येऊन चिंतातूर होऊन राहिले. सर्व आहारविहार बंद झाले. झोप नाही तेव्हा बकुला त्यांना म्हणाली, 'तुला काय झाले? तू असा दुःखी का?' त्यावेळी वेंकटेशांनी उपवनात घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर बकुला म्हणाली, 'मला मार्ग सांगा. मी आताच जाते. मुलगी तुला द्यावी म्हणून त्याला सांगून निश्चय करून येते.'
वेंकटेशांनी तिचा पूर्व इतिहास सांगितला. 'मागील जन्मात मी राम होतो. ही सीता होती. रावणाने तिला लंकेस नेले होते. ती अग्नीजवळ गुप्त होऊन राहिली. रावणवधानंतर ती प्रगट झाली असता आता आपण माझा स्वीकार करावा असे तिने सांगितले असताना रामाने तिला आश्वासन दिले, 'मी एक पत्नीव्रत असल्याने या अवतारात तुझा स्वीकार करता येत नाही. तुला असा वर देतो की पुढे २८व्या कलियुगात मी वेंकटेश या नावाने पृथ्वीवर प्रगट होईन त्यावेळी तुझी इच्छा पूर्ण करता येईल.' त्यांनी आपला अवतार संपविला.
सीता हीच पुढे आकाशराजाची मुलगी जन्मास आली. तेव्हा बकुला म्हणाली, 'मला मार्ग सांग.' वेंकटेशांनी हास्य केले व म्हणाले, 'मी तुला घोडा देतो.' असे म्हणून एक घोडा त्या थिकाणी उत्पन्न केला. त्याच्यावर बसून ती निघाली. त्यांनी तिला मार्ग दाखविला ' त्या वाटेने जाताना तुला कपिलेश्वर मंदिर लागेल. त्या ठिकाणी कैलासपतीचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे प्रार्थना कर, हे कैलासपती आपण समर्थ आहात माझी इच्छा पूर्ण करा. त्यापुढे गेल्यावर शुकाचार्यांचा आश्रम लागेल. त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे रामकृष्णांच्या मूर्ती लागतील. तिथून पुढे गेल्यावर अगस्तींचा आश्रम व नारायणपूर लागेल.
घोड्यावर बसून ती निघाली. वाटेतील सगळी स्थाने तिने पाहिली. अगस्तींच्या आश्रमाजवळील शिवमंदिरात ब्राह्मण रुद्राभिषेक करीत होते. ते पहाण्यास नारायणपुरातील लोक, पद्मावतीच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्या दर्शन घेऊन निघाल्या असताना त्यांचे आपसातील बोलणे तिने ऐकले. त्या म्हणत होत्या की या अरण्यातील सुंदर पुरुषाच्या दर्शनाने पद्मावती दुःखी झालेली आहे. त्यांच्या सखीचे बोलणे ऐकून बकुलेने विचारले, 'ती कोण? तिला कोण पुरुष भेटला?' तिच्या सखींनी सगळी हकीकत सांगितली. या पुढील इतिहास पुढच्या अध्यायात पाहू.
श्रीवेंकटेशाय नमः ॥ श्रीवेंकटेशकथामनोहर ॥ हेचि कृष्णा वेणी गंगा थोर ॥ स्नान करितांचि साचार ॥ पापसंहार क्षणमात्रे ॥१॥
श्रोत्यावक्त्यांची इच्छा अधिक ॥ हेचि इचे दोनी तटाक ॥ प्रेमपूर भरला सुरेख ॥ मनोरम्य वाहतसे ॥२॥
भक्ति ज्ञान वैराग्य विचित्र ॥ हेचि एथे तळपती जळचर ॥ भाव माघमासी ज्ञानीनर ॥ स्नानाकारणे धावती ॥३॥
या गंगेत करिता स्नान ॥ अंगी संचरे वैराग्य ज्ञान ॥ त्रिविधताप अवघे निरसून ॥ सायुज्य सदन पावती ॥४॥
भावे श्रवण करिता विशेष ॥ कृपा करील श्रीवेंकटेश ॥ जो मायातीत अविनाश ॥ वैकुंठवासी जगद्गुरू ॥५॥
पूर्वाध्यायी अनुसंधान ॥ वेंकटाद्रीवरी मधुसूदन ॥ बकुलेसहित रमारमण ॥ राहता जाहला जगदात्मा ॥६॥
पुढे कैसे वर्तले चरित्र ॥ सावध ऐके जनक नृपवर ॥ शतानंदऋषि परम पवित्र ॥ सांगे विचित्र नवल पै ॥७॥
एके दिवशी ह्रषीकेशी ॥ चिंतिता जाहला निजमानसी ॥ क्रीडावयालागी वनासी ॥ मृगयानिमित्त जाइजे ॥८॥
अश्वावरी आरूढोन ॥ करावे काननामाजी गमन ॥ ऐसे चिंतिता जनार्दन ॥ तो अश्व तात्काळ पातला ॥९॥
तो परब्रह्म मुरारी ॥ इच्छामात्रे सर्व करी ॥ मनी चिंतिता निर्धारी ॥ घोडा प्रकटला अकस्मात् ॥१०॥
शुभ्रवर्ण घोडा परिकर ॥ वरी जीन घातले परम सुंदर ॥ आरक्तवर्ण नेत्र ॥ अश्वोत्तमाचे दीसती ॥११॥
उच्चैः श्रवा समान ॥ गति त्याची परम गहन ॥ मुखी मोहली विराजमान ॥ रत्नखचित शोभतसे ॥१२॥
जैसे चांदणे शोभिवंत ॥ तैसे अंगीचे तेज दिसत॥ ऐसे पाहोनी रमानाथ ॥ उठिला तेव्हा तात्काळी ॥१३॥
बकुला म्हणे जगज्जीवना ॥ कोठे जातोसि मनमोहना ॥ यावरी बोले जनार्दन ॥ बकुलेप्रती तेधवा ॥१४॥
म्हणे वनामाजी जाऊन ॥ येतो आता मृगयाकरून ॥ नेसला तेव्हा पीतवसन ॥ कटी मेखळा विराजती ॥१५॥
मस्तकी रत्नखचितमुकुट ॥ कुंडलांची शोभा सुभट ॥ सभोवती मुक्ताफळे दाट ॥ विराजमान शोभती ॥१६॥
चतुर्भुज घनश्यामवर्ण ॥ कस्तूरीतिलक शोभायमान ॥ चौभुजांवरी बाहुभूषण ॥ रत्नजडित झळकती ॥१७॥
गळा वैजयंती हार ॥ कौस्तुभ मणि तेजपरिकर ॥ श्यामसुंदर मुख उदार ॥ सुहास्यवदन शोभतसे ॥१८॥
असो ऐसा वेंकटेश ॥ अश्वारूढ जगन्निवास ॥ मृगया करीत ह्रषीकेश ॥ काननामाजी चालिला ॥१९॥
वृक व्याघ्र रीस सूकर ॥ हरिण जंबुक वानर ॥ ससे आणि जवादी मार्जार ॥ श्वापदे धावती चहूकडे ॥२०॥
बहुत जीवांचा संहार ॥ करीत जात श्रीधर ॥ तो एक उन्मत्तकुंजर ॥ देखता जाहला जगदात्मा ॥२१॥
त्याचे पाठीलागोन त्वरित ॥ पिटित जात रमानाथ ॥ मातंग धावता बहुत ॥ जगन्नाथ न सोडी ॥२२॥
ऐसे धावत धावत ॥ नारायण पुरा समीप येत ॥ मग गज होवोनी शरणागत ॥ श्रीहरीसन्मुख जाहला ॥२३॥
शुंडादंड वरुते करून ॥ विलोकी श्रीवेंकटेशाचे वदन ॥ म्हणे दीनदयाळा मजकारणे ॥ न मारावे सर्वथा ॥२४॥
कृपा उपजली जगज्जीवना ॥ सोडोनि दीधला न लागता क्षण ॥ तो अकस्मात देखिले उपवन ॥ नारायणपुरा समीप ॥२५॥
जाईजुई मालती परिकर ॥ शेवंती बकुल मंदार ॥ आगस्ती जपा करवीर ॥ सुमनभारे शोभती ॥२६॥
मध्यभागी दिव्यसरोवर ॥ माजी भरले असे नीर ॥ त्यात विकसली कल्हारे ॥ तीरी मराळ खेळती ॥२७॥
ऐशा सुंदरवनात ॥ विलोकी कमळोद्बवाचा तात ॥ सुंदरकुमारी असंख्यात ॥ चहूंकडे पसरल्या ॥२८॥
शौनकादिक मुनिजन ॥ सूताप्रती करिती प्रशन ॥ तू चिदाकाशींचा रोहिणीरमण ॥ करी तृप्ति श्रवण चकोरा ॥२९॥
वेंकटेश उपवनात ॥ कन्या देखिल्या अकस्मात ॥ त्या कोठील कोण समस्त ॥ कायनिमित्त पातल्या ॥३०॥
ही कथा सविस्तर ॥ सांग आम्हांसी मनोहर ॥ यावरी सुत वक्ता चतुर ॥ बोलता झाला आनंदे ॥३१॥
म्हणे ऐका आता एकचित्ती ॥ पुर्वी द्वापाराचे अंती ॥ पांडवकौरवांची युद्धनिश्चित्ती ॥ संपल्यावरी जाण पा ॥३२॥
निजधामा गेलिया पंडुसुत ॥ अठ्ठावीसावे कलियुगात ॥ विक्रमादिक नृपसमस्त ॥ स्वर्गाप्रती गेलियावरी ॥३३॥
सहस्त्रवर्षे क्रमलियावर ॥ चंद्रवंशी एक नृपवर ॥ परमधार्मिक पवित्र ॥ सुवीर नामा होता पै ॥३४॥
त्याचा पुत्र नामे सुधर्म ॥ जाहला जाण नृपसत्तम ॥ त्यापासोनी उत्तम ॥ पुत्र दोघे जन्मले ॥३५॥
आकाशराव वडील जाण ॥ दुसरा पुत्र तोंडमान ॥ सोमवंशी दोघे जण ॥ कुलदीपक उपजले ॥३६॥
पूर्वींचा जो माधव ब्राह्मण ॥ चतुर्थाध्यायी वर्णिले संपूर्ण ॥ तोचि आकाश राजा होवोन ॥ जन्मला हो निर्धारी ॥३७॥
परम धार्मिक भक्त थोर ॥ नारायणभक्तीसी तत्पर ॥ दानशूर आणि उदार ॥ कृपावंत सर्वांवरी ॥३८॥
तोंडदेशींचा अधिपती ॥ राज्य चालवी बहुत नीती ॥ दुःख अणुमात्र कोणाप्रती ॥ नाही निश्चित्ती लोकांते ॥३९॥
गायी दुहती त्रिकाळ ॥ वृक्ष विराजती सदा फळ ॥ चहूवर्ण प्रजा सकळ ॥ स्वधर्माचारे वर्तती ॥४०॥
असो तो नृपवर ॥ सकळसंपत्तीचा सागर ॥ परी पोटी नाही पुत्र ॥ तेणे उद्विग्न सर्वदा ॥४१॥
पुत्राविणे शून्यसदने ॥ की नासिकेवांचोनी वदन ॥ की बुबुळेविण नयन ॥ शोभा नयेचि सर्वथा ॥४२॥
की जीवनेविण सरिता ॥ की फळेविण वृक्ष वृथा ॥ की पतिविणे पतिव्रता ॥ न शोभेचि ज्यापरी ॥४३॥
तैसे पुत्राविणे साचार ॥ कदापि नव्हे वंश पवित्र ॥ रात्रंदिवस आकाशनृपवर ॥ संततीकारणे दुश्चित्त ॥४४॥
आपुल्या गुरूशी पाचारोन ॥ बोलता झाला उदास वचन ॥ म्हणे न देखता पुत्रवदन ॥ व्यर्थ काय संसारी ॥४५॥
मी हतभागी होय निश्चय ॥ मज कैशी पुत्रप्राप्ति होय ॥ धनधान्य पशु संपत्ति पाहे ॥ करावे काय मज आता ॥४६॥
राया हा तुझा पुत्र ॥ ऐसे कोणी न बोलती निर्धार ॥ पुत्राचा रुदन शब्दसाचार ॥ म्या कर्णी नाहीच आकर्णिला ॥४७॥
नानापरीचे आभरण ॥ म्या न केले पुत्राकारण ॥ एवढी संपत्ति घेऊन ॥ काय करावी व्यर्थची ॥४८॥
ऐसा राव चिंताग्रस्त ॥ दुजे काही नाठवे मनात ॥ मग गुरु तयाप्रती बोलत ॥ ऐक राया सादर ॥४९॥
प्राक्तन भोग दारुण ॥ ते कदा न सुटे भोगिल्याविण ॥ परी काही तरी करावा यत्न ॥ पुत्र उत्पत्तीकारणे ॥५०॥
जरी हरि होईल कृपावंत ॥ तरी अघटित तेचि घडे निश्चित ॥ यालागी तू शोक न करी बहुत ॥ ऐक मात नृपश्रेष्ठा ॥५१॥
ऐकोनि गुरूचे वचन ॥ राजा धावोनि धरी चरण ॥ म्हणे तू सांगसी ते करीन ॥ बोल यथार्थ गुरुवर्या ॥५२॥
काळमृत्यु भयदारुण ॥ त्यापासूनि रक्षिता श्रीगुरुपूर्ण ॥ तुझे वचन मज प्रमाण ॥ आज्ञा करी शीघ्र आता ॥५३॥
गुरु म्हणे हरिप्रीत्यर्थ पुत्रकामेष्टि करावी सत्य ॥ उत्तम पुत्र प्राप्त ॥ होईल सत्य राजेंद्रा ॥५४॥
राव म्हणे करितो अवश्य ॥ तूचि आचार्यत्व करी वेगेस ॥ काय जे लागेल यज्ञास ॥ सिद्ध करीन स्वामिया ॥५५॥
गुरु म्हणे आधी ॥ केली पाहिजे भूमिशुद्धि ॥ तू न करिता अवधी ॥ नांगर करवी सुवर्णाचा ॥५६॥
भूमि आधी नांगरून ॥ शुद्ध करावी परिपूर्ण ॥ मग त्यावरि मंडप रचून ॥ कुंड वेदिका करावी ॥५७॥
आधी एवढा करी उद्योग ॥ मग मी येतो सवेग ॥ यथाशास्त्र करवीन सांग ॥ चिंता काही न करावी ॥५८॥
ऐशी आज्ञा देऊन ॥ गुरु पवला अंतर्धान ॥ रावप्रधानाशी आज्ञापोन ॥ सुवर्ण हल करविला ॥५९॥
सुमुहूर्ते करोनि सत्वर ॥ राजा जुंपविला नांगर ॥ भूशोधना लागी निर्धार ॥ आरंभ केला तेधवा ॥६०॥
नांगरदाती अकस्मात ॥ हेमपद्म लागले तेथ ॥ सेवक रायासी सांगत ॥ नवल अद्भुत जाहले हो ॥६१॥
भूमि नांगरता नृपाळ ॥ निघाले असे सुवर्णकमळ ॥ आश्चर्य पहावया तात्काळ ॥ जवळी नृपवर पातला ॥६२॥
तो सुवर्णकमळ शोभायमान ॥ कमळगर्भी देखिले कन्यारत्न ॥ रूप पाहता परमलावण्य ॥ राव अंतरी वेधला ॥६३॥
षण्मासांची कुमारी ॥ असंभाव्य तेज पडले अंबरी ॥ जिचिया स्वरूपाची सरी ॥ ब्रह्मांडोदरामाजी नसेची ॥६४॥
कोट्यानकोटी मीनकेतन ॥ वोवाळावे पदनखांवरून ॥ पद्मनेत्री सुहास्यवदन ॥ आकर्णनयन सुकुमार ॥६५॥
राव हर्षला अंतरी ॥ म्हणे माझ्या भाग्यासि नाही सरी ॥ सायास न करीता निर्धारी ॥ कन्यारत्न मिळाले ॥६६॥
पुत्र किंवा कन्या निश्चित्ती ॥ दोन्ही नव्हती मजप्रती ॥ मजवरी तुष्टला रमापती ॥ कन्या सुंदर दीधली ॥६७॥
ऐसे बोलोनि नृपनाथ ॥ कन्या उचलिली अकस्मात ॥ तो आकाशवाणी बोलत ॥ राजा ऐकत सावध ॥६८॥
म्हणे हे राजेंद्रा अवधारी ॥ हे साक्षात वैकुंठपतीची अंतुरी ॥ अवतरली जाण पृथ्वीवरी ॥ तुज सापडली पूर्वभाग्ये ॥६९॥
आता करी इचे पाळण ॥ थोर होईल हे कन्यारत्न ॥ साक्षात वेंकटेश येऊन ॥ अंगीकार करीय इयेचा ॥७०॥
ऐसे ऐकता राजेंद्र ॥ उचंबळला आनंदसमुद्र ॥ त्या सुखाचा पार ॥ कोणाचेनि न करवे ॥७१॥
रायाचे आनंदगहन ॥ जैसे निर्धनासी सापडले धन ॥ की जन्मांधासी नयन ॥ अकस्मात पातले ॥७२॥
तैसा हर्षसागर ॥ उचंबळला आकाश नृपवर ॥ कन्या घेऊनानि सत्वर ॥ मंदिराप्रति पातला ॥७३॥
कांतेपाशी येऊन ॥ राजा बोले प्रसन्नवदन ॥ म्हणे हरिपूर्ण जाहला असे ॥७४॥
हे घेई कन्यारत्न ॥ करी इचे प्रतिपालन ॥ हे अयोनि संभव जाण ॥ साक्षात इंदिरा अवतरली ॥७५॥
ऐसे ऐकता वचनोक्ती ॥ धरणीदेवी हर्षला चित्ती ॥ आनंदाश्रु नयनी दाटती ॥ रोमांच अंगी उभारले ॥७६॥
मरत्यामुखी त्वरित ॥ येऊनि पडले अमृत ॥ की रोगियासी अकस्मात् ॥ रसायन सापडले ॥७७॥
ऐशी धरणी आनंद भरित ॥ नगरजन जाहले हर्षयुक्त ॥ शर्करा वाटिती नगरात ॥ उत्साह करिती बहुतची ॥७८॥
नामकरण करोन ॥ पद्मसंभव कन्ये लागून व पद्मावती नामाभिधान ॥ राये ठेविले ते काळी ॥७९॥
जैसा शुद्ध द्वितीयेचा चंद्र ॥ तैशी दिवसे दिवस जाहली थोर ॥ जिचा पाहता वदनचंद्र ॥ उपमा नाहीच द्यावया ॥८०॥
मागे बहुत कविजन स्त्रिया वर्णिल्या सुलक्षण ॥ परी पद्मावतीच्या नखांवरून ॥ वोवाळोनि टाकाव्या ॥८१॥
नगारिशत्रूची जाया ॥ की दशकद्वय नेत्राची भार्या ॥ तारकारिजनकशत्रुप्रिया ॥ उपमेसी वाटती हळुवट ॥८२॥
की नैषधराणी दमयंती ॥ की चित्रांगदाची सीमंतिनी सती ॥ बहुत वर्णिल्या युवते ॥ उपमेसी न शोभती इयेच्या ॥८३॥
तप्तहाटक जैसे सुरंग ॥ तैसे विराजे दिव्यअंग ॥ लाजोनि जाय अनंग ॥ स्वरूप तिचे पाहोनिया ॥८४॥
चंद्राचे ठायी वसे कलंक ॥ त्याहूनि विशेष कमळमुख ॥ गमनगती पाहता करिनायक ॥ लाजोनि गेला निर्धारी ॥८५॥
वेणीची आकृती पाहोन ॥ विवरी दडाला भुजंग जाऊन ॥ कटी पाहता हरि लाजोन ॥ वाहन जाहला दुर्गेचे ॥८६॥
आकर्णनेत्र सुरेख ॥ शुक भुलती पाहता नासिक ॥ दाडिंबी बीजासि देख ॥ दंत जिचे लाजविती ॥८७॥
क्षणेक चाले हंसगती ॥ देखोनि शंकला रतिपती ॥ आरक्त ओष्ठ विराजती ॥ उपमा नाहीच द्यावया ॥८८॥
पदमुद्रा जेथे उमटती ॥ तेथे दिव्य कमळे उगवती ॥ अंगीच्या मकरंदासि भुलोनि येती ॥ भ्रमरपंक्ति प्रीतीने ॥८९॥
हास्यकरितांचि सहज ॥ झळके दंतपंक्तीचे तेज ॥ हिरिया ऐसे दिसती मर्गज ॥ प्रकाश पडताचि निर्धारी ॥९०॥
असो ऐसे ती चित्कळा ॥ अवतरली साक्षातकमळा ॥ वाढता वाढता वेल्हाळा ॥ उपवर जाहली तेधवा ॥९१॥
असो त्या कन्येचे गुण ॥ राजपत्नी जाहली गर्भिण ॥ गर्भचिन्हे दिसती पूर्ण ॥ राजा मनी आनंदला ॥९२॥
अष्टमासपर्यंत आगळा ॥ आठांगुळादि केला सोहळा ॥ भूदेवगण सुखी केला ॥ द्रव्य अपार वाटोनिया ॥९३॥
नवमास भरतांचि ते वेळी ॥ उत्तमलग्न उत्तम काळी ॥ राजपत्नी प्रसूत जाहली ॥ पुत्र जाहला तियेते ॥९४॥
रायासि कळता वृत्तांत ॥ धावला वेगे विप्रांसहित ॥ पुण्याहवाचन करोनी त्वरित ॥ पुत्रमुख पाहिले ॥९५॥
जातकर्मादि वर्तोन ॥ नाम ठेविले वसुदान ॥ गोभूहिरण्यदान ॥ विप्रांलागी दीधले ॥९६॥
भांडार फोडोनि नृपवरे ॥ सुखी केले धरामर ॥ नगरनारी येऊनि समग्र ॥ वोटी भरिती धरणीची ॥९७॥
जैसा शुक्लपक्षी मृगांक ॥ तैसा वाढतसे बाळक ॥ रायास वाटले बहुतसुख ॥ कन्यापुत्र पाहोनिया ॥९८॥
उपजली तेव्हा पद्मावती ॥ नगरात नाही दरिद्राची वस्ती ॥ लोक सर्व सुखे वर्तती ॥ धेनुदुहती त्रिकाळी ॥९९॥
असो उपवर जाहली राजबाळी ॥ रायासि मनी चिंता उपजली ॥ म्हणे इच्या योग्य वर ये वेळी ॥ कोठे मिळेल न कळे ते ॥१००॥
एके दिवशी ती वेल्हाळा ॥ सवे घेवोनि सखियांचा मेळा ॥ उपवनामाजी राजबाळा ॥ क्रीडत होती तेधवा ॥१॥
तो नारदमुनि ते वेळा ॥ वृद्धब्राह्मणाचा वेष धरिला ॥ उपवनामाजी प्रवेशला ॥ देखिला मेळा कन्यांचा ॥२॥
त्यामाजी ती कमळनयनी ॥ पद्मावती देखिली नयनी ॥ जैसी मेघमंडळी सौदामिनी ॥ झळके तैसी चालता ॥३॥
मृगमदाहूनि विशेष ॥ सुटला अंगीचा सुवास ॥ नारद पाहोनि तियेस ॥ जवळी पातला साक्षेप ॥४॥
म्हणे शृंगार सरोवरमराळी ॥ चातुर्यगंगे आकाशबाळी ॥ तुझे हस्त पाहीन ये वेळी ॥ दाखवी मज आताची ॥५॥
सामुद्रिक चिन्ह पाहोन ॥ सांगेन आता तुझे लक्षण ॥ कन्या म्हणे तुज लागून ॥ हस्त का सया दाखवावे ॥६॥
तू आहेसि कोणाचा कोण ॥ हस्त पहावया काय कारण ॥ तो म्हणे मी ब्राह्मण ॥ पाहीन हस्त माते तुझे ॥७॥
मग समीप येऊनि राजबाळी ॥ ब्राह्मणाचे चरण वंदिली ॥ वामहस्त तये वेळी ॥ दाविती झाली द्विजासी ॥८॥
नारदे पाहिला हस्त ॥ तो स्वस्तिक चिन्ह मंडित ॥ म्हणे इंदिरा होय साक्षात ॥ कलियुगामाजी अवतरली ॥९॥
ऐसी सुलक्षण नारी ॥ नाही कोठे पृथ्वीवरी ॥ वैकुंठपतीची अंतुरे ॥ होय निर्धारी हे साच ॥१०॥
नारद म्हणे कुमारी ॥ तुज नवरा मिळेल श्रीहरी ॥ जो क्षीरसागरविहारी ॥ भक्तकैवारी जगदात्मा ॥१॥
ब्राह्मणाचे वचन ऐकोनी ॥ पद्मावती आनंदली मनी ॥ नारदाचे चरण वंदोने ॥ जाती जाहली सदनाप्रती ॥१२॥
कोणासि न सांगे मात ॥ मनामाजी ऐसी चिंतित ॥ श्रीवेंकटेशाचे चरण प्राप्त ॥ कधी होतील मजलागी ॥१३॥
असो सखिया सहित वरानना ॥ क्रीडावयालागी उपवना ॥ नित्य करितसे गमना ॥ परमानंदे करोनिया ॥१४॥
एके दिनी उपवनात ॥ पद्मावती सखियांसहित ॥ क्रीडावयासि हर्षयुक्त ॥ तया वनासी पातली ॥१५॥
एक कमळे तोडिती ॥ एक पुष्पकळी काढिती ॥ नानाविनोदे क्रीडा करिती ॥ गीत गाती स्वानंदे ॥१६॥
सिंहावलोकने करून ॥ ऐका मागील अनुसंधान ॥ वेंकटेश मृगयेलागून ॥ त्याचि वनासी पातला ॥१७॥
उपवनी पाहे जगन्नाथ ॥ तो कन्या मिळाल्या असंख्यात॥ ठायी ठायी पुष्पे तोडित ॥ क्रीडताती स्वानंदे ॥१८॥
तया कामिनीचक्रात ॥ मध्यमंडळी विलोकित ॥ तो जैसी विद्युल्लता तळपत ॥ तैसी देखिली पद्मावती ॥१९॥
पाहता तिचे स्वरूपासी ॥ वाटती रंभा उर्वशी दासी ॥ पृथ्वीवरी तियेसी ॥ उपमा द्यावया असेना ॥१२०॥
मुखी निघती सुगंधवास ॥ अंगीच अजो निघे सुवास ॥ भेदुनिया महदाकाश ॥ जात विशेष लवलाहे ॥२१॥
पाहोनि तिच्या वदनेंदूस ॥ तन्मय जाहला वेंकटेश ॥ नेत्र चकोर वेधले निःशेष ॥ रूप विशेष देखोनिया ॥२२॥
पद्मावती ही अकस्मात ॥ देखती जाहली हरिमुखाते ॥ श्यामसुंदर दैदीप्यवंत ॥ मदनमनोहर साजिरा ॥२३॥
कोटिकाम ओवाळून ॥ टाकावे श्रीमुखावरून ॥ पद्मावतीचे वेधले मन ॥ जगद्भूषण पाहताचि ॥२४॥
मनी विचारी सुंदर ॥ म्हणे कोठील मदन मनोहर ॥ हा जरी होईल माझा वर ॥ भाग्याशी पार नाही मग ॥२५॥
तनूराजस सुकुमार ॥ वनी धावता श्रमला फार ॥ मनामाजी वाटेसाचार ॥ की धावोनि यासि आलिंगावे ॥२६॥
मी तो लज्जावेष्टित कामिण ॥ हा पुरुष न कळे आहे कोण ॥ मग सखियांप्रती दावी खूण ॥ म्हणे आहे कोण विचारा ॥२७॥
कोटिकामसदृश सुंदर ॥ दिसतो बरवा मनोहर ॥ सखे ऐसा जोडला जरी वर ॥ सुखासि पार नाही माझ्या ॥२८॥
मग सखया पुढे येउन ॥ पुसती वेंकटेशा लागून ॥ म्हणती तुम्ही कोठील कोण ॥ काय निमित्त पातला ॥२९॥
तुमचे जनकजननी कोण ॥ तुम्ही राहता कवणे स्थान ॥ सांगा तुमची नामखूण ॥ आम्हा लागी सर्वही ॥३०॥
ऐसे ऐकता वचनासी ॥ अश्वारूढ ह्रषीकेशी ॥ येता झाला राजकन्येपाशी ॥ वर्तमान तिशी सांगतसे ॥३१॥
म्हणे कमलाक्षी परियेसी ॥ जन्म माझा सोमवंशी ॥ वसुदेव पिता आम्हासी ॥ देवकी माता निर्धारी ॥३२॥
बलभद्र आमुचा बंधुपूर्ण ॥ सुभद्रा भगिनी होय जाण ॥ शालंक आमुचा अर्जुन ॥ पांडव बांधव आमुचे ॥३३॥
नाम माझे श्रीकृष्ण ॥ कन्यार्थी पातले एथे जाण ॥ तुझे आता वर्तमान ॥ सांग सर्व वरानने ॥३४॥
ती म्हणे सोमवंशात ॥ आकाशराजा जाण विख्यात ॥ त्याची कन्या मी निश्चित्त ॥ पद्मावती नाम माझे ॥३५॥
मग बोले श्रीधर ॥ मी कन्यार्थी आहे साचार ॥ तुझे स्वरूप पाहता मनोहर ॥ मन मृग माझे वेधले ॥३६॥
तू नयनकटाक्ष जाळे पसरून ॥ बांधिला माझा मानस मीन ॥ तव वदनारविंद देखोन ॥ मम नयन मिलिंद झेपावती ॥३७॥
तुझा सौंदर्यइंदु देखोन ॥ मनसिंधु उचंबळला पूर्ण ॥ आता तूवरी मजलागून ॥ मनोरथ पूर्ण करी पै ॥३८॥
ऐकताचि ऐसी गोष्टी ॥ येरी केली सक्रोधदृष्टी ॥ सम्मुख राहे उठाउठी ॥ परती जाय वेगेसी ॥३९॥
हरी म्हणे जळी गुंतला मीन ॥ तो परत जाईल कोठून ॥ तुझे रूपी जडले मन ॥ ते न सरे माघारे ॥१४०॥
पद्मावती म्हणे ही वाणी ॥ जरी पडेल रायाचे कानी ॥ तरी होईल तुझी प्राणहानी ॥ किरातवेषिया जाणपा ॥४१॥
हरि म्हणे कार्य साधिल्याविण ॥ कदापि येउ नये मरण ॥ मनोरथ पुरलियावरी जाण ॥ मग ते मरण येता बरे ॥४२॥
क्षुधार्थी आलिया समयासी ॥ सज्ञानी न दवडिती तयासी ॥ तैसा मी सकाम आलो तुजपाशी ॥ वरी वेगेसि वरानने ॥४३॥
ऐसे ऐकता उत्तर ॥ पद्मावती कोपली फार ॥ कन्याचक्रासहित सत्वर ॥ निघाली वेगे करोनिया ॥४४॥
जाता देखोन तियेसी ॥ वेंकटेश चालिला पाठीसी ॥ मग पाषाणप्रहारे श्रीहरीसी ॥ ताडिल्या जाहल्या कन्या त्या ॥४५॥
जैसा पर्जन्यवर्षे निर्धारी ॥ तैसे पाषाण येती श्रीहरीवरी ॥ अश्व पडिला पाषाणप्रहारी ॥ कन्या गेल्या निघोनिया ॥४६॥
मुक्तकेशी जनार्दन ॥ भ्रमित होवोनिया मन ॥ अश्व तेथे त्यागोन ॥ उत्तरपंथे चालिला ॥४७॥
स्वस्थनी येऊनि श्रीहरी ॥ शयन करी मंचकावरी ॥ परम चिंताक्रांत अंतरी ॥ सतीचा वेध लागला ॥४८॥
निद्रा नाही किंचित ॥ शोकाकुलित जगन्नाथ ॥ स्फुंदस्फूंदोनी रडत ॥ तव बकुला काय बोलतसे ॥४९॥
म्हणे श्रीनिवासा वैकुंठपती ॥ काय दुःख आठवले चित्ती ॥ किमर्थ करितोसी खंती ॥ सांग मज प्रती जनार्दना ॥१५०॥
हरि बोले उत्तर ॥ म्हणे माते ऐक समाचार ॥ मृगयामिषे वनांतर ॥ हिंडत असता अकस्मात ॥५१॥
नारायणपुराजवळी यथार्थ ॥ उपवन पाहिले शोभिवंत ॥ तेथे स्त्रियांचा मेळा देखिला सत्य ॥ कुसुमे न्यावया पातल्या ॥५२॥
तयामाजी एक कामिनी ॥ जैसा उडुगणांमाजी निशामणि ॥ जीचिया स्वरुपावरोनी ॥ मीनकेतन ओवाळिजे ॥५३॥
पाहता जिच्या स्वरूपाशी ॥ वाटती रंभा उर्वशी दासी ॥ माझे चित्त तिये पाशी ॥ गुंतले जाण जननिये ॥५४॥
म्या पुसिले तियेते ॥ कोण कोठील वार्ता समस्त ॥ तिणे कथिली आकाश नृपनाथ ॥ सोमवंशी जन्मला ॥५५॥
त्याची कन्या होय निश्चित्ती ॥ नाम माझे पद्मावती ॥ मग म्या विनविले बहुत रीती ॥ परी वश नव्हे सर्वथा ॥५६॥
मज नावडे भोजन शयन ॥ प्रियेलागी गुंतले मन ॥ ती जरी न मिळे मज लागून ॥ तरी प्राणत्याग करीन मी ॥५७॥
बकुला म्हणे नारायणा ॥ क्षीराब्धिवासा जगज्जीवना ॥ मार्ग सांगावा मज लागून ॥ करीते गमन आताची ॥५८॥
कन्या तुज द्यावी म्हणोन ॥ येईन आता निश्चय करून ॥ ऐसे ऐकता मधुसूदन ॥ काय बोलता जाहला ॥५९॥
बकुले तू जाय सत्वर ॥ तूचि माझी देवकी सुंदर ॥ उद्धव अक्रूर रेवतीवर ॥ खगेश्वर तूचि ॥१६०॥
तूचि सर्व माझे आप्त ॥ आता तु जाई यथार्थ ॥ बकुले प्रती जगन्नाथ ॥ प्रार्थितसे यापरी ॥६१॥
जरी माझे पूर्वसुकृत ॥ असेल काही बळिवंत ॥ तरी कन्या होईल प्राप्त ॥ मजलागी बकुले ती ॥६२॥
बकुला म्हणे जगज्जीवना ॥ कन्या ती कोणाची कोण ॥ पूर्वी काय आचराली पुण्य ॥ तू नारायण भाळलासी ॥६३॥
तुझीच ती मूळप्रकृती ॥ तरीच तुज आवडे श्रीपती ॥ पूर्ववृत्तांत मजप्रती ॥ सांग निश्चिती श्रीहरी ॥६४॥
वेंकटेश बोले हासोन ॥ म्हणे बकुले ऐक सावधान ॥ पूर्वी त्रेतायुगामाजी जाण ॥ श्रीरामरूप जाहलो मी ॥६५॥
तेव्हा पितृवचनाचे मिसे ॥ मी गेलो काननास ॥ पंचवटीस केला वास ॥ सीता सौमित्रा समवेत ॥६६॥
तेथे येऊनी रावण ॥ जानकीसी हरू पाहे दुर्जन ॥ मग अग्नी जानकीस घेऊन ॥ पाताळासि पै गेला ॥६७॥
रावणही वेगे करून ॥ प्रवेशला पाताळभुवन ॥ जानकी गुप्त होऊन॥ अग्नीमाजी राहिली ॥६८॥
वेदवती नामे कन्यारत्न ॥ अग्नीने तिसी बोलावोन ॥ जैसे जानकीचे रूप सगुण ॥ तैसीच केली तियेसी ॥६९॥
हेचि जानकी म्हणोन ॥ रावणे नेली उचलोन ॥ लंकेमाजी नेऊन ॥ अशोकवनी ठेविली ॥७०॥
श्रीराम जाऊनि लंकेप्रती ॥ रावणासि वधिले निश्चिती ॥ मग जगदात्मा अयोध्यापती ॥ सीतेलागी आणवी ॥७१॥
लोकापवाद आला जाणोन ॥ दिव्य दिधले जानकीने ॥ तो अग्नीमाजी रूप दोन ॥ राघवेंद्रे देखिले ॥७२॥
आश्चर्य करोनी रघुपती ॥ पुसता जाहला जानकीप्रती ॥ तुझीच रूपे दोनी दिसती ॥ काय निमित्त सांगपा ॥७३॥
जनकजा म्हणे प्राणेश्वरा ॥ पुराणपुरुषा जगदुद्धारा ॥ भक्तवत्सला करुणासमुद्रा ॥ वर्तमान ऐकाते ॥७४॥
पंचवटीसी असता रघुनंदन ॥ मज न्यावया आला दशानन ॥ तेव्हा अग्नीने साह्य करोन ॥ नेता जाहला पाताळा ॥७५॥
तेथेचि आला असुर ॥ वेदवती नामे कन्या सुंदर ॥ स्वधादेवी पाशी साचार ॥ होती जाण श्रीरामा ॥७६॥
मग इने माझे प्रतिबिंबरूप ॥ धरोनि बैसली साक्षेप ॥ मीचि मानोनी लंकाधिप ॥ घेवोनि गेला इयेते ॥७७॥
मी अग्नीत होते गुप्त ॥ लंकेसी गेले नाही निश्चित ॥ मजकारणे कष्ट बहुत ॥ षण्मासावरी भोगिले इने ॥७८॥
आता दिव्याचे मिसे करोन ॥ दोघी प्रकटलो अग्नीतून ॥ तुझी आशा मनी धरून ॥ आली असे श्रीरामा ॥७९॥
माझीच प्रतिमा ही निर्धारी ॥ सर्वोत्तमा इचा अंगीकार करी ॥ कष्टाचे सार्थक झडकरी ॥ करी आता राघवेशा ॥१८०॥
ऐसे ऐकता रविकुळभूषण ॥ कमळदळाक्ष राजीवनयन ॥ जनकजेप्रती सुहास्यवदन ॥ काय बोलता जाहला ॥८१॥
म्हणे प्राणप्रिये अवधारी ॥ शृंगारसरोवर विहारी ॥ तू बोललीस निर्धारी ॥ परी या अवतारी न घडे ते ॥८२॥
मी एकपत्नीव्रती वीर ॥ प्रिये तुजठाऊक समाचार ॥ आता इचा अंगीकार ॥ करिता नये सर्वथा ॥८३॥
तरी हाचि वर देतो इयेते ॥ पुढे अष्टाविंशति कलियुगात ॥ वेंकटेश नामे त्वरित ॥ प्रकट होईन पृथ्वीवरी ॥८४॥
तेव्हा इचा मनोभाव ॥ प्रिये पूर्ण होईल सर्व ॥ ऐसे बोलोनि राघव ॥ अवतार अपुला संपविला ॥८५॥
तेचि हे पद्मसंभव ॥ पद्मावती नामे अभिनव ॥ सोमवंशी आकाशराव ॥ कन्या त्याची जाणही ॥८६॥
ऐसे हे पूर्व वर्तमान ॥ तिये पाशी गुंतले माझे मन ॥ यालागी नारायणपुरालागून ॥ जाई आता जननिये ॥८७॥
बकुला म्हणेवेंकटेशा ॥ भक्तवत्सला क्षीराब्धिवासा ॥ तुझी लीला जगदीशा ॥ ब्रह्मादिकांसी न कळेची ॥८८॥
नारायणापुरलागून ॥ मी जाते आता त्वरे करून ॥ राजस्त्रियेसि शिष्टाई करोन ॥ कार्य साधन करिते हे ॥८९॥
तरी मज जावयालागून ॥ मार्ग सांग त्वरे करून ॥ श्रीवेंकटेश सुहास्यवदन ॥ काय बोलता जाहला ॥१९०॥
इच्छामात्रे श्रीहरी ॥ अश्व एक निर्मिला झडकरी ॥ बकुलेसि दिधला ते अवसरी ॥ बैसावया कारणे ॥९१॥
त्या अश्वावरी आरुढोन ॥ बकुला निघाली तेथून ॥ वेंकटेश म्हणे याचि पंथे करून ॥ जाई आता झडकरी ॥९२॥
या पर्वत कड्यातून ॥ गमन करावे पुढे जाण ॥ कपिलेश्वर देवदयाघन ॥ तीर्थ तेथे विराजितसे ॥९३॥
त्यातीर्थी करोनिया स्नान ॥ घेई कपिलेश्वराचे दर्शन ॥ कैलासपति भगवान ॥ प्रार्थना करी तयाची ॥९४॥
जयजय शंकरा भाळनयना ॥ जगद्वंद्या कैलासराणा ॥ भक्तवत्सला उमारमणा ॥ दीनोद्धारा जगदगुरू ॥९५॥
जयविरूपाक्षा त्रिपंचनयना ॥ कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या ॥ नमो भवपाशनिकृंतना ॥ गजास्यजनका मन्मथारी ॥९६॥
तू सर्वात्मा साक्षात ॥ मी जातसे वेंकटेशानिमित्त ॥ कार्यसिद्ध करी तू समर्थ ॥ ऐसे प्रार्थी तयाते ॥९७॥
मग पुढे जाई सप्रेम ॥ लागेल शुकाचा आश्रम ॥ त्याचे चरणी मनोधर्म ॥ प्रणिपातकरावे निर्धारी ॥९८॥
आशीर्वचने संपादून ॥ पुढे करावे प्रयाण ॥ पद्मतीर्थ वसे जाण ॥ तयापाशी जाईजे ॥९९॥
तेथे वसती रामकृष्णमूर्ती ॥ मनी धरोनि स्वकार्याची आर्ती ॥ भक्तियुक्त तयांप्रती ॥ नमनकरी जननिये ॥२००॥
त्यातीर्थी करोनि स्नान ॥ तेथील कल्हार घेऊन ॥ पूजोनि रामकृष्णालागून ॥ प्रार्थना करी माते तू ॥१॥
श्रीनिवासाचे कार्य ॥ सिद्धकरा तुम्ही निश्चय ॥ ऐसे प्रार्थून लवलाहे ॥ सत्वर पुढे जाइजे ॥२॥
त्यावरी सुवर्णमुखरीप्रती ॥ अगस्ति आश्रम वसे निश्चिती ॥ नारायणपुरासि याचिपंथी ॥ जाई वेगी वरानने ॥३॥
श्रीनिवासाची आज्ञा घेऊन ॥ बकुला निघाली तेथून ॥ अश्वावरी आरूढोन ॥ जाती जाहली तात्काळी ॥४॥
वेंकटेश कथिले यथार्थ ॥ बकुला गेली तैसेचि करित ॥ सुवर्णमुखरी शोभिवंत ॥ अगस्तिआश्रम पाहिला ॥५॥
तेथे शिवालय देखिले उत्तम ॥ आत द्विज दाटले सप्रेम ॥ रुद्रघोष करिती नेम ॥ सदाशिवासी प्रीतीने ॥६॥
ते पहावया लागी देख ॥ पातले नारायणपुरीचे लोक पद्मावतीच्या सख्या बहुतेक ॥ कन्या तेथे पातल्या ॥७॥
त्याही घेवोनि शिवदर्शन ॥ माघार्या जाती त्वरेकरून ॥ एकमेकांसि बोलती वचन ॥ बकुला कर्णी आकर्णितसे ॥८॥
म्हणती आम्ही पद्मावतीसहित ॥ क्रीडार्थ गेलो वनात ॥ तेथे सुंदरपुरुष अकस्मात ॥ अश्वारूढ पातला ॥९॥
त्याचे रूप पाहता सुंदर ॥ पद्मावतीस दाटला विरहज्वर ॥ ऐसे कन्येचे बोलपरिकर ॥ ऐकोनि बकुला बोलतसे ॥२१०॥
म्हणे कन्याहो ऐकावचन ॥ पद्मावती कोठील कोण ॥ वनी पुरुषभेटला कोणालागून ॥ विरह कोणासी दाटला ॥११॥
हे आद्यंतवर्तमान ॥ सख्याहो सांगा मजलागून ॥ मग बकुले प्रती कथन ॥ कन्या सर्वही करिताती ॥१२॥
ते कथा गोड बहुत ॥ पुढील अध्यायी ऐका सावचित्त ॥ जे ऐकता यथार्थ ॥ कलिकल्मष नासती ॥१३॥
श्रीमद्वेंकटाचलनिवासा ॥ चिद्घनानंदा आदिपुरुषा ॥ तुझे चरित्र जगदीशा ॥ तूचि बोलवी रसाळ ॥१४॥
मी कर्ता हा अभिमान ॥ नाहीच सर्वथा मुळीहून ॥ थोरथोरांसी न कळे महिमान ॥ माझा पाड काय तेथे ॥१५॥
मी मतिमंदकिंकर ॥ माझेनि न तरवे गुणसागर ॥ परी आत्मसार्थकालागी निर्धार ॥ तवगुणी लीन जाहलो ॥१६॥
तू कृपाकरशील यथार्थ ॥ तरी सिद्धी पावेल हा ग्रंथ ॥ सज्जनरंजना स्वामी समर्था ॥ सांभाळी ब्रीद आपुले ॥१७॥
बालक जैसा छंद घेत ॥ माता पुरवि मनोरथ ॥ तैसे वीरवर ब्रीदसत्य ॥ सांभाळी त्वरित दयानिधे ॥१८॥
इतिश्रीवेंकटेशविजयसुंदर ॥ संमत पुराण भविष्योत्तर ॥ श्रवण करोत भक्तचतुर ॥ षष्ठोध्याय गोडहा ॥२१९॥६॥
एकंदर ओवीसंख्या ॥९०८॥ श्रीलक्ष्मीवेंकटेशार्पणमस्तु ॥