श्री वेंकटेश विजय - अध्याय १ ला

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


या 'व्यंकटेश विजय' ग्रंथाची सुरवात करताना लेखकाने प्रथमतः गणपती, सरस्वती, कुलदेवता, सदगुरु वेदव्यास इत्यादि थोर पुरुषांना वंदन करून नंतर सरस्वतीचे स्तवन केले आहे. ही कथा वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितली आहे. ती संस्कृतमध्ये असल्याने ती सामान्य लोकांकरिता म्हणून मी प्राकृत भाषेत तुम्हाला सांगतो-

एकदा नैमिष अरण्यामध्ये शौनकादिक ऋषींने सूतांना प्रश्न केला. इंदिरापति जो व्यंकटेश त्याचे चरित्र आम्हाला सांगा. त्यावर सूतांनी सांगण्यास आरंभ केला. तेच तुम्हाला मी सांगणार आहे.

पूर्वी मिथिला नावाच्या नगरीमध्ये राजा जनक राज्य करीत होता. त्याच्या वागण्याने लोक त्याला राजर्षी म्हणत असत. तो नेहमी ईश्वराची भक्ती करीत असे. त्याला कुशकेत नावाचा भाऊ होता. त्याच्यावर सर्व कारभार सोपवून तो ईश्वर भजन करण्यात मग्न होता. कुशकेतुला तीन मुलगे आणि तीन मुली होत्या. जनक राजाला जानकी नावाची एक सुंदर मुलगी होती. राजा जनक अत्यंत सुखाने काल घालवत होता. आपण फार सुखी आहोत असे हा राजा मानीत होता. विद्वान माणसाने सुख किंवा दुःख याचा विचार न करता सर्वदा शांतपणाने रहावे. राजाला आपल्या गुणांचा फार अभिमान झाला. पुढे त्याचा परिणाम असा झाला की त्याचा बंध जो कुशकेतु तो एकाएकी मरण पावला. कुशकेतुच्या पत्‍नीने अग्निप्रवेश केला. यामुळे राजाला फार त्रास झाला, वृद्धापकालामध्ये त्याची चिंता वाढू लागली. त्याने खाणे पिणे सर्व सोडून दिले. असा तो दुःखी असताना एक दिवस त्यांच्या पुरोहिताचा मुलगा शतानंद त्यांच्याकडे आले. राजाने जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यांची पूजा वगैरे केली आणि आपली सर्व हकिकत त्याला सांगितली. माझ्या व माझ्या बंधूच्या मुलीकरिता चौघे भाऊ गुणवान माझे जामात असावेत अशी माझी इच्छा आहे. याला मी काय करू? यावर शतानंदाने सांगण्यास सुरुवात केली. शतानंद म्हणाले.

राजा या पृथ्वीवर वेंकटगिरीचा महिमा फार मोठा आहे. वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात त्याचे महत्त्व सांगितले आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शतानंदाच्या मुखातून राजाने वेंकटगिरीचे महत्त्व ऐकण्यास सुरुवात केली.

राजा कृतयुगामध्ये ज्याला वृषभाद्री असे म्हणतात. त्रेतायुगामध्ये अंजनाद्री म्हणतात, द्वापारयुगात शेषाचल आणि कलीयुगामध्ये वेंकटाद्री म्हणतात. यावर राजाने प्रश्न केला की, एकाच पर्वताला निरनिराळ्या युगात निरनिराळी नावे का प्राप्त झाली? असा प्रश्न केला असताना शतानंद सांगू लागले तो कथाभाग द्वितीया अध्यायापासून सुरू झाला आहे.

श्रीमंगलमूर्तये नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसद्‌गुरुनाथाय नमः ॥ श्रीवेदव्यासाय नमः ॥ ॐनमोजी अपरंपारा ॥ आदिअनादिविश्वंभरा ॥ मायातीता अगोचरा ॥ दीनोद्धारा जगत्पति ॥१॥

नमो भवरोगनिवारणा ॥ नमो सर्गस्थित्यंतकारणा ॥ नमो जन्ममृत्युपाशमोचना ॥ सज्जनरंजना श्रीनिवासा ॥२॥

नमो नागराजतनूशयना ॥ विश्वोद्धारा खगवरकेतना ॥ भक्तवत्सला मनमोहना ॥ मधुसूदना भक्तपति ॥३॥

विधिविष्णुईशान ॥ ऐशी त्रिधा रूपे साकारून ॥ उत्पत्तिस्थितिलयकारण ॥ करिता तूची श्रीहरी ॥४॥

तू निर्गुणनिर्विकार ॥ भक्तकार्या जाहलासी साकार ॥ तुझे क्रमावया गुणांबर ॥ शक्त नव्हेति श्रुतिशास्त्रे ॥५॥

तूचि जाहलासी विनायक ॥ तुज नाही दुसरा नायक ॥ सकळविद्येचा आरंभ देख ॥ सुखदायक दासाचा ॥६॥

जैसा पूर्णिमेचा निशानाथ ॥ तैसा एकदंत झळकत ॥ तडित्प्रायपीतांबरमिरवत ॥ नागभूषणे शोभती ॥७॥

परमसुहास्यकरिराजवदन ॥ सरळसोंड लंबायमान ॥ शेंदूरचर्चितशोभायमान ॥ सिद्धगजानन विलसितसे ॥८॥

चतुर्भुजपाशांकुशधर ॥ विराजमान दोंदील सुंदर ॥ पाहतांचि रूप मनोहर ॥ आल्हादकारक वाटतसे ॥९॥

तुझे स्मरण करिता गणपति ॥ विघ्ने बारावाटे पळती ॥ वेंकटेशविजय वदावया निश्चिती ॥ देई मति मजलागी ॥१०॥

नमू आता विरिंचि कुमारी ॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी ॥ चहूं वाचांची ईश्वरी ॥ आदिमाता अवतरली ॥११॥

जय मूळप्रकृति जगदंबे ॥ सकळविद्येची आरंभे ॥ प्रणवरूपिणी स्वयंभे ॥ त्रिजगत्स्तंभे सरस्वती ॥१२॥

तुझे गायन ऐकता सुरंग ॥ सुधापानी होती कुरंग ॥ तप्तचामीकरा ऐसे अंग ॥ प्रभा अभंग दिसतसे ॥१३॥

बोलता झळकती दंत ॥ तेणे दशदिशा पै उजळत ॥ मर्गजाशी बिंक चढत ॥ हिरिया ऐसे भासती ॥१४॥

हंसावरी आरुढोन ॥ करी सुस्वरवीणा घेऊन ॥ कविजनांसी द्यावया वरदान ॥ प्रसन्नवदन सर्वदा ॥१५॥

तुझे कृपामात्रे करून ॥ मूक शास्त्रज्ञ होईल गहन ॥ ग्रंथारंभी तुझे चरण ॥ प्रेमभावे वंदितसे ॥१६॥

गणेशसरस्वतीचे स्तवन ॥ जेणे करविले कृपेकरून ॥ ज्याचेनियोगे भवपाशगहन ॥ तुटे बंधन क्षणमात्रे ॥१७॥

ऐसे सद्‌गुरुचैतन्यघन ॥ गोविंदराज नामाभिधान ॥ ज्याचे देखता महिमान ॥ गोविंदचि अवतरला ॥१८॥

जो क्रोधनगभंजनवज्रधर ॥ जो कामगजविदारक हरिवर ॥ जो अपरोक्षज्ञानाचा सागर ॥ जो मंदिरधैर्याचे ॥१९॥

ज्याची ऐकता कवित्वरचना ॥ आश्चर्यवाटे सर्वांच्या मना ॥ ज्याणे भक्तिबळे नारायणा ॥ आपणाधीन केलाअसे ॥२०॥

ऐसा तो गोविंदराज ॥ नमूनि त्याचे चरणांबुज ॥ रात्रंदिवस चरणरज ॥ वीर इच्छा करीतसे ॥२१॥

नमू आता श्रीकुलदैवत ॥ जो का श्रीकृष्ण वेणीतटस्थ ॥ दक्षयज्ञविध्वंसोनी अद्भुत ॥ खळमर्दन केले जेणे ॥२२॥

शिवनेत्री उद्भवोनी सहज ॥ दाविले जेणे अगाधतेज ॥ ग्रंथारंभी श्रीवीरभद्रराज ॥ प्रेमभावे वंदिला ॥२३॥

नमू आता मातापितर ॥ जे ज्ञानरूप परमपवित्र ॥ श्रीशंकरउपासकनिर्धार ॥ भजती निरंतर उभयता ॥२४॥

जन्मलो ज्याचे उदरात ॥ पितयाचे नाम बाळाजीपंत ॥ कृष्णाबाई माता विख्यात ॥ पतिव्रता शांतगुणी ॥२५॥

त्याउभयतांचे चरणी ॥ वीरबाळ मस्तक ठेउनी ॥ श्रीवेंकटेशविजयकथनी ॥ आरंभ केला साक्षेप ॥२६॥

आता नमू साधुसंत ॥ जे ब्रह्मानंदे डुल्लत ॥ ज्यांचे दृष्टी जनवनसमस्त ॥ समानचि भासतसे ॥२७॥

जे ज्ञानामृताचे सागर ॥ जे श्रीहरीचे कृपापात्र ॥ ज्यासाठी श्रीवेंकटेश्वर ॥ घेत अवतार युगायुगी ॥२८॥

ज्याची कृपा होता देख ॥ इंद्रपदापावे रंक ॥ मुर्खाचे ह्रदयी ज्ञानार्क ॥ उगवे कृपेने जयाचे ॥२९॥

ऐसे जे का संत सज्जन ॥ त्यांचे चरणी अनन्यशरण ॥ मजवरी कृपाकरून ॥ ग्रंथसिद्धीसी नेइजे ॥३०॥

ऐसे ऐकोनी संतस्तवन ॥ बोलती श्रोते विचक्षण ॥ पाल्लाळ अवघा टाकोन ॥ वेंकटेशविजय बोल का ॥३१॥

तंदूळांतील खडे समग्र ॥ निवडती जैसे निवडणार ॥ तैसे पाल्लाळ सांडोनी समग्र ॥ बोल साचार चरित्र पै ॥३२॥

ऐका आता सावधान ॥ श्रीवेंकटेशाचे चरित्र गहन ॥ जे ऐकता भावेकरून ॥ सर्वमनोरथ पुरती ते ॥३३॥

आयुरारोग्यैश्वर्यसंतती ॥ हे ऐकंताची होय प्राप्ती ॥ देणार श्रीवेंकटपती ॥ शेषाचलनिवासी जो ॥३४॥

श्रीवेदव्यासस्वमुखेकरोनी ॥ बोलिला भविष्योत्तरपुराणी ॥ त्याचा मथितार्थ काढोनी ॥ प्राकृतभाषणी रचियेले ॥३५॥

बोलणे माझे अरसबहुत ॥ परी संती घालावे पोटात ॥ जैसे बालक बोबडे बोलत ॥ जनकजननीसी आवडे ते ॥३६॥

मी नव्हे चतुरपंडित ॥ संस्कृतव्युत्पत्ति नाही किंचित्‍ ॥ ग्रंथ वदावयाचा हेत ॥ मनी धरिला निर्धारी ॥३७॥

श्रीवेंकटेश वैकुंठविहारी ॥ जो का भक्तजनाचा सहाकारी ॥ मूढाहाती ग्रंथनिर्धारी ॥ करविता तोची सर्वथा ॥३८॥

शौनकादिमुनि विख्यात ॥ नैमिषारण्यी ऋषींसहित ॥ सूताप्रती प्रश्न करित ॥ अत्यादरे करोनिया ॥३९॥

इंदिरापति मनमोहन ॥ त्याचे चरित्र परमपावन ॥ श्रीवेंकटेशविजय आम्हांलागून ॥ श्रवणकरविला पाहिजे ॥४०॥

यावरी सूत वक्ता निरूपण ॥ वदता जाहला हर्षायमाण ॥ श्रीनिवासाचे गुणकीर्तन ॥ ऐका सावधान श्रोते हो ॥४१॥

पूर्वी मिथिलानाम नगरी ॥ राव जनक राज्य करी ॥ परमविख्यात अवनीवरी ॥ राजऋषि म्हणवितसे ॥४२॥

जो धार्मिकसुभट ॥ जो सकलरायांमाजी वरिष्ठ ॥ जो ज्ञानगंगेचा लोट ॥ पुण्यश्लोकात गणना ज्याची ॥४३॥

दुष्टदंडनी कृतांत ॥ संतसज्जनासी नम्र बहुत ॥ बालकापरी रक्षित ॥ प्रजाजनांसी सर्वदा ॥४४॥

सत्यवादी शास्त्रज्ञ थोर ॥ कामक्रोध आवरोनी समग्र ॥ वासुदेवभजनी तत्पर ॥ अहोरात्र मज ज्याचे ॥४५॥

तयाचा बंधु विख्यात ॥ नाम त्याचे कुशकेत ॥ जनकरायासी आवडत ॥ प्राणांहूनि पलीकडे ॥४६॥

राज्यकारभार समस्त ॥ जनकराव बंधूसी सांगत ॥ यथान्याय पारपत्य ॥ सर्वही तूचि करावे ॥४७॥

बंधूसी राज्यनिरवून ॥ आपण करी श्रीहरिचिंतन ॥ कथाकीर्तन पुराण श्रवण ॥ येणेकरोनी कालक्रमी ॥४८॥

कुशकेतूचे उदरी ॥ जन्मल्या तिघी कुमारी ॥ तीन पुत्र निर्धारी ॥ तयालागी जाहले ॥४९॥

जनकरायाची कन्या ॥ जानकी नामे कमलनयना ॥ जीचिया स्वरूपावरूना ॥ कोटिकाम वोवाळिजे ॥५०॥

संततिसंपत्तिसमवेत ॥ जनकराजा राज्य करित ॥ मनी म्हणे नृपनाथ ॥ सुखी निश्चित मी एक ॥५१॥

कदापि दुःखाची वार्ता ॥ मज नाही ठाऊक सर्वथा ॥ पुढे ही दुःख तत्त्वता ॥ दृष्टी न पडो माझिया ॥५२॥

राव आपुले चित्तात ॥ सुखी मी म्हणोनि मानित ॥ परी ही गोष्ट असंमत ॥ साधूंसी संमत न होय ॥५३॥

ज्ञानियाचे मुख्य लक्षण ॥ सुखदुःख असावे समसमान ॥ कामक्रोधादिक जिंकून ॥ द्वंद्वातीत सर्वदा ॥५४॥

मृत्तिका आणि कांचन ॥ ज्यासि भासावे समान ॥ रावजनक ज्ञानी संपूर्ण ॥ त्यासी हे गुण न साजे ॥५५॥

कमळपत्राक्ष कृपाघन ॥ जो वैकुंठवासी रमारमण ॥ निजभक्तांचे उणे जाण ॥ पडो नेदी सर्वथा ॥५६॥

रावजनक ज्ञानसागर ॥ त्याने सुखाचा मानिला हरिख फार ॥ काही दिवस गेलियावर ॥ पुढील विचार ऐका पा ॥५७॥

जनकाचा बंधु कुशकेत ॥ मरण पावला अकस्मात ॥ त्याची स्त्री अग्निप्रवेश करित ॥ पतिसमागमे तेधवा ॥५८॥

जनकराजा ते अवसरी ॥ परमदुःखित जाहला अंतरी ॥ लेकुरे पाहोनि निर्धारी ॥ शोक भारी करितसे ॥५९॥

म्हणे जगन्निवासा श्रीहरी ॥ मज का दुःख दाविले निर्धारी ॥ ऐसे राजा अहोरात्री ॥ तळमळीतसे तेधवा ॥६०॥

राजा परम सज्ञान ॥ त्यासी दुःख व्हावया काय कारण ॥ सुखाचा संग धरिला म्हणून ॥ दुःख त्यासी अनुसरले ॥६१॥

सुखदुःखांची समानता ॥ मानोनिया हरीसी भजता ॥ त्यासी दुःखसांकडे तत्वता ॥ न पडे सर्वथा काळत्रयी ॥६२॥

असो रात्रंदिवस ऐशापरी ॥ राजा शोक करी भारी ॥ म्हणे परदेशी बाळे निर्धारी ॥ कैशी परी करू आता ॥६३॥

मज आले वृद्धपण ॥ शत्रु सर्वदा पाहती न्यून ॥ इंद्रजितरावणादि दुर्जन ॥ पाहो न शकती मजलागी ॥६४॥

दिशा शून्य बंधूविण ॥ आता पाठिराखा नाही कोण ॥ या लेकरांचे संरक्षण ॥ कवणे परी करू आता ॥६५॥

प्राप्त होता चिंता दारुण ॥ गोड न लगे अन्न पान ॥ राजभोग तांबूल शयन ॥ नावडेची सर्वथा ॥६६॥

ऐसा राव चिंताक्रांत ॥ तो उदेले भाग्य अद्भुत ॥ जैसा दुर्बळाचे घर शोधित ॥ चिंतामणी पातला ॥६७॥

की रोगियाच्या मुखांत ॥ सुधारस पडे अकस्मात्‌ ॥ की क्षुधितासि प्राप्त ॥ क्षीराब्धि जैसा जाहला ॥६८॥

तैसा शतानंदपुत्र गौतमाचा ॥ तो पुरोहित होय जनकाचा ॥ संकटकाल जाणोनि नृपाचा ॥ अकस्मात पातला ॥६९॥

ऋषि आला जाणोनी ॥ राव सामोरा गेला धांवोनी ॥ साष्टांगप्रणिपात करोनी ॥ लोटांगण घालितसे ॥७०॥

सिंहासनी बैसवून ॥ केले अर्घ्यपाद्यादि पूजन ॥ पुढे उभा कर जोडून ॥ स्तवन प्रीतीने करीतसे ॥७१॥

म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण ॥ तु सर्वऋषींमाजी चूडारत्‍न ॥ माझे संकट जाणोन ॥ प्रकटलासी कृपाळुवा ॥७२॥

मज आजपर्यंत प्रपंचाची आधी ॥ ऋषी ठाऊक नव्हती कधी ॥ आता स्थिर नाही माझी बुद्धी ॥ कैसे करू सांग आता ॥७३॥

माझे दःख हरायाते ॥ तुज वाचोनि नाही समर्थ ॥ मी अनन्यशर यथार्थ ॥ तुझिया चरणी गुरुवर्या ॥७४॥

शतानंद म्हणे नृपनाथा ॥ तुज काय दुःख जाहले तत्त्वता ॥ ते आद्यंत सर्ववार्ता ॥ सांग आता मजप्रती ॥७५॥

जनक बोले यथार्थ ॥ माझा बंधु कुशकेत ॥ काळे ग्रासिला तयाते ॥ स्त्रियेसहित गुरुवर्या ॥७६॥

त्याची लेकुरेही अज्ञान ॥ त्याकडे न पाहवे माझेन ॥ मज आले वृद्धपण ॥ ऐशियासी काय करू ॥७७॥

मज पाहोनी पक्षहीन ॥ शत्रु उठत्ल चहूंकडून ॥ दुःख प्राप्त जाहले गहन ॥ किती म्हणोनि वर्णावे ॥७८॥

जानकी माझी कुमारी ॥ बंधु कन्या तिघी सुंदरी ॥ या योग्यवर निर्धारी ॥ कोठे पाहू सांग आता ॥७९॥

माझ्या मनींचा हेत ॥ एकरायाचे चौघे सुत ॥ कुलशील आणि विद्यावंत ॥ ऐसे जामात मिळावे ॥८०॥

कन्या आणि जामात ॥ होवोनिया आयुष्यवंत ॥ सुखे वर्तावे यथार्थ ॥ हे मनोगत माझे असे ॥८१॥

माझे पुत्रकलत्रसहित ॥ सुखरूप असावे यथार्थ ॥ ऐशियासि उपाय त्वरित ॥ सांग यथार्थ महाराज ॥८२॥

ऐशी नृपतीची वाणी ॥ ऐकोनिया शतानंदमुनी ॥ परम कृपाळू होऊनी ॥ काय बोलता जाहला ॥८३॥

शतानंद म्हणे राजोत्तमा ॥ ऐका वैकुंठगिरीचा महिमा ॥ बहुत शोधिता उपमा ॥ दुसरी त्यासी नसेची ॥८४॥

वैकुंठनायक मुरारी ॥ तो साक्षात वसे पर्वतावरी ॥ ज्याची महिमा ऐकता श्रोत्री ॥ पावन होती जढमूढ ॥८५॥

सत्यवतीह्रदयरत्‍न ॥ भविष्योत्तरी बोलिला गहन ॥ कलियुगी वर्तेल माहात्म्य पूर्ण ॥ सर्वकाम फलप्रद जे ॥८६॥

धनविद्याआयुष्य अपार ॥ संतति आणि ज्ञानविचार ॥ श्रवणमात्रे देणार ॥ श्रीरमावर निजांगे ॥८७॥

सकळ यात्रेचे फळ ॥ महामखाचे पुण्य केवळ ॥ श्रवणमात्रे मनोरथ सकळ ॥ पूर्ण होती तात्काळी ॥८८॥

मनी करिता श्रवणाची आस ॥ तत्काळ शत्‍रू पावती नाश ॥ अनंतजन्मीचे दोष ॥ भस्म होती निर्धारी ॥८९॥

भूवैकुंठ पृथ्वीवरी ॥ तो हा साक्षात शेषाद्री ॥ त्याची महात्म्याची थोरी ॥ किती म्हणोनि वर्णावी ॥९०॥

आकाशाची उंची किती ॥ वर्णवेल सांग नृपती ॥ पृथ्वीवरील कणांची गणती ॥ करवेल निश्चिती एकदा ॥९१॥

व्यासवाल्मिक्यादिक मुनी ॥ तेही भागले गुणवर्णनी ॥ चारी सहा अठरा जणी ॥ वर्णिता तटस्थ जाहल्या ॥९२॥

ज्याचे गुण ऐकोनी ॥ शीतळ जाहला शूलपाणी ॥ ब्रह्मा इंद्र ज्याचेनी ॥ पदे आपुली पावले ॥९३॥

ऐक आता चित्त देऊन ॥ श्रीवैकुंठगिरीचे वर्णन ॥ कृतयुगी जया लागून ॥ वृषभाद्रि ऐसे नाम होते ॥९४॥

त्रेतायुगी अंजनाद्री ॥ नाम पावला निर्धारी ॥ शेषाचळ ऐसे द्वापारी ॥ श्रीवेंकटाद्रि कलियुगी ॥९५॥

युगायुगी एकेक नाम ॥ पावला तो नगोत्तम ॥ जनक म्हणे स्वामी उत्तम ॥ इतिहास सांगा सर्वही ॥९६॥

कृतयुगी वृषाद्रि म्हणोन ॥ नाम पडावया काय कारण ॥ त्रेतायुगी अंजनाद्रि म्हणोन ॥ किंनिमित्त बोलिले ॥९७॥

शेषाद्रि ऐसा द्वापारी ॥ कलियुगामाजी व्यंकटगिरी ॥ ऐसे व्हावयासि निर्धारी ॥ कारण सर्व वदावे ॥९८॥

शतानंद हर्षयुक्त ॥ बोलेल आता कथा अद्भुत ॥ ते ऐकावया एकचित्त ॥ जनक राजा अनुसरला ॥९९॥

सभा घनवट दाटली पूर्ण ॥ सावध ऐकती साधुजन ॥ ब्रह्मक्षत्रियआदि चहु वर्ण ॥ अत्यादरे ऐकती ॥१००॥

पुढील अध्यायी कथा गहन ॥ वदेल वामदेव नंदन ॥ ते संत श्रोते विचक्षण ॥ ऐका चित्त देऊनिया ॥१०१॥

चैतन्यघना श्रीनिवासा ॥ श्रीगोविंदा वैकुंठवासा ॥ भक्तवत्सला रमाविलासा ॥ मायाधीशा जगत्पते ॥२॥

तू कृपाकरशील जरी ॥ तरी ग्रंथसिद्धि होय निर्धारी ॥ श्रीवेंकटेशा शेषाद्रिविहारी ॥ करी धरी बाळकाते ॥३॥

श्रीगोविंद पदारविंद ॥ तेथील सेवावया मकरंद ॥ कुडचीवीर होऊनि षट्‌पद ॥ दिव्य आमोद सेविसते ॥४॥

इति श्रीवेंकटेशविजय सुंदर ॥ संमत पुराण भविष्योत्तर ॥ परिसोत ज्ञानीपंडित चतुर ॥ प्रथमोध्याय गोड हा ॥१०५॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP