"कोणिकडे जाशी स्वारा, दिसशी का घाईत ?"
"जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत !"
बिजलीपरि चमकुन गेला ---घोडेस्वार
नवल अहो, हां हां म्हणता झाला नजरेपार !
जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत
बहारास आली होती दो जीवांची प्रीत
ऐका तर गोष्टीला त्या झालि वर्षे वीस
स्वार अजुनि तेथे दिसतो अवकाळ्या रात्रीस
जकातिचे नाके जळके आज दिसे ओसाड
घोटाळुनि वारा घुमवी काय बरे पडसाद !
म्हातारा नाकेवाला मल्हारी शेलार
त्याची ती उपवर कन्या कल्याणी सुकुमार !
मोहिमेस निघता तेथे स्वार करी मुक्काम
कल्याणी झाली त्याच्या जीवाचे आराम !
मोहरली अंबेराई, सरता झाला माघ
बहारास आला त्यांच्या प्रीतीचा फुलबाग
"मनहरणी, शीतळ तुझिया स्वरुपाचा आल्हाद
अमृताचा धारा ढाळी जणु पुनवेचा चांद
आंब्याचा मोहर तैशी कांति तुझ्या देहास
जाईचे फूल तसा तव मंद सुगंधी श्वास
कल्याणी, पाहुनि तुजला फुलतो माझा प्राण
दे हाती हात तुझा तो, कर माझे कल्याण !
या आंबेराईची तु वनराणी सुकुमार
कल्याणी, सांग कधी ग तू माझी होणार ?"
"आणभाक वाहुनि कथिते, तुम्हि माझे सरदार
प्रीत तुम्हांवरिती जडली, तुम्हि भारी दिलदार
नाहि जरी बाबांच्या हे मर्जीला येणार
म्हणतातच, ’पेंढार्याची बाइल का होणार ?’
पंचकुळी देशमुखांचे तुमचे हो घरदार
नाहि परी बाबांच्या हे मर्जीला येणार !"
कोण बरे फेकित आला घोडा हा भरधाव ?
जकातिच्या नाक्यापुढले दचकुन गेले राव !
"चैतपुनव खंडोबाची, ऐका हो शेलार
ध्यानि धरा लुटुनी तुमची जकात मी नेणार"
आंब्याच्या खोडामध्ये घुसला तो खंजीर
बेलगाम निघुनी गेला---गेला तो हंबीर !
पुनव करी राईवरती चांदीची खैरात
जकातिच्या नाक्याकडली लख्ख उजळली वाट
सोंग जसे लळितामधले यावे उडवित राळ
धुरोळ्यात भडकुन उठला तो टेंभ्यांचा जाळ
ओरडला गढिवरला तो टेहेळ्या झुंझार
’सावध व्हा, पेंढार्यांचा आला हो सरदार !’
वाघापरि गर्जत आला, "येळकोट-मल्हार !
रामराम अमुचा घ्या हो मल्हारी शेलार !
पारखून घ्या तर आता हिरा आणखी काच ! "
आणि सुरु झाला नंग्या समशेरींचा नाच
"कल्याणी पेंढार्याची बाइल का होणार !"
काय असे डोळे फाडुनि बघता हो शेलार ?
"कल्याणी नेली’ एकच झाला हाहाकार
पाठलाग होऊन सुटले स्वारामागे स्वार
स्वाराच्या पाठित घुसला अवचित तो खंजीर
विव्हळला; परि नाही तो अडखळला खंबीर !
तसाच तो दौडत गेला विजयाच्या धुंदीत
तसाच तो दौडत गेला मृत्यूच्या खिंडीत
"जकात ही लुटिली ज्याने प्रीतीची बिनमोल
जीवाचे द्यावे लागे मोल," बोलला बोल
’कल्याणी जातो !’ सोडी शेवटला हुंकार
कोसळला घोडयावरुनी धरणीवरती स्वार !