वेंकटेश अगस्त्याश्रमात राहात असतानाच तोंडमान, श्रीवेंकटेशाचे दर्शनार्थ आला व त्याने अनेक प्रकारे श्रीनिवासाचे स्तोत्र केले. तेव्हा आनंदित झालेल्या श्रीनिवासाने त्यास आलिंगन देऊन अगत्य येण्याचे कारण विचारले असता "माझे काही काम नाही केवळ आपल्या सेवेकरिता मी आलो आहे" असे सांगितले. ते ऐकून श्रीनिवास म्हणाला की- तुझा बंधु आकाशराजाने मला आपली कन्या देऊन गृहस्थाश्रमी केले. पण मला वास्तव्य करण्यासाठी स्वतःचे निवासस्थान नाही. दुसर्याच्या घरी वास्तव्य करणे हे कमीपणाचे व अपवादास कारण होते. याकरिता तू मला एक निवासाला योग्य असे स्थान बांधून दे. अशी मी विनंति करतो.
श्रीनिवासाची ही विनंति ऐकून तोंडमानास राजास फार आनंद झाला व त्याने आपली अनुमति दर्शवून एका शुभ दिवशी श्रीनिवासपद्मावतीसह तोंडमान शेषाचलावर आला. तेथे वराहदेवाच्या अनुमतीने स्वामी पुष्करिणी तीर्थाचे दक्षिणेस मंदिर बांधण्याकरिता जागा ठरविली. ती जागा दाखवून श्रीनिवासाने तोंडमानास सांगितले की, राजा याठिकाणी मला राहण्याकरिता "पुर्वेस दोन गोपुरे, तीन प्राकार व सात द्वार असलेले व ध्वजस्तंभासह सुशोभित मंडप, आणि विविधशालादिकांनी युक्त असा प्रासाद तयार कर. यापूर्वी तू खोदविलेली. "श्रीतीर्थ व भूतीर्थ" ही तीर्थे तुझी कीर्ति गात आहेत. आता त्याप्रमाणेच माझ्याकरिता हे दगडचे भवन बांधून कीर्तिमान हो. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून आश्चर्यचकित झालेल्या तोंडमानास विचारले की, यापूर्वी मी आपण म्हणता त्याप्रमाणे दोन तीर्थकुंडे निर्माण केली नसताना तुम्ही असे का म्हणता? याप्रमाणे विचारले असता श्रीनिवासाने तोंडमानाच्या पूर्वजन्माची हकीकत सांगितली. ती अशी-
पूर्वी वैखानस या नावाने प्रसिद्ध असलेल्या ऋषीने चोलदेशात तपश्चर्या केली असता श्रीकृष्णाने त्या ऋषीस बालरूपाने दर्शन देऊन सांगितले की, हे ऋषे, तू शेषाचलावर जा. तेथे एका गुहेत मी श्रीनिवास म्हणून वास्तव्य करीत आहे. त्या श्रीनिवासाची पूजा कर. वाटेत तुला रंगदास नावाचा एक शूद्र भेटेल. त्यालाहि शेषाचलावर आपल्याबरोबर घेऊन जा. तो तुला पूजेच्याकामी मदत करील. याप्रमाणे श्रीकृष्णाने सांगितल्यावर तो वैखानस ऋषि शेषाचलास निघाला. वाटेत त्याला रंगदास भेटला असता त्यालाहि बरोबर घेऊन तो आंगिरस ब्राह्मण शेषाचलावर आला. व तो नित्य त्रिकाली गुहेत असलेल्या श्रीनिवासाची पूजा करीत असे. त्यावेळी तो रंगदास शूद्र आंगिरस ब्राह्मणाला रोज फुले तुलसी आणून देत असे. देवाला रोज फुले मिळावीत म्हणून त्याने फुलझाडे लावली. त्या फुलझाडांना पाणी घालण्याकरिता तेथेच दोन तीर्थ कुंडे रंगदासाने खोदली. तीच "श्रीतीर्थ व भूतीर्थ" या नावाने प्रसिद्ध आहेत.
पुढे एकदा वसंतऋतूमध्ये स्वामीतीर्थामध्ये कुंडल नावाचा गंधर्व आपल्या स्त्रीसह जलक्रीडा करीत असता ती जलक्रीडा पाहता रंगदास तेथेच उभा राहिला. त्यामुळे श्रीनिवासाच्या पूजेच्या वेळी फुले नेहमीप्रमाणे मिळाली नाहीत तेव्हा तो ब्राह्मण फार रागावला. तेव्हा श्रीनिवासाने त्या ब्राह्मणास शांत करून रंगदासास सांगितले की, हे रंगदासा, तू भिऊ नकोस. माझ्या मायेने तू मोहित झाल्याने तुझ्या हातून मानसिक पाप घडले आहे. पण आता तू पश्चात्तापाने शुद्ध झाला आहेस. तुझे कल्याण होईल. स्वामी तीर्थाच्या तीरावर तू आपल्या देहाचा त्याग कर. पुढे तू दुसर्या जन्मात तोंडमान या नावाने जन्म घेऊन तोंडमान या देशाचा राजा होशील. याप्रमाणे रंगदासाने निराहार करीत आपला तेथेच देह ठेवला. तोच रंगदास आता तू आहेस व तीच दोन कुंडे "श्रीतीर्थ व भूतीर्थ" या नावाने प्रसिद्ध आहेत.
याप्रमाणे श्रीनिवासाच्या मुखातून आपला पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकून तोंडमान अतिशय आनंदित व आश्चर्यचकित झाला. श्रीनिवासाच्या इच्छेप्रमाणे एक उत्तम प्रकारचे भवन तयार करविले. तसेच सद्भक्तांना तो शेषाचल चढण्यास सुलभ व्हावा म्हणून पर्वतावर ठिकठिकाणी पायर्या बांधविल्या. व तसेच विश्रांति घेण्याकरिता वाटेत धर्मशाला व विहीरी बांधविल्या. त्यावेळी इंद्रादि देवहि गृहप्रवेशासाठी आले होते. वैखानसादि ऋषी, अनेक श्रेष्ठ ब्राह्मण वेदघोष करीत असतानाच व नानाप्रकारच्या वाद्यांच्या घोषात त्या प्रासादात श्रीनिवासाने पद्मावतीसह प्रवेश केला पद्मासन घालून बसलेल्या पद्मावतीस आपल्या वक्षस्थली धारण केले.
तोंडमानाने पूर्वी खोदलेल्या कुंडाचा शोध केला. त्यापैकी श्रीतीर्थ कुंड अन्नशालेजवल होते व थोड्या अंतरावर भूतीर्थ होते. ही दोन्ही कुंडे पाषाणांनी बांधून काढली आपल्या भक्तांनाहि आपण त्यांचा भवपाश तोडून वैकुंठास नेतो हे दाखविण्यासाठी त्यांनी आपला हात कंबरेवर ठेवला आहे. तेथे असल्याने तेथे आनंदसागर आहे असे उजव्या हाताने दाखविले आहे.
चौदाव्या अध्यायाचे सार समाप्त