वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय अकरावा

वेंकटेश महात्म्याचे पारायण केल्यास प्रत्यक्ष बालाजीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.


शतानंद मुनि जनकास म्हणतो- हे राजा इंद्र नारायणपुरास गेल्यानंतर श्रीनिवास देवांना म्हणाला, हे देवहो, आकाशराजाची जी कन्या आहे. तिचे पाणिग्राहण करण्याची इच्छा मी करीत आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वजण मान्य करीत असाल तर मी त्या कन्येचा स्वीकार करीन. ॥१॥

याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून श्रीनिवासाचे भक्त असलेले पुत्रपौत्रादिक म्हणतात. ॥२॥

ब्रह्मादिदेव म्हणतात- हे पुरुषोत्तमा, आम्ही सर्वजण आपल्या दासभावाने राहात आहोत. तुझ्या अनुग्रहानेच आम्ही हा विवाहमहोत्सव पाहणार आहोत. ॥३॥

तेव्हा महादेव म्हणाला- प्राकृत मनुष्य ज्याप्रमाणे बोलतो तसे तू चेष्टेने बोलत आहेस. जर तुमच्या मनाला प्रशस्त वाटत असेल तर तू लग्न करून घे. ॥४॥

याप्रमाणे शंकराचे भाषण ऐकून हसत हसत श्रीनिवासाने शंकराची प्रशंसा केली. नंतर ब्रह्मदेव श्रीनिवासास म्हणाला. ॥५॥

हे दयानिधे, तू सर्वज्ञ असून सत्यसंकल्पवान आहेस. विवाहाच्या अगोदर अष्टवर्ग करावयाचा असतो. ॥६॥

हे पुरुषोत्तमा, याकरिता मला पुण्याहवाचन कार्यासाठी आज्ञा दे- याप्रमाणे ब्रह्मदेवाचे आपल्या मुलाचे भाषण ऐकून श्रीनिवासाने वसिष्ठ ऋषीस बोलाविले. ॥७॥

महाभाग्यशाली अशा वसिष्ठ ऋषींना पौरोहित्यासाठी नेमले व यजुःशाखीय महामंत्राच्या योगाने स्वस्तिवाचन व्हावे असे सुचविले. ॥८॥

हे ब्रह्मदेवा, सर्व देवांचा तू यजमान हो. सर्व देव, ऋषि यांचा सत्कार करण्यासाठी शंकरास नेमले. ॥९॥

सर्व देवांना बोलाविण्यासाठी कुमारास, उठविण्यासाठी (झोपेतून) मदनास योजिले. नंतर अग्नीस बोलावून श्रीनिवासाने म्हटले- हे अग्ने, स्वयंपाकासाठी तू भांडी घेऊन स्वैपाक करावास. कारण तू केलेला पाक हा देव, ऋषि यांना आवडतो. ॥१०-११॥

म्हणून स्वाहा व स्वधा यांचेसह पाकसिद्धि कर. याप्रमाणे श्रीनिवासाची आज्ञा ऐकून यज्ञमूर्ति अशा अग्नीने आपली जशी आज्ञा." म्हणून म्हटले. ॥१२॥

सर्व प्राणिमात्रांना पाणी पुरविणे हे काम वरुणाला सांगितले. दुष्टांना शासन व शिष्टाचे परिपालन करण्यासाठी यमास व सर्वत्र सुगंध पसरविण्यासाठी वायूस आज्ञा दिली. ब्राह्मणांना द्रव्य व वस्त्र अलंकार देण्यासाठी हे राजा श्रीनिवासाने कुबेराची योजना केली. दिव्याची व्यवस्था करण्याचे कामी चंद्राची योजना केली. ॥१३-१४-१५॥

खरकटी भांडी स्वच्छ करण्यासाठी अष्टवसुगणांना सांगितले. द्रोण पत्रावळी लावण्यासाठी नवग्रहाची योजना केली. ॥१६॥

याप्रमाणे पुराणपुरुष अशा श्रीनिवासाने आज्ञा दिली असता त्याप्रमाणे सर्व आपआपल्या नेमून दिलेल्या कार्यामध्ये दक्ष झाले. ॥१७॥

त्यानंतर लोक पितामह ब्रह्मदेव श्रीनिवासास म्हणाला- हे मधुसूदना, गोविंदा, मंगल असे स्नान कर. ॥१८॥

हे रमापते, पुण्याहवाचनपूर्वक इष्ट देवतापूजन, कुलदेवतेची स्थापना वगैरे गोष्टी यथासांग कर. ॥१९॥

याप्रमाणे ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या करवीर पुरात राहात असलेल्या रमादेवीचे स्मरण झाल्याने, हे जनका, सामान्य मनुष्याप्रमाणे लोकरीतीला अनुसरून लौकिक देह धारण करणारा श्रीनिवास रुदन करू लागला. ॥२०-२१॥

हे बुद्धिमान् मुला, तू, मी, हे सहपरिवार देव हे सर्व जरी असले तरीही तिच्यावाचून ही सभा शोभत नाही. ॥२२॥

ज्याप्रमाणे आकाशात चंद्रावाचून तारका शोभत नाहीत. वृक्षावाचून अरण्य, पंखावाचून पक्षी, ॥२३॥

फळावाचून वृक्ष, दरिद्री असा (श्रीमंताचा) मित्र त्याप्रमाणे हे ब्रह्मदेवा, महालक्ष्मी वाचून ही सभा शोभत नाही. ॥२४॥

हे राजा, याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून आपला हात वर करीत शंकर श्रीनिवासास म्हणाला. ॥२५॥

हे तात, निष्कारण तू का रडतो आहेस? संगरहित व अप्रमेय अशा तुला विडंबन कशा करिता करावयाचे आहे? ॥२६॥

हे देवेशा, क्लेशरहित अशा तुझे रडणे हे व्यर्थ आहे? याप्रमाणे महादेवाचे बोलणे ऐकून श्रीनिवास महादेवास म्हणाला. ॥२७॥

हे शंभो, पौत्रका, तू लहान असल्याने जाणत नाहीस. ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या महाप्रलयकाली काहीही असत नाही ॥२८॥

त्यावेळी हे महादेवा, आश्रयरहित अशा माझ्याबरोबर लक्ष्मीदेवी शय्यासकी होऊन माझ्या हितासाठी क्रीडा करते अशा लक्ष्मीवाचून मला अशा (मंगल) प्रसंगी मला कसे बरे सुख लागेल? - याप्रमाणे श्रीनिवास बोलत असताना ब्रह्मदेव म्हणाला- हे गोविंदा, जनार्दना हे तू यापूर्वीच सांगितले नाहीस. हे कमलानाथा- आजच-रमा देवीस बोलाविण्याकरिता मला आज्ञा दे. ॥२९-३०-३१॥

तेव्हा आपल्या पुत्राचे (ब्रह्मदेवाचे) भाषण ऐकून षण्मुखीकरवी सूर्यास ताबडतोब श्रीनिवासाने सूर्यास बोलाविले असता सूर्य तात्काल आला. ॥३२॥

भक्तीने नमस्कार व स्तोत्र करित हात जोडून श्रीनिवासाच्या समोर उभा राहिला तेव्हा भक्तीने नम्र झालेल्या सूर्यास पाहून श्रीनिवास म्हणाला. ॥३३॥

हे सूर्या, तू शृगाल वासुदेवाच्या नगरीस (कोल्हापूरास) जा. तेथे माझी प्रिया अशी जगन्माता आहे तिला घेऊन ये. ॥३४॥

श्रीनिवासाचे भाषण ऐकून पौत्र असा सूर्य विनयपूर्वक साष्टांग नमस्कार करीत म्हणाला. ॥३५॥

मी त्या लोकमातेस कोणते कारण सांगून येथे आणू? ती माझ्यावर विश्वास कसा ठेवील असे कारण आपण मला सांगा. ॥३६॥

ते ऐकून श्रीनिवास म्हणाला- हे सूर्या लोकाच्या महोदयास कारण असणार्‍या तुझ्यावर विशेष असा स्नेह आहे? तुझ्या आगमनामुळे ती आनंदित होऊन माझ्याकडे येईल. ॥३७॥

तिला आणण्यासाठी एक कारण सांगतो. तिच्या दारात गेला असता डोळ्यातील पाणी पुसत उभा रहा. ॥३८॥

तेव्हा हे सूर्या, तुला अश्रू पुसत असलेला पाहून महालक्ष्मी तुझे सांत्वन करीत तुझ्या दुःखाने व्याकुल होऊन ती तुला म्हणेल. ॥३९॥

या भूतलावर तुझे शासन कोणाकडून हरण केले आहे? ते मला सांग असे तिने तुला विचारले असता तु अत्यंत दुःखी होऊन तिला सांग. ॥४०॥

हे माते, माझा अधिकार या भुतलावर कोणीही हरण केला नाही. पण भूतलावर तुझा पति झोपला आहे. ॥४१॥

ज्याने मला पृथ्वीवर माझ्यावर अशा तर्‍हेने कृपा करून अधिकार दिला तो तुझा पति निश्चेतन होऊन भूमीवर पडला आहे. तो जगेल की नाही या विषयी संशय आहे. ॥४२॥

तुझा पति जगन्नाथ अतिशय अशक्त झाला आहे असे मला वाटते. "मी त्या देवी महालक्ष्मीस कधी पाहीन?" असे बडबडत आहे. ॥४३॥

याप्रमाणे तू सांगितल्याबरोबर ती निश्चयाने तुझ्याबरोबर येईल. याप्रमाणे महालक्ष्मीला कोल्हापुराहून आणण्याचे कारण ऐकल्यावर, किंचित् हसत हसत भक्तीने नम्र झालेला भय व भक्ति या दोन अवस्थेत सापडलेला सूर्य म्हणाला- सर्व लोकात महालक्ष्मी ही सर्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. ॥४४-४५॥

हे श्रीनिवासा, ती मनातील गोष्ट जाणत असता माझ्यावर महालक्ष्मी कसा बरे विश्वास ठेवील? हे हरे, तू निरोगी असता तुला रोगी असे मी कसे सांगू? ॥४६॥

याप्रमाणे सूर्याचे भाषण ऐकून श्रीनिवासाने आपले मनोगत सांगितले. श्रीनिवास म्हणाला- माझ्या मायेने ती मोहित होईल यात संशय नाही. ॥४७॥

याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता सूर्य श्रीनिवासास नमस्कार करून श्रीनिवासाच्या रथात बसला व करवीरपुरास जाऊन सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले. ॥४८॥

सूर्याचे भाषण ऐकून सूर्यावर असलेल्या विश्वासाने रमादेवी, खिन्नतेने रथात बसून सूर्यासह वायुवेगाने श्रीनिवासाजवळ आली. रमादेवीच्या आगमनाची वार्ता ऐकता क्षणीच श्रीनिवास तिच्या भेटीच्या उत्सुकतेमुळे अशक्त झाल्याप्रमाणे सामोरे गेले. अशक्त अशा प्रकारचा देह हा अद्‌भुत असा दिसू लागला. ॥४९-५०-५१॥

देव, उपदेव, ऊर्ध्वरेतस असे ऋषि सर्वांना तो श्रीनिवासाचा अशक्त देह अद्‌भुत असा दिसू लागला. श्रीनिवासाने डावा हात शंकराच्या खांद्यावर व उजवा हात ब्रह्मदेवाच्या खांद्यावर ठेवला. अशा स्थितीतल्या श्रीनिवासाला महालक्ष्मीने पाहिले. ॥५२-५३॥

लगबगीने रथातून खाली उतरून किंचित हसत चंपक पुष्पे श्रीनिवासाच्या चरणी समर्पण करीत अतिशय भक्तीने श्रीनिवासास आलिंगन देत दोन मुहूर्त तशाच अवस्थेत रमादेवी राहिली. रमादेवीच्या आलिंगनाने (श्रीनिवासाचा अशक्तपणा नष्ट झाला) श्रीनिवास पुष्ट झाला. ॥५४-५५॥

नंतर श्रीनिवासाने तिचे कुशल वर्तमान विचारले, रमादेवीने श्रीनिवासाचे कुशल विचारले. सर्व लोकांचे मातापिता असे लक्ष्मीनारायण सर्व देवांनी नमस्कृत असे ते दोघे स्वस्थ झाले. नंतर रमादेवी म्हणाली, हे गोविंदा, तुझी माया दुरत्यय आहे कारण त्या मायेने मी मोहित झाले. ॥५६-५७॥

हे गोविंदा, सूर्यास सांगून तुझ्याकडून हे विचित्र कर्म केले गेले आहे व तुझ्या मायेने ब्रह्मरुद्रादिकही मोहित झाले आहेत. ॥५८॥

हे वासुदेवा. आता मला बोलावण्याचे कारण सांग. याप्रमाणे महालक्ष्मीने विचारले असता श्रीनिवास म्हणाला, रामावतारात तू जे मला सांगितले होतेस त्याचे तू स्मरण कर. वेदवतीबरोबर विवाह करून घेण्याचा समय आला आहे. ॥५९-६०॥

कलियुगात तुझ्या सान्निध्यात हा विवाह करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता पूर्वीच्या रामावतारातील वचनाचे स्मरण होऊन रमादेवी म्हणाली, हे गोविंदा, त्या वेदवतीचा विवाहाविधीने तू स्वीकार कर. हे वत्सला, तिचा स्वीकार करून मला त्यावेळी दिलेले वचन पूर्ण कर. ॥६१-६२॥

याप्रमाणे बोलत आनंदयुक्त हौन महालक्ष्मीने श्रीनिवासाला नमस्कार केला. उदार बुद्धि अशा श्रीनिवासाने तिला दिलेले वचन पूर्ण करून महालक्ष्मीस आनंदित केले. ॥६३॥

व महालक्ष्मीचे बोलणे ऐकून मनोरथ पूर्ण झालेला, परमानन्दाने युक्त असलेल श्रीनिवास शेषाचलावर शोभू लागला. ॥६४॥

आनंद उत्पन्न करणार्‍या गोष्टीमुळे ज्याची इंद्रिये रोमांचित झाली आहेत, आनंदाश्रूनी ज्याचे नेत्र भरले आहेत, ब्रह्मरुद्रेन्द्रादिकांनी स्तवन केला गेलेला सच्चरित्र, वेंकटाचलाचा मित्र श्रीनिवास वेंकटाचलावर शोभू लागला. ॥६५॥

याप्रमाणे भविष्योत्तरपुराणांतर्गत वेंकटेशमाहात्म्याचा अकरावा अध्याय समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP