जनकराजा म्हणतो- हे शतानंद मुने, सज्जनांचा आधार असणार्या श्रीनिवासाने पुढे काय केले ते आपण मला विस्ताराने सांगा. ॥१॥
त्यावेळी शतानंदमुनि म्हणतात- हे राजा, लक्ष्मीसहित असणारा श्रीनिवास, पुढील कार्यास प्रारंभ व्हावा या इच्छेने ब्रह्मदेवास म्हणाला. ॥२॥
हे पुत्रा, पुढचे सर्व कार्यक्रम आळस सोडून तात्काल सुरू कर. याप्रमाणे श्रीनिवासाचे बोलणे ऐकून संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाने कढई, हौद वगैरे भांडी आणण्याकरिता नारायणाचे भक्त गरुड प्रमुख अशा वीर देवांना पाठविले. ॥३-४॥
गरुड प्रमुख अशा वीरांनी ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे एका क्षणातच स्नानाकरिता पाणी भरण्यासाठी मोठमोठी भांडी आणली. ॥५॥
मग त्या भांड्यातून जलाधिपति वरुणाने निरनिराळ्या तीर्थातील थंड व सुगंधी असे पाणी भरले. ॥६॥
त्यानंतर वस्त्राल्कारांनी नटलेल्या मंगलकार्याविषयी उत्सुक असणार्या सर्व सुवासिनी स्त्रिया, अरुंधतीस पुढे करून दीप व मंगल कलश धारण करण्याविषयी पार्वतीची योजना करून सावित्री प्रमुख स्त्रियांनी सर्व मंगल कार्य करण्यास प्रारंभ केला. ॥८॥
दहा अवतारात केलेल्या लीलांची शुभ्र गणी, व श्रीनिवास अवतारातील गाणी सर्व देवस्त्रिया गाऊ लागल्या. ॥९॥
याप्रमाणेच सिद्ध स्त्रिया व वैखानस स्त्रियाहि श्रीनिवासाचे चरित्र गाऊ लागल्या. याप्रमाणे वेंकटेशाचा विवाहमहोत्सव सुरू झाला असता श्रीनिवासांच्या मनोहर नेत्र असणार्या सुना, श्रीनिवासाची माता व आपली सासू महालक्ष्मी यांच्या पुढाकाराने हसत खेळत त्या महोत्सवात आसक्त झाल्या. ॥१०-११॥
याप्रमाणे सप्तमीपासून हा विवाहमहोत्सव सुरू झाला. चार दिशांना पाण्याने भरलेल्या चार कलशांना चौकोन पद्धतीने सूत गुंडाळून मध्यभागी रत्नाचे पीठ ठेवले. नंतर गडबडीने त्या देवस्त्रिया श्रीनिवासास म्हणाल्या. ॥१२-१३॥
हे पुरुषश्रेष्ठा, तू उठ व चौकोनी सूर्यमंडळातील रत्नपीठावर बैस. याप्रमाणे श्रीनिवासास स्त्रियांनी सांगितले असता आपल्या डोळ्यात पाणी आणून दीनपणे श्रीनिवास म्हणाला- हे बुद्धिमंता पितामहा, आशीर्वादपूर्वक मला तेल कोण लावणार? हे महाराजा, ज्याला माता व पिता नाहीत अशाच्या विवाह व मृत्यु यासमयी त्याचे जीवन व्यर्थ होय. मला बहिण, भाऊ, मामा, भाचे यापैकी कोणीहि नाही. कोण मला तेल लावणार? मातपित्यांनी रहित असणार्याची काय स्थिती होत असेल बरे? ॥१४-१५-१६-१७-१८॥
मातेसमान मित्र नाही, पित्यासमान सुख नाही. भार्येसमान भाग्य नाही, मुलासारखा आधार नाही, बंधुसारखा स्नेह नाही, विष्णूपेक्षा श्रेष्ठ दैवत नाही. लीलेसाठी मानव देह धारण करणारा श्रीनिवास, याप्रमाणे बोलून ब्रह्मदेवाचे तोंड पाहात लोकरीतीप्रमाणे रडू लागला. त्यावेळी महादेवासह ब्रह्मदेव श्रीनिवासाचे भाषण ऐकून श्रीनिवासाचे सांत्वन करीत त्यास म्हणाला- मायारूपी पिंजर्यात राहणार्या आम्हास का मोह उत्पन्न करीत आहेस? ॥१९-२२॥
हे चतुर्भुजा, मला कोणी नाही असे जे तू म्हणतोस ते खोटे आहे, मी तुझा पुत्र व महादेव तुझा नातू आहे. ॥२३॥
मदन हा आणखीन एक पुत्र असून षण्मुख हा तुझा पणतू आहे. वायु हा तुझा श्रेष्ठ पुत्र असून भारती ही तुझी सून आहे. ॥२४॥
तुझ्या चरणाची सेवा करणार्या सरस्वत्यादि स्त्रिया आहेत. तू स्वतः परमश्रेष्ठ असून जगतास धारण करणारी तुझी पत्नी आहे. ॥२५॥
हे पुरुषोत्तमा, हे सर्व तुझी क्रीडामात्र आहेत. इतक्या सर्व ऐश्वर्याने युक्त असणारा आम्हांस व्यर्थ मोहित करीत आहेस. याप्रमाणे रमादेवीचा सखा असणार्या श्रीनिवासाशी ब्रह्मदेव बोलत असता त्याने रमादेवीस खूण केली तेव्हा रमादेवी उठून श्रीनिवासास म्हणाली- हे देवा वेंकटेशा, तुझ्या मनात काय आहे हे मला समजले. हे पुरुषोत्तमा, तैलाभ्यंगादि सर्व गोष्टी मी करीन. ॥२६-२८॥
उठ, दुःखाचा त्याग कर, व उत्तम प्रकारच्या पीठावर जाऊन बैस. याप्रमाणे रमादेवीचे बोलणे ऐकून आनंदाश्रु डोळ्यात आणून हे जनकराजा, अर्जुनसारथि श्रीकृष्णाने (श्रीनिवासाने ) कश्यप, अत्रि, भरद्वाज व विश्वामित्र आदि प्रमुख ऋषींना नमस्कार करून विश्वाचे विडंबन करीत श्रीनिवास म्हणाला- हे महामुने, ब्रह्मन्, मला मंगलस्नान करण्याकरिता आज्ञा दे. ॥२९-३१॥
तेव्हा पुरोहित वसिष्ठांनी - तथास्तु असे म्हटले. नंतर सपत्नीक अशा देवांची व भार्यासह ऋषिसमुदायाची अनुज्ञा घेऊन देवोत्तम श्रीनिवास आपल्या अनुचरासह वर्तमान उठला. वापली शेंडीचे केस मोकळे सोडून पूर्वाभिमुख असा बसला. ॥३२-३३॥
त्या स्त्रियांनी श्रीनिवासाला रत्नमय पीठावर बसविले. त्या सर्व स्त्रियामध्ये समुद्रकन्या कमलाक्षि महालक्ष्मी ॥३४॥
तेलाने भरलेले सोन्याचे भांडे आदराने घेऊन आशीर्वाद देत व श्रीनिवासाचे अभिनंदन करीत तेल लावू लागली. ॥३५॥
रमादेवी म्हणाली - हे गोविंदा, दीर्घायुषि, बहुपुत्रवान व धनाधिपति हो. चतुर्दश लोकांचा एकछत्राधिपती राजा हो, ॥३६॥
याप्रमाणे आशीर्वाद देत रमादेवी श्रीनिवासाला तैलाभिषेक (तेल लावू लागली) करू लागली. व सुगंधि अशा तेलाने श्रीनिवासाचे शरीर मर्दन करू लागली. ॥३७॥
नंतर ब्रह्मपत्नी सरस्वतीने केशर कस्तूरी मिश्रित तेलात हळदीचे चूर्ण कालवून श्रीनिवासाच्या शरीरास लावले. त्यावेळी मंगलमय वाद्यघोषांणी व सर्व साहित्यानिशी मोठमोठ्या घागरीतून सर्व बाजूंनी आणलेल्या नानाप्रकारच्या अनेक तीर्थातिल पवित्र जलाने, व रत्नाने मढविलेल्या सुवर्णाच्या कलशातील गरम पाण्याने युक्त, रमादेवी श्रीनिवासास अभिषेक करू लागली. ॥३८-४१॥
पायापासून मस्तकापर्यंतचे शरीर रमादेवीने मर्दन केले. याप्रमाणे केलेल्या श्रीनिवासाच्या सेवेन रमादेवी स्वतःस कृतार्थ समजू लागली. ॥४२॥
नंतर चार सुवासिनी स्त्रियांनी चारी बाजूचे चारी कलश आपल्या हातांनी उचलून त्यात असलेल्या कुंकुमोदकांनी श्रीनिवासास अभिषेक केला. ॥४३॥
नंतर देवस्त्रियांनी "पुत्रवत हो, धनवंत हो" असा आशिर्वाद देत पाण्याने अभिषेक केला. ॥४४॥
त्याप्रमाणे स्त्रियांनी निरनिराळी मंगलमय पद्ये गात कुंकुमाच्या जलाने ओवाळले. ॥४५॥
याप्रमाणे स्नानविधी आटोपल्यावर ब्रह्मपत्नी सरस्वतीने उत्तम प्रकारचे वस्त्र दिले असता त्या वस्त्राने श्रीनिवासाचे सर्वांग रमादेवीने पुसले. ॥४६॥
नंतर पार्वतीने धूप आणून महालक्ष्मीच्या हातात दिला असता महालक्ष्मीने केसास धूप दिल्यावर श्रीनिवासाचे केस (शेंडी) बांधले. सावित्रीने सुवर्णाचा आरसा दाखविला. ॥४८॥
रती व द्मची यांनी चन्द्राप्रमाणे शुभ्र वर्णाच्या चवर्यांनी वारे घातले. भक्तिने युक्त असणार्या भारतीने श्रीनिवासावर छत्र धरले. गंगादेवीचा पिता असणार्या श्रीनिवासाला पवित्र गंगानदीने दोन पादुका दिल्या. ॥४९॥
ज्या पायाच्या स्पर्शाने आपल्या पतीच्या शापामुळे पाषाण होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार केला. आपल्या चरणी शरण आलेल्या लोकांचा ताप हरण करणार्या श्रीनिवासाने आपल्या त्या उत्तम अशा पादुका आपल्या पायात धारण केल्या. ॥५०॥
श्रीनिवास पादुक (खडावा) घालून चालत आपल्या उत्तम आसनावर येऊन बसले. ॥५१॥
त्यावेळी ब्रह्मादि देवश्रेष्ठ, इंद्रादि लोकपाल, कश्यपादि मुनिश्रेष्ठ, वसिष्ठादि तपोधन ॥५२॥
सनकादि योगि श्रेष्ठ, भृगु आदि ऋषिश्रेष्ठ, अर्यमादि पितृगण, तुंबुरु आदि गायक, ॥५३॥
रंभादि नर्तकी, सूतमागधबंदी हे सर्वजण स्वामि पुष्करिणी तीरावर असलेल्या वारुळातील आसनावर बसलेल्या श्रीनिवासाकडे पाहू लागले. ॥५४॥
स्वामी पुष्करिणीच्या दक्षिण तीरावर असलेया आपल्या गुहेत आपल्या आसनावर बसल्यानंतर अष्टमीच्या चंद्रकोरेप्रमाणे असलेल्या, आरशाप्रमाणे स्वच्छ असलेल्या कपाळावर सज्जनांना आधार असणार्या श्रीनिवासाने ऊर्ध्वपुंड्र धारण केला. त्यावेळी ज्योतिषांनी मुहूर्तकाल दर्शविला. ॥५५-५६॥
हे राजा; त्यावेळी बकुलेने देवमाता भारतीस व महालक्ष्मीस "श्रीनिवासाच्या ललाट भागी कुंकवाचा मळवट भर असे सांगितले ॥५७॥
याप्रमाणे बकुलेने सांगितले असता श्रीनिवासाच्या ललाट भागी महालक्ष्मीने मळवट भरला. ॥५८॥
नंतर महालक्ष्मीने श्रीनिवासासाठी कुबेराजवळ अलंकार माग्न आणले. व ते अलंकार श्रीनिवासाला दाखविले असता भगवान म्हणाला, हे वरारो हे या अलंकारांनी भूषित कर. याप्रमाणे म्हटले असता हसत हसत रमादेवीने अलंकारांनी श्रीनिवासास भूषविले. ॥५९-६१॥
पीतांबर परिधान करून त्यावर अमूल्य असा कडदोरा बांधला. सुवर्णाचे अलंकार व वस्त्रे यांनी भूषित झालेल्या श्रीनिवासाने ब्रह्मरुद्रादिक त्यांस नमस्कार करीत असतानाहि विडंबनार्थ कश्यप, अत्रि, भरद्वाज वसिष्ठादिकांस नमस्कार केला. ॥६२-६३॥
नंतर संध्यावंदन करून व तात्कालीक कर्म आटोपल्यावर आनंदाने उचंबळणार्या मनाने श्रीनिवास वसिष्ठांना बोलावून म्हणाला, हे मुनिश्रेष्ठा, वसिष्ठा, पुढील कार्यास आरंभ करा. वासुदेवाचे बोलणे ऐकून पंडितामध्ये श्रेष्ठ असलेल्या वसिष्ठाने मोत्यांनी चौकोनी वेदिका तयार करवून श्रीनिवासास बसवून शास्त्रोक्त संकल्प करीत पुण्याहवाचनकर्म केले व ब्राह्मणवरण केले व ब्राह्मणवरण केल्यानंतर सृष्टिकर्त्या पितामह ब्रह्मदेवाने अष्टवर्गनामक विधि केला. ॥६४-६७॥
नंतर ब्रह्मदेवाने आज्ञा दिल्याप्रमाणे कुबेराने वेदवेत्या व मंगलाशीर्वाद देणार्या ब्राह्मणांना व ऋषींना दक्षिणा दिल्यानंतर श्रीनिवासास प्रिय असणार्या देवांनी श्रीनिवासास द्रव्य, वस्त्र हे अहेर म्हणून दिले. नंतर शास्त्रोक्त जे कर्म करावयाचे होते ते सर्व कर्म यथाविधि संपविले. ॥६८-६९॥
हे राजा, वसिष्ठांनी श्रीनिवासाला कुलदैवत कोणते? ते विचारले असता श्रीनिवास वसिष्ठास म्हणाला- हे वसिष्ठमुने माझि कुलदेवता शमी होय. माझी पांदवांची कुलदेवता शमीच होय यात संशय नाही. ॥७०-७१॥
ते ऐकुन वसिष्ठ म्हणाला- तो वृक्षामध्ये श्रेष्ठ असा शमीवृक्ष कोठे आहे? - असे वसिष्ठाने विचरले असता अगस्त्यरुषि म्हणाला- येथून उत्तर दिशेला कुमारतीर्थाजवळ शमीचे झाड आहे. ते ऐकल्यावर श्रीनिवासाने तेथे जाऊन त्या वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा केली. व कुलदैवत अशा शमी वृक्षास नमस्कार क्ला. ॥७२-७४॥
आपल्या कुलदैवताची श्रीनिवासाने प्रार्थना केली. हे शमी, माए पाप नष्ट कर, हे शत्रूचा नाश करणार्या हे शमी अर्जुनाचे धनुष्य धारण करणार्या रामाच्या भार्येचे दर्शन घडविणार्या शमीमाते, माझा विवाह निर्विघ्नपणे पार पाड. सर्व देवामध्ये व राजामध्ये कलह होऊ देऊ नकोस ॥७५-७६॥
हे राजा याप्रमाणे श्रीनिवासाने देवपूजित अशा शमी देवीची प्रार्थनापूर्वक यथाविधि पूजा करून एक लहानसा तोडलेला फाटा आपल्या डोक्यावर घेऊन वाद्याच्या घोषाने आकाश व्यापीत श्रीनिवास आपल्या जागी आला. ॥७७-७८॥
श्रीनिवास म्हणाला हे ब्रह्मन, कुलदेवतेची स्थापना कोठे बरे करावी? असा प्रश्न उपस्थित झाला असता नारदाजवळ येऊन श्रीनिवासाला म्हणाला वराहदेवाच्या घरामध्ये कुलदेवतेची स्थापना करा. ॥७९-८०॥
ज्या स्थानात आपले राहण्याचे स्थान आहे त्याठिकाणी आपण कुलदेवतेची स्थापना करून पूजा करावी अशा तर्हेचे विद्वानाचे मत आहे असे ब्रह्मदेवांनी सांगितले. ॥८१॥
नारदाचे म्हणणे ऐकून वसिष्ठासह श्रीनिवास वराहदेवाच्या घराकडे जाऊन वराहदेवास म्हणाले ॥८२॥
हे वराहदेवा, आपल्या अनुग्रहामुळे मी लग्न करून घेण्यास उद्युक्त झालो आहे तरी तू आपली भार्या धरादेवीसह आकाशराजाच्या नगरीस ये. ॥८३॥
तू सर्वलोकांचा गुरु आहेस म्हणून विवाहाला येऊन मला कृतकृत्य कर याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून वराहदेव म्हणाला. ॥८४॥
हे महाराजा, माझ्या ठिकाणी बकुलेस समज. हे सर्व क्षेत्र माझे असल्यामुळे मला तू सोडून जा. ॥८५॥
वराहाचे बोलणे ऐकून श्रीनिवास म्हणाला तुझ्या घरात कुलदेवतेची प्रतिस्थापना मी करणार आहे. ॥८६॥
याप्रमाणे प्रार्थना करणार्या श्रीनिवासाला "काही हरकत नाही तसेच कर" असे वराहरूपी श्रीहरी म्हणाला. ॥८७॥
मग सोन्याच्या कलशात मोती भरून त्यास वस्त्र गुंडाळले. नंतर त्या कलशाची यथाविधि पूजा करून वराहाच्या घरात, प्राकृत मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या घरातील कार्यप्रसंगी कुलदेवतेची स्थापना करतो त्याप्रमाणे कुलदेवतेची स्थापना केली व सज्जनांचा आश्रय असा श्रीनिवास परत आपल्या स्थानी आला. ॥८८-८९॥
आपल्या मनाशी "जेवणाखाण्याच्या भानगडीत न पडता (न जेवताच) आज आकाशराजाच्या नगरास नारायणपुरास जावे" असा विचार निश्चित करून जाण्याची गडबड करणारा श्रीनिवास ब्रह्मदेवास म्हणाला आताच निघण्यासाठी आपली चतुरंग सेना सिद्ध कर. ॥९०-९१॥
हे ब्रह्मदेवा, मार्ग दूरचा असल्याने नारायणपुरास लवकर जाणे इष्ट आहे. उगीच याठिकाणीच वेळ जाऊ नये. ॥९२॥
हे पुत्रा, म्हातारे, लहान मुले व स्त्रिया यांनी युक्त असलेले व मुनिदायासह असलेले आपले सैन्य अरण्यातून सावकाश जाऊ दे. ॥९३॥
याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून ब्रह्मदेव, आपल्या पित्याला- श्रीनिवासास उद्देशून लगेच म्हणाला. ॥९४॥
, पुण्याहवाचन व कुलदेवतेची स्थापना ही झाल्यानंतर उपवासी जाऊ नये असे मला वाटते. ॥९५॥
हे श्रीनिवासा, वृद्ध, लहान मुले वगैरे सर्वजण भुकेलेले आहेत. याप्रमाणे ब्रह्मदेव बोलत असता श्रीनिवास म्हणाला- ॥९६॥
हे पुत्रा सर्व जगाच्या पितामहा, तुझा सल्ला अतिशय मौल्यवान असतो. पण हे पुत्रा, मात्र कोणते कार्य करावे किंवा करू नये हे मात्र तू जाणत नाहीस. ॥९७॥
एखादे लहान मूल बोलते त्याप्रमाणे देशकालाचा विचार न करता तू बोलतोस. या पर्वतावरील अरण्यात मी दहा हजार वर्षे घालविली आहेत. ॥९८॥
माझ्याजवळ काहीहि संपत्ती नाही मी दरिद्री आहे. हे तू जाणत असूनहि असे बोलतोस तेव्हा कसे व्हावयाचे ॥९९॥
याप्रमाणे श्रीनिवास बोलत असता लोकपितामह ब्रह्मदेव भगवंताच्या पुढे गप्प बसला. ॥१००॥
तेव्हा आपल्या पितामह श्रीनिवासाला नीळकंठ (महादेव) म्हणाला- हे तात माधवा लहान अशा माझे बोलणे ऐक. विवाह करणे तसेच घर बांधणे या गोष्टीस प्रारंभ केल्यानंतर (अनेक अडचणी आल्या तरी) प्रयत्नांची शिकस्त करून जो पार पाडतो ॥१-२॥
हे राजा, तोच या नरलोकांत "पुरुषश्रेष्ठ" असा समजला जातो. शुभकार्यात पुष्कळ द्रव्य खर्च करूनहि सर्व साहित्य पुष्कळच संपादन करावे. जवळचे द्रव्य संपले तर ऋण काढावे. याप्रमाणे महादेवाचे भाषण ऐकून शंबरासुराच्या शत्रू प्रद्युम्न त्याचा पिता श्रीकृष्ण (श्रीनिवास) म्हणाला. ॥३-४॥
हे महादेवा, चार लोकांत पौरुषाच्या गोष्टी सांगण्यात विशेष असे काय आहे? या माझ्या विवाहासाठी पुष्कळसे कर्ज देणारा कोण बरे आहे? ॥५॥
पुरुषाने आपला पौरुषाने प्रयत्न करावा नुसते भाषण करू नये- याप्रमाने महादेवाशी बोलून श्रीनिवास कुबेराला म्हणाला- हे धनाधिपते, (कुबेरा) तुझ्याकडे किंचित काम असल्याने इकडे ये. याप्रमाने कुबेरास म्हटले असता ब्रह्मदेव व महादेव यासह कुबेर यांचेसह श्रीनिवास, स्वामितीर्थाच्या पश्चिमेस पिंपळाच्या झाडाकाली एकांतस्थळी जाऊन सज्जनांच्या आधार असा श्रीनिवास कुबेरास म्हणाला ॥६-७-८-९॥
श्रीनिवास म्हणाला- हे महाभागा, कलियुगात माझा विवाह पार पाड. त्यासाठी माझा पुत्र ब्रह्मदेव जितके सांगेल तितके द्रव्य हे नरवाहना (कुबेरा) मला कर्ज दे. ॥११०॥
याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून कुबेर म्हणाला- हे देवा, हे सर्व चराचरात्मक जगत तुझ्या अधीन आहे. ॥११॥
अनंत जीवराशीमध्ये मी कोण आहे? तुझ्याकडून मी, नेमला गेलो आहे म्हणून तुझ्या धनाचे रक्षण करीत आहे. हे गरुडध्वजा. ते द्रव्य देणे न देणे याविषयी मला अधिकार नाही. घेणारा व देणारा तूच स्वतंत्र आहेस. ॥१२-१३॥
याप्रमाणे कुबेर बोलत असता श्रीनिवास म्हणाला ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत माझे दहा अवतार होतात ॥१४॥
अवतार घेण्याचे वेळी मी वैकुंठातून द्रव्य आणीत नाही अथवा अवतार संपविताना मी भूतलावरील द्रव्य वैकुंठास नेत नाही. ॥१५॥
युगाप्रमाणे देशकालवयाप्रमाणे अवतार घेऊन रमादेवीसह मी येथे क्रीडा करतो. ॥१६॥
कुबेरा, हे द्रव्य देण्याविषयी नुसता निमित्तमात्र आहेस. तू आता देश, काल व युग याला अनुसरून मला द्रव्य दे याप्रमाणे श्रीनिवासाचे बोलणे ऐकून तो कुबेर म्हणाला- हे श्रीनिवासा, युगानुसार चालणार्या तुला मी कर्ज म्हणून कसे बरे देऊ? ॥१७-१८॥
ज्याप्रमाणे व्यवहारात दरिद्री मनुष्याला द्रव्य मिळावे म्हणून ऋणपत्र लिहून देतो त्याप्रमाणे तू जर मला ऋणपत्र लिहून देशील तर मी तुला द्रव्य देईन. ॥१९॥
हे राजा, लौकिक देह धारण करणारा श्रीनिवास, कुबेराचे भाषण ऐकून ब्रह्मदेवास म्हणाला ॥१२०॥
हे ब्रह्मदेवा, कुबेरापासून ऋण घेण्यासाठी मी ऋणपत्र कसे लिहावे ते मला सांग. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला- ऋणको श्रीनिवास, धनको कुबेर, कलियुगात स्वतःच्या लग्नाकरिता विलंबी संवत्सरातील वैशाख युद्ध सप्तमीच्या दिवशी रामाचा शिक्का असलेले चौदालक्ष निष्क (एक नाणे) कुबेराने श्रीनिवासाला व्याजासाठी दिले आहेत. ॥२१-२२-२३॥
श्रीनिवासाने व्याज देण्याचे मान्य करून सदर मूळ रक्कम स्वीकारली आहे. विवाह वर्षापासून एक हजार वर्षानंतर श्रीनिवासाने सदर द्रव्य व्याजासह कुबेरासह परत द्यावे. (या ऋणपत्रावर) ब्रह्मदेव एक साक्षीदार, महादेव, व तिसरा साक्षीदार हा अश्वत्थ वृक्ष होय. हे धनेश्वरा, आता याबाबत संशय नको. याप्रमाने हे ऋणपत्र श्रीनिवासाने स्वतः लिहिले आहे. ॥२४-२५-२६॥
याप्रमाणे ऋणपत्र स्वतः लिहून कुबेरास दिले व त्यात श्रीनिवास म्हणाला- ॥२७॥
हे कुबेरा, ऋणपत्रात लिहिल्याप्रमाणे आता द्रव्य दे. याप्रमाणे श्रीनिवासाने म्हटले असता हे राजा, श्रीनिवासास पत्रात लिहिल्याप्रमाणे सर्व द्रव्य दिले त्या द्रव्यराशी पाहून श्रीनिवासाने ते द्रव्य कुबेराच्या स्वाधीन केले. ॥२८-२९॥
नंतर श्रीनिवास सर्व साहित्य आणण्याविषयी म्हणाला- हे कुबेरा, या कार्यासाठी (भोजनासाठी) आवश्यक असलेले तांदूळ आणा. ॥१३०॥
उडीदाची, मुगाची डाळ आणा. गहू आणा- गूळ, तेल, मध, दूध, साखर, तूप, दही, ही आणा ॥३१॥
योग्य किंमतीत नेसावयाची व पांघरण्याची वस्त्रे आणा. तीळ, हिंग, मिरच्या, जिरे, मोहर्या, मेथ्या, आणा. ॥३२॥
ब्राह्मणस्त्रियांना देण्याकरिता वस्त्रे पिवळी करा. कांबळ्याहि विकत आण. असे श्रीनिवास म्हणाला. ॥३२-३३॥
देवाना उत्तरीय वस्त्र व देवस्त्रियांना रेशमी खण आण. तसेच सुपार्या, विड्याची पाने, वेलदोडे, लवंग, कापूर, कस्तूरी, तसेच वधूसाठी मंगळसूत्र व कनिष्ठांगुलीची अंगठी, हाताच्या बोटांत घालावयाची मुद्रिका हे कुबेरा, लवकर तयार कर. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून सर्व वस्तु एका क्षणात तयार केल्या. ॥३४-३५-३६॥
त्यावेळी कुबेर म्हणाला- हे श्रीनिवासा, तुमच्या कृपेने सर्व वस्तु सिद्ध केल्या आहेत. हे पुंडरीकाक्षा, यानंतर पाकसिद्धी करिता अग्नीची योजना कर. ॥३७॥
याप्रमाणे कुबेराने सांगितले असता सज्जनांचा आधार अशा श्रीनिवासाने अग्नीस बोलावण्याकरिता षण्मुखास पाठविले. ॥३८॥
षण्मुखाने धावत जाऊन अग्नीस श्रीनिवासाची आज्ञा सांगितली त्याबरोबर अग्नीहि सत्वर आला. ॥३९॥
मग त्वरित आलेल्या अग्नीस श्रीनिवास म्हणाला- स्वाहादेवीस बरोबर घेऊन एका क्षणात भक्ष्य भोज्यादि पदार्थ सिद्ध कर. ॥१४०॥
याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून श्रीनिवासास अग्नि म्हणाला- पाक सिद्धिकरिता हे हरे, मला एकहि भांडे नाही. ॥४१॥
हे भक्तवत्सला पाकसिद्धी हजारो लोकांसाठी करावयाची आहे. ते त्याचे भाषण ऐकून श्रीनिवास म्हणाला ॥४२॥
हे अग्ने तुमच्या घरी जर महोत्सव झाला तर सर्व भांडी वटबीजाप्रमाणे वाढतात. ॥४३॥
माझ्या विवाहाच्या वेळी मात्र एकहि भांडे तुम्हास मिळत नाही. सर्वांना सर्व विषयांत दैवच बलवत्तर असते. ॥४४॥
हे अग्ने आता तू पाकसिद्धीकरिता कोणती भांडी घ्यावयाची ती ऐक. स्वामिसरोवरामध्ये भात कर, ॥४५॥
पापविनाशी तीर्थामध्ये सार कर. आकाशगंगा तीर्थामध्ये हे अग्ने घरमान्त कर देवतीर्थामध्ये भाजी कर. तुंबुतीर्थामध्ये तूप ठेव. ॥४६॥
कुमारधारिकातीर्थामध्ये निराळे भक्ष्य पदार्थ कर. पांडुतीर्थामध्ये उत्तम असे चिंचेच्या रसांनी युक्त असे पदार्थ कर. ॥४७॥
कंदमूल-फलांच्या योगाने निरनिराळे पदार्थ निरनिराळ्या तीर्थात कर. याप्रमाणे लेह्यपेयादि पदार्थ वेगवेगळ्या तीर्थात कर. ॥४८॥
याप्रमाणे श्रीनिवासाने अग्नीस पाकसिद्धि करावयास सांगितली हे पाहून वेदपारंगत असे सर्व महर्षी श्रीनिवासाची प्रशंसा करू लागले. श्रीनिवासाच्या म्हणण्याप्रमाणे अग्नीने सर्व पदार्थ सिद्ध केले. ॥४९॥
याप्रमाणे वैकुंठात वास्तव्य करणार्या युगानुसारी श्रीनिवासाचे कर्म म्हणजे अद्भुत विडंबन होय. ॥१५०॥
देवता कार्य हे वाणी मन यांनी अगोचर असल्यामुळे अचिन्त्य आहे. अग्नी म्हणाला - दहीभात, चित्रान्न, गोड वडे, दोन भाज्या, चिंचेचा रस घालून केलेले पदार्थ, कोहळ्याच्या फोडी घालून केलेले सार कंदमूळ फळाच्या कोशिंबिरी, पक्वान्ने आदि पदार्थ हे केशवा, तुझ्या कृपाप्रसादाने सर्व काही तयार केले आहे. ॥५१-५२-५३॥
तरी आता ऋषि व देव ब्राह्मणांना बोलव. याप्रमाणे अग्नीचे हे बोलणे ऐकून निर्दोष अशा श्रीनिवासाने महादेव पुत्र षण्मुखास मुनींना वगैरे भोजनासाठी बोलावणे पाठविले. त्याने लगबगीने जाऊन जप करीत बसलेल्या, अग्निपरायण अशा वेदवेत्या ब्राह्मणांना, म्हटले की, हे देवद्विजहो, पाकसिद्धि झाली असल्याने भोजनास चला. ॥५४-५५-५६॥
याप्रमणे बोलावले गेलेले कश्यप अत्रि आदि ऋषि, देव पाकसिद्धी केली त्याठिकाणी आले. ॥५७॥
तारतम्यानुसार योग्य अशा निरनिराळ्या पंक्ती पात्र अपात्र कोण हे जाणण्यास कुशल असणार्या महादेवाने पांडुतीर्थापासून ते श्रीशैल्यपर्वतापर्यंत ब्राह्मण, देव यांच्या पंक्ति बसविल्या. त्या विवाहमहोत्सवात दाटिवाटीने सर्व देव आपआपल्या जागी बसले. ॥५८-५९-६०॥
हे राजा, त्यावेळी श्रीनिवास चतुर्मुख ब्रह्मदेवास म्हणाला- हे ब्रह्मदेवा, देवाला समर्पण न करता ब्राह्मणांस अन्न समर्पण करू नये. ॥६१॥
तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला- सर्वज्ञ, सर्वभोक्ता, सर्व लोकाधिपतीचा स्वामी म्हणून आम्ही सर्वजण तुला समजतो. तुझ्यासमान अथवा तुझ्यापेक्षा अधिक कोणीहि नाही. ॥६२॥
अशा स्थितीत हे कमलापते, आम्ही कोणास अन्न निवेदन करावे ते आम्हांस सांगा- याप्रमाणे ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून श्रीनिवास, आपला पुत्र ब्रह्मदेवास म्हणाला. ॥६३॥
हे ब्रह्मदेवा, अहोबल नृसिंहाची पूजा करून त्यास अन्न निवेदन करा. याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता ब्रह्मदेवाने त्याप्रमाणे श्रीनृसिंहास अन्न समर्पण केले. हे मुनीनाहि संमत झाले. त्यानंतर वैश्वदेव करून देवब्राह्मण यांचे पूजन यथाविधि ब्रह्मदेवाने केले. अक्षता, अर्घ्य, जल, गंध, धूप, दीप, अनुलेपन यांच्या योगाने नाममंत्राने नवग्रहांचे श्रीनिवासाने पूजन केले. आनंदपरिपूर्ण असा लौकिक देह धारण करणार्या श्रीनिवासाने सर्वास नमस्कार केला. ॥६४-६५-६६-६७॥
नंतर आठ दिक्पालांनी पात्रसंस्कारासाठी पानावर अगोदर तूप वाढून नंतर पाने वाढण्यास प्रारंभ केला. ॥६८॥
मिठापासून प्रारंभ करून तूप अखेर सर्व पदार्थ ब्रह्मवेत्त्यांच्या पानावर वाढले आहेत असे अग्नीच्या तोंडून ऐकल्यावर श्रीनिवासाने "एक परमात्मा, सकल प्राणि हे ज्याचे अवयव आहेत असा विराटरूप धारण करतो. निरनिराळे प्राणी अनंत आहेत. सर्व अनंतानंत प्राणिमात्राच्या अंतर्यामि राहून सर्व भक्षण करतो." याप्रमाणे म्हणून विश्वव्यापक अशा नृसिंहरूप श्रीकृष्णाला समर्पण केले. नंतर श्रीनिवासाने काश्यपादिऋषींना भोजनास प्रारंभ करा असे सुचविले. ॥६९-७०-७१॥
आपल्यासारख्या ज्ञानपूर्णांन अन्नाच्या योगाने काय तृप्तता येणार आहे? महाज्ञानी, दयावान अशा तुमचे तप हेच धन आहे. ॥७२॥
मी दरिद्री आहे हे आपण जाणताच व मी आपणास देत असलेले अन्न व जल हे जरी अत्यंत अल्प असले तरी कृपायुक्तमनाने फार असे समजून याचा स्वीकार करा. ॥७३॥
याप्रकारे सामान्य मनुष्याप्रमाणे श्रीनिवासाने ब्राह्मणांची प्रार्थना केली. भगवान् श्रीनिवासाचे बोलणे ऐकून सर्व ब्राह्मण म्हणाले, -॥७४॥
तुझ्या घरचे अन्न हे अमृताप्रमाणे मोक्षास साधन होय. पापाकुल अशा या कलियुगात (तू दिलेले अन्न ग्रहण करून) आम्ही धन्य व कृतार्थ झालो आहोत. ॥७५॥
याप्रमाणे अभिनंदन करून संतुष्ट झालेले ब्राह्मण भोजन करू लागले. भोजन झाल्यावर ब्राह्मणांच्या योग्यतेप्रमाणे भगवान श्रीनिवासाने तांबुल व दक्षिणा दिली. ब्राह्मण-भोजन झाल्यावर स्वतः श्रीनिवासाने; पुत्र, पौत्र, भार्या, बंधु, अग्नि, लोकपाल, गरुडशेष या सर्वांना बरोबर घेऊन भोजन केले. ॥७६-७७-७८॥
भोजन झाल्यावर दिनाधीश सूर्य रात्रिस्थानास प्राप्त झाला असता श्रीनिवासाने रमादेवीसह पर्यंकावर शयन केले. ॥७९॥
स्वतः निद्राविहीन असला तरि प्राकृत मनुष्याप्रमाणे क्रीडा केली. याप्रमाणे वैभव पाहणारे सर्व ऋषि व देव आश्चर्यचकित झाले. या सप्तमीची रात्र वेंकटाचलावर काढली. ब्रह्मादि सुरश्रेष्ठ, काश्यप, अत्रि आदि ऋषि ॥८०॥
तसेच, त्यावेळी बाकीच्या सर्वांनी ज्यांना ज्याठिकाणी जागा मिळेल, त्याठिकाणी (नवीन बांधलेल्या) जागांतून, झाडांच्या खाली, पर्वताच्या गुहातून, दर्यातून शयन केले. ॥८१॥
हे राजा, शुद्ध अशा प्रकारच्या प्रभात काली सज्जनांना आधार असणार्या श्रीनिवासाने ब्रह्मदेवाकडे निरोप पाठविला. ॥८२॥
गरुड वायुवेगाने अंथरुणावर बसलेल्या ब्रह्मदेवाकडे येऊन त्यांना म्हणाला, ॥८३॥
हे ब्रह्मदेवा, वस्त्रालंकाराने भूषित होऊन तू चंद्राप्रमाणे पांढर्या शुभ्र अशा हंसावर आरूढ हो व आपल्या वडिलाकडे नारायणपुरास जाण्यासाठी जा. ॥८४॥
नानाप्रकारची चित्रविचित्र व मोठी वाद्ये वाजवा. हत्तीवर डंका ठेवून वाजू दे. ॥८५॥
हे राजा जनका, आकाशराजाच्या नगरीस जाण्यासाठी वाहने बैलगाड्या, रथ, वगैरे अलंकृत करा. ॥८६॥
याप्रमाणे गरुडाचे भाषण (निरोप) ऐकून ब्रह्मदेवने देवगणांचे सैन्य निघण्यासाठी सिद्ध केले. ॥८७॥
हत्ती, घोडे, बैल याचे समुदाय सिद्ध झाले. त्यात पायी चालणार्या शूराचेहि समुदाय सिद्ध झाले. ॥८८॥
ज्यांनी आपल्या हातात शस्त्रास्त्रे घेतली आहेत व शस्त्रास्त्रविद्येत प्रवीण असलेले शूर ब्रह्मदेवाला पुढे करून नारायणपुरास निघाले. ॥८९॥
सर्व देवांचा स्वामी अशा ब्रह्मदेवाला पाहून श्रीनिवास म्हणाला- हे ब्रह्मदेवा, निघण्यासाठी तुम्ही सर्वजण उशीर का बरे करीत आहात? ॥१९०॥
आकाशराजाच्या नगरीकडे जाण्यासाठी सर्व सैन्याची योजना कर. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून ब्रह्मदेव म्हणाला- ॥९१॥
हे शत्रूचे दमन करणार्या श्रीनिवासा, शस्त्रास्त्रे घेऊन सर्व सैन्य निघण्यासाठि तयार झाले आहे. हे श्रीनिवासा, तू उठून गरुडावर आरूढ हो. ॥९२॥
याप्रमाणे ब्रह्मदेवाने म्हटले असता श्रीनिवास गरुडावर आरूढ झाले. ॥९३॥
श्रीनिवासाच्या पुढच्या बाजूला ब्रह्मदेव, उजव्या बाजूस महादेव, डाव्या बाजूस वायु, मागच्या बाजूस कुमार, श्रीनिवासाच्या मागे सुवर्णाच्या रथात रमादेवी होती. ॥९४॥
भक्तवत्सल श्रीनिवासाने आपल्या मातेला (बकुलेस) सूर्याप्रमाणे तेजस्वी विमानात बसविले होते. ॥९५॥
सज्जनांचा आधार असा श्रीनिवास स्वतः गरुडारूढ होऊन निघाला. त्यावेळी चंद्राप्रमाणे पांढरे शुभ्र असलेले छत्र शेषाने धारण केले होते. ॥९६॥
चंद्राप्रमाणे पांढरी शूभ्र चामरे घेऊन वायु हालवीत होता. रत्नाचा दंड असलेल्या पंख्याने पराक्रमी विष्वक्सेन वारा घालीत होता. भेरी, दुंदुभि यांच्या आवाजाने, निरनिराळ्या वाद्यांच्या घोषाने, नर्तक, हाहाहुहु गायक, यांच्यासह युक्त असणारा, सर्वान्तर्यामी, सर्वत्र व्याप्त असा, श्रीनिवास अशा ऐश्वर्याने संपन्न होऊन निघाला. ॥९७-९८-९९॥
श्रीनिवासाच्या गमनाच्या वेळी देव, ऋषि, दैत्य, गंधर्व, तपस्वी, पशू, मानव, स्त्रिया, वृद्ध, बालके, राक्षस या सर्वांचा एकच मोठा गोंधळ झाला. ॥२००-१॥
त्यावेळी स्त्रियांमध्ये, ऋषि, ऋषिकन्या, देवतास्त्रिया, देव यांच्यात परस्पर कलह होऊ लागला. ॥२॥
त्यामध्ये जे दरिद्री होते ते मार्ग चालत निघाले. एक स्त्री आपल्या पतीच्या आधाराने आपल्या मुलास कडेवर घेऊन, आपल्या डोक्यावर गाठोडे घेऊन चालतच जात होती. त्यावेळी रथात बसलेल्या देवस्त्रिया, रस्त्याने जाणार्या कृश अशा दरिद्री लोकांना रस्त्याने जात असता त्यांना अडथळा आणू लागल्या, त्यावेळी ती भारपीडित स्त्री, आपल्या पतीपासून चुकली. ॥३-४-५॥
त्यावेळी "हे नाथ, हे नाथ, मला अरण्यात टाकून जाऊ नकोस," असे ओरडत असता ती भारपीडित झालेली स्त्री रस्त्यातच पडली. ॥६॥
त्यावेळी काही मुले रडत होती. तर काही मुले आनंदित झाली होती, कित्येक मुले दूध मागत होती. तर कित्येक मुले अन्न मागत होती काही जण खीर तर काही जण दहीभात खात होती. ॥७॥
काही मुले रडत होती. तर काही हसत होती. काही मुले चालू लागली तर काही बडबड करीत होती. काही घसरून पडत होती तेव्हा काहीजण हसत त्यांना उचलीत होती. ॥८॥
हे राजेंद्रा, देवस्त्रिया, वैखानस स्त्रिया, ऋषींच्या स्त्रिया, गंधर्वस्त्रिया या सर्व श्रीनिवासाच्या भक्तीने पर्वत उतरू लागल्या. ॥९-१०॥
शेषाचलापासून प्रारंभ करून नारायणपुरापर्यंत रस्त्यावर तिळमात्रहि जागा नव्हती. श्रीनिवासाचा तो सर्व परिवार पद्मतीर्थास मध्ये घालून पुढे निघाला. ऋग, यजु साम व अथर्व या चार वेदांनी ज्याचे माहात्म्य गाईले जाते असा लक्ष्मीपति, जगतास कारण, सच्चिदानन्दस्वरूपी श्रीनिवास महान तीर्थ अशा पद्मतीर्थावर आला. ॥११-१२-१३॥
देव, दानव, गंधर्व, सिद्ध, साध्य, मरुदगण, इत्यादिकासह, गरुडावर आरूढ झालेला श्रीनिवास आलेला पाहून वेदव्यासपुत्र शुकाचार्य नमस्कार करून म्हणाला, - 'हे पुरुषोत्तमा, मी आजपर्यंत केलेले तप सफल झाले असे मी समजतो. ॥१४-१५॥
जो, ब्रह्मरुद्रादिकांना अगम्य असून केवळ वेदगोचर आहे असा तू मी आज माझ्या डोळ्यांनी, हे पुरुषोत्तमा, पाहात आहे. ॥१६॥
पुत्रमित्रासह अखिल विश्वाचा पालक असणार्या लक्ष्मी व शेष यासह असणार्या तुला ज्याअर्थी माझ्या भाग्यशाली अशा डोळ्यांनी मी पाहात आहे त्याअर्थी आजपर्यंत मी केलेली तुझ्या चरणांची पूजा सफल झाली असे मी समजतो. ॥१७॥
हे देवश्रेष्ठा, वासुदेवा, माझी प्रार्थना श्रवण कर. हे वेंकटशैलपते माझ्यावर कृपा करून माझ्या घरातील कंदमूल भक्षण करून प्रसन्न हो. ॥१८॥
याप्रमाणे शुकाने म्हटले असता श्रीनिवास म्हणाला, हे तापसश्रेष्ठा, सज्जनांना संमत असे माझे बोलणे ऐका. ॥१९॥
हे शुकमुने, तू कृश, वैराग्यसंपन्न ब्रह्मचर्यव्रत दृढपणे धारण केलेला असा आहेस. आम्ही सर्वजण संसारामध्ये आसक्त असून पुष्कळ आहोत. ॥२२०॥
व आजच त्या माहात्म्या राजाच्या नगरीस लवकर पोहोचले पाहिजे आणि आज तेथेच जाऊन भोजन करावे असे मी ठरविले आहे. ॥२१॥
याप्रमाणे श्रीनिवास बोलत असताना शुकाचार्य म्हणाला हे गोविंदा, मी दरिद्री असून तुहि दरिद्रीजनांना प्रिय आहेस. ॥२२॥
तू एकट्याने भोजन केलेस तर सर्व जगताचे भोजन होईल यात संशय नाही. याप्रमाणे शुकाचार्य म्हणत असता बकुला म्हणाली, हे श्रीनिवासा, मी काय सांगते ते ऐक. हे रमापते, तुझ्या लग्नासाठी शुकाचार्यांनी फार प्रयत्न केले आहेत. राजास पद्मावती तुला देण्याविषयि सल्ला दिला. ॥२३-२४॥
याप्रमाणे आपली माता बकुला हिचे भाषण ऐकून श्रीनिवास शुकमुनीस म्हणाला, तुझ्या या गोड भाषणानेच माझी तृप्ति झाली आहे.
अशा स्थितीत प्राकृत अशा व थोडा रस असलेल्या फलांच्या भक्षणाने जास्त तृप्ति ती काय होणार आहे? तरीहि मी तुझ्या म्हणण्यास मान देण्यासाठी मी भोजन करतो. ॥२५-२६॥
याप्रमाणे शुकाचार्यांचे समाधान करीत गरुडावरून खाली उतरून पुत्रादिपरिवारासह शुकाचार्यांच्या झोपडीत श्रीनिवासाने प्रवेश केला. ॥२७॥
मोळ नामक दर्भाचे बनविलेल्या सुंदर आसनावर श्रीनिवास बसले असता शुकाचार्याने पद्मतिर्थामध्ये स्नान करून अतिशय भक्तीने युक्त होऊन आपल्या मुष्टीच्या प्रहाराने उत्तम तांदूळ तयार करून त्याचा भात तयार केला. ॥२८-२९॥
व कोहळ्याच्या फोडी घालून आणि चिंचेच्या रसाने युक्त असे पदार्थ सिद्ध केले. मनुष्य ज्याच्या योगाने स्वांतर्यामि अशा परमात्म्याची पूजा करीत असतो त्याच साधनाने बाह्य मूर्तीची पूजा करणे श्रेयस्कर होय असे समजणार्या शुकाचार्यांचे श्रीनिवासाचे पादप्रक्षालन केले. ॥३०-३१॥
नंतर कमलाची पाने मांडून त्यावर तयार केलेल्या चिंचेच्या रसासह भात वाढला व साष्टांग नमस्कार करीत म्हणाला, ॥३२॥
हे सदैव मनोरथ पूर्ण असणार्या गोविंदा, भोजन कर. याप्रमाणे ऋषीमध्ये श्रेष्ठ अशा शुकाने श्रीनिवासाची प्रार्थना केली असता त्याच्या भक्तीच्या स्वाधीन होऊन ऋषींना उचित अशा प्रकारचे पदार्थ सर्व भोक्त्या श्रीनिवासाने भक्षण केले. ॥३३-३४॥
श्रीनिवासाच्या आज्ञेने बकुलेसह लक्ष्मीनेहि शुकाचार्याने वाढलेले अमृतप्रमाने मधुर असे अन्न भक्षण केले. ॥३५॥
याप्रमाणे श्रीनिवास भोजन करीत असता रागावलेले ऋषि शुकाचार्यांना भिववीत आपल्या आसनावरून उठले. ॥३६॥
शाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ असलेले ते तपोधन ऋषि रागावलेले पाहून त्यांचे मन जाणणारा श्रीनिवास बाहेर आला. ॥३७॥
सर्वांच्या तृप्तिकरिता एक मोठी ढेकर श्रीनिवासाने दिली. सर्वांची तृप्ति व्हावी याकरिता श्रीनिवासाच्या मुखरूपी कमलातून निघालेल्या तृप्ततेच्या ढेकरीने कामधेनूच्या योगाने जशी तृप्ति होते त्याप्रमाणे सर्व ऋषि तृप्त होऊन स्तोत्ररूपी भाषणाने शुकाचार्यांना ऋषींनी संतुष्ट केले. ॥३८-३९॥
याप्रमाणे वैशाख शुद्ध अष्टमीच्या दिवशी शुकाचार्यांच्या आश्रमात वास्तव्य करून गुरुवारी नवमीच्या दिवशी प्रभातकाळी श्रीनिवास गरुडावर पुनः आरूढ होऊन चतुरंग सेनेचे अध्यक्ष अशा पितामह ब्रह्मदेवाला पुढे करून जगदीश्वर श्रीनिवास नारायणपुराकडे निघाले. ॥२४०-४१॥
इकडे आकाशराजाने सुगंधि तेलाने पद्मावतीस मंगल स्नान करवून स्वतः अष्टवर्ग केले. नंतर उत्तम अशा अलंकारांनी भूषित केले. मग सूर्य अस्तास जाण्याच्या वेळी आपल्या मुलीच्या विवाहकार्यात रत असलेल्या आकाशराजाने आपल्या मुलीला हत्तीवर बसव्न आपल्या पुत्र, पुरोहित, इंद्र, तोंडमानराजा यांच्यासह धर्मप्रवण आकाशराजा आपल्या राजवाड्यातून निघाला. ॥४२-४३-४४-४५॥
जगताला कारणीभूत अशा रमापति श्रीनिवासाला पाहण्यासाठी, हत्ती, घोडे, रथ व पायदळ अशा चतुरंग दलासह ध्वज, पताका, चवर्या, अबदागिर्या यांच्यासह भेरी, दुंदुभि इत्यादि वाद्यांच्या मोठ्या आवाजाने युक्त असणारा नट, नर्तक, सूत, मागध, बंदी इत्यादिकांकडून स्तुति केला जाणारा असा तो राजा सैन्याच्या मध्यभागी शोभू लागला. ॥४६-४७-४८॥
ज्याप्रमाणे आकाशात नक्षत्रसमूहामध्ये चंद्र शोभावा त्याप्रमाणे सैन्याच्या मध्यभागी शोभणारा आकाशराजा, इंद्राने दाखविलेल्या, गरुडावर आरूढ झालेल्या, श्वेत छत्रादिकांनी युक्त, सुकुमार, तरुण, सुंदर, तेजस्वी मुख असलेल्या, जगतास कारण, सच्चिदानंदात्मक देह असणार्या श्रीनिवासाला पाहून संतुष्ट मनाने आपल्या रथातून उतरला. ॥४९-२५०-५१॥
आपली कन्या पद्मावती हिला पुढे करून पुरोहितासह आकाशराजा (स्वतःशीच) म्हणाला. ॥५२॥
मी आज धन्य झालो आहे. कृतकृत्य झालो आहे व स्वर्गमार्गास प्राप्त झालो आहे. याप्रमाणे राजा म्हणत असतानाच सज्जनांचा आधार असा श्रीनिवास नारदाने दाखविलेल्या राजश्रेष्ठ आकाशराजास पाहू लागला. ॥५३-५४॥
नारद म्हणाला, लांब दाढी असलेला, दीर्घ बाहू असलेला, दीर्घ दृष्टि असलेला आकाशराजा, हे गोविंदा तोच तुझा श्वशुर होय. त्यास पाहा. (आकाशराजास पाहून श्रीनिवास म्हणाला- हे नारदा, आकाशराजा हा माझा सासरा झाल्याने माझा जन्म धन्य झाला आहे. ॥५५॥
मी पूर्वी कोणते पुण्यकारक कर्म केले असावे की ज्याच्या योगाने आकाशराजाची आमचे नाते झाले. याप्रमाणे श्रीनिवास बोलत असता सत्यपराक्रमी आकाशराजाने द्वारतोरणाजवळ येऊन श्रीनिवासास पाहिले व वस्त्रे, अलंकार इत्यादिकांच्या योगाने श्रीनिवासाचे पूजन केले. ॥५६-५७॥
सुवासिक गंध, अत्तर हे देऊन श्रीनिवासाचा आकाशराजाने सत्कार केला. आणि त्याच वेळी पद्मावतीने परमपवित्र अशा श्रीनिवासाला पाहिले. ॥५८॥
विशालनेत्र असणारी पद्मावती श्रीनिवासाला पाहून अतिशय लज्जित झाली. हे राजा, त्याचवेळी श्रीनिवासानेहि कमलनेत्र अशा पद्मावतीस पाहिले. ॥५९॥
नंतर पद्मावती व श्रीनिवास हे आप आपल्या वाहनातून खाली उतरून एकमेकाकडे पाहात तेथे उभे राहिले. ॥२६०॥
नगराच्या वेशीत असलेल्या दुर्गादेवीच्या देवळात येऊन भक्तिपूर्वक श्रीनिवासाचे जे भक्त होते त्यांनी परस्परांस आलिंगन दिले. ॥६१॥
पद्मावती व तिच्या पाठोपाठ येत मायावी श्रीनिवासाने देवीला नमस्कार करून "ही माझी भार्या होऊ दे" असा वर मागितला. ॥६२॥
विशाल नेत्र असणार्या पद्मावतीने "जगत्व्यापी अशा रमानाथ श्रीनिवासालाच माझा पति कर" असा वर मागितला. ॥६३॥
याप्रमाणे दुर्गादेवीस स्तवनपूर्वक नमस्कार करून पद्मावती ऐरावत हत्तीवर आरूढ झाली व भक्तवत्सल श्रीनिवास गरुडावर आरूढ झाल्यावर उभयतांची मिरवणूक निघाली. ॥६४॥
त्यावेळी तेलाचे हजारो दिवे होते. फुले, लाह्या, अक्षता हे उधळले जात होते. ॥६५॥
सूत, मागध यांच्यासह बंदीजन स्तुति करीत होते. वेदघोषपुरस्सर आशीर्वाद देणार्यांसह ब्रह्मादि देवश्रेष्ठ, शुकाचार्यादि ब्राह्मण यांचेसह असणार्या श्रीनिवासास पाहणार्या नगरातील स्त्री-पुरुषांनीयुक्त वीणा वेणु, मृदंग, पणव, जानक, दुंदुभि इत्यादि वाद्ये वाजविणार्या लोकांसह, दुसर्या वारस्त्रियांसह, गाननिपुण असे गंधर्व, सूत, अमात्यगण यांचेसह श्रीनिवासभक्त व धार्मिक असा आकाशराजा, पद्मावतीसह नारायणपुरात हलके हलके जात असलेल्या श्रीनिवासास पाहू लागला. ॥६६-६७-६८-६९-२७०॥
त्यावेळी केळीचे खुंट, ऊस, सुपारीची झाडे यांनी अलंकृत, आंब्याच्या कोवळ्या पानांची तोरणे व पूर्णकुंभ यांनी युक्त, इंद्रनील रत्नांप्रमाणे तेजस्वी अशा वज्र, वैदूर्य, इत्यादि रत्नांनी मढविलेल्या मोत्यांच्या झालरींनी युक्त, मरकतमण्याची तोरणे यांनी युक्त, ज्यात केशराचे जल भरले आहे असे सुवर्णकलश घेतलेल्या स्त्रियांकडून चार रस्त्यांवर श्रीनिवास व पद्मावतीस ओवाळले जात असतानाच तीन विभाग ओलांडून सर्वजण श्रीनिवासास उतरण्यासाठी तयार केलेल्या राजवाड्यात आले. ॥७१-७२-७३-७४॥
नंतर रमादेवीसह श्रीनिवासाला उत्तम अशा प्रकारच्या वरमंदिरात उतरविले. त्याचप्रमाणे श्रीनिवासाबरोबर असलेल्या सर्व आप्तबांधवांना, सैन्यास, ऋषिश्रेष्ठांना त्यांच्यासाठी तयार ठेवलेल्या राजवाड्यातून उतरविले. ॥७५॥
यावेळी पाच घटिका रात्र झाली होती. हे जनकराजा, आकाशराजा आपल्या राजवाड्याकडे आला. आणि त्याचवेळी राजाचा आवडता बंधु तोंडमान त्या ठिकाणी आला. त्यावेळी भुकेजलेला श्रीनिवास तोंडमानास म्हणाला. ॥७६-७७॥
या विवाहासाठी आमच्याबरोबर आलेले सर्वजण अतिशय भुकेजलेले आहेत. मी, माझी माता, माझा मुलगा, सर्व देव, माझी पतिव्रता पत्नी, भुकेने त्रस्त झालो आहोत. तरी त्यांचेकरिता नानाप्रकारचे भक्ष्यभोज्यादि पदार्थ तयार कर. ॥७८-७९॥
तसेच ऊर्ध्वरेतस अशा ऋषी करिता अग्नीकडून विशेषतः सत्वर पाकसिद्धि कर व ॥२८०॥
हे राजश्रेष्ठा, माझ्यासाठिहि पक्वान्न पाठवावे. याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून तोंडमान म्हणाला, ॥८१॥
हे जगदीशा, हे मुकुंदमूर्ते, हे माझे शरीर, हे आमचे राज्य हे सर्व तुझेच आहे. सामान्यजनांप्रमाणे लोकगतीस प्राप्त झालेला तू मला मोह उत्पन्न करीत आहेस. ॥८२॥
याप्रमाणे बोलून तोंडमान आपल्या राजवाड्यात गेला व त्याने एका क्षणात अग्नीकडून पाकसिद्धि करविली. ॥८३॥
वेदवेत्या ऋषींना, देव व देवस्त्रिया, भोजनाची इच्छा करणार्या ब्राह्मणांना अन्नसंतर्पण केले. ॥८४॥
त्या सर्वांनी भक्ष्यभोज्यादिकांनी युक्त असणारे अन्न भक्षण केले. तोंडमानाने आदरपूर्वक श्रीनिवासासाठी भक्ष्यभोज्यादि पदार्थ पाठविले. ॥८५॥
नाना तर्हेचे अन्न, गोड पदार्थ, उडदाच्या डाळीचे पदार्थ तयार करवून राजाने स्वतः येउन श्रीनिवासास भोजन घातले. ॥८६॥
पुरुषोत्तम श्रीनिवासाने लक्ष्मी, ब्रह्मदेव, बकुला, गरुडशेष रुद्र यांचेसह भोजन केले. ॥८७॥
जावई श्रीनिवासाला नानाप्रकारची वस्त्रे दिली व नंतर श्रीनिवासाच्या अनुमतीने आकाशराजा, परत आपल्या राजवाड्याकडे आला. ॥८८॥
आकाशराजा निघून गेल्यानंतर निर्दोष असूनहि श्रीनिवास सुखमय शय्येवर निद्रा करू लागला. ॥८९॥
याप्रमाणे गुरुवारची ती रात्र गेल्यानंतर, दशमी दिवशीचा प्रभातकाल प्राप्त झाला. ॥२९०॥
दशमी दिवशी प्रातःकाली उठून मंगलस्नान केलेला वेंकटाचलाधिपति श्रीनिवास वसिष्ठास म्हणाला ॥९१॥
आज मी लक्ष्मी, ब्रह्मदेव, बकुला, पुरोहित, राजा, राजपत्नी, कन्या, पुरोहित व भाऊ पांचजणांनी भोजन करावयाचे नसते. आम्ही पाचजण भोजन रहित असणार ॥९२॥
आकाशराजाच्या घरीहि राजा, राजपत्नी, कन्या, पुरोहित व भाऊ पाचजणांनी भोजन करावयाचे नसते. ॥९३॥
याप्रमाणे श्रीनिवास पुरोहित वसिष्ठाशी बोलून सज्जनांचा आधार असा श्रीनिवास कुबेरास म्हणाला, ॥९४॥
हे यक्षगणाच्या स्वामिन, ब्राह्मणांच्या भोजनासाठी राजाकडे जा. - याप्रमाणे श्रीनिवासाचे म्हणणे ऐकून कुबेराने श्रीनिवासाचा निरोप राजास सांगितला. कुबेर राजास म्हणाला, ऋषिश्रेष्ठांचे भोजन अगोदर दुपारीच व्हावे. कारण रात्री तेरा नाडिकेचा विवाहमुहूर्त असल्यामुळे त्यावेळी ब्राह्मणभोजन होणे अशक्य आहे. ॥९५-९६-९७॥
याप्रमाणे सांगून कुबेर परत आला. श्रीनिवासाच्या निरोपाप्रमाणे राजाने ब्रह्मवेत्त्या ऋषींना भोजन घातले. ॥९८॥
ब्राह्मणांना तांदूल व एकेक निष्क दक्षिणा राजाने दिली. याप्रमाणे श्रीनिवासाच्या विवाह-दिवसाची दुपार गेली. ॥९९॥
शुक्रवार दशमी दिवशी सायंकाळी आकाशराजाने आपले चतुरंग दल सिद्ध केले. ॥३००॥
आपला मुलगा, आपला बंधू तोंडमान, पुरोहित, विष्वक्सेन, इतर आपले आप्त-इष्टमित्र-बांधव यांचेसह आकाशराजा; चार दातांचा, मोठा आवाज असलेल्या, रत्नाच्या झुलीने शोभिवंत दिसणार्या, मेघाप्रमाणे आवाज असलेल्या, बांधलेल्या घंटांनी युक्त अशा, कानावर चामरे बांधलेल्या मोठ्या ऐरावत नामक हत्तीसह इंद्राला पुढे करून श्रीनिवासास बोलावण्याकरिता श्रीनिवासाच्या वसतिस्थानास- राजवाड्यात आला. श्रीनिवासासाठी तयार केलेल्या प्रासादास दहा हजार खांब होते. ॥१-२-३-४॥
ह्या राजवाड्यात विश्वकर्म्याने श्रीनिवासास आवडणार्या रत्नांनी मढविलेली सभा तयार केली होती. त्या सभेमध्ये आपआपल्या आसनावर ब्रह्मादिदेव बसले होते. ॥५॥
हे मिथिलेश्वरा, विश्वामित्र, भरद्वाज, वसिष्ठ, गौतम, भृगु, अत्रि, पुलस्त्य, वाल्मीकि, वैस्वानस, दुर्वास, मार्कंडेय, गालव, दधीचि, च्यवन, सनकसनंदन असे अत्यंत श्रेष्ठ, कोणतेहि किल्मिष नसलेले, जटारूपी मुकुटांनी शोभणारे, तेजस्वी अशा कृष्णाजिनरूपी वस्त्र धारण करणारे ऋषि कश्यपाला पुढे करून सभेच्या मध्यभागी बसले होते. या सर्वांच्या समुदायामध्ये एका रत्नांनी युक्त अशा जाजमावर श्रीनिवास बसला होता. ॥६-७-८-९॥
श्रीनिवासासमोरच ब्रह्मदेव नम्रतेने तेथे बसला होता. त्या सभेच्या दारात सत्यपराक्रमी राजा, दारात आल्यावर पुरोहितास पुढे करून श्रीनिवासाजवळ आला. तेव्हा राजा, आलेला पाहून श्रीनिवास उठून उभा राहिला. ॥३१०-११॥
व राजा आलिंगन देत श्रीनिवास म्हणाला- हे राजश्रेष्ठा. तू अतिशय श्रेष्ठ व वृद्ध आहेस. ॥१२॥
हे राजश्रेष्ठा, तू माझ्या मुक्कामी का बरे आलास? मला बोलावण्यासाठी वसुधानास पाठवावयाचे होते. ॥१३॥
याप्रमाणे श्रीनिवास बोलत असताना आकाशराजा आपल्या पुरोहितास म्हणाला- उगीच उशीर का करता? श्रीनिवासाची पूजा करा. ॥१४॥
राजाचे बोलणे ऐकून वसिष्ठ राजभार्या धरणीस म्हणाला- अरुंधती सांगेल त्याप्रमाणे श्रीनिवासाची पूजा कर. ॥१५॥
हे जनकराजा, जिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आहेत अशी आकाशराजाची पत्नी धरणी गडबडीने उठून श्रीनिवासाचे मुख पाहून स्वतःला कृतार्थ समजत अत्यंत आनंदाने व लाजत तिने सच्चिदानंद स्वरूपी श्रीनिवासाची पूजा केली. ॥१६-१७॥
राजास प्रिय असणार्या धरणीस श्रीनिवासाची पूजा करत असलेली पाहून अतिशय आश्चर्यचकित झालेल्या त्या ठिकाणी (धरणीबरोबर आलेल्या) असणार्या स्त्रिया अति आनंदाने धरणीस म्हणाल्या. ॥१८॥
हे धरे, पूर्वजन्मांत तू कोणते पुण्य केले होतेस बरे? कारण ज्या पुण्यप्रभावाने तुला ब्रह्मदेवाने श्रीनिवासाच्या पूजनासाठी उत्पन्न केले आहे. ॥१९॥
याप्रमाणे जी तू साक्षात् नारायणाची पूजा करीत आहेस- याप्रमाणे सर्व स्त्रिया धरणीदेवीचे अभिनंदन करीत असता धरणीने सुवासिक अत्तर व सुगंधि गंध लावून देवश्रेष्ठ श्रीनिवासाचे पूजन केले. ॥३२०-२१॥
त्याप्रमाणे श्रीनिवासास नाना प्रकारची वस्त्रे, रत्ने व मोती यांचे अलंकार, हे दिले. नंतर पुरोहिताच्या सांगण्यावरून राजाने पुराणपुरुषोत्तम अशा जावई श्रीनिवासास हत्तीवर बसविले. त्यावेळी श्रीनिवास, ब्रह्मदेव, महादेव, गरुड, शेष, कुबेर, अग्नि, वायु, वरुण, यम, मरुद्गण हे व यांच्या स्त्रियांसह, स्त्रीपुत्रासह वसिष्ठादि मुनि या सर्वांना बरोबर घेऊन वेंकटाचलाधिपति श्रीनिवास रत्नानी संपन्न अशा अनेक प्रकारच्या अलंकारांनी मंडित अशा हजारो लोकांनी व्याप्त, हजारो दिवे चमकणार्या, अशा राजभवनास नानाप्रकारच्या वाद्यांचा घोष होत असता जावयासह राजा राजभवनाजवळ आला असता दारातच चतुरंग दल सोडून राजा अंर्तगृहात जाण्यास उद्युक्त झाला. ॥२२-२३-२४-२५-२६-२७॥
त्यावेळी तोंडमानाची पत्नी श्रीनिवासांना ओवाळण्याकरिता कुंकुमोदकांनी युक्त असे ताम्हण घेऊन आली. तिने वासुदेवांचा ओवाळून सत्कार केला व सभाभवनाच्या दारातच पशू मारविले. नंतर श्रीनिवासांचा राजाने प्रवेश करविला. ॥२८-२९॥
अनेक चौक ओलांडून राजासह श्रीनिवास अंतर्भवनात प्रवेश करून राजाने तयार केलेल्या रत्नासनावर कमलनेत्र श्रीनिवास शोभू लागला. (बसला). ॥३३०॥
याप्रमाणे चार खांब असलेल्या, रत्नांनी मढविलेल्या बोहल्यावर श्रीनिवास बसले असता आजूबाजूस निष्पाप असे मुनि बसले. ॥३१॥
ब्रह्मदेवाला पुढे करून सर्वजण आनंदाने तो डोळ्यांना आनंद देणारा समारंभ पाहात स्वस्थपणे आपआपल्या आसनावर बसले. ॥३२॥
त्यानंतर राजाने मंगल स्नान केले. धरणीनेहि सुगंधी तेल लावून मंगलस्नान केले. ॥३३॥
तसेच राजभार्येने स्वतःस अलंकारांनी भूषविले. नंतर सुवर्णकलशामध्ये स्वामी पुष्करिणीचे पाणी, ब्राह्मणाकडून आणविले. व श्रद्धापूर्वक शास्त्राप्रमाणे कन्यादानाचा संकल्प केला. त्यानंतर पुरोहिताने कन्यादानांगभूत मधुपर्क केला. पुरोहिताने मंत्र म्हटल्याप्रमाणे श्रीनिवासाचे पादप्रक्षालन आकाशराजाने केले. ॥३४-३५-३६॥
'सहस्त्रशीर्षा' हे मंत्र म्हणत असता स्वामिपुष्करणी तीर्थातील पाणी धरणीदेवी पवित्र श्रीनिवासाच्या चरणावर घालीत असता ते श्रीनिवासाचे पादोदक आकाशराजाने आपल्या मस्तकावर प्रोक्षण करून घेतले. आपल्या भार्या, पुत्र, बंधु, आपले भवन, आपले कोषागार, हत्तीशाला, रथशाला, वस्त्रागार, इत्यादिकांवर श्रीनिवासभक्त असणार्या राजाने ते पादोदक प्रोक्षण केले. ॥३७-३८-३९॥
त्यावेळी राजा म्हणाला, आज माझा जन्म सफल झाला. जीविताचे सार्थक झाले. श्रीनिवासाच्या चरण प्रक्षालनाच्या जलाने माझे पितृगण तृप्त झाले. ॥३४०॥
नंतर राजाने नाना प्रकारच्या तर्हेतर्हेच्या अलंकाराने कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या आपल्या कन्येस अलंकृत केले. ॥४१॥
नंतर ज्योतिषाने लग्नाची इष्ट घटिका भरली असा घोष करीत "सुमुहूर्त सावधान" असे म्हणून मंगलाष्टके म्हटली. ॥४२॥
नंतर कन्यादानाच्या वेळी आकाशराजाने एक कोटि निष्क दक्षिणा म्हणून वेंकटेशास दिले. ॥४३॥
त्या धनराशी पाहून आकाशराजास श्रीनिवास म्हणाला, हे भूपते पुत्रासमान असणार्या मला तुझ्याकडून किती बरे दिले जावे? विवाहकार्यात तू निपुण असून शिवाय दानपरायण आहेस, तर आता तू मला नानाप्रकारच्या रत्नांनी युक्त असे अलंकार दे. ॥४४-४५॥
याप्रमाणे श्रीनिवासाने म्हटल्याबरोबर आकाशराजाने श्रीनिवासास नानाप्रकारचे अलंकारहि दिले. शंभर भाराचा किरीट, तितक्या वजनाचा कमरपट्टा, दिला. ॥४६॥
दिव्य अशी बाहुभूषणे व नूपुरे दिली. याच्या अर्ध्या वजनाच्या पादुका दिल्या. अमूल्य अशी सात पदके राजाने दिली. ॥४७॥
मोत्याची माळ, दोन दंडावर बांधावयाचे अलंकार, खांद्यापर्यंत लोंबणारी मोत्यांनी युक्त अशी दोन कर्णभूषणे दिली. ॥४८॥
रत्ने, माणके, वज्र, वैडूर्य इत्यादिकांनी मढविलेली अमूल्य कंकणे (कडी) बत्तीस भाराची राजाने दिली. ॥४९॥
दोन नागभूषणे, बाहुपुरक अलंकार व दाही बोटात घालण्यासाठी वीरमुद्रिका श्रीनिवासास दिल्या. ॥३५०॥
एकशे अकरा भाराचे उत्तम व नानातर्हेच्या रत्नांनी मढविलेले सुवर्णाचे कटिसूत्र दिले. ॥५१॥
तशाच खडावा श्रीनिवासास दिल्या. साठ भाराचे भोजनपात्र दिले. ॥५२॥
पाणी पिण्याच्या फुलपात्रासह मोठे पात्र (तांब्या) दिले. त्या राजाने चौसष्ट कांबळ्या दिल्या. ॥५३॥
हे सर्व अलंकार श्रीनिवासाने धारण केल्यावर राजाने कन्यादान केले. त्यावेळी कन्येचे प्रवर, पुरोहित बृहस्पति आचार्यांनी म्हटले. ॥५४॥
बृहस्पति म्हणाला, अत्रिगोत्रात जन्मलेली सुवीराची प्रपौत्री, सुधर्माची पौत्री व आकाशराजाची कमलाप्रमाणे मनोहर नेत्र असणारी कन्या; हिचा हे श्रीनिवासा, अंगीकार कर. याप्रमाणे श्रीनिवास व पद्मावती यांच्यामधे रत्नाचा अंतःपट धारण बृहस्पति आचार्याने म्हटल्यानंतर वसिष्ठ म्हणाला- ययातीचा प्रपौत्र, अमित तेजस्वी अशा शूरसेनेचा पौत्र, राजा वसुदेवाचा पुत्र, वसिष्ठ गोत्रात उत्पन्न झालेला वेंकटेश; अत्रिगोत्रात उत्पन्न झालेल्या अशा तुझ्या सालंकृत अशा कन्येचा, हे राजश्रेष्ठा, आम्ही स्वीकार करतो. याप्रमाणे कन्येच्या व वराच्या प्रवरादिकांचा उच्चार करीत असतानाच कन्यादानासाठी उत्सुक असलेल्या आकाशराजाने आपली पत्नी धरणीसह आनंदाने परस्पर अशा श्रीनिवासास म्हटले ॥५५-३६०॥
आकाशराजा म्हणाला- हे पुरुषोत्तमा, "ही कन्या तुला देत आहे हिचा स्वीकार कर" असे म्हणून स्वामितीर्थाचे मंत्राने पवित्र झालेले धरणीने दिलेले जल, आकाश राजाने श्रीनिवासाच्या उजव्या हातावर द्रव्यासह सोडले. पद्मावतीस श्रीनिवासाच्या उजव्या हातात सोपविले. ॥६१-६२॥
याप्रमाणे सर्व विधि यथाशास्त्र राजाच्या हस्ते पुरोहिताने करविले. त्यानंतर गंध, वस्त्र, अनुलेपन इत्यादिकांनी जगन्नाथाची राजाने पूजा केली. ॥६३॥
मग बृहस्पती आचार्याने श्रीनिवासाच्या मनगटावर व पद्मावतीच्या मनगटावर कंकण बांधले. ॥६४॥
तसेच विवाहाचे मंगलसूत्र पुरोहिताने, श्रीनिवासाच्या करवी पद्मावतीच्या गळ्यात बांधविले. ॥६५॥
त्यावेळी सुवासिनी स्त्रियांनी आशीर्वादपूर्वक म्हट्ले- हे कल्याणी तू सावित्रीप्रमाणे बहु पुत्रवती हो, सर्व लोकांची मंगलदायक माता हो. ॥६६॥
याप्रमाणे सुवासिनी स्त्रिया मंगलमय आशीर्वाद देत असता ब्राह्मणांचा व महात्म्या आकाशराजाचा हस्तस्पर्श झाला असता "हे सुभगे, जगताच्या जीवनाला कारण असणारे हे मंगलदायक सूत्र मी तुझ्या कंठात बांधतो. माझ्यासह चिरकाल रहा." अशा अर्थाचा मंत्र पुरोहित म्हणत असता श्रीनिवासाने ते मंगलसूत्र पद्मावतीच्या कंठात बांधले. ॥६७-६८॥
मग अनेक विद्वान अशा मुनीसह पुरोहित वसिष्ठांनी पद्मावतीच्या ओंजळीत असलेल्या लाह्यांनी यजुःशाखेच्या क्रमाने यथाशास्त्र अग्नीमध्ये हवन करविले. याप्रमाणे वसिष्ठांनी वैवाहिक विधि संपविला. ॥६९-३७०॥
नंतर पुरोहिताने स्वस्तिवाचन पूर्वक नवरत्नाच्या मंत्राक्षता मुनींच्या ओंजळीत दिल्या. ॥७१॥
त्या वेदवेत्या ऋषींनी त्या मंत्राक्षता आशीर्वादात्मक वेदमंत्र पठन करीत जगदीश अशा श्रीनिवासाच्या (पद्मावतीच्या) मस्तकावर टाकल्या. त्यावेळी आकाशराजाच्या नगरीत राहणार्या लोकांना महोत्सव वाटला. ॥७२॥
त्यावेळी आकाशराजाने ब्रह्मवेत्त्या ब्राह्मणांना आपल्या ब्राह्मणाकरवी तांबूलसहित दक्षणा दिली. ॥७३॥
कोट्यावधि गाई, हजारो घोडे, वस्त्रांचे ढीग समर्थ अशा राजाने ब्राह्मणास दिले. ॥७४॥
याप्रमाणे दशमीच्या दिवशी हे सर्व उत्सवाचे कार्यक्रम झाल्यावर वधूवरांना बसवून त्यांना भोजन दिले. ॥७५॥
सूप, रस, भक्ष्य आदि पदार्थासह नानाप्रकारचे भात, दूध, तूप, साखर यांनी युक्त अशी खीर, वगैरे पदार्थांचे; पुरोहित, बकुला, महालक्ष्मी, ब्रह्मदेव यांचेसह श्रीनिवासाने भोजन केले. ॥७६-७७॥
धर्मपरायण आकाशराजाने श्रीनिवासाच्या सानिध्यात, लक्ष्मी व बकुला यांचेसह धरणीने पतिपुत्रासह स्वादिष्ट असे भोजन केले, त्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाली सुवासिनी स्त्रियांनी सुगंधी तेल लावून श्रीनिवासास स्नान घातले. व तसेच परस्परांचे पूजन केले व आलिंगन उभयपक्षांनी केले. ॥७८-७९-३८०॥
श्रीनिवास व पद्मावती या उभयतांनीहि हसत भाग घेतला. राजाने ब्राह्मणासह देवांना पुष्कळ प्रकाराने भोजन दिले. ॥८१॥
आनंदित झालेल्या आकाशराजाने बहुमान पुरस्सर स्त्रीपुरुषांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन दिले. ॥८२॥
भोजनात नानाप्रकारचे अपूप, नाना प्रकारचे सूप, भाज्या वगैरे करविल्या होत्या. तूप, दुध, दही हे तर कालव्याप्रमाणे वाहात होते. ॥८३॥
भोजन केलेल्या लोकांची उच्छिष्ट पाने पुष्कळशा अन्नासह बाहेर फेकली असता कुत्र्यादि पशूचे समुदाय, राक्षसगण, हे त्यावर तुटून पडत. अशा तर्हेने चार दिवस ही गडबड चालू होती. ॥८४-८५॥
याप्रमाणे चार दिवस हास्य विनोद चालू होता. पाचव्या दिवशी बलिप्रदान व चार कलश त्यावर दिवे प्रज्ज्वलित केले होते. चांगल्या सिंहासनावर वधूवरांना बसवून आकाशराजाने श्रीनिवासाचे पूजन केले. धार्मिक असा आकाशराजाने आपल्या हातात दुधाचे भांडे घेऊन श्रीनिवासाची माता बकुळा हिचे यथाविधि वस्त्रे, अलंकार यांच्या योगाने पूजन केले. ॥८६-८७-८८-८९॥
नंतर हातात असलेल्या भांड्यातील दुधाने बकुलेच्या नाभीवर मार्जन करून ब्राह्मणभक्त राजश्रेष्ठ आकाशराजाने मोठ्या दुःखाने आपली कन्या पद्मावती हिला अर्पण केली. ॥३९०॥
त्यानंतर महालक्ष्मीच्या नाभीस तुपासहित दुधाचे मार्जन केल्यावर हुंदके देत आपल्या कन्येसे अर्पण केले. ॥९१॥
शेषाचलनिवासी श्रीनिवासाच्या हातात महाभाग्यवती राजपत्नी धरणीने दीनपणे स्फुंदत स्फुंदत आपल्या कन्येचा हात दिला व श्रीनिवासाच्या नाभीमूलावर दुधाने अतिदुःखित होऊन मार्जन केले. ॥९२-९३॥
नंतर दुःखाने रडणार्या व डोळ्यात अश्रु दाटल्याने अस्पष्ट असे जिला दिसत आहे. अशा धरणीने ब्राह्मणानी म्हटलेल्या मंत्राने आपली कन्या पद्मावती हिला श्रीनिवासास समर्पण केली. ॥९४॥
रडत रडत श्रीनिवासाला राजभार्या धरणी म्हणाली- नऊ महिने उदरात धारण करून लालनपालन केलेली व आनंद देणारी कन्या, हे जगन्नाथा मी तुझ्या स्वाधीन करीत आहे याप्रमाणे म्हणून धरणीने आपली कन्या पद्मावती हिला श्रीनिवासाच्या स्वाधीन केली. ॥९५-९६॥
धरणी रडू लागलेली पाहून राजाहि अतिशय दुःखी होऊन आपल्या कन्येस पोटाशी धरून रडू लागला. ॥९७॥
राजा म्हणतो- हे मुली, मी दुर्दैवी आहे, कारण केवळ तुझ्या वियोगाने माझे जीवन स्थिर राहणार नाही. ॥९८॥
हे राजकन्ये, क्रीडागृहात अथवा भोजनशालेत (तू नसताना) तुझा भाऊ कसा खेळेल? किंवा भोजन तरी कसा करील? ॥९९॥
याप्रमाणे आकाशराजा दुःख करीत असलेला पाहून त्याचा बंधु तोंडमानहि दुःखाने म्हणाला. ॥४००॥
आम्ही दरिद्री, भाग्यहीन, कृपण, दीन असून तुझ्या वियोगाने आम्ही मृत झालो आहोत यात संशय नाही. ॥१॥
अशा तर्हेची आनंद देणारी कन्या कलियुगात प्राप्त होणार नाही असे निश्चयाने आम्ही म्हणतो, तिच्या वियोगाने आम्ही अतिशय दुःखी झालो आहोत. ॥२॥
याप्रमाणे आपल्या मातापित्यांना व चुलत्यास दुःख करीत असलेले पाहून आपल्या रडत असलेल्या बहिणीला आलिंगन देत व रडत (पद्मावतीचा भाऊ) वसुधान म्हणाला- हे ताई, ज्याप्रमाणे द्रव्य मिळविणारा (द्रव्यासाठी) आई, बालक; पिता यांना सोडून देतो त्याप्रमाणे तू कोठे बरे चाललील? ॥३-४॥
या प्रसंगाने त्याठिकाणी असणार्या देवांना, कश्यपादि ऋषींना अतिशय दुःख झाले. ॥५॥
राजा वगैरे सर्व लोक रडत असलेले पाहून श्रीनिवासहि आपली बहीण अर्जुनपत्नी सुभद्रा हिचे स्मरण झाल्याने रडू लागले हे एक आश्चर्यच होय. याप्रमाणे लोकरीति दाखवीत श्रीनिवास ऐरावत हत्तीजवळ आला. ॥६-७॥
त्या हत्तीवर पद्मावतीसह श्रीनिवास बसल्यावर नानाप्रकारची वाद्ये वाजत असता गावास प्रदक्षिणा करून लक्ष्मीसह श्रीनिवास ब्रह्मदेवमहादेवादिकासह आपण उतरलेल्या राजवाड्यात आले. नंतर श्रीनिवास आपल्या स्थानी (वेंकटाचलावर) जाण्याची इच्छा करू लागला. गरुडस्कंधावर स्वतः व पद्मावति आरूढ होऊन स्वस्थानी जाण्यास उत्सुक झालेला श्रीनिवास आपल्या सासूसासर्यांचा निरोप घेण्यासाठी पुनः आकाशराजाच्या राजवाड्यात आला. ॥८-९-१०-११॥
सासुसासर्यांना नमस्कार करून त्याने आपल्या स्थानी परत जाण्याबद्दल अनुज्ञा विचारली. ॥१२॥
तेव्हा आकाशराजाने आपल्या पत्नीसह श्रीनिवासास मंगलमय असे आशीर्वाद दिले. ॥१३॥
आकाशराजा म्हणाला- सर्व लोकात श्रेष्ठ अशा श्रीनिवासा, दीर्घायुषी हो-याप्रमाणे उभयतांनी श्रीनिवासास आशीर्वाद दिल्यावर धरणी श्रीनिवासास म्हणाली- ॥१४॥
हे श्रीनिवासा, नव परिणीत वधूसह एक महिन्याने स्वस्थानी जा. असे तुझ्या श्वशुराचे म्हणणे आहे त्यास तू मान दे. ॥१५॥
याप्रमाणे धरणीचे बोलणे ऐकून आकाशराजास श्रीनिवास म्हणाला- हे राजा, मी काय म्हणतो ते ऐका. कार्याची फार गडबड आहे. ॥१६॥
याकरिता हे राजन कृपा करून मला अता जाण्याची परवानगी द्या. - याप्रमाणे म्हणून श्रीनिवास गरुडावर आरूढ झाला. ॥१७॥
व सर्व देवासह श्रीनिवास निघाला त्यावेळी सर्व नगरवासी जन अतिशय व्याकुल झाले. ॥१८॥
आणि आपल्या सज्जात गच्चीवर उभे राहून श्रीनिवासास आपल्या डोळ्यांनी पाहात परस्परांस नगरवासी लोक म्हणू लागले- राजकुलोत्पन्न, कमलनेत्र अशी पद्मावती धन्य झाली. ॥१९॥
श्रीनिवासाच्या मागोमाग ती जात आहे पहा- असे सर्व लोक बोलू लागले. श्रीनिवास परत आपल्या गावी जाण्यास निघाले असता अनेक वस्तू आंदण म्हणून दिल्या. ॥४२०॥
आकाशराजाने शंभर खारी साळीचा तांदूळ बैलगाड्यातून पाठवून दिला. ॥२१॥
तीस खारी मूग बैलावर लादून पाठविला. तसेच गुळाच्या अनेक ढेपा, चिंचेची पोती, हजार घागरी दूध, शंभर भांडी भरून दही, पाचशे तुपाचे बुधले, मोहर्या, मेथ्या, हिंग, मीठ, तेलाचे डबे, दोनशे घागरी भरून साखर, आंब्याच्या काचर्या, आमसूल, मोठाले केळीचे घड, कोहळा, आळूगड्डी; सुरण, मिरच्या, आवळे, दोनशे भांडी मध, केळीची पाने, लाकडे आदि पदार्थ राजाने पद्मावतीस दिले. ॥२२-२३-२४॥
दहा हजार घोडे, एक हजार हत्ती, पाच हजार गाई, शंभर कालवडी, दोनशे दासी, तीनशे पुरुष नौकर, नानाप्रकारची वस्त्रे, रत्नांनी मढविलेल्या उशा व पांघरण्याची वस्त्रे इत्यादि अनेक वस्तू देऊन श्रीनिवासावर प्रीति करणारा राजा, आपल्या मुलासह श्रीनिवासास पोहोचविण्यासाठी आला. ॥२५-२६-२७-२८-२९॥
आकाश राजा आलेला पाहून उठून उभा राहात श्रीनिवास म्हणाला- ॥४३०॥
हे महाराजा, लांबपर्यंत का बरे आलास? हे नृपश्रेष्ठा, तुझा मुलगाच असलेल्या मला आणखीन काय द्यावयाचे राहिले आहे? ॥३१॥
तू कन्या दिलीस आणि तू सुखी झालास. तुझ्याकडून कोणते सुकृत घडले असावे? मलाहि अतिशय आनंद झाला आहे यात संशय नाही. ॥३२॥
आता तुझ्या मनात जे असेल ते मला स्पष्ट सांग. हे महीपते, देण्याघेण्याविषयी संदेह बाळगू नकोस. ॥३३॥
श्रीनिवासाचे भाषण ऐकून राजा म्हणाला. हे केशवा, तुझ्या अनुग्रहाने आमचे सर्व रीतीने मंगल झाले आहे. ॥३४॥
हे जगन्नाथा, सर्व कुटुंबासह मला तुझे ठिकाणी निश्चल अशी भक्ति दे. मला दुसरे काही नको. ॥३५॥
याप्रमाणे आपला सासरा आकाशराजा त्याचे भाषण ऐकून आकाशराजास त्यावेळी सायुज्यमुक्ति दिली. ॥३६॥
आपला मेहुणा वसुधान याला आपल्या अंगावरील वस्त्र श्रीनिवासाने दिले. जावयाने अनुज्ञा दिल्यावर राजा आपल्या मुलीकडे येऊन म्हणाला, ॥३७॥
हे मुली, मी परत आपल्या नगराकडे जातो. श्रीनिवासासह तू सुखाने संसार कर. श्रीनिवासाने शयन केल्यावर मग तू झोपत जा. ॥३८॥
याप्रमाणे कमलाप्रमाणे मनोहर नेत्र असलेल्या पद्मावतीस राजाने उपदेश केला असता आपल्या वडिलांच्या म्हण्याप्रमाणे ती शीघ्र श्रीनिवासाबरोबर निघाली. ॥३९॥
राजाहि हुंदके देत आपल्या राजवाड्यात परत आला. पद्मावतीसह व ब्रह्मरुद्रादिकांसह सुवर्णमुखरीनदीतीरावर आल्यानंतर श्रीनिवास त्याच ठिकाणी राहिले. हे जनकराजा, सहा महिनेपर्यंत पर्वतावर चढणार नाही अशी प्रतिज्ञा केल्याने अगस्त्याश्रमामध्ये श्रीनिवासाने वास्तव्य केले. ॥४४०-४१-४२॥
त्यानंतर श्रीनिवासाने सर्व देवांची आपआपल्या स्थानी रवानगी केली. ॥४३॥
ब्रह्मादिदेव, ऊर्ध्वरेतस असे मुनी या सर्वांना भक्तवत्सल श्रीनिवासाने यथायोग्य अशी वस्त्रे दिली. ॥४४॥
जगताचे धारण करणार्या श्रीनिवासाने आज्ञा दिली असता सर्व देव आपआपल्या स्थानी निघून गेले.
ऋषीहि नारायणाच्या आज्ञेने अरण्यात गेले. महालक्ष्मीहि तेव्हा कोल्हापुरास गेली. ॥४५-४६॥
त्याविवाह महोत्सवातील आनंदाचा उपभोग घेऊन ब्रह्मरुद्रादि देव, सर्व महानुभाव ऋषिश्रेष्ठ आकाशराजाची प्रशंसा करीत सर्वजण आप आपल्या स्थानी गेले. ॥४७॥
सर्व देव गेल्यानंतर श्रीनिवास अगस्त्याश्रमास आला. ॥४८॥
श्रीनिवास, असामान्य असे सुख भोगीत तेथे राहू लागला. शतानंदमुनि म्हणतात, हे जनकराजा, या श्रीनिवासाच्या विवाहाचे माहात्म्य जे श्रवण करतील. ॥४९॥
त्यांचा भाग्योदय किती होतो हे मी सविस्तर सांगतो ते श्रवण कर. एक कोति कन्यादान केले असता किंवा समुद्रवलयांकित पृथ्वीचे दान दिले असता जे फल प्राप्त होते तेच फल आदरपूर्वक विवाहाध्याय श्रवण केले असता प्राप्त होईल. जे वेंकटेशाचा विवाहमहोत्सव साजरा करतील. ॥४५०-५१॥
त्यांना अतिशय मोठा आनंद प्राप्त होईल. याप्रमाणे श्रीनिवासाच्या विवाहमहोत्सवाची हकीकत तुला सांगितली आहे. ॥५२॥
जे म्हणून हा विवाहाध्याय श्रवण करतील, लोकांना ऐकवतील त्यांना सर्व अभीष्ट फल प्राप्त होईल. ॥५३॥
याप्रमाणे भविष्योत्तरपुराणांतील वेंकटेशमाहात्म्याचा बारावा अध्याय समाप्त.