भक्तीचिंये पोटीं बोध-कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ॥ध्रु०॥
ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ॥१॥
काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥२॥
राई रखुमाबाई उभ्या दोन्हीं दो बाहीं ।
मयूरपिच्छें चामरें ढाळिती ठाईंच्या ठायीं ॥३॥
विटेसहित पाय म्हणुनी भावें ओवाळूं ।
कोटी रविशशी दिव्य उगवले हेळू ॥४॥
तुका म्हणे दीप धेडनीं उन्मनींत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥