मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
दावा हो कोणी दावा , मम ...

प्र.के.अत्रे - दावा हो कोणी दावा , मम ...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


दावा हो कोणी दावा,

मम बावाची ती आवा! ॥ध्रु०॥

दिशा धुंडिल्या जरी चारी

उपलब्ध न ती सन्नारी!

कुत्र अहो, मी तुज पाहू?

कुठल्या वक्त्री तिज बाहू?

शिल्पकार भाषेचा मी!

बिंदुस्त्रावी कवि नामी!

मदिय भारती

सुसंस्कृता अति,

सुश्लिष्टा किति?

एवंगुण मी- मग दावा,

मम बावाची ती आवा!

भलती सलती मज आवा

शांतं पापं! नच दावा!

सद्वाचकहो, सत्कवि मी

सद्भावच मम सत्कवनी!

सत्सुंदर मम सद्भाषा

सन्मानसि मम सद्‌आशा !

संदगि माझ्या सत्कोट,

सप्तगडीचा वर थाट!

दुर्दम्या परि

इच्छा अंतरि

मंदा वैखरि

पडे; म्हणुनि हा करि धावा,

'मम बावाची ती आवा!'

वाटोळ्याहुनि अम्हि गोल,

नर्मदीय जडजंबाल!

द्वेषाग्नीचा मनि वणवा

गाली देखावा हसवा!

कन्नडकूपि जसे पाणी

स्फूर्ति तशी माझ्या कवनी

'अनुस्यूत' अन् 'व्युत्पन्ना'

शब्दांचा उडविन फन्ना!

वापरुनी दावू सर्वा?

मग दावा ती मज आवा!

होळि, पाडवा; संक्रांती,

मम काव्याला विषय किती!

देवांच्या तेतिस कोटी!

लिहू तरी 'वंदने' किती?

का ओकुनि 'भावोद्गार'

करु रसिका गारेगार?

नाट्यांची आंबट सारे

कढविन-मज येते सारे!

आर्तिपंचके

स्वनितक-षट्‍के

रचू गीतके?

का दावू मम 'भिल्ल-युवा'?

मग दावा ती मज आव!

वक्ता मी टेंपरवारी

प्राध्यापकता मिरवि तरी!!!

हीच रहस्योद्‌ग्राहकता!

हीच हीच मम सुनम्रता!

ओतुनि धाराप्रवाह का

टाकू भिजवुनिया लोका !

अर्थहीन 'प्रस्वात' तसे

खरडू का हुकुमासरसे?

शिळ्या रांजणी

'पसाय' पाणी

बसलो भरुनी

ओतिन ना तर! मग दावा

मग बावाची ती आवा!

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP