का सुंदरि, धरिसि आज असा अबोला?
मी काय सांग तव गे, अपराध केला?
का कोपर्यात बससी सखये, रुसून
माझ्याकडे न मुळि पाहसि गे हसुन?
का गाल आज दिसती अगदी मलुल,
की माझियाच पडली नयनास भूल!
तोंडावरी टवटवी लवलेश नाही,
ओठावरी दिसत लालपणा न काही!
का केश हे विखुरले सखये, कपाळी,
केलि न काय अजि वेणीफणी सकाळी?
भाळी न कुंकु विलसे, नथणी न नाकी,
हातातही न मुळि वाजति गोठवाकी!
कोठे तुझा वद असे शिणगारसाज,
का नेससी मलिन हे पटकूर आज?
ठेवुनिया हनुवटी गुडघ्यावरी ही
का एकटीच बसलीस विषण्ण बाई?
व्हावा तुला जरि असेल पदार्थ काही,
घे नाव-तो मग कुठे असु दे कसाही,
द्रोणगिरीसह जसा हनुमन्त येई,
बाजार आणिन इथे उचलून तेवी!
की आणसी उसनवार सदा म्हणून
शेजारणी तुजवरी पडल्या तुटून;
वाटून घेइ परि खंति मना न काही,
शेजारधर्म मुळि त्या लवलेश नाही !
भाडे थके म्हणुनि मालक देइ काय
गे आज 'नोटिस'? परी न तया उपाय !
घेऊन काय बसलीस भिकार खोली,
बांधीन सातमजली तुजला हवेली!
वाटेल ते करिन मी सखये, त्वदर्थ,
संतोषवीन तुज सर्व करून शर्थ!
टाकी परी झडकरी रुसवा निगोड!
दे सुंदरी मजसि एकच गोड-गोड
गेलो पुढे हसत जो पसरून हात,
तो ओरडून उठली रमणी क्षणात-
"व्हा-दूर चावटपणा भलताच काय?
स्पर्शू नका' कडकडे शिरि वीज हाय!!