प्रभु सद्गुरुसी करुनी प्रणाम । करी मानसा, शुद्धता शांतिधाम ॥
मग ज्ञानदेव-स्तवा । मी प्रवृत्त । नमो ज्ञानिया तूं महा श्रेष्ठ संत ॥१॥
श्री पैठणासन्निध दिव्य भूला । आपेगांविं, साधूचि जन्मासि आला ॥
सुपुत्र, मातेसि संतोष व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२॥
संन्याशि यासीच सुपुत्र झाला । म्हणूनि वाळींत द्विजांनीं ठेला ॥
परी योग्यता पाहतां मान द्यावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥३॥
रेडयामुखीं वेदचि बोलवीला । द्विजसंघ सगळाहि संतुष्ट झाला ॥
म्हणूनि देवासम हा स्तवावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥४॥
भावंड चारी, समवेत बैसे । भिंतीवरी ओपचि घेत भासे ॥
भेटे अशा कालिंच चांगदेवा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥५॥
चांगाची व्याघ्रावरुनी, किं आला । सर्पासि आसूड करिं घेववीला ॥
जडभिंति चालेचि, होई सजीवा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥६॥
निवृत्ति ज्ञानदेव, सोपानकाका । मुक्ताई, चत्वारि भावंड, ऐका ॥
अवतारि पुरुषांसम, मानिं देवा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥७॥
इंद्राहुनी वैभविं फार थोर । इंद्रायणी दिव्य सरित्-सुतीर ॥
तटीं तियेचे चिरवास ठेवा । नमोदेव-देवा, तुम्हां ज्ञानदेवा ॥८॥
आषाढ कार्तीक या दोन मासीं । पाहा कृष्ण पक्षींच एकादशीसी ।
विठू पंढरीचा अकस्मात् यावा । नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा ॥९॥
समाधीसि वंदी प्रभू पंढरीचा । असा भक्त प्रेमाहि अन्यत्र कैचा ॥
वर्णूं कसा मी अतुल प्रभावा । नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा ॥१०॥
जयाचे सभा-मंडपीं, घोषवीणा । अखंड ध्वनी ईश-नामासि जाणा ।
असा छंद आळंदि भक्तस्वभावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥११॥
ज्ञानेश्वरी ही कृति थोर ज्याची । ’अमृतानुभव’ ही रचना तशीची ॥
ग्रंथ द्वयीं त्या प्रगटीं सुभावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१२॥
अजाना-तरुचेंचि ऐश्वर्य फार । अशा कल्पवृक्षासि थारा समोर ॥
सिद्धेश्वरा संमुख वास व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१३॥
महाद्वारिं सौवर्ण अश्वत्थ डोले । "सेवा, सुपुत्रासि देईंच" बोले ॥
अशा वैभवा योग्य, तो पूर्ण व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१४॥
समाधी नव्हे, पाहिं साक्षात् सुदेव । दिसे त्यांसि ऐसा जयांचें सुदैव ॥
समर्पीं तयाला उपचार सर्व । नमो संतवर्या तुम्हां ज्ञानदेवा ॥१५॥
ज्ञानेश विष्णूचि साक्षात् पहावा । आळंदि वैकुंठ कीं, भाव ठेवा ॥
श्रीपंढरी तुल्य महिमाची गावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१६॥
महोदार तूं घातलीसे गवांदी । भक्तां सुभक्तांचि मोक्षाचि, आदि ॥
तिथें वैष्णवांची मिनलीच मांदी । नमो ज्ञानराया अनंता अनादि ॥१७॥
सिद्धेश्वराचें स्वयंभूचि स्थान । म्हणूनी तदाज्ञाचि देवां प्रमाण ।
"वसा येथ, सांभाळित ज्ञान देवा" । परब्रह्म सांगे, नमो त्यां सुदेवां ॥१८॥
शंकर प्रभू तो निवृत्तीच झाला । भगवान् विष्णूचि, ज्ञानेश बनला ।
सोपान ब्रह्माचि, मुक्ताई माया । अशा सगुण ब्रह्मा, नमो, शीरपायां. ॥१९॥
"चांग देव पासष्टि" चांग्यासि सांगे । इतरां सुभक्तां "हरिपाठ" जागे ॥
अभंगावली योग ज्ञानासी ठेवा । नमो संतवर्या, नमो ज्ञानदेवा ॥२०॥
आळंदि क्षेत्रीं प्रतिव्यक्ति देव । उपतिष्ठती जेथ देवाधिदेव ॥
सदा, वा,सुपर्वींच भेटीसीं जावें । नमो ज्ञानराया, नमो भक्तिभावें ॥२१॥
ज्ञानेश्वरांनीं सहनाम देवा । तीर्थाटणें केलिं सुभक्ति भावा ॥
’द्वारका प्रभासादि’ अनेक क्षेत्रें । पाहून केलींच पवित्र गात्रें ॥२२॥
बिकानेर प्रांतीं ’कोलादगी’ त्या । ग्रामीं जला काढिति, आत्मशक्त्या ॥
नामाकरी विठ्ठल प्रेमधावा । ज्ञानेश दावी किं, योगप्रप्रभावा ॥२३॥
दोघेही ज्ञानचि सुभक्त होते । परंतु ज्ञानेशयोगीहि ज्ञाते ॥
भक्तद्वयांचा अशिर्वाद व्हावा । नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२४॥
"बाप रखुमादेवीवरु विठ्ठलू" हा । अभंगासी ’पालूपदा’ तुम्हि पाहा ॥
नमी शंकरा पार्वती दोन्ही देवां । प्रकृती पुरुषात्मकां आदिदेवा ॥२५॥
ही खूण ज्यांच्या अभंगासि व्हावी । अशा ज्ञानदेवां प्रणती करावी ॥
प्रार्थीं किं "दे भक्ति, मुक्तीच देवा ।" नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२६॥
’ज्ञानेश नाम् देव’ काशीसि जाती । विश्वेश्वरीं, त्यांसि सामोरे येती ॥
प्रेमें धरीला कर, विश्वनाथें । हें प्रेम वर्णूं किती म्यां अनाथें ॥२७॥
नामदेव गुरु संत विसोबा । खेचरुं जरि वालि विठोबा ।
ज्ञानदेवचि दाखवि हा गुरु । ज्ञानिया नमिंच, मोक्षदसद्गुरु ॥२८॥
काशीचि यात्रा करुनी निघाले । खानदेशिं तापी तिरिं सर्व आले ।
वाळुवंटिं नाचूनि भजनीं सुरंगीं । पंढरपुरा, मागुति येति मार्गीं ॥२९॥
निवृत्ति, ज्ञानेश, सोपान, नामा । विसोबाचि, परिसा निष्काम प्रेमा ॥
पंढरीं, सुक्षेत्रीं आनंद केला । नमो त्याच ज्ञानेश्वरा सद्गुरुला ॥३०॥
निवत्तिनाथांसि गुरु ज्यांनिं केला । वडील बंधूचि बहुवंद्य झाला ॥
अद्भूत प्रेमें बहुपूज्य भावा । दावी तया, मी नमिं, ज्ञानदेवा ॥३१॥
श्रीआदिनाथें कीं, मच्छिंद्रनाथा । मच्छिंद्र्नाथेंचि गोरक्षनाथा ॥
गोरक्षनाथें गहिनीचनाथा, गहिनीहिनाथें निवृत्तिनाथा ॥३२॥
एकैक सोडूनि परंपरेनें । महेश विष्णूची अवतार सगुणें ॥
परस्परांसी उपदेश केला । परब्रह्म तत्त्वासिच बोधीयेला ॥३३॥
म्हणुनी निवृत्ती गुरु शंभू झाला । ज्ञानेश विष्णूसि सद्बोध केला ।
ऐशी गुरुशिष्य जोडीच कोठें । नमो ज्ञानदेवा, तव भाग्य मोठें ॥३४॥
अशा गौरवाचें रमणीय स्तोत्र । जयाचेंही गाई बहुपुण्य वक्त्र ॥
तो साधुसंतामधिं हो पवित्र । द्या केशवा या बहु ’दिव्यमंत्र’ ॥३५॥