अनंत फंदी परिचय

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.


हे मूळ संगमनेरचे राहणारे असून कवित्वगुणानें ते पुण्यास नांवाजले होते. शेवटील बाजीरावाचे वेळीं ते होते. ह्यांचा जन्म शके सोळाशें सहासष्‍ट साली होऊन, शके सत्राशें एकेचाळिसांत हे कैलासवासी झाले. मरण काळीं यांचें वय पाऊणशें वर्षाचें होतें. फंदीचें उपनांव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण. ह्यांचे वडिलांचें नांव माहित नाहीं, आईचें नांव राऊबाई. यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. यांच्या कुटुंबाचें नांव म्हाळसाबाई. पुढें त्यांनीं लावण्या बर्‍याच केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर यांनीं तमाशा आरंभिला. यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले' असा नवनीताचे नव्या आवृत्तींत लेख आहे. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाईंत गेले. कीर्तन करण्याविषयींचा अनंतफंदीचा काय लौकिक झाला ? तो काय कारणानें झाला ? आणि तो कोठपर्यंत टिकेल ? हें आतां निरुपण करुं. या कवीविषयीं होनाजीबाळाची कविता आहे. ती दाखल करतों.

फंदी अनंद कवनाचा सागर । अजिंक ज्याचा हातखंडा ॥
चमत्कार चहूंकडे चालतो । सृष्‍टीवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥
मूळ संगमनेर ठिकाण त्याचा । कीर्ति उदय जैसा अर्की ॥
नविन तर्‍हा नारळी डोयीला । पदर पागोटयाची फिर्की ॥
वाचावंत संपत्ती सारखी । बहुतांचें तनमन हारकी ॥
लांगे लुंगे कवि भेदरले । अवघ्यांवर त्याची गुर्की ॥
समोर गातां कोणी टिकेना । मनामधीं बसली कर्की ॥
धन ज्याचा हातचा मळ । केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥
फंदी आनंदी छंदी वरदी । ब्राह्मण त्यावर गुरुकृपा ॥
सरस्वती जिव्हाग्रीं अक्षयीं । भंग नसे ज्याच्या हरपा ॥
कवन बहुत उदरामधीं भरलें । फणस जसा मोठा कापा ॥
भाळीं त्रिपुंडी टिळा केशरी । कस्तुरीचा वरती छापा ॥
मोठमोठया राज्यांमधी महशुर । जगजाहीर चारी तर्फा ॥
आकट विकट कवनांच्या चाली । नित्य नव्या आक्षयी थापा ॥
विद्या अभिमान नाहीं जयाला । असा कवी कंचा धुंडा ॥च० ॥२॥
नांवाचें चांदणें जगाचें । मुख्य मुख्य खासे खासे ॥
कीर्तनरंगीं झडा घालिती । मानवला सर्वत्रांशी असे ॥
पुढें मागें ऐसा नसे दुसरा । मृत्यु लोकींचा रहिवाशी ॥
पहा रत्‍न पंधरावें माता । धन्य जन्मली हो त्याशीं ॥
असा पुरुष चिरकाल असावा । गुणनिर्गुणपंडित राशी ॥
होनाजी बाळ म्हणे जगावा । बहुत काळ आयुष्य याशीं ॥
अवीट ज्याची करणी ऐकतां । देह प्राण होतो थंडा ॥
गुरव त्याचे संगें सोबती । कुशल कला जाणे उदंडा ॥
चमत्‍कार चहूंकडे चालतो । सृष्‍टीवर ज्याचा झेंडा ॥
फंदी अनंत कवनाचा० ॥३॥

ह्या कवनावरुन या कवीच्या हयातींतच याची योग्यता किती वाढली होती. होनाजी बाळानें फंदीचें हें वर्णन केलें तें शब्दशः खरें आहे. अनंतफंदींची कविता तात्काळ ठसणारी आहे. यांनीं कटाव फटके आणि लावण्या केल्या. क्वचित श्र्लोक, आर्या, पदेंही कथेंत म्हणण्यासाठीं केलीं. ओंव्या महिपतींच्या ओंव्यांच्या पद्धतीवर आहेत. यांचा ओवीबद्ध ग्रंथ सादर केला; त्याचें नांव 'माधवग्रंथ.' हा ग्रंथ पुण्यांतील वृद्ध पुरुषांशिवाय करुन कोणास माहीत नसेल. हा ग्रंथ करण्याचें कारण सवाई माधवराव पेशवे उडी टाकून मरण पावले, त्या वेळेस पुण्याचे कारभारी मंडळींनीं बाजीराव रघुनाथ यांजकडून झालेल्या हकीकतीचें पत्र अनंतफंदीस पाठविलें आणि त्याची कविता करण्यास सांगितली. त्यावरुन ओवीबद्ध ग्रंथ केला. एके दिवशीं रावबाजींनीं फंदीबोवांस आपणांवर कविता करण्यास सांगितलें. फंदीनीं गंगकवी सारखा प्राप्त झालेला प्रसंग दवडिला नाहीं त्यांनीं खालची कविता करुन म्हटली:-

ओव्या.

वडिलांचे हातचे चाकर ॥ त्यांस न मिळे भाकर ॥

अजागळ ते तूपसाखर ॥ चारुनि व्यर्थ पोशिले ॥१॥

सत्पात्राचा त्रास मनीं ॥ उपजे प्रभूचे मनांतूनि ॥

ज्या पुरुषास न पुसे कोणी ॥ अधीं त्याला भजावें ॥२॥

तटू ज्यास न मिळे कधीं ॥ पालखी द्यावी तयास आधिं ॥

मडकें टाकूनि भांडयांत रांधीं ॥ ताटवाटया भोजना ॥३॥

द्रव्य देऊन आणिक आणिक ॥ नवे तितके केले धनिक ॥

जुन्यांची तिवुनि कणीक ॥ राज्य आपुलें हरविलें ॥४॥

जो पायलीची खायील क्षिप्रा ॥ पालखी द्यावी तया विप्रा ॥

"निरक्षर एकाद्या विप्रा ॥ त्याला क्षिप्रा चारावी ॥५॥

एके दिवशीं व्हावी खुशाली ॥ स्वारी पुढें शंभर मशाली ॥

एके दिवशीं जैशी निशा आली ॥ मशाल एकही नसावी ॥६॥

मेण्यांत बसावें जाऊनि ॥ कपाटें घ्यावीं लाऊनि ॥

स्वरुप कोणा न दावूनि ॥ जागे किंवा निजले कळेना ॥७॥

हुताशनीच्या सुंदर गांठया ॥ शेर शेर साकराच्या पेटया ॥

विप्र कंठीं जैशा घंटया ॥ उगाच कंठया घालाव्या ॥८॥

तशाच राख्या जबरदस्त ॥ सांभाळितां जड होती हस्त ॥

दौलत लुटुनि केली फस्त ॥ हस्त चहूंकडे फिरविला ॥९॥

तुरा शिरीं केवढा तरी ॥ बहुतची मोठा चक्राकारी ॥

हार गजरे नखरेदारी ॥ सोंगापरी दिसावें ॥१०॥

हात हात रेशमी धोतरजोडे ॥ चालतां ओझें चहूंकडे ॥

अंगवस्त्र दाहदां पडे ॥ चरणीं खडे रुतताती ॥११॥

पोषाग दिधले बाजिरायें ॥ मोच्यांस पैका कोठें आहे ? ॥

तैसेच अनवाणी चालताहे ॥ शास्त्री अथवा अशास्त्री ॥१२॥

घडींत व्हावें क्रोधयुक्त ॥ घडींत व्हावें आनंदभरित ॥

"घडींत व्हावें कृपण बहुत ॥ घडींत उदार कर्णापरी ॥१३॥

"घडींत व्हावी सौम्य मुद्रा ॥ घडीत यावा कोप रुद्रा ॥

"घडींत ध्यावी क्षणैक निद्रा ॥ स्वेच्छाचारी प्रभू हा ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP