१.
श्रावण सरला काय भादवा निंगाला
भादव्याच्या नव्या दिसाला बंधू आले न्यायाला
सोन्याचा नांगर रुप्याची लुमनी
वावूर पेरीत होते मी म्हनते भरतार
एवढया दूरच, बंधू आले न्यायला
मला रजा द्या जायाला
एवढा राहिला जोंधळा रुजू दे भारजा
रुजला भरतारा मी जाईते माहेरा
एवढा राहिला जोंधळा पिकू दे भारजा
पिकला भरतारा मी जाईते माहेरा
एवढा राहिला जोंधळा कापू दे भारज
कापिलाव भरतारा मी जाई ते माहेरा
एवढा राहिला जोंधळा झोडू दे भारजा
झोरलाव भरतारा मी जाईते माहेरा
एवढा राहिला जोंधळा सारवून दे भारजा
सारविला भरतारा मी जाईते माहेरा
आताशी वो रजा दिली माझ्या भरतारान
एका दिशी जावा माहेरा, दिड दिशी यावा
कंदी मी ओलंडीन दारीचा पिपळ
कंदी मला भेटल बाप माझा इट्टल
कंदी मी ओलांडीन नदीची साखळी
कंदी मला भेटेल बहिन माझी धाकली
कंदी मी ओलांडीन घरचा हुंबरटा
कंदी मला भेटेल भाव माझा गोमटा
कंदी मला भेटेल आई माझी रुक्मीण
२.
सोळा बंदी सूप घेईन भारजा
नको जाऊ दुबळ्या माहेरा
केळीच्या पानावर वनशीन भरतारा
जाते मी दुबळ्या माहेरा
पिटाच लाडू करीन भारजा
नको जाऊ दुबळ्या माहेरा
कोंडयाच लाडू करीन भारतारा
जाते मी दुबळ्या माहेरा
भिलोरी बांगडी भरीन भारजा
नको जाऊ दुबळ्या माहेरा
साध्याच बांगडया ववशीन भरतारा
जाते मी दुबळ्या माहेरा
चांगला लुगडा घेईन भारजा
नको जाऊ दुबळ्या माहेरा
साधा लुगडा नेसन भरतारा
जाते मी दुबळ्या माहेरा
भरजरी चोळी घेईन भारजा
नको जाऊ दुबळ्या माहेरा
साधीच चोळी घालीन भरतारा
जाते मी दुबळ्या माहेरा
सोन्याचे डाग घालीन भारजा
नको जाऊ दुबळ्या माहेरा
चांदीचे डाग घालीन भरतारा
जाते मी दुबळ्या माहेरा
एवरे देईतो भारजा, तरी नाय राहसी सासर्या
मग आता निंगून जा माहेरा
पतीची परवानगी घेऊन भारजा गेली आपुल्या माहेरा
३.
यमुना आईची लाडकी यमुना बापाची लाडकी
यमुनाची खोबरा लाविला यमुनानी डोकीशी धुतली
घातली गजनीची चोळी नेसली पिवळ पाताळ
बांधला बोचका काचका यमुना गेली सासर्याला
गावामधी गारुडयाचा खेळ यमुना गेली खेळ पहायला
यमुना आली खेळ पाहूनी यमुनाची सासू बोलू लागली
यमुनाचा सासरा गांजू लागला यमुनाचा दीर बोलू लागला
यमुनाची नणंद गांजू लागली यमुनाचा नवरा बोलू लागला
यमुना तितून निगाली गेली बापाच्या दरविजाशी
अरे तू माझ्या बाबा होशी उघर दाराची कावर
आमची कावर सायाची किली कुलपा लोखंडाची
मना नाय लेकी तुझी चाडी मला आहे जावयाची गोडी
यमुना तेथून निघाली गेली आईच्या दरविजाशी
अग तू माझ्या आई होशी उघड दाराची कावर
आमची कावर सायाची किली कुलपा लोखंडाची
मना नाय लेकी तुझी चाडी मला जावयाची गोडी
यमुना तितून निगाली गेली भावाच्या दरविजाशी
अग तू माझ्या वहिनी होशी उघड दाराची कावर
आमची कावर सायाची किली कुलपा लोखंडाची
मना नाय तुमची चाडी मना आहे दादोजींची गोडी
यमना तिथून निगाली गेली बहिणीच्या दरविजाशी
अग तू माझ्या बहिणी होशी उगर दाराची कावर
आमची कावर सायाची किली कुलपा लोखंडाची
मना नाय बहिणी तुझी चाडी मला आहे मेहुण्याची गोडी
यमुना तितून निगाली गेली पहिल्या वनाला
पहिला वन टाकिला यमुना गेली दुसर्या वनाला
दुसरा वन टाकिला यमुना गेली तिसर्या वनाला
चवथा वन टाकिला यमुना गेली पाचव्या वनाला
तित होता अंजन ढव तरी बोचका ठेवला चिर्यावरो
बस्ता ठेवली बोचक्यावरी
यमनाची ढवामजी उडीशी टाकिली
यमना आईच्या स्वप्नी गेली आता लेकी कुणाला म्हणशील
यमनाची आई रडू लागली यमना बापाच्या स्वप्नी गेली
आता तू चोळी बांगरी कुणाला करशील
यमनाचा भाव रडू लागला यमुना बहिणीच्या स्वप्नी गेली
आता वेणी कुणाला घालशील यमुनाची बहिण रडू लागली
यमुना भावजयच्या स्वप्नी गेली
आता तू बोचका कुणाचा बांधशील
यमुनाची भावजय रडू लागली.....
उठा उठा सासूबाई झाडू द्या ना ओसरी
तुमच्या लेकाची कचेरी
उठा उठा सासूबाई झाडू द्या ना कोनाडा
तुमच्या लेकाचा पानपुडा
उठा उठा सासूबाई सोडा बागातल्या गाई
राजहंस माझे शाही
उठा उठा सासूबाई सोडा बागातले हत्ती
राजहंस माझे पति
उठा उठा सासूबाई सोडा बागातले मोर
राजहंस माझा दीर
चीकन सुपारी खिशात दाटली
राणी वाटेत भेटली
दळण दळता उरले पाच गहू
कृष्णा सारखे माझे भाऊ
दळण दळता उरले पाच मोती
कृष्णासारखे माझे पति
माता माझी ग पाठवते काशीतल्या चोळ्या
भूजवरी ग मासळ्या
वाण्याच्या दुकानात बंधु बसला चिंतामणी
साडी निवडे मीरादाणी
सासरा माझा बाळराजा सासू माझी कमळजा
नवरत्नाचा दरवाजा गेला ग पडून
सणाचा पाडवा माय बाईला आठवला
मला मुरारी पाठवला