१
हा मास प्रथम भीमकेचा न उमजे कोणाला
वदनेंदू किंचित सुकला पहाता गजगती होय
श्रमपदी कमळ धन्य तो होय धरणीला
घामाने तनु डबडबली तोडावर दिसे लाली
गर्भाची छाया पडली नेसूनी सुंदर बारीक जरतारी
गर्भिणी रुक्मिणी नारी डोहाळे पुशी श्रीहरी
कौतुक भारी रुक्मिणी नारी
दुसर्या समसख्या मिळूनी येती
बहुपरिचे विनोद करती विंजूनी घेऊनी हाती चवरी
ढाळिती उपचार सुचिती लवकर ती उडी
वाळ्याची गुंफिती वेणी चाफ्याची
घालती माळ सुमनांची
घनदाट सुगंध सुटला भारी
गर्भिणी रुक्मिणी नारी.....
तिसर्यात होती डोहाळे बहू सोहाळे
द्राक्षांचे मंडप दिले लाविली बाग केळीची
वृक्ष पालावले फळभार तरुवर लवले
पुष्पांची बागशाही, शेवंती मोगरा जाई
आंब्याची घन अंबराई चोफळा बांधला दारी
बसे त्यावरी गर्भिणी रुक्मिणी नारी....
चवथ्यात कळले गोतात आला विश्वास
लागला पाचवा मास गुंफिती सुवासिक फुले
मेंदी हातास भोजनास भोजने नानापरी
चांदणे रात्र अधारा थंडीच्या कोवळ्या गुळाबी कळा
उन्हाच्या लहरी
लागला सहावा मास पसरले तेज अवतरले मकरध्वज
नेसून हिरवा साज पाहुनी खुशीत पतिराज
नगरीच्या येऊन नारी गातात मंजुळ गाणी
कुणी चेष्टा करी त्या मिळून वाटती,
हळदी कुंकू पान सुपारी कुणी चेष्टा करुनी
त्या मिळूनी गर्भिणी नारी....
लागला सातवा मास पोट नारळी महालामध्ये
आरास केली बैसून पति शेजारी, ओटी भरता नारी
चौघडे वाजती दारी सुस्वर वाद्ये वाजे बहुपरी
आठव्यात आंठगुळ करिती गोतास आमंत्रण देती
कुणीतरी कंचुकी आहेर करिती द्विज आशीर्वाद बहू देती
भोजनास सिध्दता केली घालुनिया रंगविली
पक्वान्न भाज्या कोशिंबीरी आणि खिरी
नऊमास नऊ दिवस झाली प्रसुत बहु आनंद द्वारकेत
वाटती नगरी शर्करा भरुनी ताटात
जन्मास आले रविकांत हर्षले मनी श्रीरंग
भक्ता ते करुनी मेघ अगेश लागला छंद
गंगेशी अवडुनी गाय गुणमाला
तुमची मुरारी प्रसुत रुक्मिणी
२
पहिले मासी रुक्मिणीसी आली अन्नाची शिसारी
द्राक्षबाग डाळिंबी बकुळ केळी नारिंगी
दिली ताकीद माळ्याला दिवस सोनियाचा आला
कृष्ण बोले रुक्मिणीला दिवस आनंदाचा आला
दुसर्या मासी भिमक तनया चढलीसे गर्भ छाया
पालटली सुरुपकाया हासतमुख यादवराया
तिरभुवनी आनंद झाला दिवस सोनियाचा आला
तिसरे मासी भिमकबाळी घालूनिया चिरचोळी
ताट पाट रांगोळी गूळ पोळी जेवणाला
उशीर झाला भोजनाला दिवस सोनियाचा आला
चौथ्या मासी उभी दारी नारी पुसीती कोण्या परी
विनोद करी नानापरी लाजे रुक्मिणी सुंदरी
आज व्रत आम्हा कळला दिवस सोनियाचा आला
पाच महिन्यात सोहाळे कृष्ण पुसतसे डोहाळे
रुक्मिणीचे वय कवळे आंबे पाडाचे पिवळे
मर्वा खविला बुचडयात पुष्पहार ग गळ्यात
उभी ऐन्या ग महालात कृष्ण हासतो गालात
कृष्ण बोले रुक्मिणीला दिवस आनंदाचा आला
सहावा महिना जी लागला डाळिंबी बागशी जाऊ चला
पाची परकाराचा थाट पंक्ति बैसल्या अचाट
मदी बसवा रुक्मिणीला दिवस सोनियाचा आला
सात महिने सात परी खिरी वाढील्या नानापरी
चोळी किनखापी भरजरी पिवळ पातळ केशरी
हिरवा शालू नेसायाला दिवस सोनियाचा आला
कृष्ण पुसे रुक्मिणीला दिवस आनंदाचा आला
आठ महिने आठंगळ गळी उंबराची माळ
हार तुरे कृष्णाजीला दिवस सोनियाचा आला
नऊ महिने नऊ दिवस झाली रुक्मीण प्रसूत
पोटी जन्मला मदन जैसे सूर्याचे किरण
सूर्य लाजूयिनी गेला दिवस सोनियाचा आला
कृष्ण बोले रुक्मिणीला दिवस आनंदाचा आला