पुष्पांची पसरीत रास अपुल्या पाऊलवाटेवरी
सह्याद्रीमधल्या दर्या कवण हा पांथस्थ हो आक्रमी !
न्यारी वेष-तर्हा, झगा झुळझुळे पायावरी रेशमी
मुद्रा शांत उदास, केश रुळती किंचित् हिमानी शिरी.
सोन्याची सुरई करात, उसळे त्यातूनिया वारुणी
फेसातील छटा पहा, वितळली रत्ने जणू आरुणी !
आहे वृद्ध कवी परी सहचरी रंगेल ये संगती
वस्त्रांतून जिच्या फुले नवतिची उन्मादशाली रती !
देखा, चाहुल लागता फुलतसे वाटेतला ताटवा
त्यासी बाहुनि जादुगार जगता संदेश सांगे नवा
वृक्षाखालिल सावलीत सखिच्या संगे सुराप्राशन
गाणे गात रसाळसे, मग मरूभूमीवरी नंदन !
केला कुंभ कुणी कुठे वसतसे कुंभार तो हुन्नरी ?
राहे तो मशिदीत वा रमतसे या उंचशा मंदिरी
आहे निर्गुण का ? कशास श्रमसी या अक्षरांच्या रणी
आमंत्री पसरूनि बाहु इकडे ही 'द्राक्षकन्या' गुणी !