स्मृति

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणू नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा

त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !

वार्‍यावर येथिल, रातराणि ही धुंद

टाकता उसासे, चरणचाल हो मन्द

परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा

त्या परसामधला एकच तो निशिगन्ध !

हेलावे भवती सागर येथ अफाट

तीरावर श्रीमान् इमारतींचा थाट

परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा

तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथिल रंग

रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग

परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा

तू आर्त मला जो ऐकवीलास अभंग !

लावण्यवतींचा लालस येथ निवास

मदिरेत माणकापरी तरारे फेस

परि स्मरति आणिक करती व्याकुल केव्हा

ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास !


References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - मुंबई

सन - १९४१


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP