अहि नकुल

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


ओतीत विखारी वातावरणी आग

हा वळसे घालित आला मन्थर नाग,

मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार

ये ज्वालामुखिला काय अचानक जाग !

कधि लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,

कधि वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,

कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार,

प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती

पर्णावर सुमने मोडुनि माना पडती

थरथरती झुडुपे हादरती नववेली

जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !

अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,

टाकली यमाने कट्यार वा कनकाची

चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली

रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,

थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,

हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,

अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान

चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य

चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब-कुणाची जाळिमधे चाहूल

अंगावर-कणापरि नयन कुणाचे लाल,

आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,

रे नकूल आला ! आला देख, नकूल !

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,

रिपु समोर येता सोडुनि अन् आडोसा,

भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,

घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात

उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,

विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प

फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

रण काय भयानक-लोळे आग जळांत

आदळती, वळती, आवळती क्रोधांत,

जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व

आषाढघनाशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार

शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर

विच्छिन्न तनूंतुनि उपसुनि काढुनि दात

वार्‍यापरि गेला नकुल वनांतुनि दूर.

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,

आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,

पिंजून कापसापरी पडे तो नाग,

ते खंड गिळाया जमले कीटक भोती !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - पुणे

सन - १९३८


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP