गोष्ट पस्तिसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट पस्तिसावी

असत्य जेव्हा पुनःपुन्हा कानी पडते, तेव्हा ते सत्य भासू लागते.

एका गावात 'मित्रशर्मा' नावाचा एक अग्निहोत्री ब्राह्मण राहात होता. एकदा यज्ञात 'बळी' देण्यासाठी त्याने बाहेरगावच्या एका ओळखीच्या माणसाकडून एक गलेलठ्ठ बोकड तसाच मिळविला व त्याला खांद्यावर घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला.

तो बोकड तीन भामट्यांच्या दृष्टीस पडला व त्यांनी त्या ब्राह्मणाला फसवून, त्या बोकडाला पळवून नेण्याचा आपपसांत बेत आखला. त्याप्रमाणे ते तिघे तो ब्राह्मण जाणार असलेल्या वाटेवर - त्याला दाद लागून न देता - थोडथोड्या अंतरावर उभे राहिले.

खांद्यावर बोकड घेतलेला ब्राह्मण जरा पुढे जाताच वाटेत भेटलेला पहिला भामटा त्याला म्हणाला, 'काय भटजीबुवा, कुत्रा खांद्यावर घेऊन कुठे चाललात ? अहो, याला असेच घेऊन गेलात तर तुमचे गावकरी तुम्हाला वेड्यात काढतील.'

'हा कुत्रा नसून बोकड आहे,' असे उत्तर त्या ब्राह्मणाने देताच तो भामटा त्याला म्हणाला, 'भटजी, कुणाला चांगलं सांगण्याची सोय नाही हेच खरं. तुम्हाला तो कुत्रा बोकड वाटतोय ना ? मग वाटल्यास त्याला घरी नेऊन यज्ञात बळी द्या. मग तर झालं ? माझं काय जात ? तुमचं पाप तुम्हाला.'

त्या भामट्याच्या या बोलण्याचा विचार करीत तो ब्राह्मण जरा पुढे जातो न जातो तोच, वाटेत भेटलेला दुसरा भामटा म्हणाला, 'काय हो शास्त्रीबुवा, तुम्हाला वेडबीड तर नाही ना लागलं ? गायीचं मेलेलं वासरू खांद्यावर घेऊन कुठे चाललात ? टाकून द्या त्याला इथंच आणि घरी जाताच गोमूत्र मिसळलेल्या पाण्यानं स्नान करून शुद्ध व्हा.'

तो ब्राह्मण भांबावलेल्या मनःस्थितीत आणखी जरा पुढे जाताच तिसर्‍या भामट्याने विचारले, 'एका गाढवाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाणे पंडितजी तुम्हाला शोभते का?'

हे शब्द ऐकून मात्र तो ब्राह्मण मनी चरकून स्वतःशीच म्हणाला, 'ज्या अर्थी वाटेत भेटलेल्या एकाला हा माझा बोकड कुत्रा दिसला, दुसर्‍याला गाईचे मेलेले वासरू दिसले तर तिसर्‍याला गाढवाचे पिलू भासले, त्या अर्थी हा बोकड म्हणजे क्षणोक्षणी रूपे बदलणारा मायावी राक्षस असावा. तेव्हा याला घरी नेण्यात काय अर्थ ? मनात असे म्हणून, त्याने त्या बोकडाला तिथेच सोडून दिले आणि तो आपल्या गावी परत गेला.

तो ब्राह्मण जरा दूर जाताच त्या तीन भामट्यांनी त्या बोकडाला पळवून नेले.'

ही गोष्ट सांगून सचीव स्थिरजीवी राजा मेघवर्णाला म्हणाला, 'महाराज, घुबडांचा राजा अरिमर्दन हा कितीही का हुशार असेना, त्यालाही फसवता येणे शक्य आहे. कारण-

अभिनवसेवकविनयैः प्राघुणकोक्तैर्विलासिनीरुदितेः ।

धूर्तजनवचननिकरैरिह कश्चिदवंचितो नास्ति ॥

(नवीन नोकराचा नम्रपणा, पाहुण्याचे गोड बोलणे, विलासिनीचे लटके रडणे आणि धूर्तांचे अघळपघळ बोलणे, यांनी न फसणारा या जगात तरी कुणीच नाही.)

सचीव स्थिरजीवी पुढे म्हणाला, 'महाराज, समजा शत्रू आपल्यापेक्षा बलवान् असला, तरी निर्धाराच्या व ऐक्याच्या बळावर आपण त्याला खलास करू. त्या क्षुद्र मुंग्यांनी निर्धार व ऐक्य करून एका नागराजाला ठार मारल्याची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे का?'

मेघवर्णाने 'नाही' म्हणताच स्थिरजीवी त्याला ती गोष्ट सांगू लागला-

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP