गोष्ट सत्ताविसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट सत्ताविसावी

हावेला तृप्ती ठाऊक नाही, शमवू पाहता ती वाढतच जाई.

एका गावात एक भिल्ल राहात होता. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर तो आपले पोट भरी. एकदा त्याने नेम धरून सोडलेला बाण एका रानडुकराच्या जिव्हारी लागला. पण तशाही परिस्थितीत सूडाच्या भावनेने ते डुक्कर त्याच्या अंगावर धावून गेले व त्याने आपल्या सुळ्याने त्या भिल्लाचे पोट फाडले. त्यामुळे त्या भिल्लाला तर प्राणांना मुकावे लागले, परंतु लगेच त्याच्याजवळ ते डुक्करही थोडावेळ तडफडून मृत्यू पावले.

काही वेळाने तिथून एक कोल्हा चालला असता त्याला ते दोन मृत देह दिसले. ते पाहून तो स्वतःशीच म्हणाला, 'वा ! दैव ही किती अजब चीज आहे. कधी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करूनही पदरात माती पडते. तर कधी जराही प्रयत्‍न केले नसताना हाती घबाड येते ! आता हे दोन मृत देह मी एकटा बरेच दिवस अगदी पुरवून पुरवून खाईन. त्या दृष्टीने आज फक्त या भिल्लाच्या बाणाच्या टोकाला अडकून राहिलेल्या डुकराच्या मांसखंडावर मी माझी भूक भागवीन.' असे म्हणून त्या लोभी कोल्ह्याने पटकन त्या बाणाचे अणकुचीदार टोक आपल्या तोंडात घातले. त्याबरोबर ते त्याच्या एकदम तोंडात घुसून डोक्यातून शेंडीसारखे बाहेर आले. अति हावेपायी तो कोल्हाही तिथे मरून पडला. म्हणून कुठल्याही गोष्टीची अति हाव धरू नये.'

ब्राह्मणाने ही गोष्ट सांगताच त्याची बायको शांडिली त्याला म्हणाली, 'नाथ, तुमचे म्हणणे मला पटले. घरात तीळ आहेत ते मी अगोदर गरम पाण्यात धुवून स्वच्छ करते व वाळवते आणि मग एखाद्या ब्राह्मणाला जेवायला बोलावून त्याला ते दान म्हणून देते. तुम्ही निश्चिंतपणे बाहेरगावी जा.'

मग तो ब्राह्मण घरातून निघून जाताच, शांडिलीने घरातले तीळ धुवून स्वच्छ केले व पुढल्या अंगणात वाळत घातले. पण ते तीळ वाळत असता, जवळून जाणारे एक खट्याळ कुत्रे नेमके त्या तिळांवर मुतले व निघून गेले ! ते पाहून शांडिली चरफडत स्वतःशी म्हणाली, 'या मेल्या खोडसाळ कुतरड्याला मुतायला भूलोकावर दुसरी जागाच सापडली नाही का ? आता काही या तिळांचे दान करता येणार नाही. तेव्हा हे पुन्हा धुवून व वाळवून गावातल्या एखाद्या भोळसर बाईला साध्या तिळांच्या बदली द्यावेत.' मनाशी असे ठरवून ती ते तीळ धुवून व वाळवून झाल्यानंतर एका घरी गेली व त्या घरातल्या बाईला भेटली.'

'साध्या तिळांच्या बदल्यात शांडिली चांगले धुवून स्वच्छ केलेले तीळ देते, 'या विचाराने त्या घरातली बाई घरचे साधे तीळ घेऊन बाहेर आली. पण तेवढ्यात तिचा मुलगा तिला म्हणाला, 'आई ज्या अर्थी शांडिलीकाकू तिच्याकडले धुवून साल काढून स्वच्छ केलेले तीळ आपल्याकडल्या साध्या तिळांच्या बदल्यात द्यायला तयार झाली आहे, त्या अर्थी तिच्या तिळांत नक्की काहीतरी दोष आहे.' मुलाचे हे म्हणणे पटल्यामुळे ती बाई - आणलेल्या साध्या तिळांसह - तशीच घरात परत गेली.

महादेवाच्या मंदिरातील ताम्रचूडाच्या मित्राने त्याला ही गोष्ट सांगून विचारले, 'काय रे, तो शक्तिशाली उंदीर कुठल्या वाटेने त्याच्या बिळाकडे जातो हे तुला ठाऊक आहे का?' ताम्रचूडाने होकारार्थी मान हलवताच त्याचा मित्र म्हणाला, 'तर मग तू कुदळ तयार ठेव. उद्या उजाडताच आपण त्याच्या बिळाचा शोध घेऊ आणि ते खणून नाहीसे करू.'

आपल्या जीवनातील दुःखद घटना इथवर सांगितल्यावर हिरण्यकाने मध्येच एक दीर्घ उसासा सोडला व मग तो आपले मित्र लघुपतनक व मंथरक यांना म्हणाला, 'मित्रांनो, त्या पाहुण्या जोग्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून माझे अवसान पार गळून गेले. हा पाहुणा आता आपला 'किल्ला' खणून काढणार, आपला धनधान्याचा साठा उद्ध्वस्त करणार आणि आपल्यालाही ठार करणार या विचाराने मी माझ्या अनुयायांसह एखाद्या सुरक्षित स्थळी जाता यावे या हेतूने वेगळ्या वाटेने जाऊ लागलो. तेवढ्यात एका गलेलठ्ठ बोक्याने आम्हाला वाटेत गाठले व आमच्यापैकी दोघातिघांना ठार केले, तर काहींना जखमी केले.

'जखमी झालेले उंदीर, मी त्यांना नको त्या वाटेने नेऊन संकटात लोटल्याबद्दल मला शिव्या देत देत, आपापल्या बिळांकडे निघून गेले पण त्यांच्या जखमांतून वाटेत पडलेल्या रक्ताच्या थेंबांवरून मागोवा घेत घेत, दुसर्‍या दिवशी सकाळी ताम्रचूड व त्याचा पाहुणा माझ्या किल्ल्यापर्यंत गेले आणि त्यांनी माझे घर व त्यातील धनधान्याचे साठे कुदळीने खणून पार उद्‌ध्वस्त केले. ते दृश्य जेव्हा मी दुरून लपून पाहिले, तेव्हा माझ्यावर जणु दुःखाचे आकाशच कोसळले.

'ताम्रचूड व त्याचा मित्र हे जेव्हा माझ्या वैभवशाली किल्ल्याची स्थिती एखाद्या उजाड स्मशानाप्रमाणे करुन निघून गेले, तेव्हा मीही कुठेतरी दूर पळून गेलो असणार, अशा समजुतीने माझे बहुतांश अनुयायी, आता या कफल्लक हिरण्यकाजवळ राहण्यात काय अर्थ आहे - असे एकमेकांपाशी म्हणत व माझी निंदानालस्ती करीत, माझ्या एका शत्रूला जाऊन मिळाले.

'मित्रांनो, तरीही मी धीर सोडला नाही. मी पुन्हा पूर्वीप्रमाणे त्या देवळात जाऊन खुंटीवरचे धान्य फस्त करण्याचे ठरविले व त्या गोसाव्यांची चीजवस्तू नासाडून त्यांना धडा शिकविण्याचे ठरविले. पण देवळात जाऊन त्या अन्नाची हंडी टांगलेल्या खुंटीवर उडी घेण्याचा प्रयत्‍न केला असता, माझी उडी तिथवर पोहोचेना. 'आता काय करायचं ?' याचा मी विचार करू लागलो. ताम्रचूडाशी बोलत असलेल्या त्या पाहुण्या गोसाव्याचे शब्द माझ्या कानी पडले. तो ताम्रचूडाला म्हणत होता, 'मित्रा, संपत्तीची ऊब नाहीशी होताच, त्या शक्तिशाली उंदराची मस्ती मी म्हटल्याप्रमाणे जिरली ना ? आता तो त्या खुंटीवरचं अन्न खायला यायचा बंद झाला. ज्याच्यावर लक्ष्मीचा कोप होतो, तो पुरुष या व्यवहारी जगात कवडीमोलाचा ठरतो, म्हटलंच आहे ना?-

दंष्ट्राविरहितः सर्पो मदहीनो यथा गजः ।

तथार्थेन विहीनोऽत्र पुरुषो नामधारकः ॥

(जसा दात काढलेला सर्प किंवा मदहीन हत्ती असतो, तसाच जवळ पैसा नसलेला पुरुष हा केवळ या जगात नावाला पुरुष असतो.)

याप्रमाणे तो पाहूणा बैरागी ताम्रचूडाशी बोलत असतानाच त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. लगेच हाती काठी घेऊन त्याने माझा पाठलाग सुरू केला व त्याने हातातल्या काठीचा एक फटकाराही मला मारला. पण केवळ माझ्या आयुष्याची दोरी बळकट, म्हणून मी त्यातून कसाबसा वाचलो व त्यानंतर दुसरा किल्ला उभारून त्यात राहू लागलो. अश दुःखमय स्थितीत दिवस कंठीत असता, माझी व लघुपतनका, तुझी मैत्री जुळून आली. मला तो नवा आधार वाटू लागला. तरीही जिथे मी वैभवात दिवस काढले, तिथे दीनवाण्या स्थितीत राहणे अयोग्य वाटल्याने, लघुपतनका, तू इकडे येण्याचे ठरविताच, मीही तुझ्यासंगे या परक्या देशात आलो.'

हिरण्यकाची ती करुण कहाणी ऐकून झाल्यावर मंथरक त्याला म्हणाला, 'मित्रा, बुद्धिवंतांना व गुणवंतांना कुठलाच देश परका नसतो. ते जिथे जातात, तो देश त्यांना आपले मानतो. तेव्हा तू इतःपर दुःख न मानता, इथे सुखात राहा.'

हिरण्यक म्हणाला, 'नाही मित्रांनो, मी भूतकाळातल्या दुःखांचे कोळसे उगाळत बसणारा नाही. माझे आता असे मत झाले आहे की, जे माझे आहे, ते कुणी हिरावून नेऊ शकत नाही. आणि जे माझे नाही ते - समजा योगायोगाने काही काळापुरते मजपाशी आले, तरी ते - फार काळ माझ्याजवळ राहू शकत नाही. त्या सागरदत्ताच्या मुलाची गोष्ट माझ्या या विधानाला पुष्टीच देणारी आहे.'

'ती गोष्ट काय आहे?' अशी पृच्छा मंथरक व लघुपतनक या दोघांनीही मोठ्या उत्कंठेने केली असता हिरण्यक सांगू लागला -

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP