वृद्धसा ब्राह्मण येऊनी बोलतु । म्हणे कां रे मृत्यु इच्छितोसी ॥ १ ॥
वैराग्य कां तुज आले असें मना । स्त्रीचा त्याग कोणा गुणें केला ॥ २ ॥
आधीं इचा विचारीं अपराध अंतरीं । मग कोपा करीं प्रवर्तावें ॥ ३ ॥
वांचण्याची इच्छा असलिया मानसीं । तरी तूं इयेसी अंगिकारीं ॥ ४ ॥
स्वधर्माविरहित वर्तेल ही जरी । तरी तिचा करीं त्याग वेड्या ॥ ५ ॥
ही आहे विरक्त निश्चिती हरिभक्त । तुवां पाहीं सत्य तैसें व्हावें ॥ ६ ॥
होईल कल्याण बोलत ब्राह्मण । भ्रतारें चरण वंदियेले ॥ ७ ॥
सांगितलें सर्व कारण आपण । देईं जीवदान आजी मज ॥ ८ ॥
ये व्यथेपासोनी वांचवीं स्वामीया । जीव तुझ्या पायां वाहीन मी ॥ ९ ॥
स्त्रियेसी सर्वथा न बोले आपण । हरीसी शरण जीवेंभावें ॥ १० ॥
केला नमस्कार प्रत्यक्ष उठोन । होईल कल्याण म्हणे द्विज ॥ ११ ॥
ऐकतें मीही दोघांचें बोलणें । घालीं लोटांगणें भ्रतारासी ॥ १२ ॥
झाला तो अदृश्य ब्राह्मण तात्काळ । आरोग्य कुशल देह झाला ॥ १३ ॥
बहिणी म्हणे देव कृपा करी तरी । सर्व सिद्धी द्वारीं तिष्ठतील ॥ १४ ॥