संचितासी दग्ध करी ऐसा कोण । सद्गुरुवांचोन जाण मना ॥ १ ॥
यालागीं सद्गुरु असावा उत्तम । जेणें निमे श्रम संसाराचा ॥ २ ॥
त्रिविध तापासी कोण करी शांत सद्गुरु एकान्त न जोडतां ॥ ३ ॥
जन्ममरणाची कथा कैं निवारे । सद्गुरु निर्धारें न भेटतां ॥ ४ ॥
वासना निःशेष निवारेल तेव्हां । भेटेल तुकोबा सद्गुरु तो ॥ ५ ॥
बहिणी म्हणे माझा जाऊं पाहे जीव । का हो न ये कींव तुकोबा ॥ ६ ॥