दशक चौथा - नवविधाभक्तीचा

दशक चौथा - नवविधाभक्तीचा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥ ४॥ समास पहिला : श्रवणभक्ति ॥ श्रीराम ॥

जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था । अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥ नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २॥ आतां आठऊं सद्गुरु । जो पराचाहि परु । जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ ३॥ श्रोतेन पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें । म्हणौनि बोलिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४॥ सावध होऊन श्रोतेजन । ऐका नवविधा भजन । सत्‌शास्त्रीं बोलिले, पावन- । होईजे येणें ॥ ५॥ श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥ नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें । श्रोतीं अवधान दिधलें । पाहिजे आतां ॥ ६॥ प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण । नाना अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें ॥ ७॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग । योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ८॥ नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे महिमे । नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ ९॥ नाना माहात्म्यें नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें । नाना तपें पुरश्चरणें । ऐकत जावीं ॥ १०॥ दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी । तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ ११॥ उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास । भूगर्भ आणी आकाशवास । कैसे ते ऐकावे ॥ १२॥ जपी तपी तामस योगी । नाना निग्रह हटयोगी । शाक्तआगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३॥ नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्षस्थानें । पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥ नाना पिंडांची रचना । नाना भूगोळरचना । नाना सृष्टीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ १५॥ चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें । येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥ ब्रह्माविष्णुमहेशस्थानें । इन्द्रदेवऋषीस्थानें । वायोवरुणकुबेरस्थानें । कैसीं ते ऐकावीं ॥ १७ । नव खंडे चौदा भुवनें । अष्ट दिग्पाळांची स्थानें । नाना वनें उपवनें गहनें । कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥ गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर । अष्ट नायका संगीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ १९॥ रागज्ञान ताळज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान । अमृतवेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २०॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥ मंत्र मोहरे तोटके सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी । धातु रसायण बुद्धी । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥ कोण्या दोषें कोण रोग । कोणा रोगास कोण प्रयोग । कोण्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३॥ रवरवादि कुंभपाक । नाना यातना येमेलोक । सुखसुःखादि स्वर्गनर्क । कैसा तो ऐकावा ॥ २४॥ कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २५॥ पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवंचना । सारासारविचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६॥ सायोज्यता मुक्ती कैसी होते । कैसें पाविजे मोक्षातें । याकारणें नाना मतें । शोधित जावीं ॥ २७॥ वेद शास्त्रें आणी पुराणें । माहावाक्याचीं विवरणें । तनुशतुष्टयनिर्शनें । कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥ ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें । असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥ सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं । श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३०॥ सगुण देवांचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्वें यंत्रें । हे दोनी परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३१॥ जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें । कीर्ति स्तुती स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥ ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें । विभक्ती सांडून भक्तीचें । मूळ शोधावें ॥ ३३॥ श्रवणभक्तीचें निरूपण । निरोपिलें असे जाण । पुढें कीर्तन भजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्तिनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥


समास दुसरा : किर्तन भक्ति ॥ श्रीराम् ॥ श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥ सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी । अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २॥ बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर । भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥ अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा । हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥ नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा । हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥ मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी । सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६॥ भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये । बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥ विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें । ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥ येश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा । जेणें भगवद्भक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९॥ कथा अन्वय लापणिका । नामघोष करताळिका । प्रसंगें बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १०॥ ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान । नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११॥ करुणा कीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें । श्रोतयांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२॥ कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें । देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३॥ पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद । बीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥ नाना नवरसिक श्रृंघारिक । गद्यपद्याचें कौतुक । नाना वचनें प्रस्ताविक । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥ भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण । साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥ प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी । निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥ पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त । बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८॥ करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण । मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९॥ ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें । गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २०॥ करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण । परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१॥ कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य समाधान तें उडे । नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२॥ सगुणकथा या नांव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरूपण । सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३॥ असो वक्‌त्रुत्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर । वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥ सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञा न भंगे । उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ २५॥ असो हें सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन । या नांव भगवद्भजन । दुसरी भक्ती ॥ २६॥ कीर्तनें माहादोष जाती । कीर्तनें होये उत्तमगती । कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥ कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र । हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ २८॥ कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्चये सांपडे । कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥ सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण । तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३०॥ म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे परमात्मा । सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनभजननिरूपणनाम समास दुसरा ॥ २॥


समास तिसरा : नामस्मरणभक्ति ॥ श्रीराम् ॥ मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन । आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १॥ स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥ नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥ हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥ आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥ नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥ भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥ नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती । नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥ बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं । सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥ नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥ उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥ हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥ नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले । माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥ परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें । नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥ सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक । होईजे स्वयें ॥ २०॥ कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर । माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥ अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥ चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर । जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥ म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरणभक्तिनिरूपणनाम समास तिसरा ॥ ३॥


समास चवथा : पादसेवन भक्ति ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण । आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १॥ पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें । सद्गुरूचे पाय सेवावे । सद्गतिकारणें ॥ २॥ या नांव पादसेवन । सद्गुरुपदीं अनन्यपण । निरसावया जन्ममरण । यातायाती ॥ ३॥ सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाव तों नाहीं । याकारणें लवलाहीं । सद्गुरुपाय सेवावे ॥ ४॥ सद्वस्तु दाखवी सद्गुरु । सकळ सारासारविचारु । परब्रह्माचा निर्धारु । अंतरीं बाणे ॥ ५॥ जे वस्तु दृष्टीस दिसेना । आणी मनास तेहि भासेना । संगत्यागेंविण ये ना । अनुभवासी ॥ ६॥ अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे । हें अनुभवी यासीच भासे । येरां गथागोवी ॥ ७॥ संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण । सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ॥ ८॥ याहिवेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें । सकळ कांहीं पादसेवनें । उमजों लागे ॥ ९॥ वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत । अनुभव अनुर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ॥ १०॥ बहुधा अनुभवाचीं आंगें । सकळ कळती संतसंगें । चौथे भक्तीचे प्रसंगें । गोप्य तें प्रगटे ॥ ११॥ प्रगट वसोनि नसे । गोप्य असोनि भासे । भासाअभासाहून अनारिसे । गुरुगम्य मार्ग ॥ १२॥ मार्ग होये परी अंतरिक्ष । जेथें सर्वहि पूर्वपक्ष । पाहों जातां अलक्ष । लक्षवेना ॥ १३॥ लक्षें जयासी लक्षावें । ध्यानें जयासी ध्यावें । तें गे तेंचि आपण व्हावें । त्रिविधा प्रचिती ॥ १४॥ असो हीं अनुभवाचीं द्वारें । कळती सारासारविचारें । सत्संगेंकरून सत्योत्तरें । प्रत्ययासि येतीं ॥ १५॥ सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य । सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ॥ १६॥ पाहाणार पाहाणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जालें । तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७॥ नाना समाधानें पाहातां । बाणती सद्गुरु करितां । सद्गुरुविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ १८॥ प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेपें विद्याअभ्यास । अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९॥ जें अभ्यासें अभ्यासितां न ये । जें साधनें असाध्य होये । तें हें सद्गुरुविण काये । उमजों जाणे ॥ २०॥ याकारणें ज्ञानमार्ग- । कळाया, धरावा सत्संग । सत्संगेंविण प्रसंग । बोलोंचि नये ॥ २१॥ सेवावे सद्गुरूचे चरण । या नांव पादसेवन । चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरोपिलें ॥ २२॥ देव ब्राह्मण माहानुभाव । सत्पात्र भजनाचे ठाव । ऐसिये ठाईं सद्भाव । दृढ धरावा ॥ २३॥ हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें । परंतु सद्गुरुपाय सेवणें । या नांव पादसेवन ॥ २४॥ पादसेवन चौथी भक्ती । पावन करितसे त्रिजगतीं । जयेकरितां सायोज्यमुक्ती । साधकास होये ॥ २५॥ म्हणौनि थोराहून थोर । चौथे भक्तीचा निर्धार । जयेकरितां पैलपार । बहुत प्राणी पावती ॥ २६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पादसेवनभक्तिनिरूपणनाम समास चवथा ॥ ४॥


समास पाचवा : अर्चनभक्ति ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १॥ पांचवी भक्ती तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २॥ नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें । मानसपूजा मूर्तिध्यानें । या नांव पांचवी भक्ती ॥ ३॥ देवब्राह्मणाग्नीपूजन । साधुसंतातीतपूजन । इति महानुभाव गाइत्रीपूजन । या नांव पांचवी भक्ती ॥ ४॥ धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्र लेप सत्पात्रपूजन । आपले गृहींचें देवतार्चन । या नांव पांचवी भक्ती ॥ ५॥ सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित । लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६॥ भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी । नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७॥ गणेशशारदाविठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती । श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८॥ मत्छकूर्मवऱ्हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती । रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९॥ केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती । त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १०॥ दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती । अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती । जनार्दन आणी उपेंद्र ॥ ११॥ हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती । शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२॥ अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण । श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३॥ ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती । त्यांचें आर्चन करावें, भक्ती- । पांचवी ऐसी ॥ १४॥ याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम । उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५॥ जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी । पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥ नाना तीर्थांक्षत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें । नाना उपचारीं आर्चावें । परमेश्वरासी ॥ १७॥ पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें । धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुराचीं ॥ १८॥ नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार । दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९॥ सिबिका छत्रें सुखासनें । माहि मेघडंब्रें सूर्यापानें । दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २०॥ नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव । गाती हरिदास सद्भाव- । लागला भगवंतीं ॥ २१॥ वापी कूप सरोवरें । नाना देवाळयें सिखरें । राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयरीं ॥ २२॥ मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा । नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री ॥ २३॥ नाना पडदे मंडप चांदोवे । नाना रत्नघोष लोंबती बरवे । नाना देवाळईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४॥ आळंकार आणि आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें । अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीचीं ॥ २५॥ वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका । ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६॥ शुक शारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें । कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावीं ॥ २७॥ सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें । नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावीं ॥ २८॥ काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें । सद्भावें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९॥ ऐसेंचि सद्गुरूचें भजन- । करून, असावें अनन्य । या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३०॥ ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१॥ मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें । मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२॥ जें जें आपणांस पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे । येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आर्चनभक्तिनाम समास पंचवा ॥ ५॥


समास सहावा : वंदनभक्ति ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । पांचवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । साहावी भक्ती ॥ १॥ साहावी भक्ती तें वंदन । करावें देवासी नमन । संत साधु आणी सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २॥ सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार । सद्गुरूस करावे नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३॥ साष्टांग नमस्कारास अधिकारु । नानाप्रतिमा देव गुरु । अन्यत्र नमनाचा विचारु । अधिकारें करावा ॥ ४॥ छपन्न कोटी वसुमती । मधें विष्णुमूर्ती असती । तयांस नमस्कार प्रीतीं । साष्टांग घालावे ॥ ५॥ पशुपति श्रीपति आणी गभस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती । तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमे । म् विशेष ॥ ६॥ श्लोक ॥ शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा । एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥ भक्त ज्ञानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी । सत्पात्रें देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७॥ वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणी विद्वज्जन । याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ ८॥ जेथें दिसती विशेष गुण । तें सद्गुरूचें अधिष्ठान । याकारणें तयासी नमन । अत्यादरें करावें ॥ ९॥ गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अवतारमूर्ती । नाना देव सांगों किती । पृथकाकारें ॥ १०॥ सर्व देवांस नमस्कारिलें । ते येका भगवंतास पावलें । येदर्थीं येक वचन बोलिलें- । आहे, तें ऐका ॥ ११॥ श्लोक ॥ आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं । सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥ याकारणें सर्व देवांसी । नमस्कारावें अत्यादरेंसीं । अधिष्ठान मानितां, देवांसी- । परम सौख्य वाटे ॥ १२॥ देव देवाचीं अधिष्ठानें । सत्पात्रें सद्गुरूचीं स्थानें । या कारणें नमस्कार करणें । उभय मार्गीं ॥ १३॥ नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४॥ नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मती । नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५॥ सिसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड । याकारणें अखंड । देव भक्त वंदावे ॥ १६॥ नमस्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे । नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकांवरीं ॥ १७॥ निशेष करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर । आणी मुख्य परमेश्वर । कृपा करी ॥ १८॥ नमस्कारें पतित पावन । नमस्कारें संतांसी शरण । नमस्कारें जन्ममरण । दुरी दुऱ्हावे ॥ १९॥ परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला । तरी तो अन्याये क्ष्मा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ २०॥ याकारणें नमस्कारापरतें । आणीक नाहीं अनुसरतें । नमस्कारें प्राणीयातें । सद्बुद्धि लागे ॥ २१॥ नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे । नमस्कारांस कांहींच नलगे । उपकर्ण सामग्री ॥ २२॥ नमस्कारा ऐसें नाहीं सोपें । नमस्कार करावा अनन्यरूपें । नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३॥ साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । सुगम पंथे नेऊन घाली । जेथील तेथें ॥ २४॥ याकारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ । येथें सांगितली पष्ट । साहावी भक्ती ॥ २५॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वंदनभक्तिनाम समास सहावा ॥ ६॥


समास सातवा : दास्यभक्ति ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । साहवें भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १॥ सातवें भजन तें दास्य जाणावें । पडिलें कार्य तितुकें करावें । सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २॥ देवाचें वैभव संभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें । चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ॥ ३॥ भंगलीं देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं । सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्यें ॥ ४॥ नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार । पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥ ५॥ गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें । मंचक डोल्हारे विमानें । नूतनचि करावीं ॥ ६॥ मेघडंब्रें छत्रें चामरें । सूर्यापानें निशाणें अपारें । नित्य नूतन अत्यादरें । सांभाळित जावीं ॥ ७॥ नाना प्रकारीचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें । बहुविध सुवर्णासनें । येत्नें करीत जावीं ॥ ८॥ भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळीं घागरी बहुवसा । संपूर्ण द्रव्यांश ऐसा । अति येत्नें करावा ॥ ९॥ भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें । अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावीं ॥ १०॥ आळंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें । नाना धातु सुवर्णपात्रें । येत्नें करीत जावीं ॥ ११॥ पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांचीं बनें । पावतीं करावीं जीवनें । तया वृक्षांसी ॥ १२॥ नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा । नाना वाद्यें नाट्यशाळा । गुणी गायेक बहुसाल ॥ १३॥ स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा । निद्रिस्तांकारणें पडशाळा । विशाळ स्थळें ॥ १४॥ नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें । नाना खाद्यफळांचीं स्थळें । नाना रसांचीं नाना स्थळें । येत्नें करीत जावीं ॥ १५॥ नाना वस्तांची नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें । देवाचें वैभव वचनें । किती म्हणौनि बोलावें ॥ १६॥ सर्वां ठाई अतिसादर । आणी दास्यत्वासहि तत्पर । कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७॥ जयंत्या पर्वें मोहोत्साव । असंभाव्य चालवी वैभव । जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्त होती ॥ १८॥ ऐसें वैभव चालवावें । आणी नीच दास्यत्वहि करावें । पडिले प्रसंगीं सावध असावें । सर्वकाळ ॥ १९॥ जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळचि देजे । अत्यंत आवडीं कीजे । सकळ सेवा ॥ २०॥ चरणक्षाळळें स्नानें आच्मनें । गंधाक्षतें वसनें भूषणें । आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१॥ शयेनाकारणें उत्तम स्थळें । जळें ठेवावीं सुसीतळें । तांबोल गायनें रसाळें । रागरंगें करावीं ॥ २२॥ परिमळद्रव्यें आणी फुलीलीं । नाना सुगंधेल तेलें । खाद्य फळें बहुसालें । सन्निधचि असावीं ॥ २३॥ सडे संमार्जनें करावीं । उदकपात्रें उदकें भरावीं । वसनें प्रक्षालून आणावीं । उत्तमोत्तमें ॥ २४॥ सकळांचें करावें पारपत्य । आलयाचें करावें आतित्य । ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ती ॥ २५॥ वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं । अंतरें निवतीं सकळांचीं । ऐसें वदावें ॥ २६॥ ऐसी हे सातवी भक्ती । निरोपिली येथामती । प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७॥ ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुरूचें । प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करित जावें ॥ २८॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्तिनाम समास सातवा ॥ ७॥


समास आठवा : सख्यभक्ति ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । सातवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १॥ देवासी परम सख्य करावें । प्रेम प्रीतीनें बांधावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २॥ देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीतीं । येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३॥ भक्ति भाव आणी भजन । निरूपण आणी कथाकीर्तन । प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४॥ आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें । मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५॥ देवाच्या सख्यत्वाकारणें । आपलें सौख्य सोडून देणें । अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६॥ सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ॥ ७॥ देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें, सेवटीं- । प्राण तोहि वेचावा ॥ ८॥ आपुलें आवघेंचि जावें । परी देवासी सख्य राहावें । ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९॥ देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी न करावें निर्वाण । परम प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १०॥ ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता । पांडव लाखाजोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११॥ देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासी । आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२॥ आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ॥ १३॥ श्लोक ॥ ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम् । जैसें जयाचे भजन । तैसाचि देवहि आपण । म्हणौन हें आवघें जाण । आपणाचि पासीं ॥ १४॥ आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । तरी गोष्टी आपणांकडे । सहजचि आली ॥ १५॥ मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना । चंद्र वेळेसि उगवेना । तऱ्ही चकोर अनन्य ॥ १६॥ ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व । भगवंतावरील ममत्व । सांडूंचि नये ॥ १७॥ सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत । विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८॥ देवावेगळें कोणीं नाहीं । ऐसें बोलती सर्वहि । परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९॥ म्हणौनी ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें । अंतरीं सदृढ धरावें । परमेश्वरासी ॥ २०॥ आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोधास येणें । ऐसीं नव्हेत किं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१॥ देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित । इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥ २२॥ देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें । मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३॥ पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी । माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४॥ देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला । शरणागतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५॥ देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी । देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६॥ देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धांविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥ २७॥ देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु । देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८॥ देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें । जिवलगें आवघीं पिसुणें । कामा न येती ॥ २९॥ सख्य देवाचें तुटीना । प्रीति देवाची विटेना । देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३०॥ म्हणौनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१॥ जैसा देव तैसा गुरु । शास्त्रीं बोलिला हा विचारु । म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुरूसीं असावा ॥ ३२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्यभक्तिनाम समास आठवा ॥ ८॥


समास नववा : आत्मनिवेदन ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । आठवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । भक्ति नवमी ॥ १॥ नवमी निवेदन जाणावें । आत्मनिवेदन करावें । तेंहि सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करूनि ॥ २॥ ऐका निवेदनाचें लक्षण । देवाअसि वाहावें आपण । करावें तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ॥ ३॥ मी भक्त ऐसें म्हणावें । आणी विभक्तपणेंचि भजावें । हें आवघेंचि जाणावें । विलक्षण ॥ ४॥ लक्षण असोन विलक्षण । ज्ञान असोन अज्ञान । भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥ ५॥ भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे । विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६॥ तस्मात् विचार करावा । देव कोण तो वोळखावा । आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७॥ मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां तत्वझाडा । विचार करितां उघडा । आपण नाहीं ॥ ८॥ तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे । आत्मनिवेदन येणेंप्रकारें । सहजचि जालें ॥ ९॥ तत्वरूप सकळ भासे । विवेक पाहातां निरसे । प्रकृतिनिरासें आत्मा असे । आपण कैंचा ॥ १०॥ येक मुख्य परमेश्वरु । दुसरी प्रकृति जगदाकारु । तिसरा आपण कैंचा चोरु । आणिला मधें ॥ ११॥ ऐसें हें सिद्धचि असतां । नाथिली लागे देहाहंता । परंतु विचारें पाहों जातां । कांहींच नसे ॥ १२॥ पाहातां तत्त्वविवेचना । पिंडब्रह्मांडतत्वरचना । विश्वाकारें वेक्ती, नाना- । तत्वें विस्तारलीं ॥ १३॥ तत्वें साक्षत्वें वोसरतीं । साक्षत्व नुरे आत्मप्रचिती । आत्मा असे आदिअंतीं । आपण कैंचा ॥ १४॥ आत्मा एक स्वानंदघन । आणी अहमात्मा हें वचन । तरी मग आपण कैंचा भिन्न । उरला तेथें ॥ १५॥ सोहं हंसा हें उत्तर । याचें पाहावें अर्थांतर । पाहतां आत्मयाचा विचार । आपण कैंचा तेथें ॥ १६॥ आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावें अनन्य । अनन्य म्हणिजे नाहीं अन्य । आपण कैंचा तेथें ॥ १७ ॥ आत्मा म्हणिजे तो अद्वैत । जेथें नाहीं द्वैताद्वैत । तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ॥ १८॥ आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण । जेथें नाहीं गुणागुण । निखळ निर्गुणी आपण । कोण कैंचा ॥ १९॥ त्वंपद तत्पद असिपद । निरसुनि सकळ भेदाभेद । वस्तु ठाईंची अभेद । आपण कैंचा ॥ २०॥ निरसितां जीवशिवौपाधी । जीवशिवचि कैंचे आधी । स्वरूपीं होतां दृढबुद्धि । आपण कैंचा ॥ २१॥ आपण मिथ्या, साच देव । देव भक्त अनन्यभाव । या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २२॥ या नांव आत्मनिवेदन । ज्ञानियांचें समाधान । नवमे भक्तींचे लक्षण । निरोपिलें ॥ २३॥ पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमधें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ति नवमी ॥ २४॥ नवमी भक्ती आत्मनिवेदन । न होतां न चुके जन्ममरण । हें वचन सत्य, प्रमाण- । अन्यथा नव्हे ॥ २५॥ ऐसी हे नवविधा भक्ती । केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती । सायोज्यमुक्तीस कल्पांतीं । चळण नाहीं ॥ २६॥ तिहीं मुक्तींस आहे चळण । सायोज्यमुक्ती अचळ जाण । त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायोज्यमुक्ती चळेना ॥ २७॥ आवघीया चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती । तयांमध्यें तीन नासती । चौथी ते अविनाश ॥ २८॥ पहिली मुक्ती ते स्वलोकता । दुसरी ते समीपता । तिसरी ते स्वरूपता । चौथी सायोज्यमुक्ती ॥ २९॥ ऐसिया चत्वार मुक्ती । भगवद्भजनें प्राणी पावती । हेंचि निरूपण प्रांजळ श्रोतीं । सावध पुढें परिसावें ॥ ३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदनभक्तिनाम समास नववा ॥ ९॥


समास दहावा : मुक्तिचतुष्टय ॥ श्रीराम् ॥ मुळीं ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूप अहंकार । तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ॥ १॥ तो अहंकार वायोरूप । तयावरी तेजाचें स्वरूप । तया तेजाच्या आधारें आप । आवर्णोदक दाटलें ॥ २॥ तया आवर्णोदकाच्या आधारें । धरा धरिली फणिवरें । वरती छपन्न कोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३॥ इयेवरी परिघ सप्त सागर । मध्य मेरू माहां थोर । अष्ट दिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४॥ तो सुवर्णाचा माहा मेरू । पृथ्वीस तयाचा आधारु । चौरुआसी सहस्र विस्तारु । रुंदी तयाची ॥ ५॥ उंच तरी मर्यादेवेगळा । भूमीमधें सहस्र सोळा । तया भोवता वेष्टित पाळा । लोकालोक पर्वताचा ॥ ६ ॥ तया ऐलिकडे हिमाचळ । जेथें पांडव गळाले सकळ । धर्म आणी तमाळनीळ । पुढें गेले ॥ ७॥ जेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले माहा अही । सितसुखें सुखावले ते ही । पर्वतरूप भासती ॥ ८॥ तया ऐलिकडे सेवटीं जाण । बद्रिकाश्रम बद्रिनारायण । तेथें माहां तापसी, निर्वाण- । देहत्यागार्थ जाती ॥ ९॥ तया ऐलिकडे बद्रिकेदार । पाहोन येती लहानथोर । ऐसा हा अवघा विस्तार । मेरुपर्वताचा ॥ १०॥ तया मेरुपर्वतापाठारीं । तीन श्रृंगे विषमहारी । परिवारें राहिले तयावरी । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११॥ ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा । विष्णुश्रृंग तो मर्गजाचा । शिवश्रृंग तो स्फटिकाचा । कैळास नाम त्याचें ॥ १२॥ वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचें । सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें । अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें । १३॥ तेथें गण गंधर्व लोकपाळ । तेतिस कोटी देव सकळ । चौदा लोक, सुवर्णाचळ- । वेष्टित राहिले ॥ १४॥ तेथें कामधेनूचीं खिलांरें । कल्पतरूचीं बनें अपारें । अमृताचीं सरोवरें । ठाईं ठाईं उचंबळतीं ॥ १५॥ तेथें उदंड चिंतामणी । हिरे परिसांचियां खाणी । तेथें सुवर्णमये धरणी । लखलखायमान ॥ १६॥ परम रमणीये फांकती किळा । नव्वरत्नाचिया पाषाणसिळा । तेथें अखंड हरुषवेळा । आनंदमये ॥ १७॥ तेथें अमृतांचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य सुमनें । अष्ट नायका गंधर्वगायनें । निरंतर ॥ १८॥ तेथें तारुण्य वोसरेना । रोगव्याधीहि असेना । वृधाप्य आणी मरण येना । कदाकाळीं ॥ १९॥ तेथें येकाहूनि येक सुंदर । तेथें येकाहूनि येक चतुर । धीर उदार आणी शूर । मर्यादेवेगळे ॥ २०॥ तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें । विद्युल्यतेसारिखीं स्वरूपें । तेथें येश कीर्ति प्रतापें । सिमा सांडिली ॥ २१॥ ऐसें तें स्वर्गभुवन । सकळ देवांचें वस्तें स्थान । तयां स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें ॥ २२॥ येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें ते देवलोकीं राहावें । स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३॥ लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता । स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता- । तिसरी मुक्ती ॥ २४॥ देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५॥ सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥ म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ती ते शाश्वत । तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥ ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥ तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ । सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९॥ निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता । सायोज्यता म्हणिजे स्वरूपता- । निर्गुण भक्ती ॥ ३०॥ सगुण भक्ती ते चळे । निर्गुण भक्ती ते न चळे । हें अवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलियां ॥ ३१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ॥ १०॥

॥ दशक चवथा समाप्त ॥

N/A

N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP