दशक सहावा - देवशोधनाचा

दशक सहावा - देवशोधनाचा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ षष्ठ दशक ॥ ॥ श्रीराम ॥ समास पहिला : देवशोधन चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥ म्हणौनि ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय श्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३॥ प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता । आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४॥ म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५॥ त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी । अंगीं लागे ॥ ६॥ याकारणें जो शहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा । ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७॥ ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती । देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८॥ राष्ट्राचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजांचाही राजा । तो चक्रवर्ती ॥ ९॥ एक नरपती एक गजपती । एक हयपती एक भूपती । सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजा ॥ १०॥ असो ऐशिया समस्तां । एक ब्रह्मा निर्माणकर्ता । त्या ब्रह्म्यासही निर्मिता । कोण आहे ॥ ११॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर । तो ओळखावा परमेश्वर । नाना यत्नें ॥ १२॥ तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना । ब्रह्माण्डनायका चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३॥ जेणें संसारीं घातलें । अवघें ब्रह्माण्ड निर्माण केलें । त्यासी नाहीं ओळखिलें । तोचि पतित ॥ १४॥ म्हणोनि देव ओळखावा । जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग धरावा । म्हणजे कळे ॥ १५॥ जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६॥ चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधू ॥ १७॥ जो जनांमध्ये वागे । परी जनांवेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधू ॥ १८॥ जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासींच म्हणावें ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९॥ पोट भरावयाकारणें । नाना विद्या अभ्यास करणें । त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २०॥ देव ओळखावा एक । तेंचि ज्ञान तें सार्थक । येर अवघेंचि निरर्थक । पोटविद्या ॥ २१॥ जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें । पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२॥ एवं पोट भरावयाची विद्या । तियेसी म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३॥ ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन । तयापासीं समाधान । पुशिलें पाहिजे ॥ २४॥ अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांपडेल ज्ञान । करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचें ॥ २५॥ रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला । निर्बळापाशीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६॥ पिशाच्यापाशीं पिशाच गेलें । तेथें कोण सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणू ॥ २७॥ भिकार्यापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं मागतां दीक्षा । उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८॥ अबद्धापाशीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबद्ध । बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९॥ देह्यापाशीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही । म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३०॥ याकारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासारविचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१॥ हरि ॐ तत्सत् । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥


जय जय रघुवीर समर्थ ॥ समास दुसरा : ब्रह्मपावननिरूपण श्रीराम ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायुज्यप्राप्ति होय जेणें । नाना मतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १॥ ब्रह्मज्ञानावीण उपदेश । तो म्हणों नये विशेष । धान्येविण जैसें भूस । खातां नये ॥ २॥ नाना काबाड बडविलें । नातरी तक्रचि घुसळिलें । अथवा धुवणचि सेविलें । सावकाश ॥ ३॥ नाना साली भक्षिल्या । अथवा चोइट्या चोखिल्या । खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैशा ॥ ४॥ तैसें ब्रह्मज्ञानाविण । नाना उपदेशांचा शीण । सार सांडून असार कोण । शहाणा सेवी ॥ ५॥ आतां ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरूपण । सुचित करावें अंतःकरण । श्रोतेजनीं ॥ ६॥ सकळ सृष्टीची रचना । तें हें पंचभौतिक जाणा । परंतु हें तगेना । सर्वकाळ ॥ ७॥ आदि अंतीं ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । येर पंचभौतिक सगुण । नाशवंत ॥ ८॥ येरवीं हीं पाहतां भूतें । देव कैसें म्हणावें त्यांतें । भूत म्हणतां मनुष्यांतें । विषाद वाटे ॥ ९॥ मा तो जगन्नाथ परमात्मा । त्यासि आणि भूतउपमा । ज्याचा कळेना महिमा । ब्रह्मादिकांसी ॥ १०॥ भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष । याकारणें महापुरुष । सर्व जाणती ॥ ११॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । यां सबाह्य जगदीश । पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी ॥ १२॥ जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥ १३॥ पंचभूतें आणि त्रिगुण । ऐशी अष्टधा प्रकृति जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥ १४॥ तें हें दृश्य नाशिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५॥ जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें जाळितां जळेना । जें कालवितां कालवेना । आपेंकरूनी ॥ १६॥ जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना झडेना । जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥ १७॥ ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वांहूनि अनारिसें । परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८॥ दिसेना तरी काय झालें । परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९॥ दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पहावें । परंतु गुज तें जाणावें । गौप्य आहे ॥ २०॥ प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार । सद्गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥ २१॥ उमजेना तें उमजावें । दिसेना तें पहावें । जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२॥ गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें । कानडेंचि अभ्यासावें । सावकाश ॥ २३॥ वेद विरंचि आणि शेष । जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म तें ॥ २४॥ तरी तें कवणें परी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे । वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६॥ तयास म्हणावें देव । वरकड लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनांकारणें ॥ २७॥ ऐसा देवाचा निश्चयो झाला । देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणचि आपला । शोध घ्यावा ॥ २८॥ माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनही नव्हे ॥ २९॥ पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्त्व झाडितां सार । आत्माचि उरे ॥ ३०॥ आपणासि ठावचि नाहीं । तेथें पाहणें नलगे कांहीं । तत्त्वें ठायींच्या ठायीं । विभागूनि गेलीं ॥ ३१॥ बांधली आहे तों गांठोडी । जो कोणी विचारें सोडी । विचार पाहतां गांठोडी । आढळेना ॥ ३२॥ तत्त्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहतां विचार । एक आत्मा निरंतर । आपण नाहीं ॥ ३३॥ आपणासि ठावचि नाहीं । जन्म मृत्यु कैंचे काई । पाहतां वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४॥ पाप पुण्य यमयातना । हें निर्गुणीं तों असेना । आपण तोचि तरी जन्ममरणा । ठावो कैंचा ॥ ३५॥ देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला । देहातीत होतां पावला । मोक्षपद ॥ ३६॥ झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक । परंतु हा विवेक । पाहिलाचि पहावा ॥ ३७॥ जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां दृश्य ओसरे । स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८॥ आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें । आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ ३९॥ आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन । पुढें आत्मनिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥ आत्मनिवेदनाउपरी । निखळ वस्तु निरंतरी । आपण आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१॥ त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला । संसारखेद तो उडाला । देह प्रारब्धीं टाकिला । सावकाश ॥ ४२॥ यासि म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न । भक्तचि जाहला ॥ ४३॥ आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥ संसारीं पुंडावें चुकलें । देवां भक्तां ऐक्य झालें । मुख्य देवासि ओळखिलें । सत्संगेंकरूनी ॥ ४५॥ हरिः ऒं तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥


समास तीसरा : मायोद्भवनिरूपण श्रीराम ॥ निर्गुण आत्मा तो निश्चळ । जैसें आकाश अंतराळ । घन दाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १॥ जें खंडलेंचि नाहीं अखंड । जें उदंडाहूनि उदंड । जें गगनाहूनि वाड । अति सूक्ष्म ॥ २॥ जें दिसेना ना भासेना । जें उपजेना ना नासेना । जें येईना ना जाईना । परब्रह्म तें ॥ ३॥ जें चळेना ना ढळेना । जें तुटेना ना फुटेना । जें रचेना ना खचेना । परब्रह्म तें ॥ ४॥ जें सन्मुखचि सर्वकाळ । जें निष्कलंक आणि निखळ । सर्वांतर आकाश पाताळ । व्यापूनि असे ॥ ५॥ अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे तें माया सगुण । सगुण आणि निर्गुण । कालवलें ॥ ६॥ या कर्दमाचा विचार । करूं जाणती योगीश्वर । जैसें क्षीर आणि नीर । राजहंस निवडिती ॥ ७॥ जड सकळ पंचभौतिक । त्यामध्यें आत्मा व्यापक । तो नित्यानित्यविवेक । पाहतां कळे ॥ ८॥ उंसामधील घेईजे रस । येर तें सांडिजे बाकस । तैसा जगामध्यें जगदीश । विवेकें ओळखावा ॥ ९॥ रस नाशवंत पातळ । आत्मा शाश्वत निश्चळ । रस अपूर्ण आत्मा केवळ । परिपूर्ण जाणावा ॥ १०॥ आत्म्यासारिखें एक असावें । मग तें दृष्टांतासि द्यावें । दृष्टांतमिसे समजावें । कैसें तरी ॥ ११॥ ऐशी आत्मस्थिति संचली । तेथें माया कैशी झाली । जैशी आकाशीं वाहिली । झुळूक वायूची ॥ १२॥ वायूपासून तेज झालें । तेजापासून आप निपजलें । आपापासून आकारलें । भूमंडळ ॥ १३॥ भूमंडळापासून उत्पत्ती । जीव नेणों झाले किती । परंतु ब्रह्म आदि अंतीं । व्यापून आहे ॥ १४॥ जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें अवघेंचि नासलें । परी मुळीं ब्रह्म तें संचलें । जैसें तैसें ॥ १५॥ घटापूर्वीं आकाश असे । घटामध्येंही आकाश भासे । घट फुटतां न नासे । आकाश जैसें ॥ १६॥ तैसें परब्रह्म केवळ । अचळ आणि अढळ । मध्यें होत जात सकळ । सचराचर ॥ १७॥ जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें आधीं ब्रह्में व्यापिलें । सर्व नासतां उरलें । अविनाश ब्रह्म ॥ १८॥ ऐसें ब्रह्म अविनाश । तें सेविती ज्ञाते पुरुष । तत्त्वनिरसनें आपणास । आपण लाभे ॥ १९॥ तत्त्वें तत्त्व मेळविलें । त्यासि देह ऐसें नाम ठेविलें । तें जाणते पुरुषीं शोधिलें । तत्त्वें तत्त्व ॥ २०॥ तत्त्वझाडा निःशेष होतां । तेथें निमाली देहाहंता । निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता । विवेकें जाहली ॥ २१॥ विवेकें देहाकडे पाहिलें । तों तत्त्वें तत्त्व ओसरलें । आपण कांहीं नाहीं आलें । प्रत्ययासी ॥ २२॥ आपला आपण शोध घेतां । आपुली तों मायिक वार्ता । तत्त्वांतीं उरलें तत्त्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३॥ आपणाविण निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म । तत्त्वासरिसा गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४॥ मीपण पाहतां आढळेना । निर्गुण ब्रह्म तें चळेना । आपण तेंचि परी कळेना । सद्गुरूविण ॥ २५॥ सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें । पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६॥ आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळामध्यें व्यापिलें । सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७॥ होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार । आपला आपणासि विचार । ठायीं पडे ॥ २८॥ आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण । मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९॥ झालिया तत्त्वांचें निरसन । निर्गुण आत्माचि आपण । कां दाखवावें मीपण । तत्त्वनिरसनाउपरी ॥ ३०॥ तत्त्वांमध्यें मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें । सोहंभावें प्रत्यया आलें । आत्मनिवेदन ॥ ३१॥ आत्मनिवेदन होतां । देवभक्तांस ऐक्यता । साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२॥ निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पाप पुण्य । निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३॥ तत्त्वीं वेंटाळूनि घेतला । प्राणी संशयें गुंडाळला । आपणास आपण भुलला । कोहं म्हणे ॥ ३४॥ तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सोहं । अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५॥ याउपरि उर्वरित । तेंचि स्वरूप संत । देहीं असोनि देहातीत । जाणिजे ऐसा ॥ ३६॥ संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे ॥ आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७॥ हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायोद्भवनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


समास चवथा : ब्रह्मनिरूपण श्रीराम ॥ कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र । त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र । द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र । आतां कलियुग ऐका ॥ १॥ कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र । चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र । ऐशीं चतुर्युगें सहस्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २॥ ऐसे ब्रह्मे सहस्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका । विष्णू सहस्र होतां ऐका । पळ एक ईश्वराचें ॥ ३॥ ईश्वर जाय सहस्र वेळ । तैं शक्तीचें अर्ध पळ । ऐशी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४॥ चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् । पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥ विष्णोरेकः सहस्राणि पलमेकं महेश्वरम् । महेश्वरसहस्राणि शक्तेरर्धं पलं भवेत् ॥ ऐशा अनन्त शक्ती होती । अनंत रचना होती जाती । तरी अखंड खंडेना स्थिति । परब्रह्माची ॥ ५॥ परब्रह्मासि कैंची स्थिती । परी ही बोलावयाची रीती । वेदश्रुती नेति नेति म्हणती । परब्रह्मीं ॥ ६॥ चार सहस्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहाटी । उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७॥ चार लक्ष सत्तावीस सहस्र । दोनशें चाळीस संवत्सर । पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८॥ ऐसें रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर । पाहतां येथींचा विचार । अंत न लगे ॥ ९॥ एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर । एक म्हणती शक्ति थोर । सकळांमध्यें ॥ १०॥ ऐसे आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं । यद्दृष्टं तन्नष्टं हें श्रुति । बोलतसे ॥ ११॥ आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां । याचा निश्चयो निवडेना । साधुविण ॥ १२॥ साधु निश्चयो करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक । येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३॥ चित्रीं लिहिली सेना । त्यांत कोण थोर कोण साना । हें कां तुम्ही विचाराना । आपुलें ठायीं ॥ १४॥ स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरही कल्पिलें । परंतु जागें झालिया झालें । कैसें पहा ॥ १५॥ पाहतां जागृतीचा विचार । कैंचें लहान कैंचें थोर । झाला अवघाचि विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६॥ अवघाचि मायिक विचार । कैंचें लहान कैंचें थोर । लहानथोराचा हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७॥ जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतचि मेला । परी याचा विचार पाहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८॥ जयां झालें आत्मज्ञान । तेचि थोर महाजन । वेद शास्त्रें पुराण । साधु संत बोलिले ॥ १९॥ एवं सकळांमध्यें थोर । तो एकचि परमेश्वर । तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २०॥ तो निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार । स्थानमानांचा विचार । ऐलिकडे ॥ २१॥ नांव रूप स्थान मान । हा तों अवघाचि अनुमान । तथापि होईल निदान । ब्रह्मप्रळयीं ॥ २२॥ ब्रह्म प्रळयावेगळें । ब्रह्म नामरूपावेगळें । ब्रह्म कोणा एक्या काळें । जैसें तैसें ॥ २३॥ करिती ब्रह्मनिरूपण । जाणती ब्रह्म संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४॥ हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥


समास पांचवा : मायाब्रह्मनिरूपण श्रीराम ॥ श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें । श्रोत्या वक्‌त्याचे मिषें । निरूपण ऐका ॥ १॥ ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार । ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥ २॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ । ब्रह्म निरुपाधि केवळ । माया उपाधिरूप ॥ ३॥ माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना । माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४॥ माया रचे ब्रह्म रचेना । माया खचे ब्रह्म खचेना । माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५॥ माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना । माया धरे ब्रह्म धरेना । धारणेसी ॥ ६॥ माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना । माया विटे ब्रह्म विटेना । अविट तें ॥ ७॥ माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म कांहींच न करी । माया नाना रूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८॥ माया पंचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक । मायाब्रह्माचा विवेक । विवेकी जाणती ॥ ९॥ माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार । माया अर्ति पारावार । ब्रह्मासि नाहीं ॥ १०॥ सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिति आच्छादिली । परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११॥ गोंडाळ सांडून नीर घेइजे । नीर सांडून क्षीर सेविजे । माया सांडून अनुभविजे । परब्रह्म तैसें ॥ १२॥ ब्रह्म आकाशा ऐसें निवळ । माया वसुंधरा डहुळ । ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरूप ॥ १३॥ ब्रह्म तें अप्रत्यक्ष असे । माया ते प्रत्यक्ष दिसे । ब्रह्म तें समचि असे । माया ते विषमरूप ॥ १४॥ माया लक्ष्य ब्रह्म अलक्ष्य । माया साक्ष ब्रह्म असाक्ष । मायेमध्यें दोन्ही पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं ॥ १५॥ माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत । माया असत् ब्रह्म सत् । ब्रह्मासि नाहीं करणें हित । मायेसि आहे ॥ १६॥ ब्रह्म अखंड घनदाट । माया पंचभौतिक पोंचट । ब्रह्म तें निरंतर निघोट । माया ते जुनी जर्जरी ॥ १७॥ माया घडे ब्रह्म घडेना । माया पडे ब्रह्म पडेना । माया विघडे ब्रह्म विघडेना । जैसें तैसें ॥ १८॥ ब्रह्म असतचि असे । माया निरसितांच निरसे । ब्रह्मास कल्पांत नसे । मायेसि असे ॥ १९॥ माया कठिण ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म विशाळ । माया नसे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २०॥ वस्तु नव्हे बोलिजे ऐशी । माया जैशी बोलिजे तैशी । काळ पावेना वस्तूसी । मायेसी झडपी ॥ २१॥ नाना रूप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग । माया भंगे ब्रह्म अभंग । जैसें तैसें ॥ २२॥ आतां असो हा विस्तार । चालत जातें सचराचर । तितुकी माया परमेश्वर । सबाह्य अभ्यंतरीं ॥ २३॥ सकळ उपाधींवेगळा । तो परमात्मा निराळा । जळीं असोन नातळे जळा । आकाश जैसें ॥ २४॥ मायाब्रह्मांचें विवरण । करितां चुके जन्ममरण । संतांसि गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५॥ अरे या संतांचा महिमा । बोलावया नाहीं सीमा । जयांचेनि जगदात्मा । अंतरींच होय ॥ २६॥ हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायाब्रह्मनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


समास सहावा : सृष्टीकथन श्रीराम ॥ सृष्टीपूर्वींच ब्रह्म असे । तेथें सृष्टि मुळींच नसे । आतां सृष्टि दिसत असे । ते सत्य कीं मिथ्या ॥ १॥ तुम्ही सर्वज्ञ गोसावी । माझी आशंका फेडावी । ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २॥ आतां ऐका प्रत्युत्तर । कथेसि व्हावें तत्पर । वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाहला ॥ ३॥ जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन । येणें वाक्यें सत्यपण । सृष्टीस आलें ॥ ४॥ यद्दृष्टं तन्नष्टं येणें- । वाक्यें सृष्टि मिथ्यापणें । सत्य मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५॥ सत्य म्हणों तरी नासे । मिथ्या म्हणों तरी दिसे । आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६॥ सृष्टीमध्यें बहु जन । अज्ञान आणि सज्ञान । म्हणोनियां समाधान । होत नाहीं ॥ ७॥ ऐका अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत । देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि आहे ॥ ८॥ बोले सर्वज्ञांचा राजा । मूर्खस्य प्रतिमापूजा । ब्रह्मप्रळयाच्या पैजा । घालूं पाहे ॥ ९॥ तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी संध्या स्नान । गुरुभजन तीर्थाटन । कासया करावें ॥ १०॥ तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दम् । वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः । वादे वादे जायते तत्त्वबोधः । बोधे बोधे भासते चन्द्रचूडः ॥ १॥ ऐसें चन्द्रचूडाचें वचन । सद्गुरूचें उपासन । गुरुगीतानिरूपण । बोलिलें हरें ॥ ११॥ गुरूसि कैसें भजावें । आधीं तयासि ओळखावें । त्याचें समाधान घ्यावें । विवेकें स्वयें ॥ १२॥ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ १॥ गुरुगीतेचें वचन । ऐसें सद्गुरूचें ध्यान । तेथें सृष्टि मिथ्या भान । उरेल कैंचें ॥ १३॥ ऐसें सज्ञान बोलिला । सद्गुरु तो ओळखिला । सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्चितार्थ ॥ १४॥ श्रोता ऐसें न मानी कदा । अधिक उठिला विवादा । म्हणे कैसा रे गोविंदा । अज्ञान म्हणतोसी ॥ १५॥ जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन । तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६॥ ऐसा श्रोता आक्षेप करी । विषाद मानिला अंतरीं । याचें प्रत्युत्तर चतुरीं । सावध परिसावें ॥ १७॥ गीतेंत बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद । म्हणोनियां व्यर्थ खेद । वाहतोसि ॥ १८॥ अश्वत्थः सर्ववृक्षाणां । माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ । वृक्ष तोडितां तत्काळ । तुटत आहे ॥ १९॥ नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ १॥ शस्त्रांचेनि तुटेना । अग्नीचेनि जळेना । उदकामध्यें कालवेना । स्वरूप माझें ॥ २०॥ पिंपळ तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकानें । पिंपळ कालवे उदकानें । नाशवंत ॥ २१॥ तुटे जळे बुडे उडे । आतां ऐक्य कैसें घडे । म्हणोनि हें उजेडे । सद्गुरुमुखें ॥ २२॥ इन्द्रियाणां मनश्चास्मि' । कृष्ण म्हणे मन तो मी । तरी कां आवरावी ऊर्मी । चंचळ मनाची ॥ २३॥ ऐसें कृष्ण कां बोलिला । साधनमार्ग दाखविला । खडे मांडूनि शिकविला । ओनामा जेवीं ॥ २४॥ ऐसा आहे वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद । देहबुद्धीचा विवाद । कामा नये ॥ २५॥ वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती । ते सर्वही निवडती । सद्गुरूचेनि वचनें ॥ २६॥ वेदशास्त्रांचें भांडण । शस्त्रें तोडी ऐसा कोण । हें निवडेना साधुविण । कदा कल्पांतीं ॥ २७॥ पूर्वपक्ष आणि सिद्धांत । शास्त्रीं बोलिला संकेत । याचा होय निश्चितार्थ । साधुमुखें ॥ २८॥ येऱ्हवीं वादाचीं उत्तरें । एकाहूनि एक थोरें । बोलूं जातां अपारें । वेदशास्त्रें ॥ २९॥ म्हणोनि वादविवाद । सांडूनि कीजे संवाद । तेणें होय ब्रह्मानंद । स्वानुभवें ॥ ३०॥ एके कल्पनेचे पोटीं । होती जाती अनंत सृष्टी । तया सृष्टीची गोष्टी । साच केवीं ॥ ३१॥ कल्पनेचा केला देव । तेथें झाला दृढ भाव । देवालागीं येतां खेव । भक्त दुःखें दुखवला ॥ ३२॥ पाषाणाचा देव केला । एके दिवशीं भंगोनि गेला । तेणें भक्त दुखवला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३॥ देव हारपला घरीं । एक देव नेला चोरीं । एक देव दुराचारीं । फोडिला बळें ॥ ३४॥ एक देव जापाणिला । एक देव उदकीं टाकिला । एक देव नेऊन घातला । पायांतळीं ॥ ३५॥ काय सांगों तीर्थमहिमा । मोडोनि गेला दुरात्मा । थोर सत्व होतें तें मा । काय जाहलें कळेना ॥ ३६॥ देव घडिला सोनारीं । देव ओतिला ओतारीं । एक देव घडिला पाथरीं । पाषाणाचा ॥ ३७॥ नर्मदा गंडिकातीरीं । देव पडिले लक्षवरी । त्यांची संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८॥ चक्रतीर्थीं चक्रांकित । देव असती असंख्यात । नाहीं मनीं निश्चितार्थ । एक देव ॥ ३९॥ बाण तांदळे ताम्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें । ऐसे देव कोण जाणे । खरे कीं खोटे ॥ ४०॥ देव रेशिमाचा केला । तोही तुटोनियां गेला । आतां नवा नेम धरिला । मृत्तिकेच्या लिंगाचा ॥ ४१॥ आमचा देव बहु सत्य । आम्हांस आकांतीं पावत । पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२॥ आतां याचें सत्त्व गेलें । प्राप्त होतें तें झालें । प्राक्तन नवचे पालटिलें । ईश्वराचेनि ॥ ४३॥ धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा । तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ ४४॥ हे आपुलाली कल्पना । प्राक्तना-ऐशीं फळें जाणा । परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याचि ॥ ४५॥ नानाशास्त्रविदो लोका नानादैवतपूजकाः । आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १॥ म्हणोनि हें माया भ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें । वेद शास्त्रें पुराणें । ऐशींच बोलती ॥ ४६॥ साधु संत महानुभाव । त्यांचा ऐसाचि अनुभव । पंचभूतातीत देव । सृष्टि मिथ्या ॥ ४७॥ सृष्टीपूर्वीं सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संहारतां । शाश्वत देव तत्त्वतां । आदि अंतीं ॥ ४८॥ ऐसा सर्वांचा निश्चयो । यदर्थीं नाहीं संशयो । व्यतिरेक आणि अन्वयो । कल्पनारूप ॥ ४९॥ एके कल्पनेचे पोटीं । बोलिजेती अष्ट सृष्टि । तये सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५०॥ एक कल्पनेची सृष्टी । दुसरी शाब्दिक सृष्टी । तिसरी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१॥ चौथी चित्रलेप सृष्टी । पांचवी स्वप्नसृष्टी । साहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी सातवी ॥ ५२॥ आठवी दृष्टिबंधन । ऐशा अष्ट सृष्टि जाण । यांमध्ये श्रेष्ठ कोण । सत्य मानावी ॥ ५३॥ म्हणोन सृष्टी नाशवंत । जाणती संत महंत । सगुण भजावा निश्चित । निश्चयालागीं ॥ ५४॥ सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासारविचारें । संतसंगें ॥ ५५॥ आतां असो हें बहुत । संतसंगें केलें नेमस्त । येरवीं चित्त दुश्चित । संशयीं पडे ॥ ५६॥ तंव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टी मिथ्या ऐसें कळलें । परी हें दृश्य अवघें नाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७॥ दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोनि सत्यचि वाटतें । यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८॥ याचें प्रत्युत्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें । श्रोतीं श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९॥ एवं सृष्टि मिथ्या जाण । जाणोनि रक्षावें सगुण । ऐशी हे अनुभवाची खूण । अनुभवी जाणती ॥ ६०॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सृष्टिकथानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६॥


समास सातवा : सगुणभजन श्रीराम ॥ ज्ञानें दृश्य मिथ्या झालें । तरी कां पाहिजे भजन केलें । तेणें काय प्राप्त झालें । हें मज निरूपावें ॥ १॥ ज्ञानाहून थोर असेना । तरी कां पाहिजे उपासना । उपासनेनें जनां । काय प्राप्त ॥ २॥ मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेचिना सगुण । भजन केलियाचा गुण । मज निरूपावा ॥ ३॥ जें प्रत्यक्ष नाशवंत । त्यासि भजावें किंनिमित्त । सत्य सांडून असत्य । कोणें भजावें ॥ ४॥ असत्याचा प्रत्ययो आला । तरी मग नेम कां लागला । सत्य सांडून गलबला । कासया करावा ॥ ५॥ निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यय येतो । सगुण काय देऊं पाहतो । सांगा स्वामी ॥ ६॥ सगुण नाशवंत ऐसें सांगतां । पुनः भजन करावें म्हणतां । तरी कासयासाठीं आतां । भजन करूं ॥ ७॥ स्वामीचे भिडेनें बोलवेना । येऱ्हवीं हें कांहींच मानेना । साध्यचि झालिया साधना । कां प्रवर्तावें ॥ ८॥ ऐसें श्रोतयाचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें । याचें उत्तर ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९॥ सद्गुरु वचन प्रतिपालन । हेंचि मुख्य परमार्थाचें लक्षण । वचनभंग करितां विलक्षण । सहजचि जाहलें ॥ १०॥ म्हणोनि आज्ञेसि वंदावें । सगुण भजन मानावें । श्रोता म्हणे हें देवें । कां प्रयोजिलें ॥ ११॥ काय मानिला उपकार । कोण झाला साक्षात्कार । किंवा प्रारब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२॥ होणार हें तों पालटेना । भजनें काय करावें जना । हें तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३॥ स्वामीची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण । परंतु याचा काय गुण । मज निरूपावा ॥ १४॥ वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाची लक्षणें । तुज कांहीं लागे करणें । किंवा नाहीं ॥ १५॥ करणें लागे भोजन । करणें लागे उदकप्राशन । मळमूत्रत्यागलक्षण । तेंही सुटेना ॥ १६॥ जनाचें समाधान राखावें । आपुलें पारिखें ओळखावें । आणि भजनचि मोडावें । हें कोण ज्ञान ॥ १७॥ ज्ञान विवेकें मिथ्या झालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें । तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८॥ साहेबास लोटांगणीं जावें । नीचासारिखें व्हावें । आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान ॥ १९॥ हरि हर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तूं एक मानवी रंक । भजसि ना तरी काय गेलें ॥ २०॥ आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ । जो समर्थाचाही समर्थ । देवां सोडविता ॥ २१॥ त्याचे आम्ही सेवकजन । सेवा करितां झालें ज्ञान । तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२॥ सद्गुरु सांगती सारासार । त्यास कैसें म्हणावें असार । तुज काय सांगणें विचार । शाहाणे जाणती ॥ २३॥ समर्थाचे मनींचें तुटे । तेंचि जाणावें अदृष्ट खोटें । राज्यपदापासून करंटें । चेवलें जैसें ॥ २४॥ मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी । विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५॥ वस्तु भजन करीना । न करीं ऐसेंही म्हणेना । तरी जाणावी ती कल्पना । दडोन राहिली ॥ २६॥ ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान । तेथें नाहीं कीं अनुमान । प्रत्ययो तुझा ॥ २७॥ तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें । तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना ऐसें ॥ २८॥ करी दुर्जनांचा संहार । भक्तजनांचा आधार । ऐसा हा चमत्कार । रोकडा चाले ॥ २९॥ मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि जातें । कृपा केलिया रघुनाथें । प्रचीति येते ॥ ३०॥ रघुनाथभजनें ज्ञान झालें । रघुनाथभजनें महत्व वाढलें । म्हणोनि तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१॥ हें तों आहे सप्रचीत । आणि तुज वाटेना प्रचित । साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥ ३२॥ रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तत्काळचि सिद्धि पावे । कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥ ३३॥ कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुण निवेदन । निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४॥ मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा । प्रतीत पाहसी तरी आतां । शीघ्रचि आहे ॥ ३५॥ मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी । राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६॥ एके भावनेसाठीं । देवासि पडे तुटी । कां ते होय कृपादृष्टी । देव कर्ताभावितां ॥ ३७॥ आपण आहे दों दिवसांचा । आणि देव बहुतां काळांचा । आपण थोडे ओळखीचा । देवास त्रैलोक्य जाणे ॥ ३८॥ याकारणें रघुनाथ भजन । त्यासि मानिती बहुत जन । ब्रह्मादिक आदिकरून । रामभजनीं तत्पर ॥ ३९॥ ज्ञानबळें उपासना । अम्ही भक्त जरी मानूं ना । तरी या दोषाचिया पतना । पावों अभक्तपणें ॥ ४०॥ देव उपेक्षी थोरपणें । तरी मग त्याचें तोचि जाणे । अप्रमाण तें श्लाघ्यवाणें । नव्हेचि कीं श्रेष्ठा ॥ ४१॥ देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना । ऐशी स्थिति सज्जना । अंतरींची ॥ ४२॥ सकळ मिथ्या होऊन जातें । हें रामभजनें कळों येतें । दृश्य ज्ञानियांचें मतें । स्वप्न जैसें ॥ ४३॥ मिथ्या स्वप्नविवंचना । तैशी हे सृष्टिरचना । दृश्य मिथ्या साधुजनां । कळों आलें ॥ ४४॥ आक्षेप झाला श्रोतयांसी । मिथ्या तरी दिसतें कां आम्हासीं । याचें उत्तर पुढिलें समासीं । बोलिलें असे ॥ ४५॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥


समास आठवा : दृश्यनिरूपण श्रीराम ॥ मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें । त्याचें उत्तर बोलिजेल तें । सावधान ऐका ॥ १॥ देखिलें तें सत्यचि मानावें । हें ज्ञात्याचें देखणें नव्हे । जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे ॥ २॥ एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी । संतमहंतांच्या गोष्टी । त्याही मिथ्या मानाव्या ॥ ३॥ माझें दिसतें हेंचि खरें । तेथें चालेना दुसरें । ऐशिया संशयाच्या भरें । भरोंचि नये ॥ ४॥ मृगें देखिलें मृगजळ । तेथें धांवे तें बरळ । जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूसि कोणें म्हणावें ॥ ५॥ रात्रौ स्वप्न देखिलें । बहुत द्रव्य सांपडलें । बहुत जनांसि वेव्हारिलें । तें खरें कैसेनि मानावें ॥ ६॥ कुशळ चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र । देखतां उठे प्रीति मात्र । परंतु तेथें मृत्तिका ॥ ७॥ नाना वनिता हस्ती घोडे । रात्रौ देखतां मन बुडे । दिवसा पाहतां कातडें । कंटाळवाणें ॥ ८॥ काष्ठी पाषाणी पुतळ्या । नाना प्रकारें निर्मिल्या । परम सुंदर वाटल्या । परंतु तेथें पाषाण ॥ ९॥ नाना गोपुरीं पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं पाहती । लाघव देखता भरे वृत्ती । परंतु तेथें त्रिभाग ॥ १०॥ खेळतां नेटके दशावतारी । तेथें येती सुंदर नारी । नेत्र मोडिती कळाकुसरीं । परी ते अवघे धटिंगण ॥ ११॥ सृष्टि बहुरंगी असत्य । बहुरूपाचें हें कृत्य । तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या ॥ १२॥ मिथ्या साचासारिखें देखिलें । परी तें पाहिजे विचारिलें । दृष्टि तरळतां भासलें । तें साच कैसें मानावें ॥ १३॥ वरी पाहतां पालथें आकाश । उदकीं पाहतां उताणें आकाश । मध्यें चांदण्याचाही प्रकाश । परी तें अवघें मिथ्या ॥ १४॥ नृपतीनें चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले । पाहतां तेचि ऐसे गमले । परी ते अवघे मायिक ॥ १५॥ नेत्रीं कांहीं बाहुली नसे । जेव्हां जें पहावें तेव्हां तें भासे । डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ॥ १६॥ जितुके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्यें रूपें दिसती । क्षणामध्यें फुटोनि जाती । रूपें मिथ्या ॥ १७॥ लघुदर्पणें दोनी चारी होतीं । तितुकीं मुखें प्रतिबिंबती । परी तीं मिथ्या आदिअंतीं । एकचि मुख ॥ १८॥ नदीतीरीं भार जातां । दुसरा भार दिसे पालथा । कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ॥ १९॥ वापी सरोवरांचें नीर । तेथें पशु पक्षी नर वानर । नाना पत्रें वृक्ष विस्तार । दिसे दोहीं सवां ॥ २०॥ एक शस्त्र झाडूं जातां । दोन दिसती तत्त्वतां । नाना तंतु टणत्कारितां । द्विधा भासती ॥ २१॥ कां ते दर्पणाचे मंदिरीं । बैसली सभा दिसे दुसरी । बहुत दीपांचिये हारीं । बहुत छाया दिसती ॥ २२॥ ऐसें हें बहुविध भासे । साचासारिखें दिसे । परी हें सत्य म्हणोन कैसें । विश्वासावें ॥ २३॥ माया मिथ्या बाजीगिरी । दिसे साचाचिये परी । परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये ॥ २४॥ लटिकें साचा ऐसे भावावें । तरी मग पारखी कासया असावें । एवं ये अविद्येचे गोवें । ऐसेचि असती ॥ २५॥ मनुष्यांची बाजीगिरी । बहुत जनां वाटे खरी । शेवट पाहतां निर्धारीं । मिथ्या होय ॥ २६॥ तैशीच माव राक्षसांची । देवांसही वाटे साची । पंचवटिकेसि मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७॥ पूर्वकाया पालटिती । एकाचेचि बहुत होती । रक्तबिंदीं जन्मती । रजनीचर ॥ २८॥ नाना पदार्थ फळेंचि झाले । द्वारकेमध्यें प्रवेशले । कृष्णें दैत्य किती वधिले । कपटरूपी ॥ २९॥ कैसें कपट रावणाचें । शिर केलें मावेचें । काळनेमीच्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३०॥ नाना दैत्य कपटमती । जे देवांसही नाटोपती । मग निर्माण होऊन शक्ती । संहार केला ॥ ३१॥ ऐसी राक्षसांची माव । जाणों न शकती देव । कपटविद्येचें लाघव । अघटित ज्यांचें ॥ ३२॥ मनुष्यांची बाजीगिरी । राक्षसांची वोडंबरी । भगवंताची नानापरी । विचित्र माया ॥ ३३॥ हे साचासारिखीच देइसे । विचारितांचि निरसे । मिथ्याच परी आभासे । निरंतर ॥ ३४॥ साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे । दोहीं पदार्थीं अविश्वासे । सांगतां मन ॥ ३५॥ परंतु हें नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार । दिसतें हें स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६॥ तथापि असो तुजला । भासचि सत्य वाटला । तरी तेथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७॥ दृश्यभास अविद्यात्मक । तुझाही देह तदात्मक । म्हणोनि हा विवेक । तेथें संचरला ॥ ३८॥ दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावरी बैसलें । परी तें लिंगदेह झालें । अविद्यात्मक ॥ ३९॥ अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोन गोष्टी विश्वासली । तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४०॥ तेचि काया मी आपण । हें देहबुद्धीचें लक्षण । येणेंकरितां झालें प्रमाण । दृश्य अवघें ॥ ४१॥ इकडे सत्य मानिला देह । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह । दोंहींमध्यें हा संदेह । पैसावला बळें ॥ ४२॥ देहबुद्धी केली बळकट । आणि ब्रह्म पाहों गेला धीट । तों दृश्यानें रोधिली वाट । परब्रह्माची ॥ ४३॥ तेथें साच मानिलें दृश्याला । निश्चयचि बाणोनि गेला । पहा हो केवढा चुका पडिला । अकस्मात ॥ ४४॥ आतां असो हें बोलणें । ब्रह्म न पाविजे मीपणें । देहबुद्धीची लक्षणें । दृश्य भाविती ॥ ४५॥ अस्थींच्या देहीं मांसाचा गोळा । पाहेन म्हणे ब्रह्मींचा सोहळा । तो ज्ञाता नव्हे आंधळा । केवळ मूर्ख ॥ ४६॥ दृष्टीस दिसे मनास भासे । तितुकें काळांतरीं नासे । म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रह्म तें ॥ ४७॥ परब्रह्म तें शाश्वत । माया तेचि अशाश्वत । ऐसा बोलिला निश्चितार्थ । नानाशास्त्रीं ॥ ४८॥ आतां पुढें निरूपण । देहबुद्धीचें लक्षण । चुका पडिला तो कोण । बोलिलें असे ॥ ४९॥ मी कोण हें जाणावें । मीपण त्यागून अनन्य व्हावें । मग समाधान तें स्वभावें । अंगीं बाणे ॥ ५०॥ हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके दृश्यनिरसनं नाम अष्टमः समासः ॥ ८॥


श्री रघुवीर समर्थ ॥ समास नववा : सारशोधन श्रीराम ॥ गुप्त आहे उदंड धन । काय जाणती सेवकजन । तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचें ॥ १॥ गुप्त ठेविले उदंड अर्थ । आणि प्रगट दिसती पदार्थ । शहाणे शोधिति स्वार्थ । अंतरीं असे ॥ २॥ तैसें दृश्य हें मायिक । पाहत असती सकळ लोक । परी जयांस ठाउका विवेक । ते अंतर जाणती ॥ ३॥ द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें । तयाचें अभ्यंतर कळलें । समर्थ जनांसी ॥ ४॥ तैसे ज्ञाते जे समर्थ । तिहीं ओळखिला परमार्थ । इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थांचा ॥ ५॥ काबाडी वाहती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्नें जाड । हें जयांचें त्यांस गोड । कर्मयोगें ॥ ६॥ एक काष्ठस्वार्थ करिती । एक शुभा एकवटिती । तैसे नव्हेत कीं नृपती । सारभोक्ते ॥ ७॥ जयांस आहे विचार । ते सुखासनीं झाले स्वार । इतर ते जवळील भार । वाहतचि मेले ॥ ८॥ एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा सावडिती । आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥ ९॥ सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेइजे वृथापुष्टीं । सारासाराची गोष्टी । सज्ञान जाणती ॥ १०॥ गुप्त परिस चिंतामणी । प्रगट खडे काचमणी । गुप्त हेम रत्नखाणी । प्रगट पाषाण मृत्तिका ॥ ११॥ अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पती अमूल्य । एरंड धोत्रे बहुसाल । प्रगट शिंपी ॥ १२॥ कोठें दिसेना कल्पतरू । उदंड शेरांचा विस्तारू । पाहतां नाहीं मैलागरू । बोरी बाभळी उदंड ॥ १३॥ कामधेनु जाणिजे इंद्रें । सृष्टींत उदंड खिल्लारें । महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतरां कर्मानुसार ॥ १४॥ नाना व्यापार करिती जन । अवघेच म्हणती सकांचन । परंतु कुबेराचें महिमान । कोणासीच न ये ॥ १५॥ तैसा ज्ञानी योगीश्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्वर । इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥ १६॥ तस्मात् सार तें दिसेना । आणि असार तें दिसे जनां । सारासारविवंचना । साधु जाणती ॥ १७॥ दिसेना जें गुप्त धन । तयास करणें लागे अंजन । गुप्त परमात्मा सज्जन । संगतीं शोधावा ॥ १९॥ रायाचें सान्निध्य होतां । सहजचि लाभे श्रीमंतता । तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥ २०॥ सद्वस्तूस लाभे सद्वस्तु । अव्यवस्थासि अव्यवस्थु । पाहतां प्रशस्तासि प्रशस्तु । विचार लाभे ॥ २१॥ म्हणोनि हें दृश्यजात । अवघें आहे अशाश्वत । परमात्मा अच्युत अनंत । तो या दृष्यावेगळा ॥ २२॥ दृश्यावेगळा दृश्याअन्तरीं । सर्वात्मा तो चराचरीं । विचार पाहतां अंतरीं । निश्चयो बाणे ॥ २३॥ संसारत्याग न करितां । प्रपंचौपाधि न सांडितां । जनांमध्ये सार्थकता । विचारेंचि होय ॥ २४॥ हें प्रचीतीचें बोलणें । विवेकें प्रचीत बाणे । प्रचीत पाहतील ते शहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५॥ प्रचीत आणि अनुमान । उधार आणि रोकडें धन । मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यास महदंतर ॥ २६॥ पुढें जन्मांतरीं होणार । हा तो अवघाच उधार । तैसें नव्हे सारासार । तत्काळ लभे ॥ २७॥ तत्काळचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो । संशय अवघाचि तुटतो । जन्ममरणांचा ॥ २८॥ याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें । मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारें ॥ २९॥ ये गोष्टीस करी अनुमान । तो शीघ्रचि पावेल पतन । मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३०॥ हें यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्रचि मुक्त होणें । असोनि कांहींच नसणें । जनांमध्यें ॥ ३१॥ देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण । हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२॥ देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे । संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरुवचनें ॥ ३४॥ हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके सारशोधननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥


जय जय रघुवीर समर्थ ॥ समास दहावा : अनुर्वाच्यनिरूपण श्रीराम ॥ समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें नाहीं । तरी तें कैसें आहे सर्वही । मज निरूपावें ॥ १॥ मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥ २॥ अनुभवही पुसों जातां । म्हणती न ये कीं सांगतां । तरी कोणापाशीं पुसों आतां । समाधान ॥ ३॥ जे ते अगम्य सांगती । न ये माझिया प्रचीती । विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४॥ ऐसें श्रोतयाचें उत्तर । याचें कैसें प्रत्युत्तर । निरूपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५॥ जें समाधानाचें स्थळ । कीं तो अनुभवचि केवळ । तेंचि स्वरूप प्रांजळ । बोलून दाऊं ॥ ६॥ जें बोलास आकळेना । बोलिल्याविणही कळेना । जयास कल्पितां कल्पना । हिंपुटी होय ॥ ७॥ तें जाणावें परब्रह्म । जें वेदांचें गुह्य परम । धरितां संत समागम । सर्वही कळे ॥ ८॥ तेंचि आतां सांगिजेल । जें समाधान सखोल । ऐक अनुभवाचे बोल । अनिर्वाच्य वस्तु ॥ ९॥ सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळावया गूळ देणें । ऐसें हें सद्गुरुविणें । होणार नाहीं ॥ १०॥ सद्गुरुकृपा कळे त्यासी । जो शोधील आपणासी । पुढें कळेल अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११॥ दृढ करूनियां बुद्धि । आधीं घ्यावी आपुली शुद्धी । तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२॥ आपुलें मूळ बरें शोधितां । आपुली तों मायिक वार्ता । पुढें वस्तूच तत्त्वतां । समाधान ॥ १३॥ आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं । जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि साधु ॥ १४॥ सिद्धांत वस्तु लक्षूं जातां । सर्वसाक्षिणी ते अवस्था । आत्मा त्याहून परता । अवस्थातीत ॥ १५॥ पदार्थज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे । ते समयीं फुंज उतरे । मीपणाचा ॥ १६॥ जेथें मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण । अनिर्वाच्य समाधान । याकारणें बोलिजे ॥ १७॥ अत्यंत विचाराचे बोल । तरी ते मायिकचि फोल । शब्द सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८॥ शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहतां शब्द व्यर्थ । शब्द सांगें तें यथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९॥ शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहतां शब्द नासे । शब्द फोल अर्थ असे । घनदाटपणें ॥ २०॥ भूसाकरितां धान्य निपजे । धान्य घेऊन भूस टाकिजे । तैसा भूस शब्द जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१॥ पोंचटामध्यें घनवट । घनवटीं उडे पोंचट । तैसा शब्द हा फलकट । परब्रह्मीं ॥ २२॥ शब्द बोलूनि राहे । अर्थ शब्दापूर्वींच आहे । याकारणें न साहे । उपमा तया अर्थासी ॥ २३॥ भूस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४॥ दृश्यावेगळें बोलिजे । त्यास वाच्यांश म्हणिजे । त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५॥ ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष्य । लक्षिला न वचे ॥ २६॥ जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभवाचा गाभा । ऐसा तोही उभा । कल्पित केला ॥ २७॥ मिथ्या कल्पनेपासून झाला । खरेंपण कैसें असेल त्याला । म्हणोनि तेथें अनुभवाला । ठावचि नाहीं ॥ २८॥ दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव । याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९॥ अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि लाजे । म्हणोनियां बोलणें साजे । अनिर्वाच्य ॥ ३०॥ दिवसरजनीचें परिमित । करावया मूळ आदित्य । तो आदित्य गेलिया उर्वरित । त्यासि काय म्हणावें ॥ ३१॥ शब्द मौनाचा विचार । व्हावया मूळ ओंकार । तो ओंकार गेलिया उच्चार । कैसा करावा ॥ ३२॥ अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेचि करितां । ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥ वस्तु एक आपण एक । ऐशी असती वेगळीक । तरी अनुभवाचा विवेक । बोलों येता मुखें ॥ ३४॥ वेगळेपणाची माता । ते लटिकी वंध्येची सुता । म्हणूनियां अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५॥ अजन्मा होता निजला । तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । सद्गुरूसी शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६॥ सद्गुरुकृपेस्तव । झाला संसार वाव । ज्ञान झालिया ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७॥ आहे तितुकें नाहीं झालें । नाहीं नाहींपणें निमालें । आहे नाहीं जाऊन उरलें । नसोन कांहीं ॥ ३८॥ शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान । तेणें झालें समाधान । ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिति ॥ ३९॥ अद्वैतनिरूपण होतां । निमाली द्वैताची वार्ता । ज्ञानचर्चा बोलों जातां । जागृति आली ॥ ४०॥ श्रोतीं व्हावें सावधान । अर्थीं घालावें मन । खुणे पावतां समाधान । अंतरीं कळे ॥ ४१॥ तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावारीं गेलें । अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२॥ तेथें शब्देंविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता । ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३॥ तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊन जागृतीस आला । तेथें तर्क कुंठित जाहला । अंत न लगे ॥ ४४॥ या निरूपणाचें मूळ । केलेंच करूं प्रांजळ । तेणें अंतरीं निवळ । समाधान कळे ॥ ४५॥ तंव शिष्यें विनविलें । जी हें आतां निरूपिलें । तरी पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६॥ मज कळाया कारण । केलेंच करावें निरूपण । तेथील जे का निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७॥ अजन्मा तो सांगा कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न । येथें कैसें निरूपण । बोलिलें आहे ॥ ४८॥ जाणोनि शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्युत्तर । तेंचि आतां अति तत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९॥ ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंचि जण । तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोही आतां सांगतों ॥ ५०॥ स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार । तेथें तुवां सारासार । विचार केला ॥ ५१॥ रिघोनि सद्गुरूसी शरण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी उणखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२॥ याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव । निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३॥ ज्ञानगोष्टीचा गलबला । सरोन अर्थ प्रगटला । याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४॥ तुज वाटे हे जागृती । मज झाली अनुभवप्राप्ती । या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥ अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला । हाही स्वप्नींचा चेइला । नाहींस बापा ॥ ५६॥ जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी । जागेपणीं स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७॥ स्वप्नीं वाटे जागेपण । तैशी अनुभवाची खूण । आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप ॥ ५८॥ जागृति यापैलीकडे । तें सांगणें केवीं घडे । जेथें धारणाचि मोडे । विवेकाची ॥५९॥ म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये ऐसें जाण । निःशब्दाची ऐशी खूण । ओळखावी ॥ ६०॥ ऐसें आहे समाधान । बोलतांच न ये जाण । इतुकेनें बाणली खूण । निःशब्दाची ॥ ६१॥ हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके अनिर्वाच्यनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥ ॥ दशक सहावा समाप्त ॥

N/A

N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP