गाये तो गाणुं नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ॥१॥
नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ॥धृ॥
पढे तो पढता उपलवी भक्ता । कवित्व करितां ख्याती लागीं ॥३॥
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिकें । जंव जीव सात्त्विकें विनटेना ॥४॥
श्रीमंत श्री कानहोबा महाराज या अभंगातून संतांचे लक्षण व्यावृत्तीपूर्वक सांगतात. संतांच्या बाबतीत समाजात फारच मोठा गैरसमज आहे. संतांविषयी अपार श्रद्धा मनामध्यें असल्यामुळे वास्तव संतांच्या देशात, वेषात, कृतीत असणाऱ्या कोणालाही संत मानले जाते. सर्व सामान्यांपेक्षा कांही वेगळेपण असले (गोधडी पांघरणें, उघडे अथवा गुहेत राहणे, मौन धरणे इ.) की त्यांना संत मानले जाते. वास्तविक संतत्व हा बाहेरून दिसणारा घटक नाही, तो अनुभवात्मक घटक असल्यामुळे संत ओळखण्याकरिता स्वतः संत असावे लागते. “तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ ” महाराज स्वतः संत असल्यामुळे सामान्य श्रद्धावान समाज ज्यांना संत मानतो, त्याला ते संत कसे मानतील? म्हणून संत आणि असंत यांची निवड करून संत कोण आहे आणि संत कोण नाही याचे स्पष्टीकरण महाराज या अभंगातून करतात.
संत विचार
गाये तो गाणुं नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ॥१॥
कोणी एखादा सुंदर गात असेल, त्याला नैसर्गीक रित्या ताल, सूर, लय, गायनातील राग रागीणीचे ज्ञान आणि आवाजात गोडवा हे गुण असतील तर तो माणासालाच काय पण पशूलाही गायनाने मोहित करू शकतो. म्हणून तो संत होतो असे मात्र नाही. तर तो गायक आहे, संत नाही, तसेच नृत्याची कला प्राप्त असणारा, हाव-भाव, कटाक्ष या द्वारा लोकांना रंजवणारा हा नाचा असतो, संत नाही.
नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ॥धृ॥
खुप श्रवण करणारा हा बहुश्रुत आहे. तो भेदाला वास्तव मानणारा असल्यामुळे तो सिद्ध, संत, योगी अथवा भक्त नाही, तर तो लोकांमध्ये दंभ करणारा आहे, तोही संत नाही.
पढे तो पढता उपलवी भक्ता | कवित्व करितां ख्याती लागीं ॥३॥
शास्राभ्यास करणारा विद्वान असेल, तो लोकांना शास्त्र समाजावून सांगणारा पंडीत होईल, काव्य करणारा कवी होईल. तो स्वताःच्या प्रसिद्धीकरीता काव्य करीत असेल, परंतु तो संत नाही.
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिकें । जंव जीव सात्त्विकें विनटेना ॥४॥
ही सर्वच संतांची वरवरची, बाह्य लक्षणे धारण करणारे लबाड, धोकेबाज आणि ढोंगी आहेत. त्यांना संत समजून त्यांचे अनुकरण कोणीही करू नये. तुका म्हणे नाही निरसला देह । तबरी अवघे संसारिक ॥ संतत्व तेव्हां प्राप्त होते, जेव्हां जीव, जीवपणाचा बळी देऊन परमात्म रूपाशी पूर्णतः ऐक्य पावतो, अर्थात् स्वतः परब्रह्मस्वरूप होतो. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- “ते चालते ज्ञानाचे बींव । तयाचे अवयव ते सुखाचे कोंब । येर मानुसपण ते भांब । लौकिक भागु ॥” तर वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात-“तुका म्हणे मिळे जिवाचिये साठी । नाहीतरी गोष्टी बोलू नये”॥ त्यासाठी अंतःकरणांतील सत्वगुण बाढवून त्याद्वारे रजोगुण आणि तमोगुण यांना बाहेर काढून आणि आत्मज्ञानाने आपण गुणातीत होऊन स्वस्वरूपाशी जो एकरूप होतो तो संत आहे. असे कान्हुराज महाराज म्हणतात.