प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन
सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.
आता सांगेन मुख्य साधन। घेवोनिया शास्त्रार्थ प्रमाण ।
वासनेचे करी हनन । विशेषत: ॥१॥
जयाची खुंटली वासना। संकल्प मुरले जाणा।
तया प्राणियांच्या यातना। चुकल्या सर्वथा ॥२॥
नित्यानित्य-विचारावीण। वासना न खुंटेचि जाण ।
शोधू जाता नित्य निधान । अनित्य उडेल निश्चये ॥३॥
प्रथम आत्मा-अनात्मा कोण। हेचि काढावे निवडोन ।
तयासीच आत्मविचार जाण। म्हणती संतयोगी ते ॥४॥
जंव तू आत्मविचार करिशी। तवं ते अनात्म सर्व सांडिशी।
तीन देहांविरहित होशी । सत्य जाण बापा रे! ॥५॥
देह द्वयाचे चळण। वर्तती इंद्रिये आणि प्राण।
सप्तधातूंचे प्रमाण । त्याहि वेगळा जाण तू॥६॥
अष्टधा प्रकृति म्हणती जे । तिये तुजपाशी न लागिजे।
सर्वा विरहित राहिजे। साक्षिभूत अखंडित ॥७॥
ऐसा हा करिता आत्मविवेक। अनात्म-वासना मुरेल देख।
वृक्ष सर्वहि काल्पनिक। अंत होई तयाचा ॥८॥
जगी सर्व विद्याकला असती। अध्यात्म त्याहुनि श्रेष्ठ निगुती।
योगीहि तयासी मान देती। प्रेमादरे करुनिया ॥९॥
असोनिया श्रेष्ठ अध्यात्म । त्यांतहि गहन आत्म-वर्म।
जयासी ज्ञान ऐसे नाम। देती ज्ञानी यथार्थ ॥१०॥
ज्ञान झालिया गोमटे। मग ज्ञेय ज्ञाताचि उमटे ।
कोणी ब्रह्मचि चोखटे। म्हणती तथा ॥११॥
शब्दाचे पोटी लक्षार्थ । तो दाविती ज्ञानीसंत समर्थ ।
तया वाचूनिया भ्रांत। न फिटे मनाची ॥१२॥
सर्व इंद्रिया मना वळण। देई कोण तोचि जाण ।
अष्टधा प्रकृतीचे संचालन। करी साक्षिरूप तो ॥१३॥
सुखदुःख खेळ जाणे तोचि। मुळी वार्ता नसे द्वैताची।
करी सर्व लीला अद्वैतचि । साक्षि आत्मा जाणावा ॥१४ ॥
आत्मसाक्षात्कार झाला। न भासे गुणधर्म तयाला ।
स्थूल सूक्ष्म कारणाला। विसरोनि जाय ॥१५॥
ऐसी जयाची होय स्थिति । तया दृश्य-भेद न भासती।
वासना जिथल्या तिथेचि मुरती। तया नराच्या ॥१६॥
जयाची होय अद्वैत वृत्ति । तया ब्रह्मात्मा दिसे सर्वांभूती।
तेथे अज्ञानाची न चले गति । वासना उरती मग कैच्या ॥१७॥
स्वप्नातूनि ठायी आला। स्वप्नसुख दुःखे कैसी त्याला?
तैसेचि मिळता ब्रह्मस्थितीला । अज्ञानजन्य जग गेले ॥१८॥
पाप-पुण्य यांच्या नेम । तेथे न राहे सुखसंभ्रम ।
हे तो देहभिमाचे काम । भौतिक वासना उपजविण॥१९॥
ऐसे करावे साजन अनात्म जाणूनी आत्मदर्षण ।
भ्रांती फिटलिया होईल जाण । वासनाक्षय पूर्णपणे ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकडयादास विचचिते । द्वादश प्रकरण संपूर्णम् ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : August 10, 2026

TOP