प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान)
सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.
मागे कथिली बहु साधने । अनेक पंथ अनेक ज्ञाने ।
परि ती सद्गुरुवाचूनि कवणे। न साधती ॥१॥
जरी साधका व्हावा देव । तरी हाचि सोपा उपाव ।
लीनपणे धरी दृढ भाव। एका सदगुरुचे पायी ॥२॥
सांडी सांडी सर्व पंथ । सद्गुरुवाचोनि होती व्यर्थ ।
म्हणोनि सद्गुरुचा भक्त । पूर्ण होई तत्त्वतः ॥३॥
नम्रतेने करी सेवा। पश्चात्तापे करी धावा ।
ठेवोनिया शुद्ध भावा। शरण जाई सुविचारे ॥४॥
एसे जाण सद्गुरुरूप। जे ब्रम्ह-सोहं-स्वरूप ।
हृदयी जयाचे ज्ञानदीप। उजळले असती ॥५॥
जरी असे नसे सद्गुरु जवळी। नामे राख लावी भाळी।
शीतल तो चंद्रमौळी। करी कृपा हदयीच ॥६॥
असे सांगतो सेवासाधन । करी नीट एकाग्र मन ।
ठेवी स्थिर करोनि आसन । एकांत स्थानी ॥७॥
नासाग्री ठेवी लक्ष। सर्व मनाचीच साक्ष ।
हृदयी धरोनि भावपक्ष । सद्गुरुमूर्ति सन्मुख स्थापी॥८॥
रत्नखचित चौरंग जाण | सुवर्णाचे गंगाळ घेऊन ।
महागंगेचे पाणी आणून । घालो स्नान तयासी ॥९॥
नेसवी जरीकाठी धोतर। अंगी चोळावं सुगंध अत्तर।
बैसवावे दिव्यासनावर । गुरुमूर्तीसी सद्भावे ॥१०॥
सद्गुरु पूजावा आदरेसी। मनसुमने वाहू नि त्यासी।
बिल्वदले पुष्पाक्षतांसी। चंदनासह अर्पावे ॥११॥
गळा घालावा सुंदर हार । शिरी मुकुटाचा संभार ।
अंगी अंगरखा जरीदार । पायी खडावा रत्नजडित ॥१२॥
मग न्याहाळावे पूर्ण स्वरूप। धरोनि चरण आपेआप ।
सदगुरु-नेत्री ज्ञानदीप। सुहास्य वदन अवलोकावे ॥१३॥
द्यावा नैवेद्य पक्वान्नांचा। हा सर्वहि भाव प्रेमाचा।
समर्पावा गुरुचरणी साचा । भक्तिपूर्वक चिंतूनि ॥१४॥
करोनि नैवेद्य अर्पण । तांबूल द्यावा प्रेमे करून ।
पंचारती ओवाळून । चरणी मस्तक ठेवावे ॥१५॥
करावी नम्रपणे प्रार्थना। स्वरूपसिद्धीची याचना।
ध्यानी रंगवावे मना। जेणे ज्ञाना तेज चढे ॥१६॥
ऐसे करिता बहुत दिनी। चित्त एकाग्र होऊनि ।
ध्यानसमाधी लागेल जनी। सद्गुरू कृपे ॥१७॥
ऐसा चाले निशिदिनी नेम । तंव होईल पूर्ण काम।
हृदयीच भेटे आत्माराम। तया नरा शुद्ध ज्ञाने॥१८॥
शुध्द राहवे अंतरी। वैराग्यतेज शरीरावरी।
कृपा करील तंव श्रीहरी। उद्धरावया निधारे ॥१९॥
प्रथम करिता भासेभास । उघडेल कपाट अनायास ।
मोकलेल षड्विकार त्रास । तया नराचा येणे पंथे ॥२०॥
न धरी काही योग-पंच। सोपे सुंदर हेचि मत ।
सद्गुरुवाचोनि ज्ञान-ज्योत। कैसी प्रकटे ? ॥२१ ॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते। नवम प्रकरण संपूर्णम् ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : August 10, 2026

TOP