मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
ज्ञोनोत्तर जीवन

ज्ञोनोत्तर जीवन

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


२७७

मी तो स्वयें परब्रह्म । मी चि स्वयें आत्माराम
मी तो असे निरूपाधी । मज नाही आधि -व्याधि
मी तो एकट एकला । द्वैत-भाव मावळला
मज विण नाहीं कोणी । एका शरण जनार्दनी

भावार्थ
आत्मज्ञान झालेल्या साधकाचे मनोगत या अभंगांत संत एकनाथ व्यक्त करतात. आपणास कोणतिही आधि, व्याधी, उपाधी नाहीं. चित्तातील द्वैत भाव लयाला जाऊन परब्रह्म रुपाशी एकरूप झालो असून सद्गुरू चरणी सर्वभावे शरणागत आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

२७८

घर सोडोनि जावें परदेशा । मज सवें देव सरिसां
कडे कपाटें सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरि
आतां कोणीकडें जावें । जिकडें पाहे तिकडें देव
एका बैसला निरंजनी । न जाईजे जनीं वनीं

भावार्थ

घराचा त्याग करून परदेशी गेलो तरी देव सतत आपल्या समवेत आहे ही जाणीव असल्याने एकनिष्ठ भक्ताला जिकडे पाहावे तिकडे देवाचे अस्तित्व जाणवते. एका जनार्दनी म्हणतात, देव नाही असे ठिकाण च नसल्याने नगरांत किंवा अरण्यांत कोठेही न जातां एका ठिकाणी निवांत बसावे.

२७९

जिकडे जावें तिकडे देवचि सांगातें । ऐसे केले नाथें पंढरीच्या
शब्द तेथें झाला समूळ चि वाव । गेला देहभाव हारपोनि
अंतरी बाहेरीं एकमय झाले । अवघे कोंदाटलें परब्रह्म
एका जनार्दनी ऐसी झाली वृत्ती । वृत्तीची निवृत्ती चिदानंदीं

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलाने अशी जादू केली कीं, जिकडे जावे तेथे देव सन्निध आहे असे वाटते. बाहेरील विश्व आणि अंतरंग विठ्ठलमय झालें. देहाचे भान हरपून गेले. सृष्टीतील अणू, रेणू या परब्रह्म स्वरुपाने व्यापून टाकले. या चे वर्णन शब्दात करावें तर शब्द च पोकळ ठरले. या चिदानंद स्वरूपांत वृत्तीची निवृत्ती झाली.

२८०

येणें जाणें खुंटलें क्रिया -कर्म ठेले । मज माझें भेटले आत्मरुप
त्यागूं तें काय भोगूं ते काय । सर्व ब्रह्मरूप पाहे कोंदाटलें
क्रिया कर्म धर्म निखिल परब्रह्म । त्यागूं भोगूं तेथें केवळ भ्रम
एका जनार्दनी सहजीसहज एक । एकी एक पाहतां कैंचेअनेक

भावार्थ

साधकाच्या ज्ञानोत्तर जीवनात कोठे येणे जाणें, क्रिया कर्म संपून जाते. आत्मज्ञान झाल्यानंतर कांही मिळवायचे बाकी राहत नाही. काही भोग किंवा कशाचा त्याग करण्याची ईच्छा च उरत नाही. त्याग, भोग या केवळ भ्रामक कल्पना आहेत असे वाटते. सर्व क्रिया, कर्म, धर्म एका परब्रह्मांत विलीन होतात. एका जनार्दनी म्हणतात, सर्वत्र व्यापून राहिलेल्या परब्रह्माचा एक अंश बनल्यावर दुजेपणाची वार्ता संपून जाते.

२८१

सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसना चि झाली स्वये
आतां चाखावें तें कायें । जिव्हा अमृता वाकुल्या दिये
तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा
एका जनार्दनी गोडी । तया क्षण एक रसना न सोडी

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेल्या उपदेशामृताची गोडी रसनेने चाखली आणि सर्व गोड पदार्थापेक्षा मधुर रुप रसनेनें धारण केले. रसनेलाच एव्हढी गोडी प्राप्त झाली कीं त्यापुढे अमृताची गोडी फिकी पडली. रसनेचे हे माधुर्य चाखण्यासाठी सर्वांगाला जिभा फुटल्या. गुरु- मुखांतून आलेल्या उपदेशाच्या अमृताची गोडी एक क्षणभरही सोडण्यास रसना तयार नाही.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP