मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
एकनाथांचा परिपाठ

एकनाथांचा परिपाठ

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


१०३

हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ।
हरि मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ।
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगे हरिरुप ।
हरिरुप ध्यानी हरिरुप मनी । एका जनार्दनी हरि बोला ।

भावार्थ

हरिदासाला उत्कट भावभक्तिमुळे सर्वत्र दाही दिशांना हरिरुप दिसते. हरीनामाचा सतत जप करीत असल्याने हरिदासाच्या सर्व चिंता मिटून जातात, त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही, कारण त्याच्या सर्व वासना हरिरुप झालेल्या असतात. एका जनार्दनी म्हणतात, हरिरुप ध्यानी-मनी धरुन केवळ हरिनामाचा जप करावा.

१०४

हरि हरि बोला नाही तरी अबोला । व्यर्थ गलबला करू नका ।
नको नको मान सांडी आभिमान । सोडी मी-तूपण तोचि सुखी ।
सुखी जेणे व्हावे जग निववावे । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ।
मार्ग जया कळे भाव-भक्ति बळे । जगाचिये मेळे न दिसती ।
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी । एका जनार्दनी ओळखिले ।

भावार्थ:

जो कोणी मानापमानाच्या कल्पनांचा त्याग करुन अभिमान, आपपर भाव सोडून इतरांशी मित्रत्वाचे नाते जोडतो तो जीवनात सुखी होतो. ईश्वरावरील अतूट भक्तिभावामुळे जगाचे बाजारी स्वरुप दिसत नाही अशा भक्ताला जनी-वनी केवळ जनार्दनच भरला आहे हे ओळखता येते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अज्ञानी लोकांना सन्मार्ग दाखवून त्यांचे दु:ख दूर करावे. मुखाने केवळ हरिनामाचा जप करावा किंवा मौन धरावे व्यर्थ गलबला करु नये.

१०५

ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दी सहित ।
सिध्दि लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी काई ।
काय ते करावे संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ।
केले कर्म झाले तेचि भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ।
एका जनार्दनी नाही यातायात । सुखाची विश्रांती हरी संगे ।

भावार्थ:

ज्याने परमेश्वरी तत्व जाणून घेतले त्याला सिध्दीसहित मोक्ष प्राप्त होतो. परंतु सिध्दी साधकाच्या मनाला वेड लावतात. त्यामुळे साधक देवाच्या भक्तिला पारखा होतो. राजहंसाला दूधापासून पाणी वेगळे करण्याची सिध्दी प्राप्त झालेली असते. पण त्या सिध्दीला फारसे महत्त्व नसते. परमेश्वरी तत्व सगुण की निर्गुण या संदेहात पडलेले मन ज्ञानमार्गाने जावे की भक्तिमार्ग आचरावा याविषयी साशंक बनते. कर्ममार्ग अनुसरला तरी कर्माची फळे भोगावी लागतात. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, यापैकी कोणतीही यातायात न करता हरिस्मरणात सुखाची विश्रांती मिळते.

१०६

जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ।
वैकुंठ-कैलासी तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठे ।
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ।
आदि-मध्य-अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ।
एकाकार झाले जीव-शिव दोन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ।

भावार्थ:

जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व हरिरुप आहे, सर्वत्र चैतन्य रुपाने हरि व्यापून राहिला असून कोठेही रिकामी जागा नाही सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्थांमध्ये हरि हेच अविनाशी तत्व अस्तित्वात आहे आणि हे तत्व अनंत असून त्याला अंत नाही. एकच हरिरुप सृष्टीतिल अनंत रुपानें नटले आहे. जीव व शिव एकरुप होतो तेव्हा सर्वत्र हरिदर्शन विनासायास घडते. वैकुंठात, कैलास पर्वतावर आणि तीर्थक्षेत्री भक्तांसाठी देव तिष्ठत उभा आहे. एका जनार्दनी म्हणतात, पूजा, ध्यान, तप यांची गरज नाही. सद्गुरुकृपेने वैष्णवांचे हे रहस्य समजून येते.

१०७

सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया । आनंद-पद जया म्हणती हरि ।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण-निर्गुण हरी-पायी ।
तत्सदिति ऐसे पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ।
हरिपद-प्राप्ति भोळ्या भाविकांसी । अभिमानियासी गर्भवास ।
अस्ति भाति प्रिय ऐशी पदे तिन्ही । एका जनार्दनी तेची झाले ।

भावार्थ:

सच्चिदानंद या परमेश्वरी नामाची फोड करून सांगतांना एका जनार्दनी म्हणतात, ब्रह्म हे सत्पद (सत्य), माया हे चित्पद (सनातन) आणि हरि हे आनंद-पद आहे. ब्रह्म हे निर्गुण, माया ही सगुण तर हरि हा सगुण, निर्गुण असून आनंदमय आहे. ब्रह्म आणि माया ह्या पैलवस्तु डोळ्याला अगोचर आहेत असे गीतेमध्ये भगवान सांगतात. भोळ्या भाविकांना हरिपदाची प्राप्ति होऊन मोक्षाचा मार्ग सुलभ होतो, तर ज्ञानामुळे अहंकार निर्माण होऊन जन्ममरणाच्या बंधनात पडावे लागते.

१०८

हरि बोला देता हरि बोला घेता । हांसता खेळता हरि बोला ।
हरि बोला गाता हरि बोला खांता । सर्व कार्य करिता हरि बोला ।
हरि बोला एकांती हरि बोला लोकांती । देह-त्याग अंती हरि बोला ।
हरि बोला भांडता हरि बोला कांडता । उठता बैसता हरि बोला ।
हरि बोला जनी हरि बोला विजनी । एका जनार्दन हरि बोला ।

भावार्थ:

कोणतीही वस्तू देतांना, घेतांना, खातांना तसेच गातांना हरिचे नाम घ्यावे. हसून खेळून आनंदात असतांना, कष्टाची कामे करतांना किंवा रागाने भांडतांनासुध्दा हरिनाम स्मरण करावे. एकांतामध्ये चिंतन करतांना किंवा चारचौघांत हास्य विनोद करतांना, जनी-विजनी हरीच्या नामाचा वाचेने सतत जप करावा.

१०९

आवडीने भावे हरि-नाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।
नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
सकळ जीवांचा करिता सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ।
जैसी स्थिति आहे तैशापरि राहे । कौतुक तु पाहे संचिताचे ।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ।

भावार्थ:
लक्ष्मीचा पती सर्व जीवांचे पालन-पोषण, सांभाळ करणारा व सर्वांची चिंता करणारा आहे, सर्व कांही जाणणारा आहे. या परमेश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून ज्या परिस्थितीत आहे तिचा स्विकार करावा व भविष्यात जे घडेल त्याचा संचित म्हणून अंगिकार करावा. या घटना आपल्या प्रारब्धाचा भोग आहेत असे मानावे. कोणत्याही गोष्टीचा खेद न करता मनापासून हरिचे नामस्मरण करावे. त्यामुळे हरिकृपा होऊन प्रारब्धातील दु:खांचा नाश होईल असे एका जनार्दन सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP